अध्याय १०
गोप्रदान आदि व्रते
वाल्मिकी दृढधन्वा राजाला विष्णू-लक्ष्मी संवादातील अधिकमासाची महती सांगत होते. नारायण लक्ष्मीला म्हणाला — “चैत्रादी बारा महिन्यांचा स्वामी सूर्य असतो व अधिकमासाचा स्वामी पुरुषोत्तम, म्हणजेच माझा अवतार श्रीकृष्ण असतो. म्हणून त्या महिन्यात जप, तप, व्रते इत्यादी सर्व श्रीकृष्ण-पुरुषोत्तमालाच उद्देशून करायचे असतात. त्या व्रतांचे अल्प आयासाने मोठे फळ मिळते.”
नाना सत्कर्मे करून भगवंताला तोषवावे. जप, दान, होम, पूजा ही सत्कर्मे करावी. जे दुर्बळ असतील त्यांनी धर्मशील ब्राह्मणांचा सत्कार करावा, त्यांची सेवा करावी. त्यांच्या आशीर्वादाने उत्तम फळ मिळते.
जे अज्ञानी आहेत त्यांनी संतांच्या सेवेत राहावे. तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही. साधूंचे दर्शन करावे, त्यांचे चरण वंदावे.
लक्ष्मी म्हणाली — “गाय व विप्र यांचे पूजन कसे करावे?” विष्णू म्हणाला — “धेनू हे दैवत परम श्रेष्ठ आहे. तिच्या शरीरात सात स्वर्ग व सप्त पाताळे आहेत. तिचे सामर्थ्य अद्भुत आहे.”
उत्तम धेनूचे दर्शन घेतले तर मोठे पुण्य मिळते. तिच्या शेपटीच्या स्पर्शाने रोग, दारिद्र्य आणि संकटे नष्ट होतात. गोमयात यमुना, मूत्रात नर्मदा, आणि तिच्या दुधात गंगा निवास करते.
वेदशास्त्रे व पुराणे धेनूच्या अंगी असतात. गाईचे दही, दूध व तूप यांनी यज्ञ पूर्ण घडतो. गाय व ब्रह्मज्ञ ब्राह्मण या दोन्ही गोष्टी जगात अत्यंत पवित्र आहेत.
अधिकमासात गायीची पूजा करून तिला वंदन करणाऱ्याला मोठा लाभ प्राप्त होतो. सुलक्षणी, तरुण, पुष्कळ दूध देणारी, शिंगांना सोन्याने सुशोभित केलेली, सवत्स, शुभ्रवर्णाची, न्याय्य मार्गाने मिळवलेली, खूर रुप्याने मढविलेली, वस्त्रे व अलंकारांनी सजविलेली अशा गाईचे पूजन करावे.
त्यानंतर सत्पात्र ब्राह्मणाला सुमुहूर्तावर ती दान द्यावी. त्यामुळे सर्व पापे नष्ट होतात. पूर्वज स्वर्गसुख भोगतात. दात्यास या इहलोकातही मान्यता मिळते.
सत्पात्र ब्राह्मण — सत्यवचनी, दानी, अभ्यासू, शांत, दयाळू, तपस्वी, निर्लोभी, स्वधर्माचरणी आणि श्रीकृष्णभक्त असावा.
त्या दानाच्या वेळी असा संकल्प करावा — “मी पुरुषोत्तमप्रीत्यर्थ सत्पात्र ब्राह्मणाला सुलक्षणी गाई दान करीत आहे.”
ब्राह्मणाची यथाविधी पूजा करावी. गायची शेपटी ब्राह्मणाच्या हातात द्यावी. त्यावर पानसुपारी व दक्षिणा द्यावी. “या गोप्रदानाने गोलोकपती भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होवोत” अशी प्रार्थना करावी.
ब्राह्मण उपलब्ध नसल्यास त्याला उद्देशून संकल्प करून जलात जल सोडावे. नंतर शुभ समयी ब्राह्मण गाय घेऊन गेला तरी दात्याला पुण्य लाभते.
अपात्र व्यक्तीला गोदान दिल्यास दोघांनाही वाईट गती मिळते. गोदानाचे पुण्य अमाप आहे. अमृताची गोडी, आकाशाची व्याप्ती, सूर्याचे तेज, पृथ्वीची क्षमा, मेरूची उंची, नामस्मरणाची थोरवी, विष्णूचा पराक्रम, शंकराचे तप, यांचे जसे मोजमाप नाही, तसे गोदानाचे पुण्यही अमर्याद आहे.
असे नारायणाने लक्ष्मीला सांगितले. त्याप्रमाणे वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला सांगितले.
