अधिक मास माहात्म्य अध्याय २ | मलमास विष्णूकडे जातो कथा |

 

अधिकमास माहात्म्य
अध्याय २

मलमास विष्णूकडे जातो, आपली दैन्यावस्था सांगतो. नारायण व मलमास यांचे गोलोकात गमन.

अधिक मास माहात्म्याचा दुसरा अध्याय भक्तिभावाने वाचण्यासाठी येथे मराठीत दिला आहे. या अध्यायात मलमास भगवान विष्णूंकडे जाऊन आपली व्यथा सांगतो. श्रीविष्णू आणि लक्ष्मी यांच्या कृपेने पुढे घडणारा सुंदर प्रसंग वाचा.

GuruCharitra Books ×
Book 1

GuruCharitra Part 1 Chapter 1 to 5

English Reading Edition

Buy
Book 2

GuruCharitra Part 2 Chapter 6 to 10

Spiritual Wisdom

Buy
Book 3

GuruCharitra Part 3 Chapter 11 to 15

Datta Teachings

Buy
Book 4

GuruCharitra Part 4 Chapter 16 to 20

Daily Devotional

Buy
Book 5

GuruCharitra Part 5 Chapter 21 to 25

Divine Reading

Buy
Book 6

GuruCharitra Part 6 Chapter 26 to 30

English Transliteration

Buy
Book 7

GuruCharitra Part 7 Chapter 31 to 35

Sacred Knowledge

Buy
Book 8

GuruCharitra Part 8 Chapter 36 to 40

Datta Blessings

Buy
Book 9

GuruCharitra Part 9 Chapter 41 to 45

Spiritual Journey

Buy
Book 10

GuruCharitra Part 10 Chapter 46 to 53

Complete Edition

Buy

श्रीगणेशाय नमः | कृष्णाने युधिष्ठराला काही गोष्टी सांगितल्या असा मागील अध्यायात उल्लेख आहे. कृष्ण काय म्हणाला ते आता ऐक. असे नारायणाने नारदास सांगितले. कृष्ण म्हणाला - " तू मला विचारलेस खरे ; पण त्याचे उत्तर देणे जरा कठीण आहे. मला थोडे अवघड वाटते. कारण हा विषय फार गुप्त आहे. मित्र असोत, नातलग असोत. सर्वांनाच हा विषय सांगता येण्यासारखा नाही. पण तू माझा परमभक्त आहेस. म्हणून मी तुला सांगतो. हे पहा. चैत्र, वैशाख वगैरे सर्व महिने आहेत. तसेच काळाचे अनेक लहान-मोठे भाग आहेत. कला, काष्ठा, मुहूर्त, घटका, प्रहर, रात्र, दिवस, ऋतू, अयन, संवत्सर, युग, परार्ध असे जे जे काळाचे भाग आहेत, त्या सर्वांना प्रत्येकी अधिष्ठाता देव असतो.

तसेच स्थिरचर सृष्टीतील विविध जलाशय, विविध वृक्ष, वेली, उद्याने, वने, उपवने, गाव, शहर या सर्वांना स्थलदेवता असतात. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या देवतेमुळे त्या त्या वस्तूला पूज्यता व मान मिळतो. स्वामी नाही असा कुठलाही पदार्थ नाही. त्या देवता उत्तम फल देतात. पण ज्यावेळी अधिक मास उत्पन्न झाला, त्या महिन्यात सूर्याची गती मोजत नाहीत ; म्हणून इतर सर्व जण त्या महिन्याची मलिनमास किंवा मलमास म्हणून चेष्टा करू लागले. म्हणून तो निंद्य ठरला. शुभकार्याला लोकांनी त्याला वर्ज्य केला. त्याला जगाचा मळ म्हटले.

अधिक महिन्याला त्यामुळे फार दुःख झाले. त्याला कुणी सहाय्यक नव्हता. तो हवालदिल झाला. हाय! हाय! मी आता कुणाचे पाय धरू ? अशा त्या चिंताग्रस्त अधिक महिन्याला मूर्च्छा आली. जरावेळाने तो शुद्धीवर आला, विचार करू लागला. त्याच्यावर हरीची कृपा झाली म्हणून त्याला सुचले - आपण हरीला शरण जावे. युधिष्ठिरा, मी विष्णूरुपाने वैकुंठात राहतो. तेथे तो अधिक मास आला. मी रत्नखचित सिंहासनावर बसलो होतो. माझे दर्शन घेतात तो माझ्या पाया पडला.

दोन्ही हात जोडून उभा राहिला. थरथर कापत व अश्रू ढाळीत तो मला म्हणाला - " हे देवा, तू जगाचा नाथ आहेस. मी पामर अनाथ आहे. तू माझे रक्षण का करीत नाहीस ? तू करुणेचा मेघ आहेस. मग माझी उपेक्षा का करतोस? मी निराश्रीत आहे. मला कुणी स्वामी नाहीत. म्हणून सर्वांनी मला मलमास असे नाव ठेवले आणि माझा धिक्कार केला आहे. माझी दुर्दशा झाली आहे. तू दयाळू आहेस. मग तू कठोर का झालास ? गजेंद्राने आर्त स्वराने हाका मारल्या, तेव्हा तू त्वरेने जाऊन त्याचे रक्षण केलेस. मग माझे रक्षण का करीत नाहीस ? "

त्यावर विष्णुने त्याचे सांत्वन केले. तो म्हणाला -"हे वैकुंठ आहे. येथे शोकाचे काय काम ? रडू नको. मी तुझे समाधान करतो. तुझे दुःख तरी काय आहे ते मला सांग." त्यावर मलमास म्हणाला -" हे सर्वज्ञ भगवंता, तुला माझी दुरवस्था माहित नाही असे कसे होईल ? सगळे जग तुझ्या जाणिवेत आहे. तू विचारतोस म्हणून मी तुला सांगतो. सर्व कालखंडांना स्वामी आहेत. त्या स्वामींच्या आश्रयाने सर्व कालखंड निर्भयपणे राहतात.

पण मी तेरावा महिना आहे. मला कोणी स्वामी नाही, म्हणून मी निराधार आहे. विधवेला शुभकार्यात घेत नाहीत. तिचे तोंडही पहात नाहीत. तशीच माझी स्थिती झाली आहे. असे जगण्यापेक्षा मेलेले बरे. ज्याचे सर्वांग जळत आहे, त्याला झोप कशी येईल ? एवढेच मला सांगायचे आहे. देवा, तुला दुसऱ्याचे दुःख बघवत नाही. तू परोपकारी आहेस. वेदात तर तुला दृष्टांचा नाश करणारा म्हणतात. तरी निजधर्म आठवून तुला योग्य वाटेल ते कर. देवाला पुन्हा पुन्हा काय सांगावे ? "

असे म्हणता म्हणता मलमास तेथे मुर्च्छित पडला. विष्णूला दया आली. त्याने गरुडाला खुणावून मलमासाला शुद्धीवर आणण्यास सांगितले. गरुडाने त्याला आपल्या पंखांनी हळूहळू वारा घातला. मलमास शुद्धीवर आला व विष्णूस म्हणाला - " काहीतरी करा व मला दुःखातून बाहेर काढा."

विष्णू त्याला म्हणाला - "होय. मी चतुर्भुज विष्णू आहे पण तुझे हे काम गोलोकात राहणारा श्रीकृष्ण, जो माझा अवतार आहे, तोच करील. तो दोन हातांचा देव आहे, पण सर्व देवांत श्रेष्ठ आहे. त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर तुझे समाधान होईल. त्याला पुरुषोत्तम असेही नाव आहे. आपण दोघे त्या गोलोकात जाऊ. तुला त्या गोलोकाची थोडी कल्पना देतो."

असे म्हणून विष्णूने प्रथम ब्रम्हांडातील कैलास, वैकुंठ व इतर लोकांची माहिती दिली. श्रीकृष्णाने ती सविस्तर माहिती युधिष्ठारास सांगितली. तो पुढे म्हणाला - " विष्णुने सांगितलेले वर्णन ऐक. त्या गोलोकात मध्यवर्ती अशी एक ज्योत आहे. त्या ज्योतीच्या मध्यभागी किशोर वयाचा अतिशय सुंदर असा श्रीकृष्ण विराजमान आहे.

इंदीवर कमळासारखा त्याचा शामल वर्ण आहे. मित्राच्या कोणांना लाल पाकळ्यांच्या कमळाची शोभा आहे. त्याचे मुखकमल शरद ऋतुतील पूर्ण चंद्रासारखी दिसते. धनुष्यासारख्या भिवया, मस्तकावर रत्नखचित मुकुट, कानामध्ये सुंदर कुंडले, श्रीवस्त मण्याचा दागिना वक्षावर शोभत आहे. हातात सुंदर कडी, कंठात कौस्तुभमणी, गुडघ्यापर्यंत लोंबणारे वनमाळा, भाळावर कस्तुरीचा टिळा असा तो श्रीकृष्ण लखलखित सोन्यासारखा पितांबर नेसून आहे.

कमरेभोवती मेखला आहे. त्याचे दोन्ही भुज नीलवर्ण शोभत आहेत. त्याच्या हातात मुरली आहे. ती सुद्धा रत्नजडीत आहे. तो सर्व सौंदर्याचे निधन आहे. रत्नाच्या सिंहासनावर तो बसला आहे. असे म्हणून विष्णूने अनेक सुंदर विशेषणांनी त्या श्रीकृष्णाचे वर्णन करून मलमासाला खूप आनंद दिला.

मलमासाला घेऊन विष्णू गोलोकी गेला. दुरूनच त्यांना श्रीकृष्णाचे मंदिर दिसले. त्या मंदिराला रत्नजडित खांब होते. महाद्वाराशी गेल्यावर द्वारपालाने पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. मग विष्णू मंदिरात प्रविष्ट झाला. विष्णूला पाहताच श्रीकृष्ण उठून उभा राहिला व पुढे होऊन विष्णूला वंदन करून, त्याला श्रेष्ठ असे आसन दिले. दोन्ही हात जोडून त्याची स्तुती केली.

विष्णूने आसन स्वीकारले. त्याच्या पाठीशी मलमास दोन्ही हात जोडून थरथर कापत उभा राहिला.

नारायणऋषी नारदास म्हणाले -" धर्मराजास श्रीकृष्णाने असे सर्व वर्णन करून सांगितले."

॥ अधिकमास माहात्म्य अध्याय - २ समाप्त ॥



Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form