सुतशौनकादिकांना सांगतात - " नारायण ऋषी दृढधन्व्याचे कथानक सांगतो म्हणाले तेव्हा नारद म्हणाले-" त्याची पूर्ण कथा सांगा." नारायण म्हणाले - " फार पूर्वीची गोष्ट आहे. हयहय देशाचा राजा, चित्रधर्मा नावाचा होता. तो पराक्रमी आणि शुद्ध बुद्धीचा होता. त्याला मुलगा झाला. त्याचे नाव दृढधन्वा असे ठेवले. तो सर्व गुणसंपन्न होता. राजनीति, धर्म, चौदा विद्या, चौसष्ट कला त्याला येत होत्या. तो तरुण झाला तेव्हा चित्रधर्मा राजाने त्याला राज्य दिले व स्वतः पुलह ऋषींच्या आश्रमात जाऊन त्याने आमरण तपश्चर्या केली. तो मोक्ष पावला तेव्हा दृढधन्वा राजास पितृशोक झाला. त्याने पित्याचे उत्तरकार्य केले तेव्हा अनेक दाने दिली. त्याच्या राजधानीचे नाव पुष्करावर्त असे होते. विदर्भ देशाची राजकन्या गुणसुंदरी नावाची त्याची पत्नी झाली. त्या दांपत्याला चार मुलगे व कन्या झाली. चित्रवाक, चित्रवाह, मणिमान, चित्रकुंडल हे पुत्र व चारुमती ही कन्या. राज कुटुंब त्याप्रमाणे नांदत असता सर्वत्र शांती, वैभव नांदत होते. उपमा द्यायची झाली तर तो पृथ्वीसारखा क्षमाशील, सागरासारखा गंभीर, ब्रह्मदेवासारखा समबुद्धीचा, शंकरासारखा लवकर प्रसन्न होणारा, पराक्रमी कार्तवीर्यासारखा, रामासारखा एकपत्नीव्रती, विष्णू सारखा शत्रुनाशक, चंद्रासारखा शितल असा तो होता. वेद, धनुर्विद्या, सुनीती, औदार्य इत्यादी त्याचे गुण लोकांमध्ये प्रशंसा पात्र होते.
तो एकदा रात्री झोपला असता, त्याच्या मनात विचार आला - ' मी ह्या जन्मात काही तप केले नाही. जप, होम इत्यादी सत्कर्मे किंवा दाने दिली नाहीत. तरीपण मला एवढे वैभव कसे प्राप्त झाले ?' अशा विचारातच रात्र गेली. दुसऱ्या दिवशी तो शिकारीसाठी रानात गेला. बरोबर निवडक सेना होती. त्याने एका हरिणास बाण मारला. तो हरीण जखमी झाला व दूर पळत गेला. वाटेत तो श्रमी झाला. त्याला तहान लागली. एक सरोवर त्याने पाहिले. दुपारची वेळ होती. त्याने पाणी प्राशन केले. घोड्यास पाणी पाजले व तो वटवृक्षाच्या छायेत जरा पहुडला. तेवढ्यात तेथे एक सुंदर पोपट आला. तो एकदम मानवी वाणीने बोलू लागला - " हे राजा, एवढे वैभव तुला प्राप्त झाले आहे, पण मूळ तत्वाचे चिंतन करीत नाहीस. त्या वैभवातच अडकला आहेस. तू मोक्ष कसा पावशील ?" राजा एकदम भानावर आला. त्याला वाटले या पोपटाच्या रूपाने मला कोणीतरी सावध करीत आहे काय ? तेवढ्यात त्याचे सैन्य आले व पोपट उडून गेला. तो राजा राजगृहात गेला पण त्याचे मन कुठेच लागेना. तो विमनस्क झाला. सर्व भोग त्याने टाकले. त्याची पत्नी गुणसुंदरी अनेक प्रकारे त्याचे मन वळवू लागली. पण तो फारच उद्विग्न होता. राजा एवढा चिंतेत का हे काहीच कुणाला कळेना.
काही काळाने वाल्मिकी ऋषी तेथे आले. राजाने त्यांचे स्वागत केले. सत्कार केला. भक्तीभावाने त्यांची स्तुती केली. पण त्याची मुद्रा चिंताग्रस्त होती. ते वाल्मिकींच्या लक्षात आले. त्यांनी विचारले - "तू चिंताग्रस्त का आहेस ?" तेव्हा राजाने, त्यांना आपण शिकारीला कसे गेलो, जखमी हरिणाच्या मागे धावत असता कसे थकलो, सरोवराचे पाणी प्राशन करून वटवृक्षाच्या छायेत कसे बसलो, एक पोपट तेथे कसा आला व पोपट काय बोलला, ते सर्व वृत्त वाल्मिकींना सांगितले. " पोपट म्हणाला - ' तू एवढे वैभव भोगीत आहेस, पण मुख्य तत्त्वाचे चिंतन का करीत नाहीस ? तुला मोक्ष कसा मिळेल ?' हे वाक्य ऐकल्यापासून मी चिंताग्रस्त झालो आहे." राजा म्हणाला - "ऋषिवर्य, याचे रहस्य आम्हाला सांगाल काय ?" वाल्मिकीने ध्यान लावून राजाचे पूर्वजन्मीचे चरित्र समजून घेतले.
वाल्मिकी त्याला म्हणाले - " तू गेल्या जन्मी द्रविड देशात सुदेव नावाचा ब्राह्मण होतास. गौतमी ही तुझी भार्या होती. तुम्हाला पुत्रसंतान नव्हते. त्यामुळे तू दुःखी होतास. गौतमीने तुझे सांत्वन केले व पुत्रापासून सुख मिळतेच असे नाही, असे सांगून, पुत्रामुळे किती पित्यांना दुःख झाले त्याची उदाहरणे दिली व तुला म्हटले - ' त्यातून जर तुम्हाला पुत्र हवाच असेल तर श्रीहरीसाठी तपश्चर्या करा.' तिचे ऐकून तू खरोखरच वनात जाऊन तप करू लागलास. तुझ्या खडतर तपाने श्रीहरी प्रसन्न झाला व तुझ्यापुढे प्रकट झाला. त्याची स्तुती करून तू व तुझी पत्नी हात जोडून उभे राहिलात.' वाल्मिकी ऋषींनी दृढधन्वाला एवढे सांगितले.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय-६ समाप्त ॥
