अधिकमास माहात्म्य
अध्याय ११
सत्पात्र ब्राह्मणाची उत्तम लक्षणे
लक्ष्मी विष्णूला विचारले — “दान घेणारा ब्राह्मण सत्पात्र असे आपण सांगता. त्याची काही लक्षणेही सांगितली. पण सत्पात्रतेची सर्व लक्षणे मला जाणून घ्यायची आहेत.”
विष्णू म्हणाला — “तप, अहिंसा, सत्यभाषण, अध्ययन-अध्यापन, यजन-याजन, दान-आदान ही षटकर्मे करणारा, सर्व कर्मे यथाविधी करणारा ब्राह्मण सत्पात्र असतो.
सर्व शास्त्रे जाणणारा, निर्लोभी, पुराणवक्ता, सच्छील, सत्यवचनी, सुचित्व पाळणारा, हरिभक्त, शुद्ध अन्न घेणारा, निर्व्यसनी, संतोषी व समाधानी असा विप्र वंदनीय असतो.
देवतांच्या उपासनेने क्षणिक फळ मिळेल, पण संतसज्जनांच्या संगतीत भगवद्भक्ती व मुक्ती निश्चित मिळते. नुसती तीर्थक्षेत्रे साधूकृपेविना व्यर्थ आहेत.
एका सद्विप्राच्या पूजेने व सेवेने त्रैलोक्याची पूजा केल्यासारखे पुण्य मिळते. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधीही करू नये. त्यामुळे पाप लागते व सर्वनाश होतो.
मी तुला नृग राजाची कथा सांगतो.
कृष्णाचे बाळगोपाळ खेळता खेळता दमले. तहान लागल्याने ते एका विहिरीपाशी गेले. तेथे पाणी नव्हते, पण एक प्रचंड सरडा पडून होता.
त्यांनी कृष्णाला सांगितले. कृष्णाने त्या सरड्याला आपल्या दैवी शक्तीने वर काढले. पण आश्चर्य — कृष्णाचा स्पर्श होताच सरडा नाहीसा झाला आणि तेथे दिव्य मानवदेहधारी राजा प्रकट झाला.
त्याने आपला इतिहास सांगितला — “मी ईक्ष्वाकू वंशाचा राजा नृग. मी मोठा उदार दाता होतो. नित्य ब्राह्मणांना रत्ने, वस्त्रे, सुवर्ण, गायी व वाहने दान देत असे.
एकदा एका ब्राह्मणाला दिलेली गाय चुकून परत आली आणि दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिलेल्या गायींत मिसळली. दोघांत वाद झाला.
मी नम्रतेने क्षमा मागितली. ‘एक लक्ष दुसऱ्या गायी देतो, पण मला चूक सुधारू द्या,’ असे म्हणालो. पण वाद मिटला नाही.
मृत्यूनंतर यम म्हणाला — ‘तू आधी पाप भोगशील की पुण्य?’ मी पाप आधी भोगायचे ठरवले. त्यामुळे दत्त-अपहरणाच्या दोषाने मला सरड्याचा जन्म मिळाला.
श्रीकृष्णा, तुझी भक्ती असल्यामुळे तुझ्या स्पर्शाने मला पूर्वदेह प्राप्त झाला.”
त्याच वेळी दिव्य विमान आले आणि राजा नृग स्वर्गात गेला. कारण पूर्वजन्मी त्याने संतसेवा व अनेक दाने केली होती.
म्हणून सज्जन, संत आणि सुशील ब्राह्मण यांची सेवा करावी. विशेषतः अधिकमासात अशी सेवा केल्यास असंख्य पुण्य प्राप्त होते.
