गुरुचरित्र – अध्याय ३२(बत्तिसावा)
॥प्रेतसंजीवनं॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्री गुरुभ्यो नमः॥
| मूळ ओवी | ओवीचा अर्थ |
|---|---|
| पतिव्रतेचिया रिति । सांगे देवा बृहस्पति । सहगमनी फलश्रुति । येणेपरी निरोपिली ॥ १ | देवगुरू बृहस्पतींनी देवांना पतिव्रतेचे नियम सांगितले आणि पतीसोबत सती जाण्याच्या (सहगमनाच्या) पुण्याचे फळही वर्णन केले. |
| विधवापणाचा आचारू । सांगता झाला देववरू । पुसताती ऋषेश्वरू । ऐका श्रोते एकचित्ते ॥ २ | आता बृहस्पतींनी विधवा स्त्रीचे आचार (नियम) सांगण्यास सुरुवात केली. ऋषींनी विचारलेले हे मार्गदर्शन श्रोत्यांनी एकाग्रतेने ऐकावे. |
| जवळी नसता आपुला पति । त्याते मरण झालिया प्राप्ति । काय करावे त्याचे सती । सहगमन केवी करावे ॥ ३ | "जर पती जवळ नसताना (परगावी असताना) त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीने काय करावे आणि तिने सहगमन कसे करावे?" |
| अथवा असेल गरोदरी । असे तीते कन्याकुमरी । काय करावे तिये नारी । म्हणून विनविती गुरूसी ॥ ४ | "किंवा जर ती स्त्री गर्भवती असेल किंवा तिला लहान मुलगी असेल, तर अशा परिस्थितीत तिने काय करावे, असे देवांनी गुरूंना विचारले." |
| ऐकोनि देवांचे वचन । सांगता जाला विस्तारोन । एकचित्ते करून । ऐका श्रोते सकळ ॥ ५ | "देवांचे हे प्रश्न ऐकून बृहस्पतींनी त्याचे सविस्तर उत्तर दिले, ते सर्व श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे." |
| पति जवळी असे जरी । सहगमनी जावे तिये नारी । असता आपण गरोदरी । करू नये सहगमन ॥ ६ | "पती जवळ असेल तर पत्नीने सहगमन करावे, परंतु जर ती गर्भवती असेल तर तिने सहगमन करू नये." |
| स्तनपानी असता कुमारू । तिणे करिता पाप थोरू । पुरुष मेला असेल दुरू । सहगमन करू नये ॥ ७ | "जर स्त्रीला अंगावर दूध पिणारे लहान बाळ असेल, तर तिने सहगमन करणे हे मोठे पाप आहे. तसेच पती लांब असताना मृत्यू पा पावला तरी सहगमन टाळावे." |
| तिणे असावे विधवापणे । विधिपूर्वक आचरणे । सहगमासमाने । असे पुण्य परियेसा ॥ ८ | अशा स्त्रियांनी विधवा धर्माचे शास्त्रशुद्ध पालन करावे. असे आचरण केल्यास सहगमनाइतकेच पुण्य मिळते. |
| विधवापणाचा आचारू । करिता असे पुण्य थोरू । निवर्तता आपुला भ्रतारू । केशवपन करावे ॥ ९ | विधवा धर्माचे पालन करणे हे मोठ्या पुण्याचे आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीने आपले केशवपन (केस कापणे) करावे. |
| ज्या का विधवा केश राखिती । त्यांची ऐका फलश्रुति । केश पुरुषासी बाधिती । नरकापरी परियेसा ॥ १० | "ज्या विधवा स्त्री केस कापून टाकत नाहीत, त्यांचे ते केस पतीला नरकाच्या यातना देण्यास कारणीभूत ठरतात." |
| यास्तव करणे केशवपण । करावे तिणे नित्य स्नान । एक वेळा भोजन । करावे तिणे परियेसा ॥ ११ | "म्हणून केशवपन करावे, दररोज स्नान करावे आणि दिवसातून केवळ एकदाच भोजन करावे." |
| एक धान्याचे अन्न । करावे तिणे भोजन । तीन दिवस उपोषण । करावे तिणे भक्तीने ॥ १२ | एकाच धान्यापासून तयार केलेले अन्न खावे आणि अधूनमधून तीन दिवसांचे उपोषण भक्तीने करावे. |
| पाच दिवस पक्षमासास । करावा तिणे उपवास । अथवा चांद्रायणग्रास । भोजन करणे परियेसा ॥ १३ | महिन्यातून पाच दिवस किंवा पंधरवड्यातून ठराविक दिवस उपवास करावा किंवा चांद्रायण व्रताप्रमाणे भोजन करावे. |
| चंद्रोदय बीजेसी । एक ग्रास तया दिवसी । चढते घ्यावे पंधरा दिवसी । पौर्णिमेसी भोजन ॥ १४ | चांद्रायण व्रतात शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला एक घास जेवावे आणि पौर्णिमेपर्यंत रोज एकेक घास वाढवत न्यावा. |
| कृष्णपक्षी येणेपरी । ग्रास घ्यावे उतरत नारी । अमावास्या येता जरी । एक ग्रास जेवावा ॥ १५ | वद्य पक्षात रोज एकेक घास कमी करत यावे आणि अमावस्येला केवळ एकच घास जेवावा. |
| शक्ति नाही जियेसी । एकान्न जेवावे परियेसी । अथवा फल-आहारेसी । अथवा शाका-आहार देखा ॥ १६ | "ज्या स्त्रीला हे व्रत करण्याची शक्ती नाही, तिने केवळ एका वेळी अन्न खावे किंवा फलाहार किंवा शाकाहार करावा." |
| अथवा घ्यावे क्षीर मात्र । कधी न घ्यावे अपवित्र । जेणे राहे प्राण मात्र । श्वासोच्छ्वास चाले ऐसे ॥ १७ | "किंवा केवळ दूध पिऊन राहावे, परंतु कधीही अपवित्र अन्न घेऊ नये. केवळ प्राण टिकून राहतील इतपतच आहार घ्यावा." |
| शयन करिता मंचकावरी । पुरुष घाली रौरव घोरी । भोगी नरक निरंतरी । पतीसहित परियेसा ॥ १८ | "विधवा स्त्रीने जर पलंगावर (मंचकावर) शयन केले, तर तिच्या पतीला रौरव नावाचा भयानक नरक भोगावा लागतो." |
| करू नये मंगलस्नान । अथवा देहमर्दन । गंध परिमल तांबूल जाण । पुष्पादि तिणे वर्जावे ॥ १९ | "तिणे मंगल स्नान, अंगाला तेल लावणे, गंध, सुवासिक द्रव्ये, विडा (तांबूल) आणि फुले यांचा त्याग करावा." |
| पुत्रावीण असे नारी । करणे तर्पण पुत्रापरी । तीळ दर्भ कुशधारी । गोत्रनाम उच्चारावे ॥ २० | "ज्या स्त्रीला मुलगा नाही, तिने स्वतः मुलाप्रमाणे पतीचे तर्पण करावे. तीळ, दर्भ आणि कुश हातात घेऊन गोत्राचा उच्चार करावा." |
| विष्णुपूजा करावी नित्य । आपुला पुरुष हा निश्चित । पुरुष आठवोनि चित्त । विष्णुस्थानी मानिजे ॥ २१ | दररोज विष्णूची पूजा करावी आणि आपल्या पतीलाच विष्णूच्या रूपात मानून त्यांचे स्मरण करावे. |
| पुरुष असता जेणेपरी । पतिनिरोपे आचार करी । तेणेचि रीती विष्णु अवधारी । त्याचे निरोपे आचरावे ॥ २२ | "पती जिवंत असताना जशी त्यांच्या आज्ञेत राहत असे, तसेच आता विष्णूला पती मानून त्यांच्या प्रेरणेने वागावे." |
| तीर्थयात्रे उपासव्रत । विष्णुनिरोपे करावे निश्चित । अथवा गुरु द्विज विख्यात । त्यांचे निरोपे आचरावे ॥ २३ | तीर्थयात्रा किंवा उपवास हे विष्णूच्या किंवा सद्गुरूंच्या अथवा ब्राह्मणांच्या आज्ञेने करावेत. |
