गुरुचरित्र – अध्याय ३३(तेहेतिसावा)
॥रुद्राक्षमाहात्म्य॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्री गुरुभ्यो नमः॥
| मूळ ओवी | ओवीचा अर्थ |
|---|---|
| नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे भाकूनि करुणा । भक्तिभावेकरोनि ॥ १ | शिष्यांमध्ये श्रेष्ठ असलेला नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून भक्तीभावाने प्रार्थना करू लागला. |
| म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानी । पतीसह सुवासिनी । आली श्रीगुरुसमागमे ॥ २ | "तो म्हणाला, ""हे स्वामी सिद्धमुनी, आधीच्या कथेच्या संदर्भाप्रमाणे ती स्त्री आपल्या जिवंत झालेल्या पतीसह श्रीगुरूंकडे आली.""" |
| श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारोनि कृपेसी । निरोपावी स्वामिया ॥ ३ | """श्रीगुरू मठात परतल्यावर पुढे काय घडले, ते कृपया मला सविस्तर सांगा.""" |
| सिद्ध म्हणे ऐक बाळा । दुजे दिनी प्रातःकाळी । दंपत्ये दोघे गुरूजवळी । येवोन बैसती वंदोन ॥ ४ | "सिद्ध म्हणाले, ""बाळा ऐक, दुसऱ्या दिवशी सकाळी ते पती-पत्नी श्रीगुरूंना वंदन करून त्यांच्यासमोर बसले.""" |
| विनविताती कर जोडोनि । आम्हा शोक घडल्या दिनी । एके यतीने येवोनि । बुद्धिवाद सांगितला ॥ ५ | "त्यांनी हात जोडून विनंती केली, ""स्वामी, ज्या दिवशी आम्हाला पतीच्या मृत्यूचे दुःख झाले, त्या दिवशी एका यतीने (योगेश्वराने) येऊन आम्हाला उपदेश केला.""" |
| रुद्राक्ष चारी आम्हासी । देता बोलिला परियेसी । कानी बांधोनि प्रेतासी । दहन करा म्हणितले ॥ ६ | """त्यांनी आम्हाला चार रुद्राक्ष दिले आणि सांगितले की, दोन रुद्राक्ष प्रेताच्या कानाला बांधून मग दहन करा.""" |
| आणिक एक बोलिले । रुद्रसूक्त असे भले । अभिषेकिती विप्रकुळे । ते तीर्थ आणावे ॥ ७ | """त्यांनी असेही सांगितले की, जिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणून श्रीगुरूंच्या चरणांवर अभिषेक करत असतील, ते तीर्थ घेऊन यावे.""" |
| आणोनिया प्रेतावरी । प्रोक्षा तुम्ही भावे करी । दर्शना जावे सत्वरी । श्रीनृसिंहसरस्वती स्वामीचे ॥ ८ | """ते तीर्थ प्रेतावर शिंपडून लगेच श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनाला जावे.""" |
| ऐसे सांगोनि आम्हांसी । आपण गेला परियेसी । रुद्राक्ष राहिले मजपासी । पतिश्रवणी स्वामिया ॥ ९ | """असे सांगून ते निघून गेले. ते रुद्राक्ष अजूनही माझ्याकडे आणि पतीच्या कानात आहेत.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरु सांगती हासोन । रुद्राक्ष दिल्हे आम्ही जाण । तव भक्ति देखोनिया ॥ १० | "तिचे बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, ""तुझी भक्ती पाहून ते रुद्राक्ष आम्हीच तुला दिले होते."" (योगेश्वर दुसरे कोणी नसून श्रीगुरूच होते)." |
| भक्ति अथवा अभक्तीसी । रुद्राक्ष धारण करणारासी । पापे न लागती परियेसी । उंच अथवा नीचाते ॥ ११ | """रुद्राक्ष भक्तीने किंवा चुकूनही धारण केले तरी, माणसाला पापे लागत नाहीत, मग तो उच्च असो वा नीच.""" |
| रुद्राक्षांचा महिमा । सांगितला अनुपमा । सांगेन विस्तारून तुम्हा । एकचित्ते परियेसा ॥ १२ | """रुद्राक्षाचा महिमा अफाट आहे, तो आता मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतो, लक्ष देऊन ऐका.""" |
| रुद्राक्षधारणे पुण्य । मिति नाही अगण्य । आणिक नाही देवास मान्य । श्रुतिसंमत परियेसा ॥ १३ | """रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य मोजता येत नाही. देवालाही हे अत्यंत मान्य आहे.""" |
