गुरुचरित्र – अध्याय २८(अठ्ठावीसावा)
॥कर्मविपाककथनं॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्री गुरुभ्यो नमः॥
| मूळ ओवी | ओवीचा अर्थ |
|---|---|
| नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांग आम्हांसी । उल्हास माझे मानसी । गुरुचरित्र अतिगोड ॥ १ | नामधारकाने सिद्धांना विनंती केली की, "गुरुचरित्राची ही गोड कथा ऐकून माझे मन प्रफुल्लित झाले आहे, कृपया पुढील कथा सांगा." |
| सिद्ध म्हणे नामधारका । कथा असे अतिविशेष । ऐकता जाती सर्व दोष । ज्ञानज्योतिप्रकाशे ॥ २ | सिद्ध म्हणाले, "पुढील कथा अतिशय विशेष आहे. ही ऐकल्याने ज्ञानाचा प्रकाश मिळतो आणि सर्व दोष नष्ट होतात." |
| श्रीगुरु म्हणती पतितासी । आपुले पूर्वजन्म पुससी । सांगेन ऐक परियेसी । चांडालजन्म होणार गति ॥ ३ | श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले, "तू तुझ्या पूर्वजन्माबद्दल विचारतोस, तर ऐक - कोणत्या कर्मामुळे माणसाला चांडाळाचा जन्म प्राप्त होतो, ते मी तुला सांगतो." |
| पुण्यपापांची गति । आपुले आर्जव भोगिती । कर्मविपाकी असे ख्याति । नीचश्रेष्ठकर्मानुसारी ॥ ४ | माणसाला त्याच्या पुण्य आणि पापांच्या गतीनुसार फळ भोगावे लागते. कर्माच्या सिद्धांतानुसार नीच किंवा श्रेष्ठ जन्म मिळतो. |
| विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण । यांचेपासाव चांडाल वर्ण । उपजला असता ज्ञातिहीन । जातिविभाग कर्मापरी ॥ ५ | ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णव्यवस्थेत कर्माच्या भ्रष्टतेमुळे चांडाल योनी निर्माण होते. |
| विप्रस्त्रियेपासी देखा । शूद्र जाय व्यभिचारिका । पिंड उपजे तो चांडालिका । सोळावी जाती चांडाल ॥ ६ | जेव्हा शूद्र पुरुष ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार करतो, तेव्हा त्यापासून जन्माला येणारी संतती ही 'चांडाल' मानली जाते. |
| हे मूळ उत्पत्तीचे लक्षण । नाना दोषांचे आचरण । तेणे हीन जन्म घेणे । विप्रादि चारी वर्णांसी ॥ ७ | हे चांडाल जन्माचे मूळ लक्षण असून, विविध दोषांच्या आचरणामुळे चारही वर्णांतील व्यक्तींना हीन जन्म घ्यावा लागतो. |
| या दोषाचा विस्तार । सांगतो की सविस्तर । विप्रे करिता अनाचा । जन्म हीनजाती पावे ॥ ८ | जर ब्राह्मणाने अनाचार (गैरवर्तन) केला, तर त्याला पुढच्या जन्मी हीन जात प्राप्त होते. |
| गुरु अथवा मातापिता । सांडोनि जाय तत्त्वतां । चांडालजन्म होय निरुता । सोडिता कुलस्त्रियेसी ॥ ९ | जो आपल्या गुरुंना, मातापित्यांना किंवा आपल्या पत्नीला सोडून देतो, त्याला चांडाळाचा जन्म मिळतो. |
| कुलदेवता सोडोनि एका । पूजा करी आणिका । तो होय चांडाल देखा । सदा अनृत बोले नर ॥ १० | जो आपल्या कुलदेवतेला सोडून दुसऱ्या दैवताची भक्ती करतो किंवा जो नेहमी खोटे बोलतो, तो चांडाल होतो. |
| सदा जीवहिंसा करी । कन्याविक्रय मनोहरी । लटकेचि आपण प्रमाण करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥ ११ | जो जीवहिंसा करतो, मुलगी विकतो (हुंडा/पैसा घेतो) किंवा खोटी साक्ष देतो, तो चांडाल योनीत जन्माला येतो. |
| शूद्रहस्ते करी भोजन । अश्वविक्रय करी ब्राह्मण । तोही चांडाल होय जाण । सदा शूद्रसंपर्कै ॥ १२ | जो ब्राह्मण शूद्राच्या हातचे अन्न जेवतो, घोडे विकतो किंवा नेहमी नीच संगतीत राहतो, तो चांडाल होतो. |
| शूद्रस्त्रीसी सदा संग । नित्य असे दासीयोग । गृहभांड अतळती त्याग । तेणे देवपितृकर्मे करी ॥ १३ | जो शूद्र स्त्रीच्या संगतीत राहतो आणि त्या अवस्थेत देव-पितृ कार्ये करतो, तो पतित होतो. |
| तोही पावे हीनयोनी । जो का अग्नि-घाली रानी । गायवासरांसी विघडोनि । वेगळी करी तोही । होय चांडाल ॥ १४ | जो जंगलात आग लावतो (वणवा) किंवा गाय आणि वासराला एकमेकांपासून वेगळे करतो, तो चांडाल होतो. |
| सोडी आपुल्या जननीते । आणि मारी लेकराते । वेगळी करी आपुल्या सत्ते । तोही जन्मे चांडाल ॥ १५ | जो स्वतःच्या आईला सोडतो किंवा लहान मुलांना मारतो/त्यांना आईपासून तोडतो, तो चांडाल होतो. |
| बैलावरी विप्र बैसे । शूद्रान्न जेवी हर्षे । चांडाल होय भरवसे । ऐसे म्हणती श्रीगुरु ॥ १६ | जो ब्राह्मण बैलावर बसतो किंवा आनंदाने शूद्राचे अन्न जेवतो, तो नक्कीच चांडाल होतो. |
| विप्र तीर्थास जावोन । श्राद्धादि न करी जाण । परान्न प्रतिग्रह घेणे । तो होय चांडाल ॥ १७ | जो ब्राह्मण तीर्थयात्रेला जाऊन तिथे श्राद्ध करत नाही किंवा विनाकारण इतरांचे दान घेतो, तो चांडाल होतो. |
| षट्कर्मेरहित विप्र देखा । कपिला गाईचे दुग्ध ऐका । न करिता अभिषेका । क्षीरपान जो करी ॥ १८ | जो ब्राह्मण आपली नित्य कर्मे करत नाही आणि देवांना अभिषेक न करता कपिला गाईचे दूध पितो, तो दोषपात्र ठरतो. |
| तोही पावे चांडालयोनी । तुळसीपत्रे ओरपोनि । पूजा करी देवांलागोनि । शालिग्राम शूद्रे भजलिया ॥ १९ | तुळशीची पाने ओरबडून काढणारा किंवा शूद्राने शालिग्रामाची पूजा केल्यास चांडाल योनी प्राप्त होते. |
| न सेवीच मातापिता । त्यजी त्यासी न प्रतिपाळिता । चांडाल होय जन्मता । सप्तजन्मी कृमि होय ॥ २० | जो आई-वडिलांची सेवा करत नाही, तो चांडाल होतो आणि पुढील सात जन्म कीडा (कृमी) म्हणून जन्माला येतो. |
| पहिली एक स्त्री असता । दुजी करोनि तिसी त्यजिता । होय जन्म त्यासी पतिता । आणिक सांगेन एक नवल ॥ २१ | पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीला सोडणाऱ्याला पतित जन्म मिळतो. |
| श्रमोनि अतिथी आला असता । वेद म्हणवोनि अन्न घालिता । जन्म पावे हा तत्त्वता । चांडालयोनी परियेसा ॥ २२ | थकलेला अतिथी दारी आला असता त्याला अन्न न देणे किंवा तो वेदवेत्ता असताना त्याला उपाशी ठेवणे पापाचे आहे. |