| आपण असता सुवासिनी । ज्या वस्तूची प्रीति अंतःकरणी । तैशी वस्तु द्यावी धणी । विद्वज्जनविप्रांसी ॥ २४ | "सुवासिनी असताना ज्या वस्तूंवर आपले प्रेम होते, त्या सर्व वस्तू ब्राह्मणांना दान कराव्यात." |
| वैशाख माघ कार्तिकमास । अनेक स्नानी आचारविशेष । माघस्नान तीर्थास । विष्णुस्मरणे करावे ॥ २५ | "वैशाख, माघ आणि कार्तिक या महिन्यांत स्नानाचे विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात विष्णूचे स्मरण करून तीर्थस्नान करावे." |
| वैशाखी जळकुंभदान । कार्तिकी दीपआराधन । ब्राह्मणा द्यावे घृतदान । यथाशक्त्या दक्षिणेसी ॥ २६ | "वैशाख महिन्यात पाण्याचे माठ (जलकुंभ) दान करावे, कार्तिक महिन्यात दीपदान करावे आणि ब्राह्मणांना तूप व यथाशक्ती दक्षिणा द्यावी." |
| माघमासी तिळघृतेसी । द्यावे दान विप्रांसी । अरण्यात वैशाखमासी । पोई घालिजे निर्मळोदके ॥ २७ | माघ महिन्यात तीळ आणि तूप दान करावे. वैशाख महिन्यात वाटसरूंसाठी पाणपोई (पिण्याच्या पाण्याची सोय) उभारावी. |
| शिवालयी ईश्वरावरी । गळती ठेविजे निर्मळ वारी । गंध परिमळ पूजा करी । तेणे पुण्य अगाध ॥ २८ | महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पाण्याची गळती (धार) धरावी आणि गंध-फुलांनी पूजा करावी. |
| विप्राचिया घरोघरी । उदक घालिजे शक्त्यानुसारी । अन्न द्यावे निर्धारी । अतिथिकाळी परियेसा ॥ २९ | ब्राह्मणांच्या घरी पाणी भरून द्यावे आणि घरी आलेल्या अतिथीला श्रद्धेने अन्न द्यावे. |
| तीर्थयात्रे जात्या लोका । त्याते द्याव्या छत्रपादुका । येता आपल्या गृहांतिका । पादप्रक्षालन करावे ॥ ३० | तीर्थयात्रेला जाणाऱ्यांना छत्री आणि पादत्राणे दान करावीत. कोणी यात्रेकरू घरी आल्यास त्यांचे पाय धुवावेत. |
| वारा घालावा विझणेसी । वस्त्र द्यावे परिधानासी । गंध तांबूल परिमळासी । कर्पूरवेलादि परियेसा ॥ ३१ | "त्यांना पंख्याने वारा घालावा, वस्त्रे दान करावीत आणि गंध, विडा, कापूर व वेलची देऊन त्यांचा सत्कार करावा." |
| जलपात्र द्यावे शक्तीसी । गुडपान आम्रपानेसी । द्राक्षे कर्दळीफळेसी । ब्राह्मणा द्यावे मनोहर ॥ ३२ | "पिण्याच्या पाण्याचे पात्र, गूळपाणी, आंबे, द्राक्षे आणि केळी ही फळे ब्राह्मणांना अर्पण करावीत." |
| जे जे दान द्यावे द्विजा । पतीच्या नावे अर्पिजे वोजा । संकल्पून पुरुषकाजा । धर्म करणे येणेपरी ॥ ३३ | "जे काही दान केले जाईल, ते पतीच्या कल्याणासाठी आहे असा संकल्प करून पतीच्या नावाने अर्पण करावे." |
| कार्तिकमासी जवान्न । अथवा जेविजे एकान्न । वृताक माष मसूर लवण । तैलादि मधु वर्जावे ॥ ३४ | "कार्तिक महिन्यात एक वेळ अन्न खावे. वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल आणि मध यांचा त्याग करावा." |
| वर्जावे कास्यपात्र । आणिक वर्जावे द्विदलमात्र । मनी असावे पवित्र । एकाग्रेसी परियेसा ॥ ३५ | काशाच्या पात्रात जेवू नये आणि द्विदल धान्याचा (कडधान्ये) त्याग करावा. मन नेहमी पवित्र आणि एकाग्र ठेवावे. |
| पलाशपात्री भोजन करावे । शुचि उद्यापन करावे । जे जे व्रत धराते । त्याते उजवावे तत्त्वता ॥ ३६ | पळसाच्या पानात भोजन करावे आणि व्रताची सांगता (उद्यापन) शास्त्रोक्त पद्धतीने करावी. |
| घृतभरित कास्यपात्र । विप्रा द्यावे पवित्र । भूमिशयन केले व्रत । मंचक द्यावा विप्रासी ॥ ३७ | "तुपाने भरलेले काशाचे पात्र ब्राह्मणाला दान द्यावे. जर जमिनीवर झोपण्याचे व्रत केले असेल, तर उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला पलंग दान द्यावा." |
| जे जे वस्तु त्यजिली आपण । ते ते द्यावी ब्राह्मणालागून । रसद्रव्ये एक मास जाण । त्याग करावी परियेसा ॥ ३८ | "ज्या ज्या वस्तूंचा आपण त्याग केला आहे, त्या वस्तू ब्राह्मणांना दान द्याव्यात. महिनाभर रसयुक्त पदार्थांचा त्याग करावा." |
| त्यजूनिया दधि क्षीर । उद्यापन आचार मनोहर । असलिया शक्त्यनुसार । धेनु द्यावी सालंकृत ॥ ३९ | दही आणि दुधाचा त्याग करून त्याचे उद्यापन करावे आणि शक्य असल्यास दागदागिन्यांसह गाय दान करावी. |
| विशेषे असे आणिक व्रत । दीपदान असे ख्यात । वर्णिता महिमा अनंत । देवांसी म्हणे बृहस्पति ॥ ४० | "बृहस्पती देवांना म्हणतात, ""दीपदानाचे महत्त्व विशेष आहे, त्याचा महिमा अनंत आहे.""" |
| दीपदान भाग सोळा । वरकड नसती धर्म सकळा । या कारणे अनंतफळा । दीपदान करावे ॥ ४१ | "इतर सर्व धर्मांपेक्षा दीपदानाचा सोळावा भागही श्रेष्ठ आहे, म्हणून अक्षय फळासाठी दीपदान करावे." |
| माघस्नान माघमासी । करणे सूर्योदयासी । येणेपरी एक मासी । आचरावे भक्तीने ॥ ४२ | माघ महिन्यात रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे आणि महिनाभर हे व्रत भक्तीने पाळावे. |
| लाडू तिळ खर्जुरेसी । करूनि पक्वान्ने ब्राह्मणांसी । द्यावी तिणे भक्तीसी । दक्षिणेसहित जाणा ॥ ४३ | "तीळ, लाडू, खजूर आणि विविध पक्वान्ने तयार करून ती ब्राह्मणांना दक्षिणेसह दान करावीत." |
| शर्करा मिरे एळेसी । तळून अपूप घृतेसी । दान द्यावे यतीसी । भोजन द्यावे अतीता ॥ ४४ | "साखर, मिरी आणि वेलची घालून तुपात तळलेले पदार्थ संन्याशांना किंवा अतिथींना भोजन म्हणून द्यावेत." |
| हेमंतऋतु होता जाण । व्हावया शीतनिवारण । काष्ठे द्यावी विप्राकारणे । वस्त्रे द्यावी द्विजांसी ॥ ४५ | हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ब्राह्मणांना जळण (काष्ठे) आणि गरम वस्त्रे दान करावीत. |
| पर्यंक द्यावा सुषुप्तीसी । एखाद्या भल्या ब्राह्मणासी । चित्र रक्त वस्त्रेसी । कंबळ द्यावे विप्रवर्गा ॥ ४६ | "झोपण्यासाठी चांगल्या ब्राह्मणाला पलंग, रंगीत वस्त्रे आणि लोकरीची चादर (कांबळे) दान द्यावी." |
