अधिकमास माहात्म्य
अध्याय ९
वाल्मिकी - दृढधन्वा संवाद, पुरुषोत्तम मासातील व्रते
![]() |
वाल्मिकी पुढे म्हणाले — राजा, विष्णूला सुदेवाने शंका विचारली तेव्हा विष्णू म्हणाला — "विप्रा, तुझ्याकडून दुःखाच्या भरात का असेना, पण महिनाभर उपास व सतत पावसाच्या पाण्यात भिजत राहणे आणि माझे चिंतन करणे अशी अशक्यप्राय साधना झाली व ती सर्व पुरुषोत्तम मासात झाली. त्यामुळे तुझा पुत्र पुनः जिवंत झाला.
या महिन्यात एक दिवस जरी उपास केला तरी मनुष्य वैकुंठात जातो. त्या मासातील व्रताचे पुण्य इतर सर्व पुण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे." विष्णूने अधिक मासाचा महिमा सांगून अंतर्धान घेतले.
सुदेव ब्राह्मण शुकदेव व पत्नीसमवेत घरी आला. त्यानंतर जेव्हा जेव्हा तीन वर्षांनी अधिक महिना येई तेव्हा तो उपवास, स्नाने व दाने देई. त्या पुण्याने पत्नीसह तो वैकुंठात गेला.
कित्येक वर्षांनी पृथ्वीवर जन्माला आला तोच तू आहेस. गुणसुंदरी हीच गतजन्मीची गौतमी आहे. शुकदेव हजारो वर्षे स्वर्गात राहून आता पोपटाच्या जन्माला आला. त्याने तुला संसारात न रमण्याबाबत सावध केले.
असे म्हणून वाल्मिकी म्हणाले — "राजा, तुझ्या प्रश्नाचे समाधान झाले ना? आणखी काही विचारायचे आहे का?"
दृढधन्वा म्हणाला — "महर्षी, कृपा करून आणखी थांबावे. मला अधिक मासाची आणखी माहिती हवी आहे."
वाल्मिकी म्हणाले — "विचार, मी उत्तर देतो." राजाने विचारले — "अधिकमासात कोणाची पूजा करावी? कोणती दाने द्यावीत? कोणती कर्मे करावीत?"
वाल्मिकी म्हणाले — "हा प्रश्न पूर्वी लक्ष्मीने विष्णूला विचारला होता. विष्णू म्हणाला — सूर्याचे संक्रमण ज्या महिन्यात नसते असा महिना दर तीन वर्षांनी येतो. त्या महिन्यात स्नान, दान, नामजप, तर्पण, देवपूजा नित्य करावी.
तसेच तेल वर्ज्य करणे, जमिनीवर झोपणे, पत्रावळीवर जेवणे, नखे व केस न काढणे, एकच पदार्थ खाणे, दिवा अर्पण करणे, अनवाणी चालणे, आवळ्याचे उटणे लावणे, अळणी जेवणे, दिवसातून एकदाच जेवणे, हविष्यान्न भक्षण, मौन धारण, तीळ, विडा, धान्य, सोने, रूपे दान, सौभाग्यवाण व सवत्स गाईचे दान करावे."
अधिकमासात सकाळ, दुपार, संध्याकाळ असे त्रिवार आन्हिक करावे. षोडशोपचारांनी राधा-कृष्णाची पूजा करावी. पूजास्थान स्वच्छ ठेवावे. अष्टदलकमल तांदळांनी रेखावे. त्यावर धातूचा किंवा मातीचा घट ठेवावा.
कलशपूजा करून पितांबराने झाकलेले ताम्हण ठेवावे. त्यात राधा-कृष्णाची प्रतिमा स्थापून प्राणप्रतिष्ठा करावी. काही पूजेचे पदार्थ कमी पडले तर शुद्ध जल अर्पण करावे. ‘यस्य… स्मृत्या’ श्लोक म्हणून न्यून ते पूर्ण करावे.
सप्तश्लोक स्तोत्रम्
नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन ।
नमस्तेस्तु हृषीकेश महापुरुषपूर्वज ॥१॥
येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितम् ।
लयमेष्यति यत्रैतत् तं प्रपन्नोस्मि केशवम् ॥२॥
परेशः परमानंदः परात्परतरः प्रभुः ।
चिद्रूपश्चित्परिज्ञेयो स मे कृष्णः प्रसीदतु ॥३॥
कृष्ण कमलपत्राक्ष रामं रघुकुलोद्भवम् ।
नृसिंहं वामनं विष्णुं स्मरन् याति परां गतिम् ॥४॥
वसुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनम् ।
पुराणपुरुषं प्रणतोम्यहम् ॥५॥
अनादिनिधनं देवं शंखचक्रगदाधरम् ।
त्रिविक्रमं हलधरं प्रणतोम्यहम् सनातनम् ॥६॥
य इदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमम् ।
सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते ॥७॥
