शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, साहित्य व पूजा विधी

 

🌺 शारदीय नवरात्र २०२६ 🌺

घटस्थापना साहित्य, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण मराठी पूजा विधी

॥ श्री दुर्गादेव्यै नमः ॥

अश्विन शुक्लपक्ष प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र आरंभ होते. या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. जाणून घेऊया घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य, शुभ मुहूर्त व मराठीतून पूजा विधी.


🌼 घटस्थापनेचे साहित्य

  • रांगोळी, फुलांच्या माळा, चौरंग, लाल वस्त्रे.
  • सात प्रकारचे धान्य: जव, हिरवे मूग, तांदूळ, तीळ, हरभरा, गहू, राळं.
  • पाच प्रकारची पाने: पिंपळ, उंबर, अशोक, आंबा, वडाची पाने.
  • पाच प्रकारची फळे, नाणी, नारळ, सुपारी, विडा, विड्याची पाने, लाल धागा, दूर्वा.
  • परडी / सुगडं / कलश, तांब्याचा कलश, अत्तर, हार, देवीचा फोटो किंवा मूर्ती.
  • पंचामृत: दूध, दही, तूप, मध, गूळ / साखर.

📅 शारदीय नवरात्र २०२६ कधी सुरू होणार?

यंदा शारदीय नवरात्र ११ ऑक्टोबरपासून सुरू होऊन १९ ऑक्टोबरपर्यंत असेल, तर २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाईल.

पंचांगानुसार, अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी सुरू होत असून ११ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे तिथीनुसार नवरात्रीचा पहिला दिवस ११ ऑक्टोबर रोजी असेल.

Watch on YouTube video 👇 👇 👇 
https://youtu.be/8ic4092wKyk

🪔 घटस्थापना कधी?

शारदीय नवरात्राची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून होईल. त्याच दिवशी घटस्थापना केली जाईल आणि पहिली माळ म्हणजेच देवी शैलपुत्रीची पूजा असेल.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त: सकाळी ६:१९ ते १०:१२ वाजेपर्यंत.

अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४४ ते दुपारी १२:३१ वाजेपर्यंत.

🐘 देवीचे वाहन आणि आगमन

यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार असल्याचे मानले जाते. नवरात्रीची सुरुवात रविवारी होत असल्याने देवीचे वाहन हत्ती असल्याचे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. देवीचे हत्तीवर आगमन हे सुख-समृद्धी आणि शुभ संकेताचे प्रतीक मानले जाते.


🙏 पूजा विधी

आश्विन शु. १ ते अश्विन शु. ९

शारदीय नवरात्र घटस्थापना विधी

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा.

ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी-कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे.

आचमन विधी

खालील मंत्र चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.

१. ॐ ऐं आत्मतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ॥

२. ॐ ह्रीं विद्यातत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ॥

३. ॐ क्लीं शिवतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ॥

४. ॐ ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा ॥

गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.

🪔 संकल्प

मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा / नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय व उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड, अचंचल, अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती (संस्कृत / प्राकृत) ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठ करण्याचा संकल्प करीत आहे.

श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.

अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.

🌺 घटस्थापनेची कृती

१. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.

२. एक वेळूची टोपली त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती व गहू मिसळून भरावे.

३. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दूर्वा, सुपारी, पैसा, गंध व अक्षता टाकाव्यात. विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा.

४. घटाच्या चारही दिशांना पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावेत.

५. खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी.

ॐ सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते ॥

हा मंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा.

देवीच्या टाकावर १६ / १ वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा.

घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावीत. त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा.

टाकाची पंचोपचार पूजा करावी.

🌼 देवीचे ध्यान

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥
ध्यायामि ध्यायामि । नमस्कारान् समर्पयामि ॥

🪔 पंचोपचार पूजा

१. गंध, अक्षता, हळद-कुंकू

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥

विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ॥

अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ॥

हरिद्रा-कुंकुम-सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ॥

(गंध लावावे, अक्षता वाहाव्यात व हळद-कुंकू वाहावे.)


२. पुष्पपूजा

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥

ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ॥

(फुले वाहावीत.)


३. धूप

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥

धूपमाघ्रापयामि ॥

(धूप ओवाळावा.)


४. दीप

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥

दीपं दर्शयामि ॥

(दीप ओवाळावा.)


५. नैवेद्य

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ॥

नैवेद्यं समर्पयामि ॥

(कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.)

🌺 घटावर माळ बांधण्याचा मंत्र

पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.

ॐ मां माले महामाये सर्वशक्तिस्वरूपिणि ।
चतुर्वर्गस्त्वयि न्यस्तः तन्मे सिद्धिदा भव ॥

☀️ पहिल्या दिवशी: विड्याच्या पानाची माळ बांधावी.

त्यानंतर आरती करावी.

☀️ रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी. घटास माळ चढवावी व आरती करावी.

☀️ नऊ दिवसांत सर्व कुटुंबीयांनी मिळून १४ किंवा २८ पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत / प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे.

☀️ कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा.

☀️ अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटानाद करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा. पुरणाच्या २१ दिव्यांनी महाआरती करावी.

☀️ नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करवावे. भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा.

☀️ दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसमवेत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवताला व घरातील ज्येष्ठांना द्यावे. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसांत माळावा व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावा.

☀️ घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी.


🌸 नवरात्रातील नऊ माळा

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे.

पहिली माळ: शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ.
दुसरी माळ: अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ: गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या निळ्या फुलांची माळ.
चौथी माळ: केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ: बेल किंवा कुंकवाची वाहतात.
सहावी माळ: कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ: झेंडू किंवा नारिंगी रंगाची फुले.
आठवी माळ: तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ: कुंकुमार्चनाची वाहतात.

🪔 अखंड दीपप्रज्वलन करण्याचे महत्त्व

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तितत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.


🍚 नवरात्रीचे नऊ नैवेद्य

पहिला दिवस – मातेचे रूप: शैलपुत्री

गायीचे शुद्ध तूप किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ.

दुसरा दिवस – मातेचे रूप: ब्रह्मचारिणी

साखर किंवा खडीसाखर (पंचामृत).

तिसरा दिवस – मातेचे रूप: चंद्रघंटा

दूध किंवा दुधाची खीर.

चौथा दिवस – मातेचे रूप: कुष्मांडा

मालपुआ.

पाचवा दिवस – मातेचे रूप: स्कंदमाता

केळी किंवा केळीपासून केलेले गोड पदार्थ.

सहावा दिवस – मातेचे रूप: कात्यायनी

मध किंवा मधाची मिठाई.

सातवा दिवस – मातेचे रूप: कालरात्री

गूळ किंवा गुळापासून बनवलेला शिरा / लापशी.

आठवा दिवस – मातेचे रूप: महागौरी

नारळ किंवा नारळाची बर्फी / लाडू.

नववा दिवस – मातेचे रूप: सिद्धीदात्री

हलवा, पुरी आणि काळे चणे.

🌺 श्री दुर्गादेव्यै नमः 🌺

आई दुर्गेची कृपा सर्वांवर सदैव राहो.

शुभ शारदीय नवरात्र!

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form