| व्हावया शीतनिवारण । औषध द्यावे उष्ण उष्ण । तांबूलदान परिपूर्ण । द्यावे एळाकर्पूरेसी ॥ ४७ | थंडी पळवण्यासाठी उष्ण गुणधर्माची औषधे आणि वेलची-कापूर युक्त विडा दान करावा. |
| गृहदान द्यावे विप्रासी । सांवत्सरिक ग्रामेसी । जाता तीर्थयात्रेसी । पादरक्षा देईजे ॥ ४८ | ब्राह्मणाला राहण्यासाठी घर दान करावे. तसेच तीर्थयात्रेला जाणाऱ्यांना वहाणा (पादरक्षा) द्याव्यात. |
| गंध परिमळ पुष्पेसी । पूजा करावी केशवासी । रुद्राभिषेक विधींसी । अभिषेकावा गौरीहर ॥ ४९ | गंध आणि फुलांनी विष्णूची पूजा करावी आणि विधीपूर्वक शंकराला रुद्राभिषेक करावा. |
| धूप दीप नैवेद्यसी । पूजा करावी षोडशी । प्रीति बहु शंकरासी । दीपमाळा उजळिता ॥ ५० | "धूप, दीप आणि नैवेद्यासह षोडशोपचार पूजा करावी. शंकराला दीपमाळा उजळलेली अत्यंत प्रिय आहे." |
| आणिक सुगंध गंधेसी । तांबूलदान विधींसी । कर्पूरलवंगादि विविधेसी । भक्तिभावे अर्पिजे ॥ ५१ | "सुगंधी द्रव्ये, गंध आणि विधीपूर्वक तांबूल (विडा) दान करावे. कापूर, लवंग इत्यादी वस्तू भक्तीभावाने अर्पण कराव्यात." |
| आप्ला पुरुष ध्यावोनि मनी । नारायण तो म्हणोनि । पूजा करावी एके मनी । भक्तिभावे परियेसा ॥ ५२ | आपल्या पतीलाच साक्षात नारायण मानून मनात त्यांचे ध्यान करावे आणि एकाग्र चित्ताने त्यांची पूजा करावी. |
| नेमे असावे तिये नारी । न बैसावे बैलावरी । लेवू नये चोळी करी । श्वेतवस्त्र नेसावे ॥ ५३ | "विधवा स्त्रीने नियमाने राहावे; बैलावर बसू नये, चोळी घालू नये आणि नेहमी पांढरे (शुभ्र) वस्त्र परिधान करावे." |
| रक्त कृष्ण चित्र वस्त्र । लेता जाण दोष बहुत । आणिक असे व्रत । पुत्राचे बोल वर्तावे ॥ ५४ | "लाल, काळे किंवा रंगीबेरंगी वस्त्र नेसल्यास मोठा दोष लागतो. तसेच मुलाच्या आज्ञेत राहून आपले आचरण ठेवावे." |
| ’आत्मा वै पुत्र नाम’ । म्हणून बोलती वेदागम । पतीपासून पुत्रजन्म । पुत्रआज्ञेत असावे ॥ ५५ | "'पुत्र हा पित्याचाच आत्मा असतो' असे वेद सांगतात. पतीच्या अंशानंतर पुत्राचा जन्म होतो, म्हणून पुत्राच्या आज्ञेत राहावे." |
| ऐसा आचार विधवेसी । असे शास्त्रपुराणेसी । जरी आचरती भक्तीसी । सहगमनाचे फळ असे ॥ ५६ | शास्त्रात विधवा स्त्रीसाठी असे नियम सांगितले आहेत. याचे भक्तीने पालन केल्यास सहगमनाइतकेच पुण्य मिळते. |
| पापी जरी पति असला । असेल पूर्वी निवर्तला । नरकामध्ये वास्ल केला । पापरूपे भुंजत ॥ ५७ | "पती जरी पापी असला आणि केव्हाही त्याचा मृत्यू झाला असला आणि तो नरकात दुःख भोगत असला," |
| विधवापणे येणेपरी । आचरण करी जे नारी । मरण होता अवसरी । घेवोनि पति स्वर्गी जाय ॥ ५८ | "तरी पत्नीने विधवा धर्माचे असे पालन केल्यास, तिच्या मरणांनंतर ती पतीला नरकातून सोडवून आपल्यासोबत स्वर्गात नेते." |
| जितुक्या परी बृहस्पति । सांगे समस्त देवांप्रती । लोपामुद्रेची केली स्तुति । पतिव्रताशिरोमणि ॥ ५९ | बृहस्पतींनी सर्व देवांना हे नियम सांगितले आणि पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या लोपामुद्रेची स्तुती केली. |
| जितुक्या पतिव्रता नारी । समस्त भागीरथी सरी । त्यांचे पुरुष शंकरापरी । पूजा करावी दोघांची ॥ ६० | सर्व पतिव्रता स्त्रिया गंगेसमान पवित्र आहेत आणि त्यांचे पती शंकरासमान आहेत; दोघांचीही पूजा करावी. |
| ऐसे बृहस्पतीचे वचन । सांगितले मनी विस्तारोन । ऐक बाळे तव मन । ज्यावरी प्रीति तेचि करी ॥ ६१ | "योगेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, ""मी तुला बृहस्पतींचे हे विचार विस्तारून सांगितले आहेत. आता तुझ्या मनाला जे पटेल ते तू कर.""" |
| दुःख सकळ त्यजोनि । मम बोल ठेवी मनी । सांगितले तुजलागोनि । परलोकसाधन ॥ ६२ | """दुःख सोडून माझे बोल लक्षात ठेव. मी तुला परलोकातील सुखाचे साधन (उपाय) सांगितले आहे.""" |
| धैर्य जरी असेल तुजसी । सहगमन करी पतीसरसी । विधवापणे आचार करिसी । तेही पुण्य तितुकेची ॥ ६३ | """तुझ्यात धैर्य असेल तर पतीसोबत सहगमन कर किंवा विधवा धर्माचे पालन कर; दोन्हीचे पुण्य सारखेच आहे.""" |
| जे आवड तुझे मनी । सांग माये विस्तारोनि । हस्त मस्तकी ठेवूनि । पुसतसे प्रेमभावे ॥ ६४ | "योगेश्वरांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, ""तुझ्या मनात काय आहे ते मला सांग.""" |
| ऐकोनि तया अवसरी । केले नमन तिये नारी । विनवीतसे करुणोत्तरी । भक्तिभावे करूनिया ॥ ६५ | ते ऐकून त्या स्त्रीने योगेश्वरांना नमस्कार केला आणि अत्यंत करुण स्वरात भक्तीने विनवणी केली. |
| जय जयाजी योगीश्वरा । तूचि पिता सहोदरा । माझा प्राण मनोहरा । जनक जननी तूचि होसी ॥ ६६ | """हे योगीश्वरा, तुमचा जयजयकार असो! तुम्हीच माझे वडील, भाऊ आणि माता-पिता आहात.""" |
| आल्ये आपण परदेशात । जवळी नाही बंधुभ्रात । भेटलेती तुम्ही परमार्थ । अंतकाळी सोयरा ॥ ६७ | """मी परदेशात आले आहे, इथे माझे कोणी नातेवाईक नाहीत. या कठीण प्रसंगी तुम्हीच माझे खरे सोयरे म्हणून भेटला आहात.""" |
| सांगितले तुम्ही आचार दोनी । कष्ट बहु विधवापणी । अशक्य आम्हा न-टाके स्वामी । असाधारण असे दातारा ॥ ६८ | """तुम्ही दोन्ही मार्ग सांगितले, पण विधवा धर्माचे पालन करणे अत्यंत कठीण आहे. ते मला शक्य होणार नाही.""" |
| तारुण्यपण मजसी । लावण्य असे देहासी । निंदापवाद शरीरासी । घडेल केवी वर्तमान ॥ ६९ | """मी तरुण आणि दिसायला सुंदर आहे. अशा स्थितीत समाजात राहताना माझ्या चारित्र्यावर कोणी कलंक लावला तर मी काय करू?""" |
| संतोष होतो माझे मनी । पुण्य अपार सहगमनी । पतीसवे संतोषोनि । जाईन स्वामी निर्धारे ॥ ७० | """म्हणून मी पतीसोबत सहगमन करण्याचा निश्चय केला आहे. त्यातच मला आनंद वाटत आहे.""" |
| म्हणूनि मागुती नमस्कारी । माथा ठेवी चरणांवरी । स्वामी माते तारी तारी । भवसागरी बुडतसे ॥ ७१ | "तिने पुन्हा त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाली, ""स्वामी, मला या संसारसागरातून तारा.""" |
