अधिकमास माहात्म्य
अध्याय १२
दीपदानाचे माहात्म्य, स्नानाचे फल. सुशर्मा-कथा
लक्ष्मीने विष्णूला विचारले - " अधिकमासात दीपदान व उचित ठिकाणी दिवे लावून प्रकाशाची सोय करणे या गोष्टीला काय महत्त्व आहे ? दिवा कोणत्या द्रव्याचा करावा ? वातीला धागे किती असावेत ? दिवा किती दिवस तेवत ठेवावा ?" विष्णू म्हणाला - " अधिक महिन्यातील दीपदानाचे महत्त्व फार आहे. त्याने सर्व पापातून मनुष्य मुक्त होतो. अधिक महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावण्यास सुरुवात करा. प्रथम स्नान करावे, शौच, मुखमार्जन करावे. स्नानाची फळे एकापेक्षा एक जास्त कशी आहेत ते आधी सांगतो. उष्ण पाण्याने स्नान केल्याने एक पट फळ मिळते असे समजा. थंड पाण्याचे स्नान केल्याने दुप्पट. ही स्नाने घरातील पाण्याने करावीत. विहिरीवर जाऊन स्नान केले तर चौपट पुण्य. मोठ्या वापीजवळ जाऊन स्नान केले तर आठ पट. तलावातील पाण्याने दसपट. त्याच्या दसपट पुण्य डोहातील पाण्याने स्नान केल्यास मिळते. झऱ्याच्या पाण्याने स्नान केल्यास दसपट, नदी स्नानाचे पुण्य त्याच्याहून दसपट, त्याच्या दसपट पुण्य महानदीतील स्नानाने मिळते.
स्नान करताना पांढरे तीळ व आवळकटीचे चूर्ण व गोमूत्र अंगाला लावून स्नान करावे. त्यावेळी म्हणायचा संस्कृत मंत्र आहे ती प्रार्थना पुढीलप्रमाणे आहे - " हे देवदेवा ऋषिकेशा, तुला देव, दानव वंदन करतात. या अधिकमासात मी स्नान करणार आहे. म्हणून मी तुला नमन करतो. तरी त्यात विघ्न येऊ नये यासाठी तू मला सहाय्य कर. " अशी प्रार्थना करून पुष्कर इत्यादी तीर्थांचे स्मरण करावे. तसेच गंगा, नंदिनी, नलिनी, सीता, मालती, मलापहा, त्रिपथगामिनी, भागीरथी, हैमवती, जान्हवी व त्रिदशेश्वरी ही गंगेची बारा नावे उच्चारून स्नान करावे. स्नानानंतर आचमन करावे, कोरडी वस्त्रे नेसावी. असे स्नान करावे.
अधिकमासात एका वेळी जरी यथाविधी स्नान घडले तरी सप्तजन्मांचे पाप नष्ट होते. सप्ताहभर स्नान केल्यास दहा जन्मांचे पाप जाते. आणि महिनाभर यथाविधी स्नान केल्यास एक हजार जन्मातील पापे नष्ट होतात. अधिकमासातील स्नानाचे खूपच महत्त्व आहे. अधिकमासात कोणतेच पुण्य कार्य न करणारा खरोखर पापीच होय. आलेली संधी फुकट घालविली असे त्यामुळे होते.
वस्त्रे परिधान केल्यावर संध्या करावी. पुरुषोत्तमाची पूजा करावी. ती अशी की, एका वेदीवर एक घट ठेवावा. त्याच्यावर दीपस्तंभ ठेवावा. तो तांब्याचा असावा. त्यात पाच अंगुळे लांबीची सात धाग्यांची वात घालावी, त्यात तेल किंवा तूप घालून दिवा लावावा. त्या दीपकाची व कुंभाची यथाविधी स्थापना करावी. हात जोडून प्रार्थना करावी. दिव्याने अंधार नाहीसा होतो. तो तेज प्रकट करतो. म्हणून मी पुरुषोत्तमाला हा दिवा दाखवीत आहे. हा संसार तेजोमय आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. म्हणून हे भगवंता, मी तुला दीप अर्पण करीत आहे. तू त्याचा स्वीकार कर व आमच्या इच्छा पूर्ण कर." तसेच कुंभ-पूजनही करावे. अशाप्रकारे संपूर्ण महिनाभर दीप तेवत ठेवावा.
त्याने फार मोठे फळ मिळते. तेज, धन, ज्ञान आणि मोक्ष, सौभाग्य, विद्या, आयुष्य, आरोग्य, चांगली स्त्री, पुत्र पौत्र, ब्रम्हज्ञान, राज्य, धन, पशू जे हवे ते मिळेल. रोगराई दूर होईल, सर्वत्र कीर्ती होईल. भयभीत झालेल्यांची भीती जाईल, बद्धजन मुक्त होतील, असा दीपदानाचा महिमा आहे. असा दिवा पाहून, प्रेरणा मिळवून जे दीपाची स्तुती करतील किंवा दुसऱ्याला तशी प्रेरणा देतील, ते मुक्त होऊन वैकुंठात जातील."
विष्णू लक्ष्मीस पुढे म्हणाला - " याविषयी मी तुला एक पुरातन गोष्ट सांगतो. माझा एक भक्त सुशर्मा नावाचा ब्राह्मण सरस्वती नदीच्या तीरावर रहात होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. रात्री हरिचिंतन करी. तो रोज रात्री दिवा लावून झोपत असे. अधिकमासात तर दीप प्रज्वलित करून रात्री निजत असे. त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका येई. एकादशी आली त्या दिवशी सुशर्म्याने पुरुषोत्तमाची पूजा केली व रात्री नामसंकीर्तन करीत जागत बसला.
मध्यरात्री उंदीर पकडायला बोका आला. त्यावेळी वातीवर काजळी धरली होती व ज्योत मंद झाली होती. उंदीर आला व बोक्याने उडी मारली. त्याच्या धक्क्याने समई थरथरली, काजळी झडून गेली व दिवा प्रदीप्त झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. योगायोग असा की, दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला. दीप उजळण्याच्या पुण्याने तो वैकुंठात गेला.
नित्य दिवा लावल्याने व पुरुषोत्तमाची पूजा केल्याने सुशर्मा ब्राह्मण श्रीमंत व सुखी झाला व मरणोत्तर मुक्त झाला. हरीच्या समोर अधिकमासात दिवा तेवत ठेवल्याने महान फळ मिळते." असे विष्णू लक्ष्मीला म्हणाला.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-१२ समाप्त ||