| योग्य विप्रांते निंदिती । आणिक जाती पूजिती । चांडालयोनी जाती । वृत्तिलोप केलिया ॥ २३ | जे योग्य ब्राह्मणांची निंदा करतात किंवा दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन (वृत्ती) हिरावून घेतात, ते चांडाल होतात. |
| तळी विहिरी फोडी मोडी । शिवालयी पूजा तोडी । ब्राह्मणांची घरे मोडी । तोही जन्मे पतितकुळी ॥ २४ | तलाव, विहिरी फोडणारा, देवालयातील पूजा बंद पाडणारा किंवा ब्राह्मणांची घरे पाडणारा पतित कुळात जन्म घेतो. |
| स्वामिस्त्रियेसी । शत्रुमित्रविश्वासस्त्रीसी । जो करी व्याभिचारासी । तोही जन्मे पतितागृही ॥ २५ | मालकाची पत्नी, शत्रू-मित्राची पत्नी किंवा विश्वासू स्त्रीशी व्यभिचार करणारा पतिताच्या घरी जन्माला येतो. |
| दोघी स्त्रिया जयासी । त्यात ठेवी प्रपंचेसी । अतिथि आलिया अस्तमानासी । ग्रास न दे तोही पतित होय ॥ २६ | दोन पत्नी असताना त्यांच्यात भेदभाव करणारा किंवा संध्याकाळी आलेल्या अतिथीला घास न देणारा पतित होतो. |
| त्रिसंध्यासमयी देखा । जो विप्र जेवी अविवेका । भाक देउनी फिरे निका । तो जन्मे चांडालयोनी ॥ २७ | संधिकाळात (संध्याकाळी) जेवणारा ब्राह्मण किंवा वचन देऊन ते न पाळणारा चांडाल योनीत जन्म घेतो. |
| राजे देती भूमिदान । आपण घेती हिरोन । संध्याकाली करी शयन । तोही होय चांडाल ॥ २८ | दिलेले भूदान परत घेणारा किंवा संध्याकाळी झोपणारा चांडाल होतो. |
| वैश्वदेवकालि अतिथीसी । जो करी दुष्टोत्तरेसी । अन्न न देई तयासी । कुक्कुटजन्म होवोनि उपजे ॥ २९ | अतिथीला वाईट बोलून हाकलून देणारा किंवा अन्न नाकारणारा पुढच्या जन्मी कोंबडा (कुक्कुट) होतो. |
| गंगातीर्थांची निंदा करी । एकादशी भोजन करी । स्वामीस सोडी समरी । चांडालयोनी तया जन्म ॥ ३० | गंगा नदीची निंदा करणारा, एकादशीला जेवणारा किंवा संकटात मालकाला सोडून पळणारा चांडाल होतो. |
| स्त्री संभोगी पर्वणीसी । अथवा हरिहरादिवशी । वेद शिकवी शूद्रासी । चांडालयोनी जन्म पावे ॥ ३१ | पर्वकाळात किंवा पवित्र दिवशी स्त्री-भोग घेणारा किंवा अपात्र व्यक्तीला वेद शिकवणारा चांडाल होतो. |
| मृत्युदिवसी न करी श्राद्ध । केले पुण्य सांगे प्रसिद्ध । वाटेकरांसी करी भेद । चांडालयोनी जन्म पावे ॥ ३२ | पितृ पक्षात श्राद्ध न करणारा, स्वतःच्या पुण्याचा गर्व करणारा किंवा वाटणीत भेदभाव करणारा चांडाल होतो. |
| ग्रीष्मकाली अरण्यात । पोई घालिती ज्ञानवंत । तेथे विघ्न जो करी । तोही जन्मे चांडालयोनी ॥ ३३ | उन्हाळ्यात पाणपोई सुरू करणाऱ्यांच्या कार्यात अडथळा आणणारा चांडाल होतो. |
| नाडीभेद न कळता वैद्यकी । जाणोनि औषधे दे आणिकी । तो होय महापातकी । चांडालयोनीत संभवे ॥ ३४ | वैद्यकीचे ज्ञान नसताना चुकीची औषधे देणारा महापातकी असून तो चांडाल होतो. |
| जारण मारण मोहनादि । मंत्र जपती कुबुद्धि । जन्म चांडाल होय त्रिशुद्धी । वेदमार्ग त्यजिता विप्रे ॥ ३५ | जादूटोणा किंवा वाईट मंत्रांचा जप करणारा आणि वेदमार्ग सोडणारा ब्राह्मण चांडाल होतो. |
| श्रीगुरुसी नर म्हणे कोण । हरिहराते निंदे जाण । अन्य देवतांचे करी पूजन । तो नर पतित होय ॥ ३६ | श्रीगुरूंना सामान्य माणूस समजणारा किंवा विष्णू-शिवाची निंदा करणारा पतित होतो. |
| ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । आपुले कर्म त्यजूनि मंद । आणिक कर्म आचरे सदा । तोही होय चांडाल ॥ ३७ | जो स्वतःच्या वर्णाचे विहित कर्म सोडून दुसऱ्याची कर्मे करतो, तो चांडाल होतो. |
| शूद्रापासूनी मंत्र शिके । त्यासी घडती सर्व पातके । गंगोदक क्षीरोदके । श्वानचर्मी घातले परी ॥ ३८ | अपात्र व्यक्तीकडून मंत्र घेणे म्हणजे गंगेचे पाणी कुत्र्याच्या चामड्यात ठेवण्यासारखे अपवित्र आहे. |
| विधवा स्त्रीशी संग करी । शिव्या देऊन अतिथि जेववी घरी । श्राद्धदिनी पिंड न करी । चांडालयोनी तो जन्मे ॥ ३९ | विधवा स्त्रीशी संग करणारा किंवा शिव्या देऊन दान देणारा चांडाल योनीत जन्म घेतो. |
| माता पिता गुरु द्वेषी । तो जन्मे चांडालयोनीसी । आणिक जन्म पापवंशी । उपजोनि येती परियेसा ॥ ४० | आई-वडील आणि गुरूंचा द्वेष करणारा चांडाल योनीत जन्माला येतो. |
| गुरूची निंदा करी हर्षी । सदा असे विप्रद्वेषी । वेदचर्चा करी बहुवशी । तो होय ब्रह्मराक्षस ॥ ४१ | गुरूंची निंदा करणारा आणि विनाकारण वेदांवर वाद घालणारा ब्रह्मराक्षस होतो. |
| भजे आपण एक दैवत । दुजे देव निंदा करीत । तो होय अपस्मारित । दरिद्ररूपे पीडतसे ॥ ४२ | एका देवाची भक्ती करून दुसऱ्या देवाची निंदा करणारा फेफरे (अपस्मार) आणि दारिद्र्याने पीडित होतो. |
| माता पिता गुरु वर्जोन । वेगळा होय स्त्री आपण । बेरडाचे पोटी उपजोन । रोगी होऊन राहतसे ॥ ४३ | आई-वडिलांना सोडून फक्त पत्नीसाठी वेगळे राहणारा रोगी होतो. |
| सदा वेद दूषी आपण । अवमानीत ब्राह्मण । कर्मभ्रष्ट होय आपण । मूत्रकृच्छ्ररोगी होय ॥ ४४ | वेदांची निंदा आणि ब्राह्मणांचा अपमान करणारा मूत्रविकाराने (मूत्रकृच्छ्र) ग्रस्त होतो. |
| लोकांचे वर्मकर्म आपण । सदा करी उच्चारण । ह्रदयरोगी होय जाण । महाकष्ट भोगीतसे ॥ ४५ | दुसऱ्यांच्या दोषांचे सतत प्रदर्शन करणारा हृदयरोगी होतो. |
| गर्भपात करी स्त्रियेसी । वांझ होवोनि उपजे परियेसी । पुत्र झालिया मरती त्वरेसी । गर्भपात करू नये ॥ ४६ | गर्भपात करणारी स्त्री पुढच्या जन्मी वांझ होते किंवा तिची मुले अल्पायुषी ठरतात. |
| धर्मशास्त्रादि पुराण । सांगता नायके जाण । आणिक जेविता दृष्टि आपण । बहिरट होवोनि उपजे ॥ ४७ | धर्मशास्त्रे न ऐकणारा किंवा जेवताना वाईट दृष्टी ठेवणारा बहिरा होऊन जन्माला येतो. |
