अधिकमास माहात्म्य
अध्याय १९ – द्वादशी तिथीचे माहात्म्य
विष्णू लक्ष्मीला द्वादशी पर्वाचा महिमा सांगू लागला. " द्वादशी तिथीचे व्रत करणाऱ्यास अविनाशी पद प्राप्त होते. गंगास्नानादी जी पुण्यकृत्ये आहेत त्यांच्यापेक्षा द्वादशीला स्नान, दान, जप, होम आदी कर्मे केल्यास कितीतरी पट पुण्य मिळते. एकादशीस उपवास करावा. द्वादशीस आवळीच्या झाडाच्या मुळाशी पिंड अर्पण करावे. त्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य मिळते. हरि दिन म्हणजे द्वादशी. जसा तो एकादशीच्या उपवासाने प्रसन्न होतो तसेच द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणास आदरपूर्वक सुग्रास अन्नाचे भोजन देणे, दक्षिणा देणे, उत्तम वस्त्र देणे या गोष्टी महापुण्यप्रद आहेत. द्वादशीस पितृतर्पण करण्यानेही पितर फार प्रसन्न होतात. द्वादशीस शेती कामे करू नयेत. वाहनात बसू नये. म्हणजे मरणोत्तर स्वर्गसुख मिळते व शेतीचे उत्पन्नही उत्तम येते.
जे या दिवशी योग्य माणसास भूमिदान देतात ते दीर्घकाळ वैकुंठात रहातात. वस्त्रदान देणारे चंद्रलोकात दीर्घकाळ वस्ती करतात. जो कपिला गायीचे दान देतो त्याचे अनेक पितर उद्धरून जातात. विद्यादान करणारा स्वर्गात राहतो, त्याला पृथ्वीवर पुनर्जन्म नाही. द्वादशीच्या पुण्यकर्माची ही महती लक्षात घे आणि अधिकमासातील द्वादशीला जर अशी पुण्यकर्मे केली तर केवढे पुण्य लाभेल याचा विचार कर. धन, वस्त्रे, पादुका यांचे दान त्या दिवशी करावे. मी त्याला इष्ट जे असेल ते देतो. रत्नखचित सुवर्णपादुका द्वादशीच्या दिवशी योग्य विप्राला द्याव्या. देणाऱ्याला वैकुंठात निवास करायला मिळतो. लोकरीचे, कापसाचे, रेशमाचे, उंटाच्या लोकरीचे, तागाचे यापैकी जे योग्य वाटेल ते वस्त्र, धोतर, उपरणे इत्यादी गरजू सज्जनास दान द्यावे.
म्हशीचे किंवा गायीचे तूप द्वादशीस (अधिकमासातील) ब्राह्मणास दान देईल, विशेषतः सकाळी दान देईल, त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. त्याने अन्य कितीही दाने दिली तरी ती घृतदानाच्या बरोबरीची नाहीत. कास्यपात्र घ्यावे. त्यात घृत घालावे. त्यात माझी सुवर्णप्रतिमा ठेवावी. विप्राची व त्या पात्राची पूजा करावी व त्याला ते दान द्यावे. द्वादशी व अधिकमास हा उत्तम योग ! या दिवशी सत्याने व सूचिभूर्तपणे दान द्यावे. त्याला अनेक यज्ञ करायला नकोत. अतिथीला विन्मुख दडवू नये. तसेच द्वादशीस ब्राह्मणाला उत्तम भोजन द्यावे. अन्नदान म्हणजे प्राणदानच होय. द्वादशीस स्नान, जप, तप, होम, यांनी मिळणारे पुण्य अक्षय संचित होते.
कुबेर, यम, इंद्र यांना आपापले अधिकार प्राप्त होण्यामागे त्यांनी केलेल्या द्वादशीव्रताचा मोठा वाटा आहे. अधिकमासातील सर्व तिथी पुण्यप्रद असल्या तरी द्वादशी ही मला सर्वात प्रिय असलेली तिथी आहे. द्वादशीस काय किंवा इतर तिथेच काय, दान देणे ते सत्पात्र व्यक्तीलाच द्यावे. पापी, दारुडा, जुगारी, घाणेरडा, शिवराळ, खुनी, चोर, व्यभिचारी, अनभ्यासी, शठ, नास्तिक, क्रूरकर्मी अशा लोकांना दान दिल्यास अत्यंत पाप लागेल. मानवाची मोक्षमार्गावर प्रगती सदाचरणानेच होते म्हणून सदाचरणी लोकांचे जीवन सुखकर व्हावे हेच इष्ट होय. द्वादशीस माझी कृष्णरुपात पूजा करणे म्हणजे उत्तम फल प्राप्त करून देणारे सत्कर्म होय. या माहात्म्याचे वाचन व श्रवण नि:संशय विकल्परहित मनाने करावे. तेही मोठे हितकारक आहे. विष्णूने असे अधिकमासातील व इतर मासातील द्वादशी पर्वाचे माहात्म्य लक्ष्मीला सांगितले. - वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला हे सर्व सांगत होते.
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-१९ समाप्त ||
