अधिकमास माहात्म्य अध्याय २६
अधिकमास व्रत व व्रताचे उद्यापन
विष्णू लक्ष्मीला म्हणाला - " मी आता अधिकमास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो. संपूर्ण अधिकमासात व्रत कर्त्याने पुरुषोत्तम श्रीकृष्ण व राधा यांची रोज पूजा करावी. कृष्णपक्षात चतुर्दशीस शक्यतो उद्यापन करावे. ती तिथी काही अडचणीमुळे साधत नसेल तर कृष्ण अष्टमी किंवा नवमी तिथी घ्यावी. ( पण एक लक्षात ठेवावे की त्या नवमीनंतर राधा कृष्णाची पूजा उरलेल्या दिवसात करण्याची आवश्यकता नसली तरी, स्नान, दान, उपवास इत्यादी काही नियम घेतल्यास ते मात्र अमावस्येपर्यंत सोडू नयेत.) उद्यापनाच्या दिवशी सकाळची सर्व शुद्धीकर्मे उरकावीत. त्या दिवशी ३० मेहुणे जेवायला घालणे प्रशस्त आहे. पण ते शक्य नसेल तर ७ मेहुणे किंवा पाच मेहुणे (दांपत्ये) तरी बोलवावीत. ३३ मेहुणे बोलावण्याची रूढी ही प्रचलित आहे. पण दांपत्य संख्या व्रती यजमानाच्या आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून असावे. मोठा मंडप घालावा किंवा मंगल कार्यालय भाड्याने घ्यावे.
मंगलवाद्ये वाजवावी. उत्सव करावा. माळा, पताका, तोरणे, द्वारे सजविणे, रांगोळ्या काढणे, आम्रपल्लव बांधणे, पुष्परचना करणे अशी सुंदर व्यवस्था करावी. सर्वत्र दिवे लावावे. उत्तम प्रशस्त स्वच्छ जागी सारवून वर रांगोळ्या घालाव्या. सर्वतोभद्र आकृती पाच धान्यांनी काढावी. त्यावर चार दिशांस मंगल कलश. सुवर्ण, रजत, ताम्र किंवा मृण्मय अशा कोणत्यातरी एका प्रकारचे स्थापावेत. त्यात उदक अर्धपात्र भरून आम्रपल्लव तोंडावर बसवावे. वस्त्राने घट वेष्टावे. घटावर नारळ ठेवावा. प्रत्येक घटाशी संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांची प्रतिमा /प्रतिके स्थापावीत. यांना चतुर्व्यूह म्हणतात. प्रथम मध्यभागी कलशावर पूर्णपात्रावर तांदळावर राधासहित मुरलीधर श्रीकृष्णाची पुरुषोत्तम म्हणून मूर्तीची स्थापना करावी. सर्वतोभद्र आकृतींवर ही स्थापना करायची असते. पुरोहित म्हणून तंत्रकुशल व मंत्रवेत्ता ब्राह्मण आधीपासून निमंत्रण केलेला असावा. जप करण्यासाठी चार विद्वान ब्राह्मण बोलवावे. त्यांना प्रत्येकी दोन वस्त्रे अर्पण करावी व शक्य असेल तर मुद्रिका द्याव्यात.
आचार्य पुरोहिताला अनेक वस्त्रे भूषणे व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे - हे कार्य समाप्तीनंतर करायचे आहे. स्वतःच्या पत्नीसह यजमानाने नीट आसनावर बसून सर्वोपचारांनी पूजा करायची. अनेक प्रकारची अन्नाची नैवेद्याची पात्रे असावी. जपकर्त्या विप्रांकडून संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, व अनिरुद्ध यांच्या नामांचा जप १०८ वेळा करून घ्यावा. चारी दिशांना मोठे दीप प्रज्वलित ठेवावे. पूजा संपल्यावर आरत्या, गीत! नृत्य, कीर्तन आदि कार्यक्रम उत्साहाने करावे. रात्री जागरण करावे. अधिकमास पुस्तक किंवा पुराण वाचन करावे. सकाळी उठून आन्हीके उरकून पुन्हा पूजन करावे. नाममंत्राने हवन करावे. नंतर तर्पण, मार्जन करावे. राधाकृष्णाची मंत्रयुक्त आरती करावी. दोघांनी प्रदक्षिणा नमस्कार करावा. नंतर ब्राह्मणाला सोने व पूर्णपात्र दान करावे. वर उल्लेख केलेली दाने अर्पण करावी. गोप्रदान देणे, ऋत्विज्यांना दक्षिणा व दान, दांपत्यांना पूर्वनियोजित दाने, भोजनोत्तर देणे. विशेषतः भागवत पुराणाचा ग्रंथ वैष्णव ब्राह्मणास द्यावा. त्याने श्रीकृष्ण संतुष्ट होतो. तीस दांपत्यांना अनारशांचे वाण दान करावे. अडीच प्रस्त मापाचा एक डबा घ्यावा. तू कांस्य, पितळ, निष्कलंक लोहाचा (कालमानानुसार) चालेल. प्रत्येक डब्यात ३३ अनारसे घालावे. जेवढी छिद्रे त्या अनारशांना असतील तेवढे हजार वर्षे तो दाता वैकुंठात राहतो. तेथून त्याला पुनर्जन्माला यावे लागत नाही.
ज्यांना अनारसे देणे शक्य नाही त्यांनी त्यांचे साहित्य तयार करून ते पीठ, साखर, गुळ, तूप, असे द्यावे. त्या दांपत्यांची पूजा करून त्यांना पक्वान्नाचे भोजन द्यावे. अनेक भाज्या, भक्ष, भौज्य, चोष्य, लेह्य, पेय असे चविष्ट पदार्थ दान द्यावे. त्या भोजनाने संतुष्ट दांपत्यास दक्षिणा द्यावी. नमस्कार करावा. त्यांचे आभार मानावे. तांबूलादि देऊन त्यांना निरोप देण्यास विशिष्ट सीमेपर्यंत जावे. घरी पूजा केलेल्या पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी - यस्य स्मृत्या च नामोक्त्या o' हा श्लोक म्हणून, यथा मिलत द्रव्यांनी मी जी पूजा केली आहे तिचा स्वीकार करावा अशी प्रार्थना करावी आणि स्वजनांसह भोजन करावे. मग मूर्तीवर समंत्रक अक्षता वाहून मूर्ती अन्यत्र ठेवावी किंवा पूजा सांगणाऱ्या आचार्यांना सर्व पूजा - पदार्थांसह विधिपूर्वक समर्पण करावी. महिन्याच्या मध्ये अष्टमी, नवमी वगैरे तिथीला उद्यापन केल्यास त्यानंतर अमावस्येपर्यंत उरलेल्या प्रत्येक दिवशी कलश स्थापित - पुरुषोत्तमाची सर्वोपचारपूर्वक पूजा करावी आणि अमावस्येच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करून आचार्यांस दान द्यावी. यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे.
हे लक्ष्मी ! जे हे व्रत यथाशक्ती करतील त्यांना संकटे, दारिद्र्य, रोग यांची बाधा न होता त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील व ऐहिक सुखे भोगून ते गोलोकात चिरकाल निवास करतील."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२६ समाप्त ||