॥ अधिकमास माहात्म्य ॥
अध्याय १७ – मौन-भोजनाचा महिमा
वाल्मिकी-दृढधन्वा संवादातील ही कथा पुढे चालू आहे. लक्ष्मीने विष्णूला विचारले – "ज्यांना उपवास करण्याचेही बल नाही त्यांनी अधिकमासात कोणते व्रत करावे?"
विष्णू म्हणाला – "प्रिये, ऐक. ज्यांना उपवास करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी मौनव्रत पाळावे. जेवताना मौन, स्नान करताना मौन, होम करताना मौन असा नियम पाळावा. त्या योगानेही मोठा लाभ होतो.
मौनाने सद्भाग्य उदयास येते. मौनाने कलह होत नाही. सुख मिळते. शक्ती फुकट जात नाही. रूपसौंदर्य लाभते. आयुष्य वाढते. एवढेच नव्हे तर मरणोत्तर स्वर्गात सुख मिळते.
भोजनाच्या वेळी मौन पाळण्याच्या दोन रीती आहेत. जेवण संपेपर्यंत मौन राहणे ही एक रीत व प्राणाहुती घेईपर्यंतच मौन राहणे ही दुसरी रीत. नियम केला आणि जर मौन मोडले तर मात्र पाप लागते.
अधिकमासातील व्रतामुळे नारदाला श्रेष्ठत्व कसे मिळाले त्याची कथा ऐक.
पूर्वकल्पामध्ये नारद एकादशीचा पुत्र होता. त्याने अधिकमासात मौनव्रत धारण केले होते. त्याचे फळ म्हणून त्याला साधूजनांचा सहवास मिळाला. त्यामुळे त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला.
तेथेही त्याने कुरुक्षेत्र येथे अधिकमासात तीन दिन मौन पाळले. त्यामुळे तो ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्म पावला. तो महान भक्त व ज्ञानी झाला. तो अनेकांचा गुरु झाला.
तेव्हा मौनव्रताचा महिमा पहा केवढा मोठा आहे. स्नान, मौन आणि दीप प्रज्वलन या व्रतांचे आचरण अधिकमासात केल्याने फार मोठा लाभ होतो. चारी पुरुषार्थ पूर्ण होतात.
वेदशर्मा कथा
अवंती नगरात वेदशर्मा नावाचा ब्राह्मण राहत असे. तप, स्वाध्याय व निरभिमानी शांत वृत्तीचा त्याचा स्वभाव होता. निर्मम, निरिच्छ, सच्छील, जितेंद्रिय असा तो ब्राह्मण तेथे राहत असता एकदा अधिकमास आला.
त्याच्या मनात विचार आला – "या अधिकमासात उपवास करण्याची माझी शक्ती नाही. काय करावे?" त्या विचारातच तो रात्री झोपला.
त्याला स्वप्न पडले. भगवान विष्णूने त्याला सांगितले – "तुला जर उपवास करणे शक्य नसेल तर तू मौन पाळ. जेवताना बोलायचे नाही एवढा नियम पाळलास तरी तुला उत्तम फळ मिळेल."
वेदशर्मा जागा झाला. त्या दृष्टांतामुळे त्याला फार आनंद झाला. त्याने पुरुषोत्तमाची स्तुती केली आणि मौनव्रत धरले. अमावस्येला उद्यापन केले.
त्यावेळी भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांनी वरदान देऊ केले. वेदशर्माने मागितले – "तुझ्या चरणी भक्ती अखंड राहावी. चक्रवर्ती राजाला जे सौख्य दुर्लभ आहे ते मला मिळावे. कायावाचामनाने ब्राह्मणांची सेवा घडावी.
दीनांवर अनुग्रह करता यावा. दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे. दाने देता यावीत."
अशा प्रकारे त्याने अनेक वर मागितले व भगवंताने ते वरदान दिले. त्याप्रमाणे वेदशर्माने नाना प्रकारे लोकोपयोगी महान कार्ये केली.
नंतर तो वैकुंठास गेला. त्याचे वैभव असे की विमानाने तो जात असता अनेक देव आपापल्या विमानात बसून त्याचा आदर करीत होते.
इंद्राने त्याच्याजवळ अधिकमासात त्याने केलेल्या उपवासापैकी एका दिवसाच्या उपवासाचे पुण्य मागितले. वेदशर्माने ते पुण्य इंद्राला दिले. त्याच्या बळावर इंद्राने वृत्रासुराचा वध केला.
वेदशर्मा पुढे वैकुंठात गेला. हे इंदिरे, तो अजून वैकुंठात आनंदाने राहत आहे. असे मौनभोजनव्रताचे मोठे पुण्य असते."
अधिकमासातील व्रताचा महिमा नारायण लक्ष्मीला सांगत होता. ती कथा वाल्मिकी ऋषी दृढधन्वाला सांगत होते.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय-१७ समाप्त ॥