| करुणाकृपेचा सागर । उठवीतसे योगेश्वर । देता झाला अभयकर । म्हणे पतीसवे जावे ॥ ७२ | दयेचा सागर असलेल्या योगेश्वरांनी तिला उठवले आणि 'पतीसोबत जा' असा आशीर्वाद (अभय) दिला. |
| तोचि ठाव पुरुषासी । जाय माते सांगतेसी । सांगेन तुज विशेषी । ऐक माते एकचित्ते ॥ ७३ | """तू पतीसोबत त्याच ठिकाणी जाशील जिथे ते गेले आहेत. आता मी तुला काही विशेष गोष्टी सांगतो, त्या ऐक.""" |
| आलात तुम्ही दर्शनी । श्रीगुरुभेटीलागोनि । आरोग्य होईल म्हणोनि । भक्तिभावेकरूनिया ॥ ७४ | """तुम्ही श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला होता की पतीला आरोग्य मिळेल, पण ईश्वराची इच्छा वेगळी होती.""" |
| होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिले नाही कोणी । जैशी ईश्वरनिर्वाणी । तैसेपरी होतसे ॥ ७५ | """जे होणार होते ते झाले. काळाला कोणीही जिंकू शकत नाही. ईश्वराच्या इच्छेनुसार सर्व घडते.""" |
| ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण । घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥ ७६ | """ललाटलेख टळत नाही. जे नशिबात असेल ते भोगावेच लागते, त्यामुळे दुःख करू नकोस.""" |
| हरिश्चंद्र राजा देख । डोंबाघरी वाहे उदका । बळी अजिंक्य ऐका । तोही गेला पाताळा ॥ ७७ | """पहा, राजा हरिश्चंद्राला डोंबाच्या घरी पाणी भरावे लागले आणि अजिंक्य बळी राजालाही पाताळात जावे लागले.""" |
| सहस्त्रकोटि वर्षे ज्यासी । आयुष्य असे रावणासी । काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योदह्ना काय झाले ॥ ७८ | """रावणाचे आयुष्य खूप मोठे होते, पण काळाने त्यालाही सोडले नाही. दुर्योधनाचीही तीच अवस्था झाली.""" |
| भीष्मदेव इच्छारमनी । तेही पडले रणांगणी । परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥ ७९ | """इच्छामरणी भीष्म पितामह रणांगणात पडले आणि राजा परीक्षिती लपून बसला तरी सर्पदंशाने मेलाच.""" |
| अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी । देव दानव येणेपरी । सकळ काळाआधीन ॥ ८० | """असे अनेक अवतार झाले आणि संपले. देव असो वा दानव, सर्व काळाच्या अधीन आहेत.""" |
| या कारणे काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी । सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥ ८१ | """या पृथ्वीवर काळाला कोणीही जिंकू शकले नाही. काळ सर्वांवर विजय मिळवतो.""" |
| काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि । भाव असे ज्याचे मनी । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥ ८२ | """केवळ श्रीगुरूच काळाला जिंकू शकतात. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, त्यांना याचा अनुभव येईल.""" |
| आता तुम्ही ऐसे करणे । जावे त्वरित सहगमने । अंतकाळ होता क्षणे । श्रीगुरुदर्शना जाय म्हणे ॥ ८३ | """आता तू त्वरित सहगमनासाठी जा आणि जाताना श्रीगुरूंचे दर्शन घे.""" |
| म्हणोनि भस्म तये वेळी । लाविता झाला कपाळी । रुद्राक्ष चारी तत्काळी । देता जहाला तये वेळी ॥ ८४ | योगेश्वरांनी तिच्या कपाळाला भस्म लावले आणि तिला चार रुद्राक्ष दिले. |
| योगी बोले तियेसी । रुद्राक्ष बांधी कंठासी । दोनी प्रेतकर्णासी । बांधोनि दहन करावे ॥ ८५ | "योगी म्हणाले, ""दोन रुद्राक्ष तुझ्या गळ्यात बांध आणि दोन पतीच्या कानांना बांधून मग दहन करा.""" |
| आणिक एक सांगेन तुज । गुरुदर्शना जाई सहज । रुद्रसूक्त म्हणती द्विज । गुरुचरण प्रक्षाळिता ॥ ८६ | """आंणखी एक गोष्ट कर, श्रीगुरूंच्या दर्शनाला जा. तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत श्रीगुरूंचे पाय धुवत असतील.""" |
| तेचि तीर्थ घेवोनि । आपुला देह प्रोक्षोनि । प्रेतावरी आणोनि । प्रोक्षण करावे भक्तीने ॥ ८७ | """ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या अंगावर शिंपड आणि पतीच्या प्रेतावरही भक्तीने शिंपड.""" |
| मग जावे सहगमनेसी । वाणे द्यावी सुवासिनींसी । अनेक द्रव्ये वेचूनि हर्षी । विप्रा तोषवावे बहुत ॥ ८८ | """त्यानंतर सहगमन कर. सुवासिनींना वाण दे आणि ब्राह्मणांना दान देऊन संतुष्ट कर.""" |
| ऐशा परी तियेसी । सांगोनि गेला तापसी । पतिव्रता भावेसी । करी आयती त्या वेळी ॥ ८९ | असे सांगून तो तपस्वी निघून गेला. मग त्या पतिव्रतेने सहगमनाची तयारी सुरू केली. |
| भले ब्राह्मण बोलावूनि । षोडश कर्मे आचरोनि । प्रेतासी प्रायश्चित्त देवोनि । औपासन करविताती ॥ ९० | चांगल्या ब्राह्मणांना बोलावून विधी पूर्ण केले. प्रेताला प्रायश्चित्त देऊन औपासन विधी केला. |
| सुस्नात होवोनि आपण । पीतांबर नेसोन । सर्वाभरणे लेवोन । हळदी कुंकू लावितसे ॥ ९१ | "तिने स्नान करून पीतांबर नेसला, दागिने घातले आणि कपाळाला हळद-कुंकू लावले." |
| औपासन प्रेतासी । करविताती विधींसी । प्रेत बांधोनि काष्ठेसी । घेवोनि गेले गंगेत ॥ ९२ | विधीपूर्वक प्रेत लाकडाला बांधून गंगेच्या काठावर नेण्यात आले. |
| अग्नि घेऊनि तळहातेसी । निघाली पतिव्रता कैसी । आनंद बहु मानसी । प्रेतापुढे जातसे ॥ ९३ | हातामध्ये अग्नी घेऊन ती पतिव्रता अत्यंत आनंदाने प्रेताच्या पुढे चालू लागली. |
| सोळा वरुषांचे तारुण्यपण । सुंदर रुप लावण्य । ल्याइलीसे आभरणे । लक्ष्मीसरसी दिसतसे ॥ ९४ | तिचे वय केवळ सोळा वर्षांचे होते. तिचे सौंदर्य आणि दागिने पाहून ती साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. |
| मिळोनिया नगरनारी । पाहो आल्या सहस्त्र चारी । माथा तुकविती सकळी । पतिव्रता म्हणोनिया ॥ ९५ | तिला पाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले. तिचे पातिव्रत्य पाहून सर्वजण तिला नमन करत होते. |