| सहस्त्रसंख्या जो नर । रुद्राक्षमाळा करी हार । स्वरूपे होय तोचि रुद्र । समस्त देव वंदिती ॥ १४ | """जो मनुष्य एक हजार रुद्राक्ष धारण करतो, तो साक्षात रुद्राचे रूप बनतो आणि सर्व देव त्याला वंदन करतात.""" |
| सहस्त्र जरी न साधती । दोही बाही षोडशती । शिखेसी एक ख्याति । चतुर्विशति दोही करी ॥ १५ | """हजार शक्य नसतील, तर दोन्ही दंडांवर १६-१६, शिखेला १ आणि दोन्ही मनगटांवर २४-२४ रुद्राक्ष बांधावेत.""" |
| कंठी बांधा बत्तीस । मस्तकी बांधा चत्वारिंश । श्रवणद्वयी द्वादश । धारण करावे परियेसा ॥ १६ | """गळ्यात ३२, डोक्यावर ४० आणि दोन्ही कानांत १२-१२ रुद्राक्ष धारण करावेत.""" |
| कंठी अष्टोत्तरशत एक । माळा करा सुरेख । रुद्रपुत्रसमान ऐक । येणे विधी धारण केलिया ॥ १७ | """गळ्यात १०८ रुद्राक्षांची माळ घातल्यास तो मनुष्य शिवपुत्राप्रमाणे होतो.""" |
| मोती पोवळी स्फटिकेसी । रौप्य वैडूर्य सुवर्णेसी । मिळोनि रुद्राक्षमाळेसी । करावे धारण परियेसा ॥ १८ | """मोती, पोवळे, स्फटिक, चांदी किंवा सोन्यासोबत रुद्राक्ष गुंफून धारण करावेत.""" |
| याचे फळ असे अपार । रुद्राक्षमाला अति थोर । जे मिळती समयानुसार । रुद्राक्ष धारण करावे ॥ १९ | """याचे फळ मोठे आहे. जसे उपलब्ध होतील तसे रुद्राक्ष जरूर धारण करावेत.""" |
| ज्याचे गळा रुद्राक्ष असती । त्यासी पापे नातळती । तया होय सद्गति । रुद्रलोकी अखंडित ॥ २० | """ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असतात, त्याला पाप स्पर्श करत नाही आणि त्याला शिवलोकात कायमचे स्थान मिळते.""" |
| रुद्राक्षमाळा धरोनि । जप करिती अनुष्ठानी । अनंत फळ असे जाणी । एकचित्ते परियेसा ॥ २१ | """रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्यास अनंत पटीने फळ मिळते.""" |
| रुद्राक्षाविणे जो नर । वृथा जन्म जाणा घोर । ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र । जन्म वाया परियेसा ॥ २२ | """ज्याने कधी रुद्राक्ष घातले नाहीत आणि कपाळाला भस्माचा त्रिपुंड्र लावला नाही, त्याचा जन्म वाया गेला समजावा.""" |
| रुद्राक्ष बांधोनि मस्तकेसी । अथवा दोन्ही श्रवणांसी । स्नान करिता नरासी । गंगास्नानफळ असे ॥ २३ | """डोक्यावर किंवा कानाला रुद्राक्ष बांधून स्नान केल्यास गंगास्नानाचे पुण्य मिळते.""" |
| रुद्राक्ष ठेवोनि पूजेसी । अभिषेक करावा श्रीरुद्रेसी । लिंगपूजा समानेसी । फळ असे निर्धारा ॥ २४ | """रुद्राक्षाची पूजा करून त्यावर रुद्राभिषेक केल्यास शिवलिंगाच्या पूजेइतकेच फळ मिळते.""" |
| एकमुख पंचमुख । एकादश असती मुख । चतुर्दशादि कौतुक । मुखे असती परियेसा ॥ २५ | """रुद्राक्ष १ ते १४ मुखी किंवा त्याहीपेक्षा जास्त मुखांचे असतात.""" |
| हे उत्तम मिळती जरी । अथवा असती नानापरी । धारण करावे प्रीतिकरी । पावे चतुर्विध पुरुषार्थ ॥ २६ | """ते कोणत्याही प्रकारचे असले तरी श्रद्धेने धारण केल्यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात.""" |
| याचे पूर्वील आख्यान । विशेष असे अति गहन । ऐकता पापे पळोन । जाती त्वरित परियेसा ॥ २७ | """या संदर्भात एक प्राचीन आणि गहन कथा आहे, जी ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात.""" |
| राजा काश्मीरदेशासी । भद्रसेन नामे परियेसी । त्याचा पुत्र सुधर्म नामेसी । प्रख्यात असे अवधारा ॥ २८ | """काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता आणि सुधर्म नावाचा त्याचा प्रसिद्ध पुत्र होता.""" |
| त्या राजाचा मंत्रीसुत । नाम तारक विख्यात । दोघे कुमार ज्ञानवंत । परमसखे असति देखा ॥ २९ | """राजाचा मुलगा सुधर्म आणि मंत्र्याचा मुलगा तारक हे दोघे मित्र अत्यंत हुशार आणि एकमेकांचे जीवश्चकंठश्च मित्र होते.""" |