| पतितासवे करी इष्टती । गर्दभजन्म पावती । त्यासी रस औषध घेती । मृगयोनी जन्मे तो ॥ ४८ | पतितांशी मैत्री करणारा गाढव होतो आणि चुकीची औषधे घेणारा हरीण (मृग) होतो. |
| ब्रह्महत्या केली जरी । क्षयरोगी होय निर्धारी । सुरापानी ओळखा परी । श्यामदंत उपजेल ॥ ४९ | ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी (TB) होतो आणि मद्यपान करणाऱ्याचे दात काळे (श्यामदंत) होतात. |
| अश्ववध गोवध करिता । वांझ ज्वरी होय निश्चिता । सवेचि होय अनुतप्तता । दोष काही नाही त्यासी ॥ ५० | घोडा किंवा गाय मारणारा तापाने फणफणतो, मात्र पश्चात्ताप झाल्यास दोष मुक्त होतो. |
| विश्वासघातकी नरासी । जन्म होय ऐसा त्यासी । अन्न जेविता वांति उर्वशी । अन्नवैरी तो होय ॥ ५१ | विश्वासघातकी माणसाला अन्नाची ओकारी येते, तो अन्नवैरी होतो. |
| सेवक एकाचा चाळवोन । घेवोनि जाती जे जन । त्यासी होय जाण बंधन । कारागृह भोगीतसे ॥ ५२ | दुसऱ्याच्या सेवकाला फसवून नेणाऱ्याला कैद (बंधन) भोगावे लागते. |
| सर्पजाती मारी नर । सर्पयोनी पुढे निर्धार । ऐसे दोष अपार । आता तस्कर प्रकरण सांगेन ॥ ५३ | साप मारणारा पुढच्या जन्मी स्वतः सर्प होतो. आता चोरीच्या (तस्कर) पापांची फळे सांगतो. |
| स्त्रियांते चोरूनि घेऊनि जाय । मतिहीन जन्म होय । सदा क्लेशी आपण होय । अंती जाय नरकासी ॥ ५४ | स्त्रियांचे अपहरण करणारा मतिमंद होतो आणि शेवटी नरकात जातो. |
| सुवर्णचोरी करी नर । प्रमेहव्याधि होय निर्धार । पुस्तक चोरिता नर । अंध होउनि उपजे देखा ॥ ५५ | सोने चोरणाऱ्याला प्रमेह होतो आणि पुस्तक चोरणारा अंध होतो. |
| वस्त्रचोरी करी जरी । श्वित्री रोगी होय निर्धारी । गणद्रव्यचोरी घरी । ब्रह्मांडपुराणी बोलिले असे ॥ ५६ | कपडे चोरणारा कुष्ठरोगी (कोड) होतो आणि सार्वजनिक संपत्ती चोरणारा दंड भोगतो. |
| परद्रव्य-अपहार देखा । परदत्तापहार विशेषा । परद्वेषी नर ऐका । धान्य अपुत्री होउनि उपजे ॥ ५७ | दुसऱ्याचे धन किंवा धान्य चोरणारा निपुत्रिक होतो. |
| अन्नचोरी केलिया देखा । गुल्मव्याधि होय ऐका । धान्य करील तस्करिका । रक्तांग होय दुर्गंध शरीर ॥ ५८ | अन्न चोरणाऱ्याला पोटाचे विकार होतात आणि धान्य चोरणाऱ्याचे शरीर दुर्गंधीयुक्त होते. |
| का एखादा तैल चोरी । तोही दुर्गंधी पावे शरीरी । परस्त्रीब्रह्मस्व अपहारी । ब्रह्मक्षसजन्म पावे ॥ ५९ | तेल चोरणाऱ्याचे शरीर दुर्गंधी मारते. परस्त्री किंवा ब्राह्मणाचे धन हरण करणारा ब्रह्मराक्षस होतो. |
| मोती माणिक रत्ने देखा । चोरी करी नर ऐका । हीनजातीसी जन्म निका । पावे नर अवधारा ॥ ६० | मौल्यवान रत्ने चोरणारा नीच जातीत जन्म घेतो. |
| पत्रशाखादि फळे चोरी । खरूजी होय अपरंपारी । रक्तांगी होय निर्धारी । गोचिड होय तो नर ॥ ६१ | फळे किंवा झाडांची पाने चोरणारा गोचीड होतो किंवा त्याला खाज सुटते. |
| कांस्य लोह कर्पास लवण । तस्करिता नरा जाण । श्वेतकुष्ठ होय निर्गुण । विचारोनि रहाटावे ॥ ६२ | कासे, लोखंड, कापूस किंवा मीठ चोरणाऱ्याला पांढरे कोड होते. |
| देवद्रव्यापहारी देखा । देवकार्यनाश अपहार देखा । पंडुरोगी तो निका । फळचोरी विद्रूपी ॥ ६३ | देवाचे धन किंवा कार्यात अडथळा आणणारा पांडुरोगी होतो. |
| परनिक्षेपचोरी करी देखा । करिता होय सदा शोका । धनतस्कर उंष्ट्र ऐका । जन्म पावे अवधारा ॥ ६४ | ठेवीत ठेवलेले धन चोरणारा नेहमी दुःखी राहतो किंवा उंट होतो. |
| फलचोरी होय वनचर । जलचोरही होय कावळा थोर । गृहोपकरणे तस्कर । काकजन्म तो पावे ॥ ६५ | फळे चोरणारा वनचर (माकड), पाणी चोरणारा कावळा आणि घरातील वस्तू चोरणारा कावळा होतो. |
| मधुतस्कर अवधारी । जन्म पावे होय घारी । गोरस करी चोरी । कुष्ठी होय परियेसा ॥ ६६ | मध चोरणारा घार होतो आणि दूध-दही चोरणारा कुष्ठरोगी होतो. |
| श्रीगुरु म्हणती पतितासी । जन्म पावे ऐसिया दोषी । आता सांगेन व्यभिचारप्रकरणेसी । शांतिपर्वी बोलिले असे ॥ ६७ | श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले, अशा पापांमुळे हे जन्म मिळतात. आता व्यभिचाराची फळे ऐक. |
| परस्त्री आलिंगिया देखा । शतजन्म श्वान निका । पुढे मागुती सप्तजन्मिका । भोगी दुःखा अवधारा ॥ ६८ | परस्त्रीला आलिंगन देणारा शंभर जन्म कुत्रा होतो आणि पुढेही सात जन्म दुःख भोगतो. |
| परस्त्रीयोनी पाहे दृष्टीने । जन्मे तो अंधत्वपणे । बंधुभार्यासंपर्क करणे । गर्दभजन्म तो पावे ॥ ६९ | परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा अंध होतो आणि भावाच्या पत्नीशी संबंध ठेवणारा गाढव होतो. |
| गुरुपत्नीसंग करी । तोही पावे नरकद्वारी । अतिपातकी महाघोरी । खळ होवोनि उपजेल ॥ ७० | गुरूंच्या पत्नीशी कुकर्म करणारा नरकात जातो आणि अतिशय नीच योनीत जन्माला येतो. |
| तोही जन्म सोडोनि । निघोनि जाय सर्पयोनी । पुन्हा नरकी जावोनि । नाना कष्ट भोगीतसे ॥ ७१ | गुरुपत्नीशी गमन करणारा नरक भोगून सर्पयोनीत जातो आणि पुन्हा नरकात जाऊन अनंत कष्ट भोगतों. |
| सखीभार्यासवे ऐका । मातुलस्त्री असे विशेखा । येखादा करी संपर्का । श्वानयोनी जन्म पावे ॥ ७२ | "जो मित्राच्या पत्नीशी किंवा मामीशी (मातुलस्त्री) संबंध ठेवतो, तो पुढच्या जन्मी कुत्रा होतो." |
| परस्त्रियांचे वदन । न करावे कदा अवलोकन । कुबुद्धी करिता निरीक्षण । चक्षुरोगी होऊनि उपजे ॥ ७३ | परस्त्रियांकडे कधीही वाईट नजरेने पाहू नये; तसे केल्यास माणूस चक्षुरोगी (डोळ्यांचे आजार असलेला) होऊन जन्माला येतो. |
