॥ अधिकमास माहात्म्य ॥
अध्याय १८ – पंच पर्वांचे माहात्म्य
लक्ष्मी नारायणाला म्हणाली – "अधिकमासात पाच विशेष पर्वणीचे दिवस असतात ते कोणते? कृपा करून त्या दिवशी व्रत केल्यास काय काय फळे मिळतात ते मला सांगाल काय?"
नारायण त्यावर म्हणाले – "प्रिये, पाच पर्वे म्हणजे वैधृती, व्यतीपात, पौर्णिमा, अमावस्या व द्वादशी. त्यांचे क्रमाने वाढते महत्त्व आहे.
वैधृती योगावर केलेल्या उपासनेने मी प्रसन्न होतो. व्यतीपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म प्रसन्न होतो. पौर्णिमेस केलेल्या व्रताने ब्रह्मदेव प्रसन्न होतो. अमावस्येला केलेल्या उपासनेने पितर संतुष्ट होतात व द्वादशी तिथीच्या व्रताने मी प्रसन्न होतो. यातील पहिल्या चार पर्वांची महती सांगतो. ती ऐक."
नारायण प्रथम वैधृती योगावर केलेल्या उपासनेचे महत्त्व सांगू लागला. तो म्हणाला – "वैधृती योगावर दिलेले धन, धान्य, दूध, तूप, फळे इत्यादींचे दान फार पुण्यप्रद असते. ते संक्रांतीच्या दानाहून जास्त पुण्यकारक आहे आणि अधिकमासात येणाऱ्या वैधृती योगाला इतर मासातील वैधृती योगांपेक्षा जास्त महत्त्व आहे.
प्रल्हादाने या दिवशी स्नान, दान, होम इत्यादी सत्कर्मे केली होती. त्यामुळे त्याला इंद्रपदाचा अधिकार मिळाला. अशाच पुण्याने अनेक देवतांना त्यांचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
प्रत्येक महिन्यात वैधृती योगावर तूप, दूध, साखर, तिळाचे लाडू, नारळ, सुपाऱ्या अशी दाने द्यावी. पण अधिकमासात या पर्वणीवर अशी दाने दिली तर खूपच लवकर पुण्यभोग मिळतो."
"आता व्यतीपात योगावर केलेल्या दानाचे फळ सांगतो. सूर्य व चंद्र यांच्या विशिष्ट स्थानांच्या योगाने व्यतीपात योग घडतो. या योगावर दाने दिल्यास धन, धान्य, संतती, संपत्ती मिळते. दानाने यमधर्म संतुष्ट होतो.
सूर्यग्रहणात कुरुक्षेत्रात दान दिल्यास जे पुण्य लाभते त्याच्या बारापट अधिक पुण्य व्यतीपात या योगावर केलेल्या दानाने मिळते.
रविवारी हा योग आला तर सोने, धान्य दान दिले तर अनंत पुण्य प्राप्त होते. प्रातःकाळी स्नान करावे. सुपात्र विप्राला आमंत्रण द्यावे. त्याचा सत्कार व पूजन करावे.
तेरा नारळ किंवा तेरा सुपाऱ्या किंवा तेरा केळी दान द्यावीत. खजूर, द्राक्षे, आंबे किंवा यथाशक्ती इतर दान द्यावे. सांगता म्हणून दक्षिणा द्यावी.
मनुष्य कोणत्याही जातीचा असो, त्याला या दानाचे पुण्य सारखेच मिळते. पण कोणतेही व्रत करताना पूर्ण भक्तिभाव हवा. नुसता नियम पाळून उपयोग होत नाही.
व्यतीपातावर तीळ भरून एक पात्र जो देतो त्याला मी इहलोक व परलोक यांत सुख देतो. धान्य दिले तर त्रिलोकात धन्य मानला जातो. या दानांचे फळ तत्काळ मिळते हे विशेष आहे."
"आता पौर्णिमा पर्वाचे माहात्म्य सांगतो. अधिकमासात आधी व शेवटी पौर्णिमा येते. मासभर व्रताची सांगता करणे फार पुण्यकारक आहे. त्याच्या योगाने ब्रह्मदेव प्रसन्न होतो. ब्रह्मदेव संतुष्ट झाला की सर्व देव प्रसन्न होतात.
त्या दिवशी प्रातःकाळची आन्हिक कृत्ये करून स्थावर किंवा जंगम अशी कोणतीतरी उत्तम वस्तू ब्राह्मणाला दान द्यावी.
पौर्णिमा म्हणजे देवांची आवडती तिथी. वस्त्रे, गाय, अलंकार, अन्न, धान्य जे काही शक्य असेल ते दान द्यावे. ऋतूत प्राप्त होणारी फळे दिल्यासही पुण्य लाभते.
अनेक स्नानांपेक्षा पौर्णिमेस भगवस्मरणपूर्वक अभ्यंग स्नान केले तर एकाच स्नानाने सर्व पुण्य लाभते. ज्यांना रोज स्नान करणे शक्य नसते त्यांनी पौर्णिमेस एकदा स्वच्छ शीतल किंवा उष्ण पाण्याने स्नान करावे व पितृतर्पण करावे."
"आता अमावस्येचे महत्त्व सांगतो. अमावस्येला केलेल्या दानांनी पितर तृप्त होतात व त्यांना त्यांच्या स्थितीहून वरची स्थिती मिळते.
प्रत्येक दर्श अमावस्येला पितरांना उद्देशून दान, तर्पण इत्यादी केल्याने ते वंशजांना संतती, संपत्ती, सुख, समाधान व आरोग्य देतात.
ते अतृप्त राहिले तर त्यांच्या विचारांचा वंशजांना त्रास होतो. त्यांच्या कोपाने हाल सोसावे लागतात.
नामजप, उपोषण, स्नान, दान, श्राद्धकर्म आणि त्यांचे आदरपूर्वक स्मरण करणे फार महत्त्वाचे आहे. आणि सर्वांत जास्त महत्त्व अधिकमासाच्या शेवटी जी अमावस्या येते त्या पर्वणीला आहे.
हिऱ्याला उत्तम कोंदण मिळावे तसे महत्त्व त्या दिवशी केलेल्या पैतृक कार्याला आहे."
विष्णूने लक्ष्मीला अशा प्रकारे चार पर्वदिवसांचे महत्त्व सांगितले. पुढील अध्यायात द्वादशीच्या व्रताचे महत्त्व सांगितले आहे.
॥ अधिकमास माहात्म्य अध्याय-१८ समाप्त ॥