| उभयता एके वयासी । एके स्थानी विद्याभ्यासी । क्रीडा विनोद अति प्रीतींसी । वर्तती देखा संतोषे ॥ ३० | """दोघे एकाच वयाचे होते, एकाच ठिकाणी शिकले आणि आनंदाने खेळायचे.""" |
| क्रीडास्थानी सहभोजनी । असती दोघे संतोषोनि । ऐसे कुमार महाज्ञानी । शिवभजक परियेसा ॥ ३१ | """ते एकत्र जेवायचे आणि खेळायचे. हे दोन्ही राजपुत्र साक्षात शिवभक्त होते.""" |
| सर्वदेहा अलंकार । रुद्राक्षमाळा सुंदर । भस्मधारण त्रिपुंड्र । टिळा असे परियेसा ॥ ३२ | """त्यांच्या अंगावर दागिन्यांऐवजी रुद्राक्षमाळा असायच्या आणि कपाळावर भस्माचे तीन पट्टे (त्रिपुंड्र) असायचे.""" |
| रत्नाभरणे सुवर्ण । लेखिती लोहासमान । रुद्रमाळावाचून । न घेती देखा अलंकार ॥ ३३ | """ते हिरे, दागिने आणि सोन्याला लोखंडासारखे लेखायचे. रुद्राक्षाशिवाय इतर कोणताही अलंकार त्यांना आवडत नसे.""" |
| मातापिता बंधुजन । आणोनि देती रत्नाभरण । टाकोनि देती कोपोन । लोह पाषाण म्हणती त्यांसी ॥ ३४ | """आई-वडिलांनी दागिने दिले तर ते रागाने फेकून द्यायचे आणि त्यांना लोखंड किंवा दगड म्हणायचे.""" |
| वर्तता ऐसे एके दिवशी । तया राजमंदिरासी । आला पराशर ऋषि । जो का त्रिकाळज्ञ असे देखा ॥ ३५ | """एकदा राजवाड्यात पराशर ऋषी आले, जे भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे होते.""" |
| ऋषि आला देखोन । राजा संमुख जाऊन । साष्टांगी नमन करून । अभिवंदिला तये वेळी ॥ ३६ | """ऋषींचे आगमन पाहून राजाने सामोरे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला.""" |
| बैसवोनि सिंहासनी । अर्घ्य पाद्य देवोनि । पूजा केली विधानी । महानंदे तये वेळी ॥ ३७ | """त्यांना सिंहासनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली.""" |
| कर जोडोनि मुनिवरासी । विनवी राव भक्तीसी । पिसे लागले पुत्रांसी । काय करावे म्हणतसे ॥ ३८ | """राजाने हात जोडून विचारले, स्वामी, माझ्या मुलाला वेड लागले आहे की काय? तो असे का वागतो?""" |
| रत्नाभरणे अलंकार । न घेती भुषण परिकर । रुद्राक्षमाळा कंठी हार । सर्वाभरणे तीच करिती ॥ ३९ | """तो मौल्यवान दागिने नाकारतो आणि फक्त रुद्राक्षच अंगावर घालतो.""" |
| शिकविल्या नायकती । कैचे यांचे मती । स्वामी त्याते बोधिती । तरीच ऐकती कुमार ॥ ४० | """आम्ही कितीही समजावले तरी तो ऐकत नाही. स्वामी, तुम्हीच त्याला उपदेश करा.""" |
| भूतभविष्यावर्तमानी । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनि । यांचा अभिप्राय विस्तारोनि । निरोपावा दातार ॥ ४१ | """तुम्ही त्रिकाळज्ञ आहात, कृपया यामागचे कारण सांगा.""" |
| ऐकोनि रायाचे वचन । पराशरा हर्ष जाण । निरोपितसे हासोन । म्हणे विचित्र असे देखा ॥ ४२ | """राजाचे बोलणे ऐकून पराशर ऋषी हसले आणि म्हणाले, 'हे आश्चर्यकारक आहे!'""" |
| तुझ्या आणि मंत्रिसुताचे । वृत्तान्त असती विस्मयाचे । सांगेन ऐक विचित्र साचे । म्हणोनि निरोपी तया वेळी ॥ ४३ | """तुझ्या मुलाचा आणि मंत्र्याच्या मुलाचा पूर्ववृत्तांत अत्यंत विस्मयकारक आहे, तो मी तुला सांगतो.""" |
| पूर्वी नंदीनाम नगरी । अति लावण्य सुंदरी । होती एक वेश्या नारी । जैसे तेज चंद्रकांति ॥ ४४ | """पूर्वी नंदी नावाच्या नगरात एक अत्यंत सुंदर वेश्या राहत होती, तिचे रूप चंद्रासारखे तेजस्वी होते.""" |
| जैसा चंद्र पौर्णिमेसी । तैसे छत्र असे तिसी । सुखासन सुवर्णैसी । शोभायमान असे देखा ॥ ४५ | """तिचा थाट एखाद्या राणीसारखा होता, तिच्याकडे सोन्याच्या पालख्या आणि छत्रे होती.""" |