| आपण असे शूद्रजाति । विप्रस्त्रीशी करी रति । ती दोघेही कृमि होती । हे निश्चित अवधारा ॥ ७४ | "जर शूद्र पुरुष ब्राह्मण स्त्रीशी संबंध ठेवतो, तर ते दोघेही पुढच्या जन्मी कीडा (कृमी) होतात." |
| सदा शूद्रसंपर्क करी । याची स्त्री व्यभिचारी । जन्म पावे हो कुतरी । महादोष बोलिलासे ॥ ७५ | "जो नेहमी नीच संगतीत राहतो, त्याची पत्नी व्यभिचारी होते आणि ती पुढच्या जन्मी कुत्री होते." |
| ऐसे तया पतिताप्रती । श्रीगुरु आपण निरोपिती । ऐकत होता त्रिविक्रमभारती । प्रश्न केला श्रीगुरूसी ॥ ७६ | श्रीगुरु त्या पतिताला हे सांगत असताना त्रिविक्रम भारथींनी श्रीगुरूंना प्रश्न विचारला. |
| स्वामी निरोपिले धर्म सकळ । ऐकता होय मन निर्मळ । जरी घडले एक वेळ । पाप जाय कवणेपरी ॥ ७७ | "स्वामी, आपले प्रवचन ऐकून मन निर्मळ झाले. पण जर एखाद्याकडून एकदा पाप घडले, तर ते कसे नष्ट होते?" |
| श्रीगुरु म्हणती त्रिक्रमासी । प्रायश्चित्त असे पापासी । पश्चात्ताप होय ज्यासी । पाप नाही सर्वथा ॥ ७८ | "श्रीगुरु म्हणाले, 'प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे. ज्याला खरोखर पश्चात्ताप होतो, त्याचे पाप उरत नाही.'" |
| पाप असे थोर केले । अंतःकरणणी असे खोचले । त्यासी प्रायश्चित्त भले । कर्मविपाकी बोलिले ॥ ७९ | "मोठे पाप केले असेल आणि ते मनात टोचत असेल, तर शास्त्रोक्त प्रायश्चित्त घेणे आवश्यक आहे." |
| प्रायश्चित्तांची विधाने । सांगेन ऐका स्थिर मने । अनेक ऋषींची वचने । ती सांगेन ऐका तुम्ही ॥ ८० | श्रीगुरु प्रायश्चित्ताचे विविध प्रकार आणि ऋषींची वचने सांगू लागले. |
| प्रथम व्हावा ब्रह्मदंड । तेणे होय पापखंड । गोदाने सालंकृत अखंड । अशक्त तरी द्रव्य द्यावे ॥ ८१ | "प्रथम 'ब्रह्मदंड' द्यावा. गोदान करावे, शक्य नसल्यास त्याचे मूल्य (द्रव्य) द्यावे." |
| निष्क अथवा अर्धनिष्क । सूक्ष्म पाप पाव निष्क । स्थूलसूक्ष्म असेल पातक । तेणे विधीं द्रव्य द्यावे ॥ ८२ | पापाच्या तीव्रतेनुसार (सूक्ष्म किंवा स्थूल) सुवर्ण नाणी (निष्क) किंवा द्रव्य दान करावे. |
| अज्ञानकृत पापासी । पश्चात्तापे शुद्धि परियेसी । गुरुसेवा तत्परेसी । केलिया गुरु निवारी ॥ ८३ | अजाणतेपणी घडलेल्या पापासाठी पश्चात्ताप आणि मनापासून केलेली गुरुसेवा पापांचे निवारण करते. |
| नेणता पाप केलियासी । प्रायश्चित्त असे परियेसी । प्राणायाम द्विशतेसी । पुण्यतीर्थी दहा स्नाने ॥ ८४ | अनवधानाने पाप घडल्यास २०० प्राणायाम आणि पुण्यतीर्थात १० वेळा स्नान करावे. |
| तीन गुंजा सुवर्ण द्यावे । नदी आचरावे दोन गावे । सौम्य पातक याचि भावे । जाती पापे परियेसी ॥ ८५ | "तीन गुंजा सोने दान करावे आणि नदीकाठी दोन गाव प्रवास करावा, त्याने सौम्य पापे जातात." |
| स्त्रीपुरुष दोघांत एक । करिती पुण्यपाप दोष । दोघेही पडती दोषात । दोघे आचरावे प्रायश्चित्त ॥ ८६ | "पती-पत्नीपैकी एकाने जरी पाप केले तरी दोघांना दोष लागतो, म्हणून दोघांनीही प्रायश्चित्त घ्यावे." |
| आणिक एक असे प्रकार । जेणे पाप होय दूर । गायत्रीजप दहा सहस्त्र । करावा तेणे वेदमंत्र ॥ ८७ | पाप दूर करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे दहा हजार वेळा गायत्री मंत्राचा जप करणे. |
| याचे नाव गायत्रीकृच्छ । महादोषी करी पवित्र । ऐसे करावे विचित्र । श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी ॥ ८८ | "याला 'गायत्रीकृच्छ' म्हणतात, जे मोठ्या पाप्यालाही पवित्र करते." |
| प्राजापत्यकृच्छ्र देखा । असे विधि अतिविशेषा । भोजन करावे मुक्त एका । अथवा अयाचित भिक्षा ॥ ८९ | 'प्राजापत्यकृच्छ्र' विधीमध्ये दिवसातून एकदाच जेवावे किंवा अयाचित (न मागता मिळालेली) भिक्षा घ्यावी. |
| उपवास करावे तीन दिवस । स्मरावे गुरुचरणास । येणे जाती सौम्य दोष । जे आपणासी सामान्य ॥ ९० | "तीन दिवस उपवास करून श्रीगुरूंचे स्मरण करावे, त्याने सामान्य दोष जातात." |
| ’अतिकच्छ्र’ असे एक । एकचित्ते मुनि ऐक । दोष असतील सामान्यक । अज्ञानेचि केलिया ॥ ९१ | अज्ञानाने घडलेल्या दोषांसाठी 'अतिकृच्छ्र' नावाचा विधी आहे. |
| अन्न घ्यावे सप्तविंशति ग्रास । सकाळी बारा रात्री पंचदश । अथवा दोनी अष्ट ग्रास । अयाचित अन्न द्यावे ॥ ९२ | यात अन्नाचे ठराविक घास (सकाळी १२ आणि रात्री १५) घेण्याचा नियम आहे. |
| ऐसे सौम्य पातकासी । विधि असती परियेसी । मास एक नेमेसी । अंजुली एक जेवावे ॥ ९३ | सौम्य पापांसाठी एक महिनाभर दिवसातून फक्त एक ओंजळ अन्न घेण्याचा नियम आहे. |
| उपवास तीन करावे देखा । प्रकार सांगेन आणिका । तीन दिन उपोषका । घृतपारणे करावे ॥ ९४ | तीन दिवस उपवास करून फक्त तुपाने (घृत) पारणे करावे. |
| तीन दिवस घृत घेवोनि । क्षीर घ्यावे दिवस तीनी । तीन दिवस वायु भक्षोनि । पुन्हा क्षीर एक दिवस ॥ ९५ | "३ दिवस तूप, ३ दिवस दूध, ३ दिवस फक्त हवा (उपवास) आणि पुन्हा १ दिवस दूध घ्यावे." |
| एखादा असेल अशक्त । तयासी असे एक व्रत । तीळ गुळ लाह्या पीठ । उपवास एक करावा ॥ ९६ | "अशक्त माणसाने तीळ, गूळ, लाह्या आणि पीठाचा आहार घेऊन एक उपवास करावा." |
| पूर्णकृच्छ्र करा ऐसी । पर्णोदक घ्यावे प्रतिदिवशी । करावे तितके उपवासी । पश्चात्तापे प्राशन कीजे ॥ ९७ | 'पूर्णकृच्छ्र' मध्ये पानांचे पाणी (पर्णोदक) प्राशन करून उपवास करावा. |
| कमल बिल्व अश्वत्थ । कुशोदक बिंदु नित्य । पान करावे सत्य । पर्णकृच्छ्र परियेसा ॥ ९८ | "कमळ, बेल, पिंपळ यांची पाने आणि दर्भाचे पाणी प्राशन करण्याला 'पर्णकृच्छ्र' म्हणतात." |
| आणिक एक प्रकार । करी चांद्रायण-आचार । कुक्कुटांडप्रमाण आहार । ग्रास घ्यावे वर्धमानी ॥ ९९ | 'चांद्रायण' व्रतात चंद्राच्या कलेप्रमाणे अन्नाचे घास वाढवावे किंवा कमी करावे. |
