ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त २०२६ | गौरी पूजन व विसर्जन शुभ वेळ

 

यंदा ज्येष्ठा गौराईला घरी कधी आणायचे?
ज्येष्ठा गौरी मुहूर्त २०२६


गौरी पूजन कधी आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गौराईच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

दरवर्षी गौराई तीन दिवसांसाठी माहेरी, म्हणजेच आपल्या घरी येतात. पहिल्या दिवशी गौरी आवाहन आणि स्थापना केली जाते, दुसऱ्या दिवशी गौरींचे पूजन करून महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते.

अखंड सौभाग्य आणि घरातील सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन करण्याची परंपरा आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, एके काळी असुरांच्या त्रासामुळे देवांसह सर्व लोक त्रस्त झाले होते. तेव्हा स्त्रियांनी महालक्ष्मीला शरण जाऊन दैत्यांच्या त्रासातून मुक्त करण्याची आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना केली.

त्यावेळी प्रसन्न झालेल्या महालक्ष्मीने आपल्या शक्तीने दुष्ट राक्षसांचा संहार करून जनतेला दिलासा दिला. या कृतज्ञतेची आठवण म्हणून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे.

🌺 गौरी आवाहन आणि पूजनाच्या विविध पद्धती

गौरी आवाहन आणि पूजनाच्या पद्धती मात्र प्रत्येक घरातील आणि प्रदेशातील परंपरेनुसार वेगवेगळ्या असतात.

काही ठिकाणी चांदीचे, पितळेचे किंवा मातीचे मुखवटे वापरले जातात. काही ठिकाणी मातीची मूर्ती, सुघट किंवा नदीकाठचे पाच छोटे खडे गौरीचे प्रतीक मानले जातात.

तर काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवला जातो. काही भागात तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यावर मातीचा मुखवटा बसवण्याचीही परंपरा आहे.



गौरीला साडी नेसवून दागदागिने आणि फुलांनी सजवले जाते. गौरी घरात आणताना रांगोळीने लक्ष्मीची पावले काढली जातात. काही घरांमध्ये आठ पावले काढून प्रत्येक पावलावर गौरीला थांबवत घरात आणले जाते.

गौरी आवाहनाच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर गौरी आणताना, ज्या सुवासिनीच्या हातात गौरी असतात तिचे पाय दूध आणि पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढण्याचीही प्रथा आहे.

यानंतर घराच्या दरवाज्यापासून गौरी जिथे बसवायच्या आहेत, तिथपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत गौरींना घरात आणले जाते. ताट-चमचा किंवा घंटा वाजवून मंगलध्वनी केला जातो.

गौरींची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील धान्य, दुध-दुभत्याची जागा आणि समृद्धीच्या वस्तू दाखवण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते.

🍽️ गौरींचा नैवेद्य आणि पूजन

पहिल्या दिवशी काही भागांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात गौरीला शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते. पूजा आणि आरतीनंतर गौरीला पुरणपोळी, खीर आणि विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो.

काही घरांमध्ये सोळा भाज्या, सोळा कोशिंबिरी, सोळा चटण्या, सोळा पक्वान्ने आणि विविध फराळाचे पदार्थ करण्याची परंपरा आहे.



यासोबतच कटाची आमटी, भजी, पापड, लोणचे अशा पदार्थांचीही मेजवानी केली जाते.

या दिवशी सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी बोलावले जाते. काही ठिकाणी कुमारिका पूजनही केले जाते. संध्याकाळी आरती केल्यानंतर गाणी, फुगड्या आणि पारंपरिक खेळ खेळत गौरीसाठी जागरण केले जाते.

🌸 तिसरा दिवस — गौरी विसर्जन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते.

या दिवशी गौरीला हळद-कुंकू आणि अक्षता वाहून पूजा व आरती केली जाते. काही परंपरांमध्ये पोवत्याच्या किंवा सुताच्या गाठी पाडल्या जातात.

या सुतामध्ये हळद-कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, सुकामेवा, बेलफळ आणि इतर वस्तूंचा समावेश केला जातो.

त्यानंतर गोड शेवयांची खीर, कानवले, दहीभात किंवा घरच्या परंपरेनुसार इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरींची पूजा आणि आरती करून पुढील वर्षी पुन्हा माहेरी येण्याचे आमंत्रण देत त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते.

गौरी मातेच्या सणात घरातील सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी बोलावण्याची, लेकुरवाळी सवाष्ण जेवू घालण्याची आणि तिला विडा व दक्षिणा देण्याचीही काही ठिकाणी परंपरा आहे.

गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी, फुगड्या आणि विविध पारंपरिक खेळ करून देवीसाठी जागरण करतात.

🪔 आता जाणून घेऊया यंदाच्या गौरी सणाच्या तारखा

यंदा २०२६ मध्ये गौराई गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी येणार आहेत.

पहिला दिवस १७ सप्टेंबर २०२६
गुरुवार
गौरी आवाहन
दुसरा दिवस १८ सप्टेंबर २०२६
शुक्रवार
गौरी पूजन
तिसरा दिवस १९ सप्टेंबर २०२६
शनिवार
गौरी विसर्जन
🕉️ गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जनाचे मुहूर्त

🌺 गौराई पूजन शुभ मुहूर्त 🌺

गौरी आवाहन:
१७ सप्टेंबर २०२६, गुरुवार
संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
गौरी पूजन:
१८ सप्टेंबर २०२६, शुक्रवार
दिवसभरात आपल्या घरच्या परंपरेनुसार करता येईल.
गौरी विसर्जन:
१९ सप्टेंबर २०२६, शनिवार
सकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत

📅 यंदाच्या तीन तारखा नक्की लक्षात ठेवा

🌿 १७ सप्टेंबर — गौरी आवाहन

🌺 १८ सप्टेंबर — गौरी पूजन

🌊 १९ सप्टेंबर — गौरी विसर्जन

गौरी मातेचे आपल्या घरात आगमन सुख, शांती, समृद्धी आणि मंगलमय वातावरण घेऊन येवो, हीच प्रार्थना.
श्री ज्येष्ठा गौरी मातेला नमस्कार!
गौरी माता की जय! 🙏🌺

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form