| हिरण्यमय तिचे भुवन । पादुका सुवर्णाच्या जाण । नानापरी आभरणे । विचित्र असती परियेसा ॥ ४६ | """तिचे घर सोन्यासारखे चमकत होते, ती सोन्याच्या पादुका वापरायची आणि तिच्याकडे खूप दागिने होते.""" |
| पर्यंक रत्नखचित देखा । वस्त्राभरणे अनेका । गोमहिषी दास्यादिका । बहुत असती परियेसा ॥ ४७ | """तिचा पलंग हिऱ्या-माणकांनी जडलेला होता. तिच्याकडे खूप गायी, म्हशी आणि दासी होत्या.""" |
| सर्वाभरणे तीस असती । जैसी दिसे मन्मथरति । नवयौवना सोमकांति । अतिसुंदर लावण्य ॥ ४८ | """दागिन्यांनी सजलेली ती साक्षात रतीसारखी सुंदर दिसायची.""" |
| गंध कुंकुम कस्तुरी । पुष्पे असती नानापरी । अखिल भोग तिच्या घरी । ख्याति असे तया ग्रामी ॥ ४९ | """तिच्याकडे सुगंधी द्रव्ये आणि फुलांची कमतरता नव्हती. सर्व प्रकारचे उपभोग तिच्या घरी होते.""" |
| धनधान्यादि संपत्ति । कोटिसंख्या नाही मिति । ऐशियापरी नांदती । वारवनिता तये नगरी ॥ ५० | """तिच्याकडे अफाट संपत्ती होती, अशी ती वेश्या त्या नगरात राहायची.""" |
| असोनि वारवनिता । म्हणवी आपण पतिव्रता । धर्म करी असंख्याता । अन्नवस्त्रे ब्राह्मणांसी ॥ ५१ | """वेश्या असूनही ती स्वतःला पतिव्रतेप्रमाणे मानून ब्राह्मणांना अन्न आणि वस्त्रे दान करायची.""" |
| नाट्यमंडप तिचे द्वारी । रत्नखचित नानापरी । उभारिला अतिकुसरी । सदा नृत्य करी तेथे ॥ ५२ | """तिच्या घरासमोर एक रत्नजडित नाट्यमंडप होता, जिथे ती नेहमी नृत्य करायची.""" |
| सखिवर्गासह नित्य । नृय करी मनोरथ । कुक्कुट मर्कट विनोदार्थ । बांधिले असती मंडप्पी ॥ ५३ | """तिने आपल्या मैत्रिणींसह तिथे नाचायची. तिने गंमत म्हणून तिथे एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते.""" |
| तया मर्कटकुक्कुटांसी । नृत्य शिकवी विनोदेसी । रुद्राक्षमाळाभूषणेसी । गळा रुद्राक्ष बांधिले ॥ ५४ | """ती त्या माकडाला आणि कोंबड्याला नाच शिकवायची आणि गंमत म्हणून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते.""" |
| तया मर्कटकुक्कुटांसी । नामे ठेविली सदाशिव ऐसी । वर्तता एके दिवसी । अभिनव झाले परियेसा ॥ ५५ | """तिने त्या दोघांची नावे 'सदाशिव' ठेवली होती. एकदा एक विचित्र घटना घडली.""" |
| शिवव्रत म्हणजे एक । वैश्य झाला महाधनिक । रुद्राक्षमाळा-भस्मांकित । प्रवेशला तिचे घरी ॥ ५६ | """एक शिवभक्त श्रीमंत व्यापारी (वैश्य), ज्याने अंगावर रुद्राक्ष आणि भस्म लावले होते, तिच्या घरी आला.""" |
| त्याचे सव्य करी देखा । रत्नखचित लिंग निका । तेजे फाके चंद्रार्का । विराजमान दिसतसे ॥ ५७ | """त्याच्या उजव्या हातात एक रत्नजडित अत्यंत तेजस्वी शिवलिं होते.""" |
| तया वैश्यासी देखोनि । नेले वेश्ये वंदूनि । नाट्यमंडपी बैसवोनि । उपचार केले नानापरी ॥ ५८ | """त्या व्यापाराला पाहून वेश्येने त्याला वंदन केले आणि नाट्यमंडपात नेऊन त्याचे स्वागत केले.""" |
| तया वैश्याचे करी । जे का होते लिंग भारी । रत्नखचित सूर्यापरी । दिसतसे तयाचे ॥ ५९ | """त्या व्यापाराच्या हातातील ते रत्नजडित लिंग सूर्यासारखे चमकत होते.""" |
| देखोनि लिंग रत्नखचित । वारवनिता विस्मय करीत । आपुल्या सखीस म्हणत । ऐसी वस्तु पाहिजे आम्हा ॥ ६० | """ते पाहून वेश्येला ते हवेसे वाटले. ती आपल्या सखीला म्हणाली, 'मला हेच लिंग हवे आहे.'""" |
| पुसावे तया वैश्यासी । जरी देईल मौल्येसी । अथवा देईल रतीसी । होईन कुलस्त्री तीन दिवस ॥ ६१ | """त्याला विचारा, तो विकत देईल का? किंवा जर त्याने ते दिले, तर मी तीन दिवस त्याची पत्नी होऊन राहीन.""" |
| ऐकोन तियेचे वचन । पुसती वैश्यासी सखी जाण । जरि का द्याल लिंगरत्न । देईल रति दिवस तीनी ॥ ६२ | """सखीने विचारल्यावर व्यापाराला ती म्हणाली की, जर तुम्ही हे रत्न दिले तर ती तीन दिवस तुमची सेवा करेल.""" |
