अधिकमास माहात्म्यअध्याय ३
अधिक मास माहात्म्य अध्याय ३ मध्ये भगवान विष्णूंची कृपा, अधिक मासाचे महत्त्व आणि भक्तीचे सुंदर वर्णन दिले आहे. मराठीत संपूर्ण अध्याय वाचा आणि पुरुषोत्तम मासाचे पुण्य मिळवा.
श्री गणेशाय नमः
श्रीकृष्ण मलमासाला पुरुषोत्तममास नाम देतो व सर्व मासांत त्याला श्रेष्ठता देतो.
श्रीकृष्ण युधिष्ठारास म्हणाला - "आता पुढे गोष्ट ऐक."
श्रीकृष्णाने विष्णूला विचारले - "हा कोण आहे? याचे नाव काय? तो का रडत आहे? त्याला कोणती दुःखे आहेत? या गोलोकात कुणीही दुःखी नसतो. असे असता हा येथे आसवे का ढाळीत आहे?"
विष्णू म्हणाला - "हा अधिकमास आहे. याला फार मोठे दुःख आहे. काळाच्या सर्व भागांना, पक्ष, महिना, ऋतू वगैरेंना तसेच जलाशयांना, वृक्षांना, नगरांना, डोंगरांना अधिष्ठाते देव असतात. स्वामी असतात. त्यामुळे ते पूज्य ठरतात.
पण या तेराव्या महिन्याला स्वामी नाही. त्यामुळे लोक त्याची अवहेलना करतात. शुभ कार्याला हा वर्ज्य आहे. रवीची गती या महिन्यात मोजत नाहीत. याला मलमास म्हणतात. तो व्यक्तिरूप घेऊन आला आहे.
तो आत्महत्या करणार होता तेव्हा कुणीतरी त्याला सांगितले वैकुंठात विष्णूला भेट. तो माझ्याकडे आला पण त्याचे दुःख तूच दूर करू शकतोस. त्याला तुझा आश्रय दे. मी माझे इतर कार्य बाजूस सारून येथे आलो आहे. तेव्हा तू याचे दुःख दूर कर."
श्रीकृष्ण म्हणाला - "हे भगवान विष्णू, तू याला येथे घेऊन आलास हे फार छान केलेस त्यामुळे तुझी फार कीर्ती होईल. मी याचा उद्धार करतो पहा.
यापुढे याला माझ्या नावाने ओळखतील. मी त्याचा स्वीकार करतो. मी ज्या ज्या गुणांनी संपन्न आहे, त्या त्या गुणांनी त्यालाही समृद्ध करतो. या महिन्याचा स्वामी मीच. त्यामुळे सर्व महिन्यात हा श्रेष्ठ ठरेल.
त्याला माझे पुरुषोत्तम हे नाव मी देतो. चैत्रादि मासात जी उपासना करतात, ती कामिक असते. पण या पुरुषोत्तम मासात जे जे व्रत किंवा उपासना केली जाईल, त्यामुळे व्रतकर्त्याला सर्व सुखे तर मिळतीलच. शेवटी तो मोक्ष मिळवून गोलोकापर्यंत येईल.
चातुर्मासात व अन्य महिन्यात जे यज्ञ वगैरे केले जातात, त्यामुळे मिळालेल्या पुण्याने स्वर्ग मिळाला तरी लोक पुन्हा जगात जन्मास येतात.
पण ह्या अधिकमासात केलेल्या उपासनेने मनुष्य माझ्या समीप येईल. त्याला पुन्हा जन्म प्राप्त होणार नाही. जो या मासाची भक्ती करील, त्याची चिंता मीच वाहीन.
त्यांच्या सर्व कामना व मोक्षही त्यांना लाभेल, पण जे अधिकमासाची पर्वणी आली असता कोणतेही पुण्यकर्म करणार नाहीत; स्नान, दान, तप, उपवास करणार नाहीत, ते फार मोठे दुःख भोगतील.
ज्या स्त्रिया या मासात पुण्य कर्मे करतील, त्यांना सौभाग्य, पुत्रसंतती, अनुकूलता इत्यादी सर्व सुख मी देईन.
म्हणून मी असा नियम करतो की, या मासात यथाशक्ती पूजा, जप, दाने इत्यादी पुण्य कर्मे करावी. आजपासून हा मास परम पवित्र मानला जाईल. म्हणून ह्याला आता वैकुंठात परत घेऊन जा."
हे ऐकून विष्णू मलमासासह वैकुंठात परत गेला.
श्रीकृष्ण पुढे म्हणाला - "हे धर्मराजा, तुम्हाला अनेक दुःखे येतात त्याचे कारण मी जाणतो.
तुम्ही वनात आल्यापासून दोनदा तीनदा अधिकमास येऊन गेला. पण पूजा, दान वगैरे काहीच कार्य तुम्ही केले नाही.
तुम्हाला कौरवांचे भय वाटत होते. भीष्म व द्रोण यांचे भय वाटत होते. अर्जुन इंद्रलोकात गेल्याने त्याच्या वियोगाने तुमचे मन बैचेन होते.
यामुळे कदाचित तुम्हाला अधिक मास येऊन गेला हे कळलेच नसेल. आता याला इलाज नाही.
याच्यापुढे काय करायचे ते मी सांगणार आहे. आणखीही एक पुरातन गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते ऐका.
नारायण नारदाला अशी कथा सांगत होता.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय-३ समाप्त ॥