| एक म्हणती काय नवल । पूर्ववयेसी असे बाळ । काय दैव पूर्वफळ । पतीसवे जातसे ॥ ९७ | "लोक म्हणू लागले, ""काय हे आश्चर्य! ही अजून लहान मुलगीच आहे, पण किती थोर दैव की ती पतीसोबत सती जात आहे.""" |
| देखिले नाही पतीचे मुख । नाही जहाले की बाळक । कैसा जीव झाला एक । आनंदरूपे जातसे ॥ ९७ | "तिने पतीचे सुख पाहिले नाही, तिला मूलबाळही नाही, तरीही ती किती धैर्याने आनंदाने चालली आहे." |
| म्हणती शिकवा इसी । वाया का हो जीव देसी । परतूनि जाई माहेरासी । आपुल्या मातापित्याजवळी ॥ ९८ | "काहीजण तिला समजावू लागले, ""असे जीव देऊ नकोस, आपल्या आई-वडिलांकडे परत जा.""" |
| एक म्हणती ज्ञानवंता । सत्य नारी पतिव्रता । बुद्धि दे गा जगन्नाथा । सकळ स्त्रिया ऐसीच ॥ ९९ | "पण ज्ञानी लोक म्हणाले, ""हीच खरी पतिव्रता आहे. देवा, सर्वांना अशीच सद्बुद्धी दे.""" |
| धन्य इची मातापिता । बेचाळीस उद्धरले आता । प्रेतापुढे चालता । एकैक पाउला अश्वमेधफळ ॥ १०० | """तिचे आई-वडील धन्य आहेत. तिच्या एका एका पावलावर अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळत आहे.""" |
| येणेपरी नदीतीरासी । गेली नारी पतीसरसी । कुंड केले अग्नीसी । काष्ठे शेणी अपरिमित ॥ १०१ | अशा प्रकारे ती नदीकाठी पोहोचली. तिथे चिता रचण्यात आली आणि भरपूर लाकडे व शेण्या आणल्या गेल्या. |
| अग्निकुंडसन्निधेसी । ठेविले तया प्रेतासी । बोलावोनि सुवासिनींसी । देई झाली वाण देखा ॥ १०२ | अग्नीकुंडाजवळ प्रेत ठेवले आणि तिने सुवासिनींना बोलावून वाण दिले. |
| सुपे चोळी कुंकुमेसी । हळदी काजळ परियेसी । तोडर कंठसूत्रेसी । सुवासिनींसी देतसे ॥ १०३ | "सुप, चोळी, कुंकू, हळद, काजळ, तोडे आणि मंगळसूत्र तिने सुवासिनींना दान केले." |
| गंधपुष्पादि परिमळेसी । पूजा केली सुवासिनींसी । द्रव्य दिधले अपारेसी । समस्त ब्राह्मणा तये वेळी ॥ १०४ | तिने सुवासिनींची गंध-फुलांनी पूजा केली आणि ब्राह्मणांना भरपूर दान-दक्षिणा दिली. |
| नमन करोनि समस्तांसी । निरोप मागतसे हर्षी । आपण जाते माहेरासी । लोभ असो द्यावा म्हणतसे ॥ १०५ | "सर्वांना नमस्कार करून ती म्हणाली, ""आता मी माझ्या माहेरी (परलोकी) जात आहे, माझा लोभ असू द्या.""" |
| माझा पिता शूलपाणी । उमा गौरी अंतःकरणी । आम्हा बोलाविले सगुणी । प्रेमभावे करूनिया ॥ १०६ | """साक्षात शंकर माझे पिता आणि पार्वती माझी माता आहे, त्यांनीच मला प्रेमाने बोलावले आहे.""" |
| आली श्रावणी दिपवाळी । आम्ही जातो मातेजवळी । पतीसहित मने निर्मळी । जाते लोभ असो द्यावा ॥ १०७ | """आता दिवाळी सण आला आहे (आनंदाचा काळ), मी पतीसह माझ्या आईकडे जात आहे.""" |
| समागमे लोक आपुले । होते जे का सवे आले । त्यांसी सांगतसे बाळे । परतोनि जावे ग्रामासी ॥ १०८ | तिच्यासोबत जे लोक आले होते, त्यांना तिने परत गावी जाण्यास सांगितले. |
| पुसतसे श्वशुरमामेसी । त्याते न सांगावे परियेसी । प्राण देतील आम्हांसी । हत्या तुम्हा घडेल ॥ १०९ | """माझ्या सासरच्या लोकांना हे सांगू नका, अन्यथा ते दुःखाने प्राण सोडतील आणि त्याचे पाप तुम्हाला लागेल.""" |
| त्यासी तुम्ही सांगावे ऐसे । क्षेम आहे तीर्थवासे । भीमातीरस्थान ऐसे । श्रीगुरूचे सन्निधानी ॥ ११० | """त्यांना सांगा की आम्ही भीमा नदीच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध्यात सुखात आहोत.""" |
| आलो श्रीगुरुदर्शनासी । आरोग्य झाले पतीसी । राहिलो आपण संतोषी । म्हणोनि सांगा घरी आमुचे ॥ १११ | "ती स्त्री लोकांना सांगते, ""आम्ही श्रीगुरूंच्या दर्शनाला आलो आणि पतीला आरोग्य लाभले, आता आम्ही सुखात आहोत, असे माझ्या घरी सांगा.""" |
| ऐसे सांगा श्वशुरमामींसी । आमुचे मातापितयादिकांसी । इष्टजन सोयरियांसी । सांगा येणेपरी तुम्ही ॥ ११२ | """माझे सासू-सासरे, आई-वडील आणि सर्व नातेवाईकांना हेच सांगा की आम्ही आनंदी आहोत.""" |
| ऐसे वचन ऐकोन । दुःख पावले सकळ जन । आपण असे हास्यवदन । प्रेताजवळी उभी देखा ॥ ११३ | "तिचे हे बोलणे ऐकून सर्व लोक दुःखी झाले, पण ती स्वतः मात्र हसतमुखाने पतीच्या प्रेताजवळ उभी होती." |
| अग्निकुंडी तये क्षणी । घालिताती काष्ठ शेणी । तो आठवण झाली झणी । योगेश्वराचा उपदेश ॥ ११४ | चितेमध्ये लाकडे आणि शेण्या रचल्या जात असताना तिला योगेश्वरांनी दिलेल्या उपदेशाची आठवण झाली. |
| मग रुद्राक्ष काढोनिया दोनी । बांधिले प्रेताचिया श्रवणी । कंठसूत्री दोन ठेवोनि । पुसतसे ब्राह्मणांसी ॥ ११५ | "तिने दोन रुद्राक्ष पतीच्या कानांना बांधले आणि दोन स्वतःच्या मंगळसूत्रात गुंफले, मग तिने ब्राह्मणांना विचारले." |
| विनवीतसे द्विजांसी । संकल्प केला म्या मानसी । श्रीगुरुमूर्ति आहे कैसी । आपल्या दृष्टी पाहीन ॥ ११६ | "ती ब्राह्मणांना विनवणी करू लागली, ""माझ्या मनात संकल्प आहे की एकदा श्रीगुरूंचे रूप डोळे भरून पहावे.""" |
| दृष्टी देखोनिया स्वामीसी । त्वरित येईन अग्निकुंडापासी । आज्ञा झालिया वेगेसी । त्वरित येईन म्हणतसे ॥ ११७ | """गुरूंचे दर्शन घेऊन मी लगेच या अग्निकुंडापाशी परत येईन. तुमची आज्ञा असेल तर मी तातडीने जाऊन येते.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । बोलताती विद्वज्जन । दहन होता अस्तमान । त्वरित जाउनी तुम्ही यावे ॥ ११८ | "विद्वानांनी तिला परवानगी दिली आणि सांगितले की, ""सूर्यास्तापूर्वी दहन करायचे आहे, त्यामुळे तू लवकर जाऊन ये.""" |
| पुसोनिया विप्रांसी । निघाली नारी संगमासी । जेथे होता ह्रषीकेशी । श्रीनरसिंहसरस्वती ॥ ११९ | "ब्राह्मणांचा निरोप घेऊन ती संगमाकडे निघाली, जिथे साक्षात विष्णूस्वरूप श्रीनृसिंह सरस्वती महाराज विराजमान होते." |