| अथवा द्याल मौल्येसी । लक्षसंख्यादि द्रव्यासी । जे का वसे तुमचे मानसी । निरोपावे वेश्येप्रती ॥ ६३ | """किंवा तुम्हाला जे मूल्य हवे असेल ते सांगा.""" |
| ऐकोनि सखियांचे वचन । म्हणे वैश्य हासोन । देईन लिंग मोहन । रतिकांक्षा करुनी ॥ ६४ | """व्यापारी हसून म्हणाला, 'मी हे लिंग द्यायला तयार आहे, पण माझी अट आहे.'""" |
| तुमची मुख्य वारवनिता । जरी होईल माझी कांता । दिवस तीन पतिव्रता । होवोनि असणे मनोभावे ॥ ६५ | """'जर ती वेश्या तीन दिवस मनापासून माझी निष्ठावान पत्नी म्हणून राहिली, तरच मी हे देईन.'""" |
| म्हणोनिया मुख्य वनितेसी । पुसतसे वैश्य तिसी । व्यभिचारिणी नाम तुजसी । काय सत्य तुझे बोल ॥ ६६ | """तो वेश्येला विचारू लागला, 'तुझे नाव तर व्यभिचारिणी आहे, तू तुझे वचन पाळशील का?'""" |
| तुम्हा कैचे धर्म कर्म । बहु पुरुषांचा संगम । पतिव्रता कैचे नाम । तुज असे सांग मज ॥ ६७ | """'तुला धर्माचे काय ज्ञान? तू तर अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी आहेस. तू पतिव्रता कशी बनशील?'""" |
| प्रख्यात तुमचा कुळाचार । सदा करणे व्यभिचार । नव्हे तुमचे मन स्थिर । एका पुरुषासवे नित्य ॥ ६८ | """'तुमच्या कुळाचा आचारच असा आहे, तुमचे मन एका पुरुषावर स्थिर राहू शकत नाही.'""" |
| ऐकोनि वैश्याचे वचन । वारवनिता बोले आपण । दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री ॥ ६९ | """वेश्येने उत्तर दिले, 'मी शपथ घेते की तीन दिवस मी तुमचीच निष्ठावान पत्नी होऊन राहीन.'""" |
| द्यावे माते लिंगरत्न । रतिप्रसंगी तुमचे मन । संतोषवीन अतिगहन । तनमनधनेसी ॥ ७० | """'मला ते रत्न द्या, मी तुम्हाला सर्वतोपरी संतुष्ट करीन.'""" |
| वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावे आम्हांसी । दिनत्रय दिवानिशी । वागावे पत्नीधर्मकर्मे ॥ ७१ | "व्यापाऱ्याने सांगितले, ""मला वचन दे की तू तीन दिवस आणि रात्र माझ्याशी पत्नीप्रमाणे एकनिष्ठ राहशील.""" |
| तये वेळी वारवनिता । लिंगावरी ठेवी हाता । चंद्र सूर्य साक्षी करिता । झाली पत्नी तयाची ॥ ७२ | "त्या वेश्येने शिवलिंगावर हात ठेवून, चंद्र-सूर्याला साक्षी ठेवून तीन दिवसांसाठी त्याची पत्नी होण्याचे मान्य केले." |
| इतुकिया अवसरी । लिंग दिले तियेचे करी । संतोष जहाली ती नारी । करी कंकण बांधिले ॥ ७३ | तेव्हा त्या व्यापाराने ते रत्नजडित लिंग तिच्या हातात दिले. ती आनंदित झाली आणि तिने हातात कंकण बांधले. |
| लिंग देवोनि वेश्येसी । बोले वैश्य परियेसी । माझ्या प्राणासमानेसी । लिंग असे जाण तुवा ॥ ७४ | "लिंग देताना तो म्हणाला, ""हे लिंग माझ्या प्राणांइतके प्रिय आहे, हे लक्षात ठेव.""" |
| या कारणे लिंगासी । जतन करणे परियेसी । हानि होता यासी । प्राण आपुला देईन ॥ ७५ | """याची नीट काळजी घे. जर याला काही झाले, तर मी माझे प्राण सोडेन.""" |
| ऐसे वैश्याचे वचन ऐकोनि । अंगिकारिले आपण । म्हणे लिंग करीन जतन । प्राणापरी परियेसा ॥ ७६ | "तिने ते मान्य केले आणि सांगितले की, ""मी माझ्या प्राणांप्रमाणे या लिंगाचे जतन करीन.""" |
| ऐसी दोघे संतोषित । बैसले होते मंडपात । दिवस जाता अस्तंगत । म्हणती जाऊ मंदिरा ॥ ७७ | ते दोघे मंडपात बसले होते. संध्याकाळ झाल्यावर ते घराच्या आत जाण्यास निघाले. |
| संभोगसमयी लिंगासी । न ठेवावे जवळिकेसी । म्हणे वैश्य तियेसी । तये वेळी परियेसा ॥ ७८ | "व्यापाऱ्याने सांगितले की, ""संभोगसमयी हे पवित्र लिंग जवळ ठेवू नये.""" |