| अमावास्येसी एक ग्रास । पौर्णिमेसी पंचदश । कृष्णपक्षी उतरत । दुसरे मासी हविष्यान्न ॥ १०० | "अमावस्येला १ घास आणि पौर्णिमेला १५ घास घ्यावे, कृष्ण पक्षात घास कमी करत जावे." |
| आपणले पाप प्रगटूनि । उच्चारावे सभास्थानी । पश्चात्तापे जळूनि । पाप जाय अवधारा ॥ १०१ | आपले पाप सर्वांसमोर मान्य करून पश्चात्ताप व्यक्त केल्याने ते जळून नष्ट होते. |
| आता सांगेन तीर्थकृच्छ । यात्रा करावी पवित्र । वाराणसी श्वेतपर्वत । स्नानमात्रे पापे जाती ॥ १०२ | काशी किंवा रामेश्वर (श्वेतपर्वत) यांसारख्या तीर्थक्षेत्री स्नान केल्याने पापे जातात. |
| वरकड तीर्थी गेलियासी । गायत्रीजप सहस्त्रेसी । पाप जाय त्वरेसी । अगस्तीवचन बोलिले असे ॥ १०३ | "तीर्थक्षेत्री १००० गायत्री जप केल्याने पाप लवकर नष्ट होते, असे अगस्ती ऋषींचे वचन आहे." |
| समुद्रसेतुबंधेसी । स्नान केलिया परियेसी । भ्रूणहत्यापाप नाशी । कृतघ्नादि पातके ॥ १०४ | सेतुबंध रामेश्वर येथे स्नान केल्याने भ्रूणहत्या आणि कृतघ्नतेसारखी महापापे नष्ट होतात. |
| विधिपूर्वक शुचीसी । जप कोटी गायत्रीसी । ब्रह्महत्यापाप नाशी । ऐके त्रिविक्रम एकचित्ते ॥ १०५ | एक कोटी गायत्री जप केल्याने ब्रह्महत्येचे पापही नष्ट होते. |
| लक्ष गायत्री जप केलिया । सुरापानपाप जाय लया । सुवर्णचोरी केलिया । सात लक्ष जपावे ॥ १०६ | मद्यपानाच्या पापासाठी १ लाख आणि सोने चोरीसाठी ७ लाख गायत्री जप करावा. |
| अष्ट लक्ष गुरुतल्पगासी । गायत्री जपता पाप नाशी । आता सांगेन परियेसी । वेदाक्षरे पाप दूर ॥ १०७ | गुरुपत्नीशी गमन केल्याच्या पापासाठी ८ लाख जप करावा. आता वेदांच्या मंत्रांनी होणारी पापमुक्ती ऐक. |
| पवमानसूक्त चत्वारी । पठण करिता ब्रह्महत्या दूरी । इंद्रमित्र अवधारी । एक मास जपावे ॥ १०८ | पवमान सूक्ताचे पठण केल्याने ब्रह्महत्या दूर होते. १ महिना याचा जप करावा. |
| सुरापानादि पातके । जातील येणे सूक्तके । शुनःशेपा नाम सूक्ते । सुवर्णहरा पाप जाय ॥ १०९ | शुनःशेप सूक्ताने मद्यपान आणि सोने चोरीचे पाप जाते. |
| पवमानशन्नसूक्त । पठण करिता हविष्योक्त । मास एक पठत । गुरुतल्पगादिक हरती ॥ ११० | 'पवमानशन्न' सूक्ताने १ महिन्यात गुरुपत्नी-गमनासारखी पापे नष्ट होतात. |
| पंच मास सहा मास । मिताहर करुनी पुरुष । पुरुषसूक्ते कर्मनाश । पंचमहापापे नासती ॥ १११ | ५-६ महिने मिताहार घेऊन पुरुषसूक्ताचा जप केल्यास पाच महापापे नष्ट होतात. |
| त्रिमधु म्हणेजे मंत्रसूक्त । सुवर्णात्रीनास मंत्र । जपावे नाचिकेत । समस्त पातके प्रायश्चित्त ॥ ११२ | "त्रिमधु, नाचिकेत मंत्रांच्या जपाने सर्व पातकांपासून मुक्ती मिळते." |
| नारायणपन्न देखा । जपावे भक्तिपूर्वका । नाशी पंच महापातका । प्रीतिपूर्वक जपावे ॥ ११३ | नारायण सूक्ताच्या भक्तीपूर्वक जपाने पाच महापापे नष्ट होतात. |
| त्रिपदा नाम गायत्रीसी । जपती जे भक्तीसी । अघमर्षण त्रिरावृत्तेसी । सप्त जन्म पाप जाय ॥ ११४ | गायत्री आणि अघमर्षण सूक्ताच्या तीन आवर्तनांनी सात जन्मांची पापे जातात. |
| अपांमध्य पन्नासी । तद्विष्णो नाम सूक्तेसी । जपती जे जन भक्तीसी । सप्त जन्म पाप जाय ॥ ११५ | 'तद्विष्णो' सूक्ताच्या जपाने सात जन्मांची पापे नष्ट होतात. |
| आणिक असे विधान देखा । अज्ञानकृत दोषादिका । अनुतप्त होवोनि विशेषा । पंचगव्य प्राशन कीजे ॥ ११६ | अज्ञानाने घडलेल्या पापांसाठी पश्चात्तापपूर्वक 'पंचगव्य' प्राशन करावे. |
| गोमूत्र गोमय क्षीर । दधि घृत कुशसार । विधिमंत्रे घ्यावे निर्धार । पहिले दिनी उपवास ॥ ११७ | "गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप आणि दर्भाचे पाणी विधीपूर्वक घ्यावे. पहिल्या दिवशी उपवास करावा." |
| नीलवर्ण गोमूत्र । कृष्णगोमय पवित्र । ताम्र गायत्रीचे क्षीर । श्वेतधेनूचे दधि घ्यावे ॥ ११८ | यात वेगवेगळ्या रंगांच्या गाईंचे घटक घेण्याचे महत्त्व सांगितले आहे. |
| कपिला गाईचे तूप बरवे । ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे । एकेकासी क्लप्त भावे । सांगेन सर्व अवधारा ॥ ११९ | "कपिला गाईचे तूप श्रेष्ठ असून, मी आता त्याचे प्रमाण सांगतो." |
| गोमूत्र घ्यावे पावशेर। अंगुष्ठपर्व गोमय पवित्र । क्षीर पावणे दोन शेर । दधि तीन पाव घ्यावे ॥ १२० | "गोमूत्र (१ पाव), शेण (अंगठ्याएवढे), दूध (पोणे दोन शेर), दही (३ पाव) असे प्रमाण घ्यावे." |
| घृत घ्यावे पाव शेर । तितुकेचि मिळवावे कुशनीर । घेता मंत्र उच्चार । विस्तारोनि सांगेन ॥ १२१ | तूप (१ पाव) आणि तितकेच दर्भाचे पाणी घेऊन मंत्रासह प्राशन करावे. |
| कुशांसहित सहा रसे । एकेकासी मंत्र पृथक् असे । प्रथम मंत्र इरावती असे । इदं विष्णु दुजा देख ॥ १२२ | "या सहा रसांसाठी वेगवेगळे मंत्र (इरावती, इदं विष्णु इ.) आहेत." |
| मानस्तोक मंत्र तिसरा । प्रजापति चतुर्थ अवधारा । पंचम गायत्री उच्चारा । सहावी व्याह्रति प्रणवपूर्वका ॥ १२३ | "३. मानस्तोक, ४. प्रजापती, ५. गायत्री आणि ६. प्रणवयुक्त व्याहृती हे मंत्र म्हणावे." |
| ऐसे मंत्रोनि पंचगव्य । प्यावे अनुतप्त एकभाव । अस्थिगत चर्मगत पूर्व । पापे जाती अवधारा ॥ १२४ | मंत्राग्नीने सिद्ध केलेले पंचगव्य प्यायल्याने हाडांत आणि चामडीत भिनलेली पापेही नष्ट होतात. |
| गाई न मिळता इतुके जिन्नसी । कपिला गाय मुख्य परियेसी । दर्शनमात्रे दोष नाशी । कपिला गाई उत्तम ॥ १२५ | कपिला गाय सर्वश्रेष्ठ असून तिच्या दर्शनानेही दोष नष्ट होतात. |