| सर्व येती नरनारी । विप्रमेळा नानापरी । कौतुक पाहती मनोहरी । पतिव्रता स्त्रियेची ॥ १२० | "तिच्यासोबत अनेक स्त्री-पुरुष आणि ब्राह्मणही आले, जे त्या पतिव्रतेचे धैर्य पाहून आश्चर्यचकित झाले होते." |
| जाता मार्गी स्तोत्र करी । म्हणे स्वामी नरकेसरी । अभाग्य आपुले पूर्वापरी । म्हणोनि आम्हा अव्हेरिले ॥ १२१ | "वाटेने जाताना ती गुरूंची स्तुती करू लागली, ""हे स्वामी नरकेसरी, माझे नशीब कदाचित वाईट असेल म्हणून तुम्ही माझा स्वीकार केला नाही.""" |
| तूचि दाता सर्वेश्वर । शरणागतांचा आधार । ऐसे तुझे ब्रीद थोर । कामी आपण न लाधेची ॥ १२२ | """तुम्ही सर्वांचे आधार आहात, शरणागतांचे रक्षण करणे हे तुमचे ब्रीद आहे, मग माझ्या बाबतीत असे का घडले?""" |
| हेळामात्रे त्रिभुवनासी । रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी । सत्त्वगुणे सृष्टीसी । प्रतिपाळिसी तूचि स्वामी ॥ १२३ | """तुम्हीच ब्रह्मा (रजोगुण) होऊन सृष्टी रचता आणि विष्णू (सत्त्वगुण) होऊन तिचे पालन करता.""" |
| तमोगुणे निश्चयेसी । प्रलय समस्त जीवांसी । त्रिगुण तूचि होसी । त्रिमूर्ति तूचि देवा ॥ १२४ | """तुम्हीच शंकर (तमोगुण) होऊन प्रलय घडवता. तुम्हीच साक्षात त्रिमूर्ती आहात.""" |
| तुजपाशी सर्व सिद्धि । ओळंघिती तव विधी । देखिली आमुची कुडी बुद्धि । जाणोनि माते अव्हेरिली ॥ १२५ | """सर्व सिद्धी तुमच्या चरणी आहेत. माझी बुद्धी कदाचित अशुद्ध असेल, म्हणूनच तुम्ही माझी उपेक्षा केली का?""" |
| एखादा नर बाधा करी । जाणोनि सांगती राजद्वारी । क्षण न लागता अवसरी । राजा साह्य करी तयांचे ॥ १२६ | """एखाद्या माणसाला त्रास झाला आणि त्याने राजाकडे तक्रार केली, तर राजा लगेच त्याला मदत करतो.""" |
| रोग होता मनुष्यासी । जाऊनिया वैद्यापासी । औषध करी तात्काळेसी । आरोग्य तया होतसे ॥ १२७ | """माणूस आजारी पडला की वैद्याकडे जातो आणि वैद्य त्याला औषध देऊन बरे करतो.""" |
| तू त्रिमूर्तीचा अवतार । ख्याति झाली अपरंपार । सर्व भक्तजना आधार । म्हणोनि सेविती सकळ जन ॥ १२८ | """तुम्ही तर त्रिमूर्तीचे अवतार आहात आणि सर्व भक्तांचे आधार आहात, म्हणून सर्व लोक तुमची सेवा करतात.""" |
| अपराध आपण काय केले । भेटीसी वीस गावे आले । मातापिता विसरले । तुझ्या ध्याने स्वामिया ॥ १२९ | """माझा असा काय अपराध झाला? मी इतक्या लांबून तुम्हाला भेटायला आले, आई-वडिलांनाही विसरले, पण पदरी दुःखच आले.""" |
| होसी तूचि मातापिता । म्हणोनि आल्ये धावता । भेटी होता आरोग्यता । पतीस व्हावी म्हणोनिया ॥ १३० | """तुम्हीच माझे आई-बाप आहात असे मानून मी धावत आले होते की पतीला आरोग्य लाभेल.""" |
| आपुले समान असती नारी । त्या नांदता पुत्रपौत्री । आपण झाल्ये दगडापरी । पुत्र नाही आपणासी ॥ १३१ | """माझ्या वयाच्या इतर स्त्रिया संसारात सुखी आहेत, त्यांना मुले-नातवंडे आहेत, पण मी मात्र निपुत्रिक आहे.""" |
| पति आपुला सदा रोगी । कैचा पुत्र आपणालागी । तरी याचि काम्यालागी । निघोनि आल्ये स्वामिया ॥ १३२ | """माझा पती सदा रोगी होता, त्यामुळे मला संततीसुख मिळाले नाही. याच आशेने मी तुमच्याकडे आले होते.""" |
| आरोग्य होईल पतीसी । पुत्र होतील आपणासी । आशा धरून मानसी । आल्ये स्वामी कृपासिंधु ॥ १३३ | """पती बरा होईल आणि मला पुत्रप्राप्ती होईल, हीच आशा मनात धरून मी तुमच्याकडे आले होते.""" |
| पुरले माझे मनोरथ । आरोग्य झाला प्राणनाथ । पुत्र झाले बहुत । नवल झाले स्वामिया ॥ १३४ | """माझे मनोरथ पूर्ण झाले, पतीला कायमचे आरोग्य मिळाले आणि आता मला खूप पुत्र झाले, हे काय नवल आहे स्वामी!""" |
| मनोरथ पावला सिद्धीसी । म्हणोनि आल्ये पुसावयासी । जाते आता परलोकासी । कीर्ति तुझी घेवोनि ॥ १३५ | """माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी तुम्हाला सांगायला आले आहे. आता मी तुमची कीर्ती मनात जपून परलोकाला जात आहे.""" |
| ऐशा परी ध्यान करीत । आली अमरजासंगमी त्वरित । वृक्ष असे अश्वत्थ । देखती झाली स्वामिया ॥ १३६ | असे चिंतन करत ती अमरजा संगमावर पोहोचली आणि तिथे पिंपळाच्या वृक्षाखाली श्रीगुरूंना पाहिले. |
| उभी ठाकोनिया दुरी । तया साष्टांग नमन करी । श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव ॥ १३७ | "ती लांब उभी राहून श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार करू लागली. तेव्हा श्रीगुरू (तिचे तोंड न पाहता) म्हणाले, ""तू अखंड सुवासिनी हो!""" |
| ऐसे म्हणता मागुती । नमन करी एकभक्ती । पुनरपि स्वामी तेणेच रीती । अष्टपुत्रा होय म्हणतसे ॥ १३८ | "तिने पुन्हा नमस्कार केला तेव्हा स्वामींनी पुन्हा आशीर्वाद दिला, ""अष्टपुत्रा सौभाग्यवती हो!""" |
| ऐसे ऐकोनिया वचन । हास्य करिती सकळ जन । सांगताती विस्तारोन । गुरूलागी सत्वर ॥ १३९ | हे ऐकून तिथे जमलेले लोक हसू लागले आणि त्यांनी श्रीगुरूंना सत्य परिस्थिती सांगितली. |
| विप्र म्हणती स्वामीसी । इचा पति पंचत्वासी । पावला परंधामासी । सुवासिनी केवी होय ॥ १४० | "ब्राह्मण म्हणाले, ""स्वामी, हिचा पती तर मरण पावला आहे. मग ती सुवासिनी कशी राहणार?""" |
| प्रेत नेले स्मशानासी । ही आली सहगमनासी । निरोप घ्यावया तुम्हापासी । आली असे स्वामिया ॥ १४१ | """पतीचे प्रेत स्मशानात नेले आहे आणि ही सती जाण्यासाठी तुमचा निरोप घ्यायला आली आहे.""" |
| तुमचा निरोप घ्यावोनि । अग्निकुंडा जावोनि । समागमे पतिशयनी । दहन करणे तियेसी ॥ १४२ | """तुमचा आशीर्वाद घेऊन ती आता पतीसोबत अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेणार आहे.""" |
| ऐकोनि त्याचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । इचे स्थिर अहेवपण । मरण केवी घडे इसी ॥ १४३ | "हे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, ""हिचे सौभाग्य (अहेवपण) स्थिर आहे, मग हिचा मृत्यू किंवा वैधव्य कसे घडेल?""" |
