श्रावणी सोमवार आणि नागपंचमी 2026: आधी शिवपूजा की नागपूजा? उपवास कधी सोडावा?


यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व


यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या दिवशी पूजा नेमकी कधी आणि कोणत्या पद्धतीने करावी, आधी भगवान शिवांची पूजा करावी की नागदेवतेची, तसेच उपवास कधी सोडावा, असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात आहेत. जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.


नागपंचमी पूजेचे महत्त्व

धार्मिक श्रद्धेनुसार, ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प दोषाचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. या दिवशी श्रद्धेने पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, अशीही धार्मिक धारणा आहे.

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला नमवून यमुना नदीतून बाहेर काढले, अशी कथा सांगितली जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार, नागपंचमीच्या दिवशी ऋषींची पूजा करणाऱ्या व्यक्तींना सर्पभय राहत नाही, अशीही श्रद्धा आहे.


श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र अर्पण तसेच उपवास करण्याची परंपरा आहे.

श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी हे व्रत करतात, अशी परंपरा आहे.


नागपंचमी पूजा विधी

नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजेसाठी बसावे. नागपंचमीच्या पूजेसाठी चौरंग किंवा पाटावर मातीची नागाची मूर्ती तयार करून ठेवली जाते. काहीजण नागदेवतेचा फोटोही पाटावर मांडून पूजा करतात.

नागाची मूर्ती किंवा फोटो पाटावर व्यवस्थित ठेवून त्याला हळद-कुंकू वाहावे. त्यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप आणि अगरबत्ती लावून दूध, लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा.

या दिवशी खास पुरणाचे दिंड उकडून केले जातात. हा नैवेद्यही नागपंचमीच्या दिवशी विशेष मानला जातो. पूजा पूर्ण झाल्यानंतर नागदेवतेची आरती करून सर्वांना दिंडीचा प्रसाद द्यावा.


१७ ऑगस्टला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी

पंचांगानुसार, २०२६ मध्ये श्रावण महिना १३ ऑगस्टपासून सुरू झाला असून पहिला श्रावणी सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी देखील आहे.

मराठी पंचांगानुसार, १७ ऑगस्ट रोजी श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवारचे शिवपूजन आणि नागपंचमी असा विशेष योग आला आहे.


नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त

पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:५२ वाजता सुरू होईल. ही तिथी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०१ वाजेपर्यंत राहणार आहे.

उदयतिथीच्या नियमानुसार, यावर्षी नागपंचमीचा सण १७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

पंचांगानुसार, नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ५:५१ ते ८:२९ असा दिला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी ६:२० वाजता होईल, तर पंचमी तिथी सायंकाळी ५:०१ वाजता समाप्त होईल.


श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी; पूजेचा क्रम काय असावा?

१७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजा करण्याचा क्रम पुढीलप्रमाणे ठेवता येईल.

प्रथम भगवान शिवांची पूजा करावी — सकाळी स्नान करून भगवान शिवांच्या शिवलिंगाला जलाभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.

त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी — नागपंचमीच्या शुभ मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून विधीपूर्वक पूजा करावी. त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करावी.

मात्र प्रत्येक घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक धार्मिक प्रथा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार पूजा करण्यास प्राधान्य द्यावे. नागपंचमीची पूजा मात्र सकाळच्या दिलेल्या शुभ मुहूर्तात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.


पूजा करण्याची उत्तम पद्धत

सकाळी स्नान करून सर्वप्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी.

श्रावणी सोमवारची शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करावेत.

त्यानंतर नागदेवतेची विधिवत पूजा करावी.

यानंतर आपल्या घरच्या परंपरेनुसार श्रावणी सोमवारचे व्रत सुरू ठेवावे आणि संध्याकाळी शिवपूजा व आरती केल्यानंतर उपवास सोडता येईल.


उपवास कधी सोडावा?

धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी भगवान शिवांची पूजा आणि आरती केल्यानंतर सोडणे योग्य मानले जाते.

नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे ५:०१ वाजता संपत असली, तरी तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही.

उपवास सोडताना फलाहार किंवा आपल्या घरच्या व्रतपरंपरेनुसार सात्त्विक आहार घ्यावा.

म्हणजेच, सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी भगवान शिवांची पूजा व आरती झाल्यानंतर पारणा करायचा.

अशा प्रकारे यंदा श्रावणी सोमवार आणि नागपंचमी या दोन्ही पर्वांचा धार्मिक विधी श्रद्धेने आणि आपल्या घरच्या परंपरेनुसार करता येईल.

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form