| पंचमहापातक नावे । ब्रह्महत्या सुरापान जाणावे । स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे । पाचवा त्यासवे मिळालेला ॥ १२६ | "५ महापापे: १. ब्रह्महत्या, २. मद्यपान, ३. सोने चोरी, ४. गुरुपत्नी-गमन आणि ५. या पाप्यांना साथ देणे." |
| चौघे पातकी देखा । पाचवा तया मिळता देखा । त्यासहित पंचमहापातका । आहेती पापे परियेसा ॥ १२७ | वरील चार गुन्हे करणाऱ्यांच्या संगतीत राहणाराही तितकाच दोषी ठरतो. |
| सुरापानी ब्रह्मघातकी । सुवर्णस्तेय गुरुतल्पकी । पाचवा महाघातकी । जो सानुकूळ मिळे तो ॥ १२८ | "मद्यपी, ब्रह्मघातकी, चोर आणि व्यभिचारी यांना मदत करणारा पाचवा महाघातकी होय." |
| ऐसे पातक घडे त्यासी । प्रायश्चित्त परियेसी । श्रीगुरुसंतोषी । अनुग्रहे पुनीत ॥ १२९ | अशा पातकी माणसालाही श्रीगुरूंच्या अनुग्रहाने आणि प्रायश्चित्ताने शुद्धि मिळते. |
| एखादा मिळेल शास्त्रज्ञ । स्वधर्माचारे अभिज्ञ । त्याच्या अनुग्रहे पापघ्न । पुनीत होय अवधारा ॥ १३० | एखाद्या शास्त्रज्ञ आणि धर्माचरणी पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य पवित्र होतो. |
| ऐसे श्रीगुरु त्रिक्रमासी । प्रायश्चित्त सांगती परियेसी । सकल विप्र संतोषी । ज्ञानप्रकाशे होती ॥ १३१ | श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारथींना सांगितलेले हे ज्ञान ऐकून सर्व ब्राह्मण संतुष्ट झाले. |
| श्रीगुरु म्हणती पतितासी । पूर्वी तू विप्र होतासी । माता पिता गुरु दूषी । तेणे होय चांडालजन्म ॥ १३२ | "श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले, 'तू पूर्वजन्मी ब्राह्मण होतास, पण आई-वडील आणि गुरूंची निंदा केल्यामुळे तुला हा जन्म मिळाला.'" |
| आता सांगतो ऐक । स्नानसंगमी मास एक । केलिया दोष जाती निःशंक । पुनः विप्रजन्म होसी ॥ १३३ | "आता एक महिना संगमावर स्नान कर, तुझे दोष जातील आणि तू पुन्हा ब्राह्मण होशील." |
| पतित म्हणे स्वामीसी । तव दर्शन जाहले आम्हांसी । कावळा जाता मानसासी । राजहंस तो होतसे ॥ १३४ | "पतित म्हणाला, 'स्वामी, आपले दर्शन झाले. जसा कावळा मानससरोवरात गेल्यावर राजहंस होतो, तसा मी झालो आहे.'" |
| तैस तव दर्शनमात्रे । पवित्र झाली सकळ गात्रे । तारावे आता त्वा कृपापात्रे । शरणागतासी ॥ १३५ | "आपल्या दर्शनाने माझे शरीर पवित्र झाले आहे. आता या शरणागताचा उद्धार करा." |
| परिस लागता लोखंडासी । सुवर्ण होय तत्क्षणेसी । सुवर्ण मागुती लोहासी । केवी मिळे स्वामिया ॥ १३६ | "लोखंडाला परिस लागला की त्याचे सोने होते, ते सोने पुन्हा लोखंड कसे होईल?" |
| तव दर्शनसुधारसी । आपण झालो ज्ञानराशी । अभिमंत्रोनि आम्हांसी । विप्रांमध्ये मिळवावे ॥ १३७ | "आपल्या दर्शन-अमृताने मला ज्ञान मिळाले आहे, आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणांत सामावून घ्या." |
| ऐकोनि तयाचे वचन । गुरु बोलती हासोन । तव देह जातिहीन । विप्र केवी म्हणतील ॥ १३८ | "श्रीगुरु हसून म्हणाले, 'तुझा हा देह चांडाळाचा आहे, ब्राह्मण तुला आपला कसे मानतील?'" |
| पतिताच्या गृहासी । उपजोनि तू वाढलासी । ब्रह्मत्व केवी पावसी । विप्र निंदा करितील ॥ १३९ | "तू चांडाळाच्या घरी वाढला आहेस, तुला ब्राह्मणत्व कसे मिळेल? इतर ब्राह्मण तुझी निंदा करतील." |
| पूर्वी ऐसा विश्वामित्र । क्षत्रियवंशी गाधिपुत्र । तपोबळे म्हणवी पवित्र । म्हणे तो विप्र आपणा ॥ १४० | "पूर्वी विश्वामित्र क्षत्रिय असूनही तपोबळाने ब्राह्मण झाले होते, पण त्यासाठी मोठे सामर्थ्य लागते." |
| ब्रह्मयाची शत वर्षे । तप केले महाक्लेशे । त्याचे बळे म्हणवीतसे । ब्रह्मऋषी आपणा ॥ १४१ | विश्वामित्रांनी ब्रह्मदेवाची शंभर वर्षे अत्यंत कठीण तपश्चर्या केली आणि त्या जोरावर स्वतःला 'ब्रह्मर्षी' म्हणवून घेऊ लागले. |
| इंद्रादि सुरवरांसी । विनविता झाला परियेसी । आपणाते ब्रह्मर्षि । म्हणा ऐसे बोलतसे ॥ १४२ | "त्यांनी इंद्रादी देवांना विनंती केली की, ""आता मला ब्रह्मर्षी म्हणून संबोधा.""" |
| देव म्हणती तयासी । आम्हा गुरु वसिष्ठ ऋषि । जरी तो बोले ब्रह्मऋषि । तरी आम्ही अंगिकारू ॥ १४३ | "देव म्हणाले, ""आमचे गुरु वसिष्ठ ऋषी आहेत. जर त्यांनी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटले, तरच आम्ही ते मान्य करू.""" |
| मग त्या वसिष्ठासी । विनवी विश्वामित्र ऋषि । विप्र म्हणा आपणासी । केले तप बहुकाळ ॥ १४४ | "मग विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली की, ""मी खूप काळ तप केले आहे, आता मला ब्राह्मण (ब्रह्मर्षी) म्हणा.""" |
| वसिष्ठ म्हणे विश्वामित्र । क्षत्रिय तपास अपात्र । देह टाकोनि मग पवित्र । विप्रकुळी जन्मावे ॥ १४५ | "वसिष्ठ म्हणाले, ""विश्वामित्रा, तू क्षत्रिय आहेस. ब्रह्मर्षी होण्यासाठी हा देह त्यागून ब्राह्मण कुळात जन्म घेणे आवश्यक आहे.""" |
| मग तुझा होईल व्रतबंध । होईल गायत्रीप्रबोध । तधी तुवा होसी शुद्ध । ब्रह्मऋषि नाम तुझे ॥ १४६ | ""त्या जन्मात तुझा मुंज (व्रतबंध) होईल, गायत्री मंत्राचा उपदेश मिळेल आणि मगच तू शुद्ध होऊन ब्रह्मर्षी होशील.""" |
| काही केल्या न म्हणे विप्र । मग कोपला विश्वामित्र । वसिष्ठाचे शत पुत्र । मारिता झाला तये वेळी ॥ १४७ | वसिष्ठ काही केल्या त्यांना ब्राह्मण म्हणत नाहीत हे पाहून विश्वामित्र संतापले आणि त्यांनी वसिष्ठांच्या शंभर पुत्रांना मारले. |
| ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषि । नव्हे कदा तामसी । अथवा न म्हणे ब्रह्मऋषि । तया विश्वामित्रासी ॥ १४८ | तरीही ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषींनी आपला शांत स्वभाव (तामसी वृत्ती नाही) सोडला नाही आणि विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हटले नाही. |