| गुरु म्हणती जा वेळी । आणा प्रेत आम्हाजवळी । प्राण गेला कवणे वेळी । पाहू म्हणती अवधारा ॥ १४४ | "गुरू आज्ञा देतात, ""जा, लगेच त्याचे प्रेत माझ्याकडे घेऊन या. त्याचा प्राण कधी गेला ते मी पाहतो.""" |
| श्रीगुरु म्हणती द्विजांसी । आमुचे बोल जहाले इसी । अहेवपण स्थिर इसी । संदेह न धरावा मनात ॥ १४५ | "श्रीगुरू ब्राह्मणांना म्हणाले, ""मी तिला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे हिचे सौभाग्य नष्ट होणार नाही, मनात शंका धरू नका.""" |
| या बोलाचा निर्धारू । करील आता कर्पूरगौरू । नका प्रेत संस्कारू । आणा प्रेत आम्हांजवळी ॥ १४६ | """माझ्या शब्दाचा प्रत्यय आता साक्षात शंकर (कर्पूरगौर) देतील. अंत्यसंस्कार करू नका, प्रेत इथे घेऊन या.""" |
| श्रीगुरूचा निरोप होता । आणो गेले धावत प्रेता । पहाती लोक कौतुका । अभिनव म्हणताती ॥ १४७ | गुरूंची आज्ञा होताच लोक धावत जाऊन प्रेत घेऊन आले. सर्व लोक हे आश्चर्य पाहत होते. |
| इतुके होता ते अवसरी । आले विप्र तेथवरी । पूजा करिती मनोहरी । श्रीगुरुची भक्तीने ॥ १४८ | "दरम्यान, काही ब्राह्मण तिथे आले आणि त्यांनी श्रीगुरूंची मनोभावे पूजा सुरू केली." |
| रुद्रसूक्त म्हणोनि । अभिषेक करिती श्रीगुरुचरणी । षोडशोपचारी विस्तारोनि । पूजा करिती भक्तीने ॥ १४९ | ते ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणून श्रीगुरूंच्या चरणांवर अभिषेक करू लागले आणि षोडशोपचार पूजा केली. |
| तीर्थपूजा नानापरी । पूजा करिती उपचारी । इतुकीया अवसरी । घेउनी आले प्रेतासी ॥ १५० | ही पूजा सुरू असतानाच लोक प्रेत घेऊन तिथे पोहोचले. |
| प्रेत आणोनिया देखा । ठेविले श्रीगुरुसंमुखा । श्रीगुरु म्हणती विप्रलोका । सोडा वस्त्र दोर त्याचे ॥ १५१ | "प्रेत श्रीगुरूंसमोर ठेवले. त्यांनी सांगितले, ""ह्याचे बांधलेले दोर आणि वस्त्रे सोडा.""" |
| चरणतीर्थ त्यावेळी । देती तया विप्रांजवळी । प्रोक्षा म्हणती तात्काळी । प्रेत सर्वांगी स्नपन करा ॥ १५२ | "श्रीगुरूंनी आपले चरणतीर्थ ब्राह्मणाकडे दिले आणि सांगितले, ""हे तीर्थ प्रेताच्या अंगावर शिंपडा.""" |
| श्रीगुरुनिरोपे ब्राह्मण । प्रेतासी करिती तीर्थस्नपन । अमृतदृष्टीसी आपण । पाहती प्रेत अवधारा ॥ १५३ | ब्राह्मणांनी ते तीर्थ प्रेतावर शिंपडले आणि श्रीगुरूंनी आपल्या अमृतमय नजरेने प्रेताकडे पाहिले. |
| पाहता सुधादृष्टीकरून । प्रेत झाले संजीवन । उठोनि बैसे तत्क्षण । अंग मुरडीत परियेसा ॥ १५४ | गुरूंच्या अमृतदृष्टीचा स्पर्श होताच प्रेत जिवंत झाले आणि तो मनुष्य आळस देत खडबडून जागा झाला. |
| नग्न म्हणुनी लाजत । प्रेत झाले सावचित्त । नवे वस्त्र नेसत । येवोनि बैसे एकीकडे ॥ १५५ | तो सावध झाला आणि आपली वस्त्रे विस्कळीत असल्याचे पाहून लाजून बाजूला जाऊन बसला. |
| बोलावोनि स्त्रियेसी । पुसतसे विस्तारेसी । कोठे आणिले मजसी । यतीश्वर कोण सांगे ॥ १५६ | "त्याने आपल्या पत्नीला विचारले, ""मला इथे कुठे आणले आहे आणि हे महान यतीश्वर कोण आहेत?""" |
| इतुके लोक असता का । का वो तू न करसी चेता । निद्रा आली मदोन्मत्ता । म्हणोनि सांगे स्त्रियेसी ॥ १५७ | """इतके लोक इथे जमले आहेत, तू मला उठवले का नाहीस? मला खूप गाढ झोप लागली होती.""" |
| ऐकून पतीचे वचन । सांगती झाली विस्तारून । उभी राहून दोघेजण । नमन करिती श्रीगुरूसी ॥ १५८ | पतीचे बोलणे ऐकून पत्नीने सर्व हकिकत सांगितली. मग त्या दोघांनीही श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातले. |
| चरणी माथा ठेवून । स्तोत्र करिती दोघेजण । पहाती लोक सर्व जन । महा आनंद प्रवर्तला ॥ १५९ | त्या दोघांनी श्रीगुरूंची स्तुती केली. हे पाहून तिथे जमलेल्या सर्व लोकांना प्रचंड आनंद झाला. |
| म्हणती पापरूपी आपण । पाप केले दारुण । पापापासाव अनुसंधान । जन्म जहालो परियेसी ॥ १६० | "तो ब्राह्मण म्हणू लागला, ""मी पापी आहे, माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील.""" |
| दुर्बुद्धीने वर्तलो । पापसागरी बुडालो । तुझे चरण विसरलो । त्रयमूर्ती जगद्गुरु ॥ १६१ | """मी इतका काळ तुमची भक्ती विसरलो होतो, पण आज तुम्ही मला जीवनदान दिले.""" |
| सकळ जीवमात्रांसी । रक्षिता शंकर तू होसी । ख्याति तव त्रिभुवनासी । शरणागता रक्षिसी ॥ १६२ | """तुम्हीच जगाचे रक्षक साक्षात शंकर आहात, तुमची कीर्ती त्रिलोकात पसरली आहे.""" |
| त्राहि त्राहि जगद्गुरु । विश्वमूर्ति परात्परु । ब्रह्मा विष्णु शंकरु । सच्चिदानंदस्वरूप तू ॥ १६३ | """हे जगद्गुरू, माझे रक्षण करा! तुम्हीच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहात.""" |
| त्राहि त्राहि विश्वकर्ता । त्राहि त्राहि जगद्भर्ता । कृपासागरा जगन्नाथा । भक्तजनविश्रामा ॥ १६४ | """तुम्हीच विश्वाचे निर्माते आणि पालनकर्ते आहात. हे जगन्नाथा, माझे रक्षण करा.""" |
| जय जयाजी गुरुमूर्ति । जटाजूट पशुपति । अवतरलासी तू क्षिती । मनुष्यदेह धरूनिया ॥ १६५ | """तुम्ही साक्षात महादेव आहात, भक्तांसाठी तुम्ही मनुष्यदेह धारण केला आहे.""" |
| त्राहि त्राहि पिनाकपाणि । त्राहि देवा तू शिरोमणि । भक्तजन पाळोनि । रक्षितोसी निरंतर ॥ १६६ | """तुम्ही देवांमध्ये श्रेष्ठ आहात आणि भक्तांचे निरंतर रक्षण करता.""" |
| सर्वा भूती तूचि वससी । नमन तुझे चरणांसी । मज ऐसे गमलासी । मातारूप वर्तत तू ॥ १६७ | """तुम्ही सर्व चराचरात आहात. मला तुम्ही प्रत्यक्ष मातेसारखे वाटत आहात.""" |
| त्रिभुवनी तव करणी । माथा ठेविला तुझे चरणी । निश्चय केला माझे मनी । पुनर्जन्म नव्हे आता ॥ १६८ | """तुमच्या दर्शनामुळे आता मला पुनर्जन्माची भीती राहिलेली नाही.""" |
