अधिकमास माहात्म्य
अध्याय १३
सुशीला व विमला यांची कथा
लक्ष्मी विष्णूला म्हणाली - " दीप अर्पण करण्याची महती आपण मला सांगितली पण माझे अजून समाधान झालेले नाही. आपण आणखी माहिती सांगावी अशी मी आपणाला विनंती करते. अधिक महिन्यात कोणी दीप लावावा, त्याचे फळ त्याला काय मिळाले, दीप मुद्दाम मालवला तर काय परिणाम होतो ? सर्व काही मला सांगा." त्यावर विष्णू म्हणाला - " पूर्वी मथुरानगरीत शाकली शाखेचा विप्र रहात होता. त्याला दोन बायका होत्या. एकीचे नाव विमला व दुसरीचे नाव सुशीला. तो ब्राह्मण धार्मिक होता. त्याचा गृहस्थाश्रम नीट चालला होता.
पुढे अधिकमास आला. सुशीला पाणी आणण्यास यमुनेकडे गेली. त्यावेळी तिथे अनेक नागरिक स्नानासाठी आले होते. सुशीला पाण्याची घागर घेऊन घरी आली आणि तिने पतीला विचारले - "मी एक प्रश्न विचारते रागावू नका. आज नदीवर कितीतरी लोक स्नानाला आले होते ते का म्हणून ?" पती म्हणाला - " आता अधिकमास आहे. अधिकमासात स्नान करण्याचे महत्त्व फार आहे. अधिकमासात सूर्याचे संक्रमण मोजत नाहीत. स्नानाप्रमाणेच पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे दिवा तेवत ठेवण्याचेही मोठे पुण्य आहे."
सुशीला म्हणाली - " तुम्ही संमती दिली तर मी महिनाभर दिवा तेवत ठेवू का ?" पती म्हणाला - " माझी संमती मिळवून कार्य करतेस हे फार चांगले आहे. कर, योग्य प्रकारे परत कर." सुशीलेला मोठा आनंद झाला. रोज यमुना नदीत स्नान करून यावे, पतीची सेवा करावी, एका घटावर दीप स्थापित करून तो नित्य तेवत ठेवावा. इत्यादी नित्यक्रम तिने सुरू केला.
तिची सवत विमला मात्र तिचा द्वेष करू लागली. तिचे व्रत मोडावे म्हणून तिने एक युक्ती केली. घरात कुणी नसताना तिने दिव्यातील तेल काढून टाकले व जणू काही झालेच नाही अशा मुद्रेने ती दारात येऊन उभी राहिली. सुशीला आली. तिने बघितले तर दिवा गेलेला. तिला वाईट वाटले. तिने दिव्यात पुन्हा तेल घातले. देवाची क्षमा मागितली.
दुसऱ्या दिवशी शाकली बाहेर गेला होता आणि सुशीलाही काही निमित्ताने बाहेर गेली होती. तेवढ्यात विमलाने दिवा विझवला व तेल काढून टाकले. सुशीलाने पुन्हा दिवा लावला. पुढे ती घरातच राहिली तरी तिचा डोळा चुकवून विमलाने फुंकर मारून दिवा घालवला. सुशीलाने दिवा लावला की, कधी फुंकर मारून, कधी पदराच्या वाऱ्याने तर कधी संधी साधली तर तेलच काढून टाकून विमलाने सुशीलेचे व्रत मोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी सुशीला पुन्हा दिवा लावत असे.
अनेक ब्राह्मणांना जेवायला बोलावून तिने व्रताची सांगता केली. या व्रताने सुशीलेला ऐहिक व पारलौकिक सुख मिळाले. तिला काही कमी पडले नाही. विमलेने मात्र केलेल्या दुष्ट कर्माची फळे भोगली. तिचे तीन सुंदर मुलगे अकाली मेले. ती लवकर म्हातारी झाली, आंधळी झाली. ती मेल्यावर रौरव नरकात तिचे फार हाल झाले.
पुढे हजारो वर्षांनी ती गावात डुकरीच्या जन्माला गेली. नंतर सर्पिणी झाली, त्यापुढे कोल्हीण झाली. मग तिला वटवाघुळीचा जन्म आला. नंतर पालीचा जन्म आला. नंतर माद्र देशात भिल्लीण झाली. अशी ती अनेक जन्मात परम दुखी झाली.
सुशीला मात्र पती आणि संतती यांचे सौख्य मिळवून पतीसह वैकुंठात गेली. असे सांगून विष्णू लक्ष्मीस म्हणाला - " अधिकमासाचा व दीप अर्पण करण्याचा असा महिमा आहे." लक्ष्मीने आणखी प्रश्न विचारले. ते पुढील चौदाव्या अध्यायात पाहूया.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-१३ समाप्त ||
