अधिकमास माहात्म्य अध्याय २५
वीरबाहू, यशोमती व गुणवती यांची कथा
विष्णूने लक्ष्मीला म्हटले - " हे प्राणप्रिये, स्नान, दाने इत्यादींनी युक्त असे अधिकमासाचे व्रत करावे. त्याने कसा लाभ होतो याची कथा मी तुला सांगतो. पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती ही खूप सुंदर होती. पण गर्विष्ठ होती. आपली संपत्ती, आपले सौंदर्य, आपले तारुण्य यांचा तिला फार गर्व होता. मंडन नावाचा त्या राजाचा प्रधान होता. तो स्वामीभक्त, शूर होता. प्रधानाची पत्नी गुणवती नावाची होती. ती गर्विष्ठ नव्हती. धार्मिक स्वभावाची, दानशूर होती. वीरबाहू पत्नीच्या नादाने विलासात दंग असे. त्याने प्रधानावर सर्व राज्यकारभार सोपविला. उपवनातून भटकावे, नवी वस्त्रे नेसावी, अनेक भूषणे धारण करावी, मानपान, उधळेपणा, नाना भोग, नाना वाहने यात राजा व राणी गुंग असत. कोणतेही देवतार्चन करीत नसत.
त्या दोघांना सुबाहू व शतबाहू असे दोघे राजपुत्र होते. गुणवती ही राजवाड्यात यशोमतीस भेटायला येत असे. पुढे अधिकमास आला. यशोमतीचे प्रचंड वैभव, तिचा विलासीपणा यांचा विचार करून गुणवतीला असे वाटते की, राणीचे हे वैभव तिच्या पूर्वकर्माप्रमाणे तिला प्राप्त झाले आहे. पण हिने जर आता सत्कर्म केले नाही तर पुढे सर्व वैभव लयास जाईल. हिला एखादे कल्याणप्रद व्रत सांगावे. प्रसंग पाहून तिने राणीस म्हटले - " राणीसाहेब, आता अधिकमास आला आहे. त्यात तू चांगले व्रत कर. म्हणजे तुझे हे वैभव अक्षय टिकून राहील. पण राणीने तिचे न ऐकता उलट अधिकमासाची निंदा केली. त्याचा परिणाम असा झाला की, तिचे दोन्ही पुत्र ज्वर होऊन मरण पावले. तिचे सांत्वन करण्यासाठी गुणवती गेली असता, यशोमती दुःखात होती. पण गुणवतीने दागिने घातले होते. चेहरा तेजस्वी दिसत होता. उत्तम वस्त्र नेसली होती. आपण दुःखात असता ही नटून आली, त्यामुळे त्या शोकग्रस्त राणीला गुणवतीचा राग आला, आणि तिने गुणवतीला घालवून दिले. राणीने एवढ्यावरच न थांबता प्रधानाला व गुणवतीला कैदेत टाकले. त्यावेळी प्रधान व त्याची पत्नी यांनी श्रीकृष्णाचा धावा केला.
खरोखर राणीने गुणवतीच्या संबंधी राजाकडे कागाळी केली होती. त्यामुळे राजाने त्यांना बंदीत घातले होते. कृष्णाने राजाला स्वप्नात सांगितले की, " गुणवतीने जे सौभाग्यलंकार धारण केले आहेत, आणि तिचे जे मुख तेजस्वी दिसते, ते सर्व तिने केलेल्या अधिकमास व्रताचे फळ आहे. तुम्ही प्रयत्न केला तरी तिचे कुंकू पुसले जाणार नाही, तिचे अलंकार व तेज निघू शकणार नाही. ते अक्षय आहेत. तिचे मुख धुतले तरी लावलेली उटी निघणार नाही. यशोमतीने अधिकमासाची निंदा केली, त्यामुळेच तुझे दोन्ही पुत्र मरण पावले." असे सांगून श्रीकृष्ण अंतर्धान पावला. राजा जागा झाला. त्याने यशोमतीला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा यशोमती म्हणाली - " मी ही असेच स्वप्नात पाहिले. तरी आपण या गोष्टीचा शोध घेऊ या.
राजा व राणी कारागृहात गेली. एका दासीला गुणवतीचे मुख धुण्यास सांगितले. तरी तिच्या चेहऱ्यात फरक पडला नाही. मग राजाने स्वतःच्या हाताने गुणवतीचे मुख चोळून चोळून धुतले. तरी तिने लावलेली उटी व कुंकू पुसले गेले नाही. राजा, राणी ओशाळले. तेथील दास, दासी व इतर मंडळी यांना आश्चर्य व आनंद वाटला. राजाने दोघांना बंदीतून मुक्त केले. राजा व राणी यांनी प्रधान व त्याची पत्नी यांची क्षमा मागितली. राणीला खरोखर पश्चाताप झाला होता. असे म्हणून विष्णू म्हणाला - " प्रिये, सिंधुकन्ये, अधिकमासाच्या व्रताचे गुणवतीला असे फळ मिळाले. पुढे पुन्हा अधिकमास आला, त्यावेळी राणीनेही व्रत केले. त्यामुळे त्यांचे वैभव टिकले. सारांश, अधिकमासाच्या व्रताने पाप नष्ट होते, वैभव व पुण्य लागते, देहांत झाल्यावर नरकात न जाता व्रत करणारा वैकुंठात जातो.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२५ समाप्त ||