| वर्तता ऐसे एके दिवसी । विश्वामित्र कोपेसी । हाती घेउनी पर्वतासी । घालू आला वसिष्ठावरी ॥ १४९ | एके दिवशी विश्वामित्र रागाच्या भरात एक डोंगर उचलून वसिष्ठांच्या अंगावर टाकण्यासाठी आले. |
| विचार करीत मागुती मनी । जरी वदिन वसिष्ठमुनि । आपणाते न म्हणे कोणी । ब्रह्मऋषि म्हणोनिया ॥ १५० | "पण पुन्हा त्यांनी विचार केला की, ""जर मी वसिष्ठांना मारले, तर मला कोणीही कधीच ब्रह्मर्षी म्हणणार नाही.""" |
| इंद्रादि देव समस्त ऋषि । म्हणती वसिष्ठवाक्यासरसी । आपण म्हणो ब्रह्मऋषि । अन्यथा नाही म्हणोनिया ॥ १५१ | कारण सर्व देव आणि ऋषींनी वसिष्ठांच्या शब्दावरच विश्वामित्रांना ब्रह्मर्षी मानण्याचे ठरवले होते. |
| ऐशा वसिष्ठमुनीस । मारिता यासी फार दोष । म्हणोनि टाकी गिरिवरास । भूमीवरी परियेसा ॥ १५२ | वसिष्ठांना मारणे महापाप ठरेल असे ओळखून त्यांनी तो डोंगर जमिनीवर टाकून दिला. |
| अनुतप्त झाला अंतःकरणी । वसिष्ठे ते ओळखूनि । ब्रह्मऋषि म्हणोनि । पाचारिले तये वेळी ॥ १५३ | विश्वामित्रांच्या मनातील हा पश्चात्ताप ओळखून वसिष्ठांनी त्यांना त्याच क्षणी 'ब्रह्मर्षी' म्हणून हाक मारली. |
| संतोषोनि विश्वामित्र । म्हणे बोल बोलिला पवित्र । म्हणे घरी अन्नमात्र । तुम्ही घ्यावे स्वामिया ॥ १५४ | "आनंदी होऊन विश्वामित्रांनी वसिष्ठांना विनंती केली की, ""स्वामी, आपण आता माझ्या घरी भोजन घ्यावे.""" |
| संतोषोनि वसिष्ठ । तयालागी बोलत । म्हणे शरीर हे निभ्रांत । सूर्यकिरणी पचवावे ॥ १५५ | "वसिष्ठ म्हणाले, ""जर तुला ब्राह्मण व्हायचे असेल, तर तुझे हे शरीर सूर्यकिरणांच्या तेजात जळवून शुद्ध करावे लागेल.""" |
| विश्वामित्रे अंगिकारिले । सूर्यकिरणे देहा जाळिले । सहस्त्रकिरणी तापले । देह सर्व भस्म झाला ॥ १५६ | विश्वामित्रांनी हे मान्य केले. सूर्यकिरणांच्या तीव्र प्रकाशात त्यांचा देह जळून भस्म झाला. |
| विश्वामित्र महामुनि । अतिसामर्थ्य अनुष्ठानी । पहिला देह जाळोनि । नूतन देह धरियेला ॥ १५७ | आपल्या तपोबळाने जुना देह जाळून त्यांनी नवीन आणि पवित्र देह धारण केला. |
| ब्रह्मर्षि तेथोन । विश्वामित्र झाला जाण । सकळांसी मान्य । महाराज ॥ १५८ | त्यानंतरच विश्वामित्र खऱ्या अर्थाने ब्रह्मर्षी झाले आणि सर्वांना मान्य झाले. |
| मग म्हणती सकळ मुनि । विश्वामित्र ब्रह्मज्ञानी । ब्रह्मऋषी म्हणोनि । झाला त्रिभुवनी प्रख्यात ॥ १५९ | सर्व मुनींनी त्यांना ब्रह्मज्ञानी मानले आणि विश्वामित्र त्रिभुवनात ब्रह्मर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. |
| या कारणे तव देह । विसर्जावा जन्म इह । अनुतप्त तव भाव । ब्रह्मकुल भाविसी ॥ १६० | "श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले, ""त्याचप्रमाणे तुलाही ब्राह्मण व्हायचे असेल तर हा देह सोडावा लागेल. तुझे मन आता शुद्ध झाले आहे.""" |
| ऐको त्या पतितासी । बोधिता गुरु परियेसी । लाधले सुख त्यासी । त्याच्या मानसी न ये काही ॥ १६१ | "श्रीगुरूंनी उपदेश केला, पण त्या पतिताला इतके सुख मिळत होते की त्याला आता संसाराची ओढ राहिली नव्हती." |
| निधान सापडे दरिद्र्यासी । तो का सांडील संतोषी । अमृत सापडता रोग्यासी । का सांडील जीवित्व ॥ १६२ | "जसा दरिद्री माणसाला खजिना सापडल्यावर तो सोडत नाही किंवा रोग्याला अमृत मिळाल्यावर तो प्राण सोडत नाही, तशी त्या पतिताची अवस्था झाली." |
| एखादे ढोर उपवासी । पावे तृणबिढारासी । तेथोनि जावया त्यासी । मन नव्हे सर्वथा ॥ १६३ | भुकेलेल्या जनावराला चाऱ्याचा ढीग सापडला की तेथून हलण्याची त्याची इच्छा होत नाही. |
| तैसे त्या पतितासी । लागले ध्यान गुरूसी । न जाय आपुल्या मंदिरासी । विप्र आपणा म्हणतसे ॥ १६४ | "तसे त्या पतिताला श्रीगुरूंचे ध्यान लागले, तो घरी जायला तयार नव्हता आणि स्वतःला ब्राह्मण समजू लागला." |
| इतुके होता ते अवसरी । आली त्यांची पुत्रनारी । म्हणो लागले अपस्मारी । म्हणोनि आलो धावत ॥ १६५ | "तेवढ्यात त्याची पत्नी आणि मुले तिथे आली. ""याला फेफरे (अपस्मार) आले आहे का?"" असे म्हणत ती धावत आली." |
| जवळ येता स्त्रियेसी । स्पर्शो नको म्हणे तिसी । कोपेकरोनि मारावयासी । जात असे तो पतित ॥ १६६ | "पत्नी जवळ येताच तो तिला ओरडला, ""मला स्पर्श करू नको!"" आणि रागाने तिला मारायला उठला." |
| दुःख करी ती भार्या । दुरुनी नमे गुरुपाया । पति माते सोडोनिया । जातो आता काय करू ॥ १६७ | "दुःखी होऊन पत्नीने दुरूनच श्रीगुरूंच्या चरणांना नमस्कार केला आणि म्हणाली, ""माझे पती मला सोडून चालले आहेत, मी काय करू?""" |
| कन्या पुत्र मज बहुत । तया कोण पाळित । आम्हा सांडोनि जातो किमर्थ । सांगा तयासी स्वामिया ॥ १६८ | ""मला खूप मुले आहेत, त्यांचे पालनपोषण कोण करणार? हे आम्हाला सोडून का जात आहेत, स्वामी त्यांना सांगा.""" |
| जरी न सांगाल स्वामी त्यासी । त्यजीन प्राण पुत्रासरसी । येरवी आपणाते कोण पोषी । अनाथ मी स्वामिया ॥ १६९ | ""जर आपण त्यांना घरी पाठवले नाही, तर मी मुलांसह प्राण देईन. आमच्याकडे दुसरे कोणीही नाही.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । गुरु बोलती हासोन । त्या नराते बोलावून । सांगताती परियेसा ॥ १७० | तिचे शब्द ऐकून श्रीगुरु हसले आणि त्यांनी त्या पतिताला जवळ बोलावले. |
| गुरु म्हणती पतितासी । जावे आपुल्या घरासी । पुत्रकलश क्षोभता दोषी । तूते केवी गति होय ॥ १७१ | "श्रीगुरु म्हणाले, ""तू तुझ्या घरी जा. पत्नी आणि मुलांचा छळ केल्यास तुला कधीही चांगली गती मिळणार नाही.""" |