| ऐकोनि वैश्याचे वचन । मंडपी ठेविले लिंगरत्न । मध्यस्तंभी बैसवोन । गेली अंतर्गृहात ॥ ७९ | त्याच्या म्हणण्यानुसार तिने ते लिंग नाट्यमंडपाच्या मधल्या खांबावर सुरक्षित ठेवले आणि ती आत गेली. |
| क्रीडा करिती दोघेजण । होते ऐका एक क्षण । उठिला अग्नि दारुण । तया नाट्यमंडपी ॥ ८० | ते दोघे आत असताना अचानक नाट्यमंडपाला भीषण आग लागली. |
| अग्नि लागता मंडप । भस्म झाला जैसा धूप । वैश्य करितसे प्रलाप । देखोनि तये वेळी ॥ ८१ | संपूर्ण मंडप जळून खाक झाला. हे पाहून व्यापारी मोठ्याने आक्रोश करू लागला. |
| म्हणे हा हा काय झाले । माझे प्राणलिंग गेले । विझविताती अतिप्रबळे । नगरलोक मिळोनि ॥ ८२ | """माझे प्राणलिंग आगीत भस्म झाले!"" असे म्हणून तो रडू लागला. नगरातील लोकांनी आग विझवली." |
| विझवूनिया पहाती लिंगासी । दग्ध झाले परियेसी । अग्नी कुक्कुटमर्कटांसी । दहन जहाले परियेसा ॥ ८३ | आग विझवून पाहिले तर ते लिंग जळून गेले होते आणि तिथे असलेले माकड व कोंबडाही जळून मृत झाले होते. |
| वैश्य देखोनि तये वेळी । दुःख करी अतिप्रबळी । प्राणलिंग गेले जळोनि । आता प्राण त्यजीन म्हणे ॥ ८४ | """माझे लिंग गेले, आता जगून काय फायदा?"" असे म्हणून व्यापाऱ्याने स्वतःचे प्राण देण्याचे ठरवले." |
| म्हणोनिया निघाला बाहेरी । आयती केली ते अवसरी । काष्ठे मिळवोन अपारी । अग्नि केला परियेसा ॥ ८५ | त्याने बाहेर जाऊन सरपण गोळा केले आणि मोठी चिता रचली. |
| लिंग दग्ध झाले म्हणत । अग्निप्रवेश केला त्वरित । नगरलोक विस्मय करीत । वेश्या दुःख करीतसे ॥ ८६ | त्याने अग्नीत उडी घेतली. हे पाहून वेश्येला खूप दुःख झाले. |
| म्हणे हा हा काय झाले । पुरुषहत्यापाप घडले । लिंग मंडपी ठेविले । दग्ध जहाले परियेसा ॥ ८७ | तिला वाटले की आपल्यामुळे पतीचा (व्यापाऱ्याचा) मृत्यू झाला आणि लिंगही जळाले. |
| वैश्य माझा प्राणेश्वर । तया हानि जहाली निर्धार । पतिव्रताधर्मे सत्वर । प्राण त्यजीन म्हणतसे ॥ ८८ | """हा तीन दिवसांसाठी का असेना, माझा पती आहे. आता मीही पतिव्रता धर्माने सती जाईन.""" |
| बोलाविले विप्रांसी । संकल्पिले संपदेसी । सहगमन करावयासी । दानधर्म करीतसे ॥ ८९ | "तिने ब्राह्मणांना बोलावले, आपली संपत्ती दान केली आणि सती जाण्याची तयारी केली." |
| वस्त्रे भूषणे भांडारा । देती झाली विप्रवरा । चंदनकाष्ठभारा । चेतविले अग्नीसी ॥ ९० | तिने चंदनाची लाकडे रचून अग्नी प्रज्वलित केला. |
| आपुल्या बंधुवर्गासी । नमोनि पुसे तयासी । निरोप द्यावा आपणासी । पतीसवे जातसे ॥ ९१ | तिने आपल्या नातेवाईकांचा निरोप घेतला. |
| ऐकोनि तियेचे वचन । दुःख पावले बंधुजन । म्हणती तुझी बुद्धि हीन । काय धर्म करीतसे ॥ ९२ | "नातेवाईक म्हणाले, ""तुझी बुद्धी फिरली आहे का? तू एका वेश्येसारखी वाग, हे काय सती जाणे वगैरे?""" |
| वेश्येच्या मंदिरासी । येती पुरुष रतीसी । मिती नाही तयांसी । केवी जहाला तुझा पुरुष ॥ ९३ | """तुझ्याकडे तर रोज अनेक पुरुष येतात, मग हा तुझा पती कसा झाला?""" |
| कैचा वैश्य कैचे लिंग । वाया जाळिसी आपुले अंग । वारवनिता धर्म चांग । नूतन पुरुष नित्य घ्यावा ॥ ९४ | """वेडी होऊ नकोस, स्वतःचे शरीर अग्नीत जाळू नकोस. नवीन पुरुष शोध.""" |
| ऐसे वैश्य किती येती । त्यांची कैशी होसी सती । हासती नगरलोक ख्याति । काय तुझी बुद्धि सांगे ॥ ९५ | """असे कितीतरी लोक येतील, प्रत्येकासाठी तू सती जाणार का? लोक तुला हसतील.""" |
| येणेपरी सकळ जन । वारिताती बंधुजन । काय केलिया नायके जाण । कवणाचेही ते काळी ॥ ९६ | "सर्वजण तिला अडवत होते, पण तिने कोणाचेही ऐकले नाही." |
