वाल्मिकी दृढधन्वाला म्हणाले - "श्रीहरी प्रसन्न झाला. सुदेव ब्राह्मण व त्याची पत्नी हात जोडून उभे राहिले. श्रीहरी म्हणाला - "तू फारच कठीण तपश्चर्या केली आहेस. तुमची काय इच्छा आहे ती मला सांग." सुदेवाने पुत्रसंतती नाही म्हणून पुत्र द्यावा अशी विनंती केली पण हरी म्हणाला - "तुझ्या भाग्यात या जन्मी पुत्र नाही. पुत्राशिवाय अन्य काहीही मागून घे." ते ऐकून सुदेव ब्राह्मण मुर्च्छित पडला. त्याची पत्नी त्याला शुद्धीवर आणू लागली. ती म्हणाली - "अहो प्राणेश्वरा उठा. जागे व्हा. पुत्रप्राप्ती ही पुढे दुःखदायकही होऊ शकते हे मी तुम्हाला आधीच सांगत होते! दैवात नाही ते भगवंतही कसे देऊ शकेल?"
त्या दोघांची निराश अवस्था पाहून विष्णूचा वाहन गरुड भित भित म्हणाला - "भगवन, स्वामी! आपण ईश्वर आहात तरी खरेच काही करू शकणार नाही काय? तुमच्या भक्ताचे एवढेसे कार्यही का होऊ नये? मला या ब्राह्मणाची दया येते. तुम्ही याला पुत्र दिला नाहीत तर यापुढे तुमची भक्ती कोण करील? तरी याची कामना पूर्ण करावी अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे. ध्रुव, गजेंद्र, प्रल्हाद यांना तुम्ही सहाय्य केलेत!" यावर विष्णू गरुडाला म्हणाला - "गरुडा, तुला या विप्राची करुणा येत असेल तर याला तुझ्या अधिकारात एक पुत्र तू दे." गरुडाला आनंद झाला. तो सुदेवाला म्हणाला - "माझ्या पक्षीवंशातून एक पुत्र तुला मी देतो. तुम्हाला पुत्र होईल असा मी आशीर्वाद देतो."
ते ऐकून तो ब्राह्मण व गौतमी घरी गेले. काही दिवस गेल्यावर गौतमी गरोदर राहिली व तिला योग्य समयी एक सुंदर पुत्र झाला. सुदेवाने त्याप्रसंगी मोठा उत्सव केला. अनेक दाने दिली. ज्योतिषी लोकांनी त्या मुलाचे नाव शुकदेव असे ठेवले. हळूहळू तो पुत्र लाडात वाढू लागला. तो आठ वर्षांचा झाला. त्याची मुंज झाली. गुरुजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. त्याचे तेज काही आगळेच होते. तो शास्त्र व वेद अल्पावधीतच शिकला.
काही दिवसांनी त्या ब्राह्मणाकडे देवल मुनी आले. त्यांचे उत्तम आतिथ्य झाले. कुशल वर्तमान विचारले गेले. किशोर अवस्थेतील शुकदेवाला पाहून ऋषींनी सुदेवाला धन्यवाद दिले. त्या मुलाची वाखाणणी केली. त्याला जवळ घेतले. कुतूहूल वाटले. त्याचे हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार भविष्य पहावे म्हणून त्यांनी त्याचा हात निरखून पाहिला. त्याची सर्व लक्षणे पाहून देवल आनंदित झाले. पण पाहता पाहता त्यांची मुद्रा उदास झाली. त्या मुलाचे आयुर्मान थोडे होते.
सुदेवाला देवल ऋषी म्हणाले - "विप्रा! काय सांगू! हा तुझा सुलक्षणी पुत्र बाराव्या वर्षी पाण्यात बुडून मरणार आहे." सुदेवाला धक्काच बसला. तो आक्रोश करीत भूमीवर गडबडा लोळू लागला. शुकदेव चकित व स्तब्ध! नुसते पहात होता. गौतमी पतीचे सांत्वन करू लागली. दैवापुढे सर्व दीन आहेत म्हणून अनेक दैवहतांची उदाहरणे देत पतीची समजूत काढू लागली.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय -७ समाप्त ॥