| विश्वकारण करिसी । हेळामात्रे सृष्टि रचिसी । मज ऐसे गमलासी । अज्ञानरूपे वर्तत ॥ १६९ | """तुम्ही लीलेने सृष्टीची निर्मिती करता, तरीही सामान्यांसारखे (अज्ञानरूपाने) वागता.""" |
| तुझे न ऐके एखादा जरी । कोपसी त्वरित त्यावरी । माझे मनी येणेपरी । निष्कलंक तू दिसतोसी ॥ १७० | """तुमच्या आज्ञेचे पालन न करणाऱ्याला तुम्ही शासन करता, पण तुम्ही स्वतः मात्र निष्कलंक आहात.""" |
| क्रोध नाही तुझे मनी । आनंदमूर्ति तूचि सहस्त्रगुणी । भक्तजना संरक्षणी । कृपासागर स्वामिया ॥ १७१ | """तुमच्या मनात क्रोध नाही, तुम्ही आनंदाची मूर्ती आहात आणि भक्तांचे रक्षण करणारे कृपासागर आहात.""" |
| जीवमात्रा कृपा करिसी । शरणागताते रक्षिसी । इहपर सौख्याते देसी । चतुर्विध पुरुषार्थ ॥ १७२ | """तुम्ही सर्व जीवांवर कृपा करता आणि भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ देता.""" |
| तूचि करुणेचा सागरू । चिन्मात्रा अगोचरू । श्रीनरसिंहसरस्वती गुरु । क्षमा करणे स्वामिया ॥ १७३ | """हे श्रीनृसिंह सरस्वती गुरूराया, तुम्ही करुणेचे सागर आहात, माझ्या अपराधांची क्षमा करा.""" |
| ऐसी नानापरीसी । स्तोत्रे केली श्रीगुरूसी । श्रीगुरुमूर्ति संतोषी । आश्वासिती तये वेळी ॥ १७४ | अशी विविध प्रकारे स्तुती केल्यावर श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. |
| अष्ट पुत्र पूर्णायुषी । होतील सत्य तुजसी । हो का श्रीमंत अतिहर्षी । गेले तुमचे पूर्वदोष ॥ १७५ | """तुम्हाला आठ पुत्र होतील, जे दीर्घायुषी असतील. तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमचे सर्व दोष नष्ट झाले आहेत.""" |
| चतुर्विध पुरुषार्थ । लभ्य झाले तुम्हांसी यथार्थ । सांडोनि संदेह त्वरित । सुखे असा म्हणती गुरु ॥ १७६ | """तुम्हाला सर्व सुखे मिळतील, आता शंका सोडून आनंदाने राहा.""" |
| इतुके होता ते अवसरी । मिळाल्या होत्या नरनारी । जयजयकार अपरंपारी । प्रवर्तला तये वेळी ॥ १७७ | ही अद्भुत घटना पाहून सर्व लोकांनी श्रीगुरूंचा मोठा जयजयकार केला. |
| नमन करिती सकळ जन । स्तोत्र करिताती गायन । करिताती नीरांजन । जयजयकार प्रवर्तला ॥ १७८ | "सर्व लोक नमन करू लागले, गाणी गाऊ लागले आणि श्रीगुरूंची आरती करू लागले." |
| तयामध्ये विप्र एक । होता धूर्त कुबुद्धिक । आपुले मनी आणोनि तर्क । श्रीगुरूसी पुसतसे ॥ १७९ | "तिथे एक शंकाखोर ब्राह्मण होता, त्याने आपल्या तर्काने श्रीगुरूंना एक प्रश्न विचारला." |
| विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंती स्वामी परियेसी । संशय आमुचे मानसी । होत आहे स्वामिया ॥ १८० | "तो म्हणाला, ""स्वामी, माझ्या मनात एक शंका येत आहे.""" |
| वेदशास्त्रे पुराणे । बोलताती सनातने । ब्रह्मलिखित सत्य जाणे । म्हणोनि वाक्य निर्धारी पा ॥ १८१ | """शास्त्रे म्हणतात की ब्रह्मदेवाने लिहिलेले नशीब (ललाटलेख) कधीही चुकत नाही.""" |
| घडला नाही अपमृत्यु यासी । दिवामरण परियेसी । आला कैसा जीव यासी । ब्रह्मलिखित सत्य मिथ्या ॥ १८२ | """ह्याचा मृत्यू तर नैसर्गिक होता, मग हा पुन्हा जिवंत कसा झाला? ब्रह्मदेवाची अक्षरे खोटी ठरली का?""" |
| न कळे याच्या अभिप्राया । निरोपावे गुरुराया । गुरु म्हणती हासोनिया । तया मूर्ख ब्राह्मणासी ॥ १८३ | श्रीगुरूंनी हसून त्या शंकाखोर ब्राह्मणाला उत्तर दिले. |
| गुरु म्हणती तयासी । सांगेन तुज विस्तारेसी । पुढील जन्माच्या आयुष्यासी । उसने घेतले परियेसा ॥ १८४ | "श्रीगुरू म्हणाले, ""मी ह्याच्या पुढील जन्माचे आयुष्य 'उसनवारी'ने मागून घेतले आहे.""" |
| आमी तया बह्मदेवासी । मागून घेतले करुणेसी । पुढले जन्मी परियेसी । वर्षे तीस संख्या पै ॥ १८५ | """मी ब्रह्मदेवाला विनंती करून ह्याच्या पुढच्या जन्मातील ३० वर्षे ह्याच जन्मात जोडून घेतली आहेत.""" |
| भक्तजन रक्षावयासी । मागून घेतले ब्रह्मदेवासी । म्हणून सांगती विस्तारेसी । तया विप्रवर्गाते ॥ १८६ | """भक्ताचे रक्षण करण्यासाठी मी हे केले आहे,"" असे श्रीगुरूंनी स्पष्ट केले." |
| तटस्थ झाले सकळ जन । साष्टांग करिती नमन । गेले आपुलिया भुवना । ख्याति झाली चहू राष्ट्रा ॥ १८७ | हे ऐकून सर्व लोक थक्क झाले. सर्वजण नमस्कार करून आपापल्या घरी गेले आणि श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. |
| पतिव्रतेने पतीसहित । स्नान केले संगमात । अंतःकरणी संतोष बहुत । पूजा करिती भक्तीसी ॥ १८८ | त्या दाम्पत्याने संगमावर स्नान केले आणि श्रीगुरूंची भक्तीने पूजा केली. |
| अपार द्रव्य वेचोनि । विप्र तोषवोनि आराधनी । सूर्य जाता अस्तमानी । येती गुरूच्या मठासी ॥ १८९ | त्यांनी ब्राह्मणांना दान दिले आणि संध्याकाळी ते श्रीगुरूंच्या मठात आले. |
| स्त्रीपुरुष नमस्कार । करिताती वारंवार । पूजासामग्री उपचार । आरती करिती श्रीगुरूसी ॥ १९० | त्या पती-पत्नीने श्रीगुरूंना वारंवार नमस्कार केला आणि त्यांची मनोभावे आरती केली. |
| सिद्ध म्हणे नामधारका । पुढे अपूर्व वर्तले ते ऐका । कथा असे अपूर्व देखा । सांगेन ऐका एकचित्ते ॥ १९१ | "सिद्ध नामधारकाला म्हणतात, ""पुढची कथा अजूनही रंजक आहे, ती तू एकाग्रतेने ऐक.""" |
| म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार । ऐकता पावन मनोहर । सकळाभीष्टे पावती ॥ १९२ | "सरस्वती गंगाधर म्हणतात की, हे गुरुचरित्र ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात." |
| इति श्रीगुरुचरित्रामृत । उठविले विप्राचे प्रेत । सौभाग्य देवोनि अद्भुत । परम तयासी तोषविले ॥ १९३ | अशा प्रकारे मृत ब्राह्मणाला जिवंत करून श्रीगुरूंनी त्या स्त्रीला सौभाग्य प्रदान केले. |
| इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥ ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओवीसंख्या १९३ ॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ | |