अधिकमास माहात्म्य
अध्याय १४
चित्रबाहू - मणिग्रीव कथा
लक्ष्मीने विष्णू अधिकमासासंबंधी आणखी कथा सांगण्याचा आग्रह केला. तेव्हा विष्णू कथा सांगू लागला - " पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरात चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. तो शूरवीर व धार्मिक होता. कृष्णभक्त होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले. त्यांचे त्याने स्वागत केले. त्यांची स्तुती केली. आपले सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शविली.
अगस्त्यांना त्या कृष्णभक्त राजाचे दर्शन घेऊन आनंद झालाच होता. त्यांनी चित्रबाहूला म्हटले - "तुझे हे राज्य मी तुलाच परत देतो. तुला पाहूनही मला धन्यता वाटली." तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तेथे आली. तिला अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले.
राजाने विचारले - "ऋषिवर्य, मला हे राज्यवैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी हे सर्व कसे प्राप्त झाले ? माझे कोणते पूर्वपुण्य सफल झाले ?" मुनी म्हणाले - " मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे." त्यांनी तत्काळ समाधी लावली.
तेव्हा त्यांना असे दिसले की, चित्रबाहू राजा पूर्वी मणिग्रीव नावाचा शूद्र होता. ते त्यांनी राजास सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले - "चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास. तू अत्यंत दुराचारी होतास. तू सर्व प्रकारची पापे केलीस.
चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदर नामक पत्नी होती. आपल्या पतीचे वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्माने त्याच्याबरोबर राहत होती. त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जात-भाईंनी त्याला हाकलले. बृहद्बल राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली, त्याला अरण्यात घालवले. त्याची पत्नी त्याच्याबरोबर गेली.
पुष्कळ दिवस लोटले. मणिग्रीव प्राण्यांना मारून आपले पोट भरत असे. काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चालला होता. थकल्याने तो मुर्च्छित पडला. मणिग्रीवाने त्याला पाहिले व त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केले.
त्याला आपल्या अंगणात आणले, फलाहार दिला. सरोवरात स्नान करण्यास सांगितले व दोघांनी मिळून त्याची सेवा केली. मणिग्रीवाने त्याची वास्तपुस्त घेतली व आपली माहिती सांगितली. तहानभुकेची शांती झाल्याने व विश्रांती मिळाल्याने उग्रदेव प्रसन्न झाला.
" आपण यात्रेस चाललो असता रस्ता चुकून अरण्यात आलो व अतिश्रमाने, तहानभुकेने व्याकुळ झालो. तुम्ही मला जीवदान दिलेत." तेव्हा उग्रदेव पुढे म्हणाला - " तुमची या अरण्यातील वस्ती कशामुळे ? तुम्ही नगरात का राहत नाही ? मला तुमचे काही भले करता आले तर करीन."
असे त्याने विचारल्यावर मणिग्रीवास आनंद झाला व दैवयोगाने आपल्याला हा विप्र भेटला आहे. त्याच्या कृपेने आपली स्थिती सुधारली तर बरे, असा विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-१४ समाप्त ||