| वेश्या म्हणे तिये वेळी । आपुला पति वैश्य अढळी । प्रमाण केले तयाजवळी । चंद्र सूर्य साक्षी असे ॥ ९७ | "ती म्हणाली, ""मी चंद्र-सूर्याला साक्षी ठेवून वचन दिले आहे की मी त्याची पत्नी आहे.""" |
| साक्षी केली म्या हो क्षिति । दिवस तीन अहोरात्री । धर्मकर्म त्याची पत्नी । जाहले आपण परियेसा ॥ ९८ | """मी तीन दिवसांसाठी त्याची धर्मपत्नी झाली आहे.""" |
| माझा पति जाहला मृत । आपण विनवीतसे सत्य । पतिव्रता धर्म ख्यात । वेदशास्त्र परियेसा ॥ ९९ | """आता तो मृत झाला आहे, तर मी शास्त्रानुसार सहगमन करणारच.""" |
| पतीसवे जे नारी । सहगमन हाय प्रीतिकरी । एकेक पाउली भूमीवरी । अश्वमेधफळ असे ॥ १०० | """सती जाणाऱ्या स्त्रीला प्रत्येक पावलावर अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते.""" |
| आपुले माता पिता उद्धरती । एकवीस कुळे पवित्र होती । पतीची जाण तेच रीती । एकवीस कुळे परियेसा ॥ १०१ | """तिच्यामुळे दोन्हीकडची ४२ कुळे उद्धरतात.""" |
| इतुके जरी न करिता । पातिव्रत्यपणा वृथा । केवी पाविजे पंथा । स्वर्गाचिया निश्चये ॥ १०२ | """जर मी हे केले नाही, तर माझ्या पातिव्रत्याला काही अर्थ उरणार नाही.""" |
| ऐसे पुण्य जोडिती । काय वाचूनि राहणे क्षिती । दुःख संसारसागर ख्याति । मरणे सत्य कधी तरी ॥ १०३ | """कधी ना कधी मरायचेच आहे, तर असे पुण्य करून का मरू नये?""" |
| म्हणोनि विनवी सकळांसी । निघाली बाहेर संतोषी । आली अग्निकुंडापासी । नमन करी तये वेळी ॥ १०४ | सर्वांना नमस्कार करून ती हसतमुखाने अग्निकुंडापाशी आली. |
| स्मरोनिया सर्वेश्वर । केला सूर्यासी नमस्कार । प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळी ॥ १०५ | "तिने देवाची प्रार्थना केली, सूर्याला नमस्कार केला आणि अग्नीला प्रदक्षिणा घातली." |
| नमुनी समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निकुंडासी । उडी घातली वेगेसी । अभिनव जहाले तये वेळी ॥ १०६ | तिने अग्नीत उडी घेतली आणि एक चमत्कार घडला! |
| सदाशिव पंचवक्त्र । दशभुजा नागसूत्र । हाती आयुधे विचित्र । त्रिशूळ डमरू जाण पा ॥ १०७ | "प्रत्यक्ष पंचमुखी, दशभुज भगवान शंकर तिथे प्रकट झाले." |
| भस्मांकित जटाधारी । बैसला असे नंदीवरी । धरिता झाला वरचेवरी । वेश्येशी तये वेळी ॥ १०८ | नंदीवर बसलेल्या महादेवाने तिला आगीतून अलगद वर उचलले. |
| तया अग्निकुंडात । न दिसे अग्नि असे शांत । भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न झाला तये वेळी ॥ १०९ | तो अग्नी अचानक शांत झाला आणि भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले. |
| हाती धरुनी तियेसी । कडे काढी व्योमकेशी । प्रसन्न होउनी परियेसी । वर माग म्हणतसे ॥ ११० | "महादेवाने तिचा हात धरून तिला बाहेर काढले आणि विचारले, ""वर माग.""" |
| ईश्वर म्हणे तियेसी । आलो तुझे परीक्षेसी । धर्मधैर्य पाहावयासी । येणे घडले परियेसा ॥ १११ | "ईश्वर म्हणाले, ""मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच व्यापाऱ्याचे रूप घेऊन आलो होतो.""" |
| झालो वैश्य आपणची । रत्नलिंग स्वयंभूची । मायाअग्नि केला म्यांची । नाट्यमंडप दग्ध केला ॥ ११२ | """ते रत्नलिं मीच होतो आणि ती आगही माझीच माया होती.""" |
| तुझे मन पहावयासी । जहालो अग्निप्रवेशी । तूची पतिव्रता सत्य होशी । सत्य केले व्रत आपुले ॥ ११३ | """तुझे धैर्य पाहण्यासाठी मी स्वतः अग्नीत प्रवेश केला. तू खरी पतिव्रता आहेस हे सिद्ध झाले.""" |
| संतोषलो तुझे भक्तीसी । देईन वर जो मागसी । आयुरारोग्यश्रियेसी । जे इच्छिसी ते देईन ॥ ११४ | """मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवे ते माग.""" |
