अधिक मास माहात्म्य
अध्याय ४
अधिकमास माहात्म्याच्या चौथ्या अध्यायात द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा आणि दुर्वास मुनींची उपकथा सांगितली आहे. भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला ही कथा सांगतात. भक्ती, कर्म आणि नियती यांचा सुंदर संगम या अध्यायात अनुभवायला मिळतो.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
द्रौपदीची पूर्वकथा, दुर्वासांची उपकथा
श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला – "तुमची पत्नी गेल्या जन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. ती दहा वर्षांची झाली, ती अतिशय सुंदर होती. तिचे मुख चंद्रासारखे सुंदर होते. सौंदर्याची जणू ती खाणच होती. दुःखाची गोष्ट अशी की, तिचा जन्म झाला तेव्हा तिची आई मरण पावली. त्यामुळे त्या मुलीचे संगोपन त्या ब्राह्मणानेच केले. पित्याचे तिच्यावर खूपच प्रेम होते.
तिला चांगली समज आली तेव्हा त्याने तिला साहित्य, नीतिशास्त्र, व्यवहार चातुर्य आणि इतर अनेक विद्या प्रेमाने शिकविल्या. ती जरा मोठी झाली तेव्हा तिच्या वयाच्या इतर ओळखीच्या मुलींचे विवाह झाले. काही मुलींना तर पुत्र झाले. ती मनात झुरू लागली – "मी आता काय करू? माझे लग्न केव्हा होईल? माझे वडील महापंडित आहेत, पण मला वेळेवर लग्न हवे हे त्यांना कसे कळत नाही? विवाहाचे वय उलटून जाऊ लागले आहे. मी अजून कुमारीच राहिले.
माझी आई भाग्याची.
ती गेली स्वर्गात.
मला मात्र दुःख भोगायला इथे ठेवले!"
मेधावीला आता चिंता लागली.
त्याने वरसंशोधन खूप तळमळीने केले.
सर्वत्र फिरला.
पण कुणीही योग्य वर मिळेना.
तो दमून भागून घरी येतो तोच त्याच्या अंगात ताप भरला.
अंग फार तापले.
डोळ्यांची आग झाली.
डोके दुखू लागले.
गरम श्वास येऊ लागला.
अंगात प्रचंड वेदना होऊ लागल्या.
हातापायातील शक्ती गेली.
तो घराशी येतायेताच खाली पडला.
तेवढ्यात त्याने मुलीला हाक मारली. बाबांची हाक ऐकताच ती धावत बाहेर आली. पहाते तो काय? मेधावी निपचित पडला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला होता. पाय गार पडले होते. त्याचे पुण्य चांगले म्हणून त्याला मरणाच्या क्षणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या आनंदकंद पुरुषोत्तमाचे नाव घेतच त्याने प्राण सोडले.
विष्णूचे दूत आले व त्याला वैकुंठात घेऊन गेले. मुलीने हंबरडा फोडला – "बाबा, तुम्ही मला कंटाळालात का? दिवसरात्र तुम्ही मला विसंबले नाहीत. आता मी कुणाच्या मांडीवर डोके ठेवू? मला ना बहीण, ना भाऊ, ना कुणी नातेवाईक.
आता मला जेवायला कोण घालील?
वस्त्र कोण देईल?
आश्रम कसला हा?
भकास अरण्य आहे.मी एकटी कशी राहू?
माझ्या जिण्याला तरी काय अर्थ आहे?
बाबा, लवकर परत या ना.
नाहीतर मी प्राण देते.
ती रडू लागली.
घामाने अंग भिजले, अश्रूंनी आणखी भिजले.
तिच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळपास राहणाऱ्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटले
व ते धावत आले.
मेधावीचे प्रेत पाहून तेही रडू लागले.
त्या ब्राह्मणांनी योग्य वेळी ते प्रेत तिच्या मांडीवरून उचलले.
व स्मशानात नेऊन दाहकर्म केले.
नदीत स्नान करून परत मेधावीच्या आश्रमात आले.
मग ते आपापल्या घरी गेले.
तिने धैर्याने यथाशक्ती उत्तर कार्य केले.
नंतर ती आश्रमात एकटीच राहिली.
काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले.
ते सिद्ध होते.
अनुग्रह करण्याची विलक्षण सिद्धी त्यांना होती.
ते रागीटही होते.
मुलीचे रडणे ऐकून ते आश्रमात आले.
युधिष्ठिरा, तुझी आई कुंती हिने दुर्वासांची खूप सेवा केली होती.
त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी तिला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते.
तुमचा जन्म त्या मंत्रानेच झाला आहे.
आता त्यांच्या क्रोधाची गोष्ट सांगतो.
त्यांनी मला व रुक्मिणीला रथ ओढायला लावला होता
व रथात ते बसले होते.
रथ ओढताना रुक्मिणी दमली.
तिचे तोंड सुकले.तिने हळूच आपली अवस्था मला सांगितली.
मला तिची दया आली.
मी पायाचा अंगठा दाबून पृथ्वीतून गंगा उत्पन्न केली
व ते पाणी रुक्मिणीच्या मुखात पडेल अशी युक्ती केली.
दुर्वासांना राग आला.
एवढ्या थोर ऋषींच्या देखत मी पत्नीवर प्रेम व्यक्त केले म्हणून
ते रागावले आणि त्यांनी मला पत्नीवियोगाचा शाप दिला.
असे ते दुर्वास मेधावीच्या आश्रमात आले.
त्या मुलीने त्यांचे उत्तम स्वागत केले.
आपली सर्व करुण कहानी तिने दुर्वासांना सांगितली
व आपला विवाह होत नाही ही व्यथा त्यांच्या कानावर घातली.
आपण आत्महत्या करणार असे ती उद्वेगाने बोलली
व आपले दुःख दूर करा अशी विनंती तिने त्यांना केली.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय ४ समाप्त ॥
.jpeg)