| या संसारी जन्मोनिया । संतोषवावे इंद्रिया । मग पावे धर्मकाया । तरीच तरे भवार्णव ॥ १७२ | """संसारात राहून कर्तव्ये पूर्ण केल्याशिवाय आणि धर्म आचरल्याशिवाय हा भवसागर तरता येणार नाही.""" |
| या कारणे पूर्वीच जाणा । न करावी आपण अंगना । करोनि तिसी त्यजिता जाणा । महादोष बोलिजे ॥ १७३ | """एक तर लग्न करू नये, पण एकदा लग्न केल्यावर पत्नीचा त्याग करणे हे महापाप आहे.""" |
| सूर्य-भूमी-साक्षीसी । तुवा वरिले स्त्रियेसी । तीस त्यागिता महादोषी । तूते नव्हे गति जाण ॥ १७४ | """सूर्य आणि भूमीला साक्षी ठेवून तू लग्न केले आहेस. तिला सोडलेस तर तुला नरकवास घडेल.""" |
| श्रीगुरुवचन ऐकोन । विनवीतसे कर जोडून । केवी होऊ जातिहीन । ज्ञान होवोनि मागुती ॥ १७५ | "तो पतित हात जोडून म्हणाला, ""स्वामी, आता ज्ञान मिळाल्यावर मी पुन्हा अज्ञानी आणि जातीहीन कसा होऊ?""" |
| श्रीगुरु मनी विचारिती । याचे अंगी असे विभूति । प्रक्षाळावे लुब्धका-हाती । अज्ञानत्व पावेल ॥ १७६ | "श्रीगुरूंनी विचार केला की, याच्या अंगाला मी लावलेली विभूती (भस्म) आहे, जोपर्यंत ती आहे तोवर याला हे ज्ञान राहील. ती धुवून टाकली की हा पूर्ववत होईल." |
| ऐसे मनी विचारूनि । सांगती शिष्यासी बोलावोनि । एका लुब्धका पाचारोनि । आणा अतित्वरेसी ॥ १७७ | असा विचार करून त्यांनी एका 'लुब्धकाला' (व्यापारी/व्याध) बोलावून आणायला सांगितले. |
| तया ग्रामी द्विज एक । करी उदीम वाणिक । तयाते पाचारिती ऐक । तया पतितासन्निध ॥ १७८ | गावातील एका व्यापाराला त्या पतिताजवळ बोलावले. |
| श्रीगुरु म्हणती त्यासी । उदक घेवोनि हस्तेसी । स्नपन करी गा पतितासी । होय आसक्त संसारी ॥ १७९ | "श्रीगुरु त्याला म्हणाले, ""या पतिताच्या अंगावर पाणी घालून याला आंघोळ घाल, जेणेकरून हा पुन्हा संसारात रमेल.""" |
| आज्ञा होता ब्राह्मण । आला उदक घेऊन । त्यावरी घालिता तत्क्षण । गेली विभूति धुवोनि ॥ १८० | श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्याने पाणी घातले आणि त्या पतिताच्या अंगावरची विभूती वाहून गेली. |
| विभूति धूता पतिताचे । झाले अज्ञान मन त्याचे । मुख पाहता स्त्री-पुत्रांचे । धावत गेला त्याजवळी ॥ १८१ | विभूती धुवून टाकताच त्याचे दिव्य ज्ञान नष्ट झाले आणि तो पुन्हा आपल्या संसारात गुंतला. आपल्या कुटुंबाला पाहून तो आनंदाने त्यांच्याकडे धावला. |
| आलिंगोनिया पुत्रासी । भ्रांति म्हणे त्यासी । का आलो या स्थळासी । तुम्ही आला कवण कार्या ॥ १८२ | "त्याने मुलांना मिठी मारली आणि आश्चर्याने विचारले, ""मी इथे कसा आलो? आणि तुम्ही लोक इथे काय करत आहात?""" |
| ऐसा मनी विस्मय करीत । निघोनि घरा गेला पतित । सांगितला वृत्तान्त । विस्मय सर्व करिताती ॥ १८३ | तो पतित आपल्या कुटुंबासह घरी निघून गेला. हा चमत्कार पाहून सर्व गावकरी चकित झाले. |
| इतुके झाले कौतुक । पहाती नगरलोक । विस्मय करिती सकळिक । म्हणती अभिनव काय झाले ॥ १८४ | नगरवासीयांना हे मोठे नवल वाटले की एका क्षणात ज्ञान आलेला माणूस पुन्हा सामान्य कसा झाला. |
| त्रिविक्रमभारती मुनि । जो का होता गुरुसन्निधानी । पुसतसे विनवोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥ १८५ | श्रीगुरूंच्या जवळ असलेल्या त्रिविक्रम भारथींनी श्रीगुरूंना हात जोडून विनंती केली. |
| त्रिविक्रम म्हणे श्रीगुरूसी । होतो संदेह मानसी । निरोप द्यावा कृपेसी । विनंती एक अवधारा ॥ १८६ | """स्वामी, माझ्या मनात एक शंका आहे, कृपया तिचे निरसन करावे.""" |
| महापतित जातिहीन जाण । तयाते दिधले दिव्यज्ञान । अंग धुता तत्क्षण । गेले ज्ञान केवी त्याचे ॥ १८७ | """त्या जातीहीन चांडाळाला आपण दिव्य ज्ञान दिले होते, पण केवळ शरीर धुण्याने त्याचे ज्ञान कसे नष्ट झाले?""" |
| विस्तारोनि आम्हांसी । निरोपावे कृपेसी । म्हणोनि लागला चरणांसी । भावभक्ति करोनिया ॥ १८८ | """हे रहस्य आम्हाला विस्तारून सांगा,"" असे म्हणत त्रिविक्रम भारथींनी श्रीगुरूंचे पाय धरले." |
| ऐसे पुसता त्रिविक्रम यति । श्रीगुरु तया निरोपिती । त्याचे अंगाची विभूति । धुता गेले ज्ञान त्याचे ॥ १८९ | "श्रीगुरु म्हणाले, ""जोवर त्याच्या अंगाला विभूती होती, तोवर त्याला ज्ञान होते. ती धुताच त्याचे ज्ञान निघून गेले.""" |
| ऐसे विभूतीचे महिमान । माहात्म्य असे पावन । सांच होय ब्रह्म पूर्ण । भस्ममहिमा अपार ॥ १९० | """हा भस्माचा (विभूतीचा) महिमा आहे. भस्म हे साक्षात ब्रह्मस्वरूप असून त्याचे सामर्थ्य अपार आहे.""" |
| गुरुवचन ऐकोनि । विनवीतसे त्रिविक्रम मुनि । देव गुरुशिरोमणि । भस्ममहिमा निरोपावा ॥ १९१ | "मग त्रिविक्रम भारथींनी श्रीगुरूंना विनंती केली की, ""स्वामी, आता आम्हाला या भस्माचा महिमा सविस्तर सांगावा.""" |
| सिद्ध म्हणे शिष्यासी । भस्ममहिमा परियेसी । गुरु सांगता विस्तारेसी । एकचित्ते अवधारा ॥ १९२ | "सिद्ध मुनी नामधारकाला म्हणतात, ""आता श्रीगुरूंनी भस्ममहिमा कसा सांगितला, ते नीट ऐक.""" |
| म्हणोनि सरस्वतिगंगाधर । गुरुचरित्रविस्तार । ऐकता होय मनोहर । सकळाभीष्टे साधती ॥ १९३ | "सरस्वती गंगाधर म्हणतात की, हे गुरुचरित्र ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात." |
| पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारोन । महाराष्ट्रभाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदास ॥ १९४ | पुढील पावन कथा सिद्ध मुनी विस्तारून सांगत आहेत. |
| इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥ ॥ ओवीसंख्या ॥१९५॥ ॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥ | |