अधिक मास माहात्म्य कथा
अध्याय ५
मेधावी कन्या शंकराकडे वर मागते. पती दे असे पाच वेळा म्हणते. युधिष्ठिराला कृष्णाचा अधिकमास व्रत करण्याचा उपदेश.
गेल्या अध्यायात कृष्ण युधिष्ठिरास मेधावी ऋषीची गोष्ट सांगत होता. मेधावीची कन्या दुःखी होती. तिने आपले दुःख दुर्वास मुनींना सांगितले. तिला लग्न व्हायला हवे होते. दुर्वास ऋषी तिला म्हणाले - "ब्राह्मणकन्ये रडू नकोस. तुझे दुःख दूर करण्यास एक दुर्मिळ उपाय सांगतो. एक व्रत आहे. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्या महिन्याचे माहात्म्य फार मोठे आहे. इतर कुठलाही महिना या महिन्याइतका पुण्यदायक नाही. बारा हजार वर्षे गंगेत स्नान करणे, सिंह राशीत गुरु असता गोदावरीत स्नान करणे यांनी जे पुण्य मिळते, तेच पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. हा महिना पुरुषोत्तमास प्रिय आहे. मला याचा अनुभव आहे. माझे तप:सामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. जे हवे ते त्यामुळे मिळते."
दुर्वासांनी त्या कन्येस असा चांगला उपदेश केला. पण देव देते आणि कर्म नेते, काय सांगू? त्या मूढ बुद्धीच्या मुलीने त्या महाकोपिष्ट दुर्वासास प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली - "मुनिवर्य, तुम्ही काय सांगता ते मला पटत नाही. माघ, कार्तिक, वैशाख इत्यादी महिने उत्तम फले देतातच. शंकर इत्यादी देवांची सेवा केल्यास ते फळे देत नाहीत का? सूर्य प्रत्यक्ष दिसणारा देव आहे. अंबिका, गणेश या देवता आपल्या इच्छा पूर्ण करतातच की! तुम्ही म्हणता तो महिना तर मलमास म्हणून निंद्य आहे. सर्व संकटे दूर करणारा हरी, उमापती शंकर, सितापति राम हे सर्व असताना तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करता? सूर्याला सोडून काजव्याची उपासना करावी असे हे आहे!"
धर्मा, त्या मुलीचे हे बोलणे कसे होते? अमृताचा कलश मिळावा आणि तो ओतून टाकावा. चिंतामणी मिळावा आणि तो पायरीला बसवावा. कामधेनू घरी चालत यावी व तिला झोडपून हकलावी. अंगणात कल्पवृक्ष उगवावा, मोठा वाढावा आणि बाईने तो तोडून लाकडे चुलीस लावावी असे तिचे कर्म होते. अर्थात दुर्वास ऋषी खूप रागावले. पण त्यांनी असा विचार केला, ही माझ्या मित्राची मुलगी अजाण आहे. तिला शाप देणे बरोबर नाही. महापंडितांनाही पुरुषोत्तम माहात्म्य कळत नाही. तर ह्या बिचारीला काय कळणार?
ते राग आवरून तिला म्हणाले - "मी तुझ्यावर रागवत नाही. तुला जसे वाटेल तसे तू कर. एवढे सांगतो की, तू ह्या मासाची निंदा केलीस त्याचे फळ तुला या जन्मी किंवा पुढल्या जन्मी भोगावे लागणार. मी आता बदरिकावनात जात आहे. जे होणार आहे ते टळत नाही, हेच खरे." एवढे बोलून दुर्वास निघून गेले. आपले चुकले एवढे लक्षात घेऊन ती कन्या फार उदास झाली.
काही काळ गेला. तिने शंकराची उपासना करण्याचे ठरविले. खूप खडतर तप केले. इंद्राने तिला विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ गेला. शंकर तिला प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रगट झाला. शुभ्र वर्ण, गळ्यात नरमुंडांची माळ, पाच तोंडे, दहा हात, पिंगट जटा, त्यात गंगा, तिसरा डोळा भडकलेला, वाघाचे चामडे गुंडाळलेला, नागाचे जानवे, अंगाला भस्म, निळा कंठ, हातात डमरू व त्रिशूळ! अत्यंत तेजस्वी असे शिवाचे दर्शन होताच ती क्षीण झालेली विप्रकन्या तत्काळ अंगात बळ संचारून उठली. तिने शंकराची स्तुती केली.
शंकर तिला म्हणाला - "तुला काय हवे आहे?" ती म्हणाली - "मला पती द्या." तळमळीमुळे तिने हे वाक्य पाच वेळा म्हटले. तेव्हा शंकर म्हणाला - "तू पाच वेळा मागितलेस त्याप्रमाणे तुला पाच पती मिळतील." तिला फार दुःख झाले. जगामध्ये असे कधीच झाले नाही. शंकर म्हणाला - "तुला पाच पती पुढल्या जन्मी मिळतील. तरी तुला पतिव्रता म्हणतील. पण एक सांगतो, तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास. ते तर माझेच अंश आणि पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस. तेही पाप झाले. मुली, पुढल्या जन्मी या पापाचे फळ म्हणून तुला खूप दुःख भोगावे लागेल."
असे म्हणून भगवान शंकर गुप्त झाले. ती विप्रकन्या अतिशय ओशाळली, दुःखी झाली. कालांतराने ती मरण पावली. धर्मा, द्रौपदीचा पिता द्रुपद हा पुत्रप्राप्तीसाठी त्याच वेळी यज्ञ करीत होता. त्या यज्ञातून ही द्रौपदी याज्ञसेनी म्हणून प्रकट झाली. तुम्ही या अयोनिसंभव द्रुपद कन्येमुळे तिचे पाच पती झालात. ती माझी प्रिय भगिनी आहे. एरव्ही मी हिला नरकात पाठविली असती.
आता असे करा, यापुढे जो अधिकमास येईल, तेव्हा स्नान, दान, जप इत्यादींनी या मासाचे व्रत तुम्ही पूर्ण करा. मी आता जातो. चिंता करू नको. कृष्ण जातो म्हणून पांडवांना खूप वाईट वाटले. पण मोह दूर सारून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला.
पांडवांनी अधिकमास आल्यावर सर्व व्रत पूर्ण केले. चौदा वर्षे संपल्यावर त्यांचा युद्धात जय झाला. सर्व वैभवे त्यांना मिळाली. नारायणऋषी म्हणाले - "ही झाली द्रौपदीची कथा. पूर्वी दृढधन्वा नावाचा एक राजा सूर्यवंशात होऊन गेला. त्याने पुरुषोत्तम मासाचे व्रत केले व तो सर्व सुखे प्राप्त करून गोलोकास प्राप्त झाला. तीही कथा मी सांगतो."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-५ समाप्त ||