| म्हणे वेश्या तये वेळी । नलगे वर चंद्रमौळी । स्वर्ग भूमि पाताळी । न घे भोग ऐश्वर्य ॥ ११५ | "वेश्या म्हणाली, ""स्वामी, मला स्वर्ग किंवा ऐश्वर्य काहीही नको.""" |
| तुझे चरणकमळी भृंग । होवोनि राहीन महाभाग्य । माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे सन्निधेसी ॥ ११६ | """फक्त तुमच्या चरणांपाशी मला जागा द्या. तसेच माझे नातेवाईक,"" |
| दासदासी माझे असती । सकळा न्यावे स्वर्गाप्रति । तव सन्निध पशुपति । सर्वदा राहो सर्वेश्वरा ॥ ११७ | """दास-दासी आणि जे प्राणी (माकड व कोंबडा) जळाले, त्यांनाही मुक्ती द्या.""" |
| न व्हावी पुनरावृत्ती । न लागे संसार यातायाती । विमोचावे स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणी लागली ॥ ११८ | """मला आता पुन्हा जन्म नको, या संसारातून कायमची सुटका करा.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । प्रसन्न झाला गौरीरमण । सकळा विमानी बैसवोन । घेऊन गेला स्वर्गाप्रती ॥ ११९ | शंकराने सर्वांना विमानात बसवून कैलासाला (शिवलोकात) नेले. |
| तिचे नाट्यमंडपात । जो का झाला मर्कटघात । कुक्कुटसमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥ १२० | "त्या नाट्यमंडपात जे माकड आणि कोंबडा जळाले होते," |
| म्हणोनि पराशर ऋषि । सांगतसे रायासी । मर्कटजन्म त्यजूनि हर्षी । तुझे उदरी जन्मला ॥ १२१ | "पराशर ऋषी राजाला म्हणाले, ""त्या माकडाने तुझ्या पोटी राजपुत्र म्हणून जन्म घेतला.""" |
| तुझे मंत्रियाचे कुशी । कुक्कुट जन्मला परियेसी । रुद्राक्षधारणफळे ऐसी । राजकुमार होऊन आले ॥ १२२ | """आणि तो कोंबडा तुझ्या मंत्र्याचा मुलगा झाला. त्या जन्मात त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष होते, म्हणूनच आज ते राजपुत्र झाले आहेत.""" |
| पूर्वसंस्काराकरिता । रुद्राक्षधारण केले नित्या । इतके पुण्य घडले म्हणता । जहाले तुझे कुमार हे ॥ १२३ | """नकळत केलेल्या रुद्राक्षधारणामुळे त्यांचे जीवन बदलले, मग भक्तीने रुद्राक्ष धारण करणाऱ्याचे किती पुण्य असेल!""" |
| आता तरी ज्ञानवंती । रुद्राक्ष धारण करिताती । त्याच्या पुण्या नाही मिती । म्हणोनि सांगे पराशरऋषि ॥ १२४ | """म्हणून ज्ञानी लोक नेहमी रुद्राक्ष धारण करतात.""" |
| श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेपरी रायासी । सांगता झाला महाऋषि । पराशर विस्तारे ॥ १२५ | श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्याला ही कथा सांगितली. |
| ऐकोनि ऋषीचे वचन । राजा विनवी कर जोडून । प्रश्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्ते ॥ १२६ | ही कथा ऐकून राजाने ऋषींना आणखी एक गहन प्रश्न विचारला. |
| म्हणोनि सिद्ध विस्तारेसी । सांगे नामधारकासी । अपूर्व जहाले परियेसी । पुढील कथा असे ऐका ॥ १२७ | "सिद्ध नामधारकाला म्हणतात, ""पुढची कथा अत्यंत अपूर्व आहे, ती लक्ष देऊन ऐक.""" |
| गंगाधराचा नंदनु । सांगे श्रीगुरुचरित्रकामधेनु । ऐका श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १२८ | सरस्वती गंगाधर म्हणतात, हे गुरुचरित्र कामधेनूसारखे सर्व काही देणारे आहे. |
| इति श्रीगुरुचरित्रामृत । रुद्राक्षमहिमा येथ । सांगितले निभ्रांत । पुण्यात्मक पावन जे ॥ १२९ | येथे रुद्राक्षाचा महिमा पूर्ण झाला. |
| इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रुद्राक्षमाहात्म्य नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३३॥ ॥श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओवीसंख्या १३० ॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ | |