अधिकमास माहात्म्य अध्याय २१ – स्नान-माहात्म्य
विष्णूला लक्ष्मीने पुन्हा प्रश्न केला - "अधिकमासात कोणती स्नाने केल्यास कोणती फले मिळतात ते सांगाल काय? मला हे सर्व ऐकावेसे वाटते." विष्णू म्हणाला - "हे सागरकन्ये! अधिक मासात श्रीकृष्णरूप माझे चिंतन करीत जो रोज स्नान करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. तो दुःख पावत नाही. यमसदनात जात नाही. त्याला मन:शांती मिळते. त्याची सर्व कार्ये सफल होतात. त्याला सर्व देव प्रसन्न होतात. अधिकमासात एकदा स्नान केले तर बारा महिने स्नान केल्याचे पुण्य मिळते. अधिकमासात प्रयाग येथे स्नान करावे व माधवाचे दर्शन घ्यावे. त्यामुळे सालोक्य मुक्ती लाभते. सर्व पापे नष्ट होतात. सरस्वती नदीच्या तीरी स्नान केल्यासही असेच फळ मिळते. ग्रहणकालात स्नान करणे, कोटि गोदाने करणे, कुरुक्षेत्रात नित्य स्नान करणे यांच्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य अधिकमासात शुद्ध पाण्याने स्नान केल्यास मिळते.
एक लक्ष विप्रांना उत्तम भोजन देणे, पितरांना घृत, मध, पायस यांनी तर्पण करणे, यांचे पुण्य या मासातील एका स्नानाने मिळते. देवर्षी व देवता यांना त्यांचे स्नान अधिकमासात शुध्दोदकस्नानानेच मिळाले आहे. असे स्नान न करणाऱ्याला चांगला गती मिळत नाही. मात्र अशा स्नानाने मी, शिव आणि ब्रम्हा प्रसन्न होतो. कोणतेही यज्ञ, दाने, तप आदि न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्यानी अधिकमासात नित्य स्नान करावे. इतर पुण्यकर्मानी मिळणाऱ्या स्वर्गातून पुन्हा भूलोकात जन्म घ्यावा लागतो. पण अधिकमासात स्नान केल्याने अक्षय्य स्वर्गप्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे.
हे लक्ष्मी, निदान तीन दिवस स्नान केले तरी उद्धार होतो? तो कसा? एक कथा ऐक. गोदावरी नदीच्या काठी पैठण नगर आहे. तेथे अनेक ज्ञानी व धर्मनिष्ठ लोक रहातात. त्यातच धर्मशर्मा नामक एक ब्राम्हण रहात असे. तो वृद्ध होता, विद्वान होता, धार्मिक होता, आचारशील होता. अधिकमास प्राप्त झाला तेव्हा त्याने विचार केला - मला महिनाभर रोज नदीत स्नान करण्याची शक्ती नाही. मी श्रद्धेने तीन दिवस स्नान करीन.
तो प्रथम दोन दिवस गोदावरी नदीवर स्नान करून घरी परत आला. तिसऱ्या दिवशी त्याने स्नान केले. पाण्याने कमंडलू भरून घेतला व तो घरी परत येऊ लागला. वाटेत एक भयंकर स्वरूपाचे भूत भेटले. लांब अस्तव्यस्त केस, तांबारलेले डोळे, भयानक उघडे तोंड, हातांनी छाती पिटतो आहे, अंगावर धमन्या व शिरांचे जाळे, लांब जीभ, अक्राळविक्राळ अवतार! त्याला पाहून धर्मशर्माने निर्भयपणे विचारले - "अरे! तू कोण आहेस?" त्या विप्राच्या दर्शनाने व मृदू वचनानेच तो प्रेतात्मा सौम्य झाला. त्याने विप्राला वाकून नमस्कार केला. तो म्हणाला - "मी स्मशानात रहातो. दुष्कर्मामुळे माझी अशी दुर्गती झाली. लोकांना छळणे हाच माझा स्वभाव. माझे अन्न अत्यंत किळसवाणे आहे. पण तुमच्या दर्शनानेच मला शांत वाटते. तुमचे शब्द ऐकून विवेक उत्पन्न झाला आहे. या भूत योनीतून तू माझा उद्धार कर. काहीही उपाय कर! माझी अवस्था अत्यंत दुःखद आहे."
धर्मशर्माला करुणा भाकली. त्याने त्या भुताला विचारले - "आधी तू मला सांग की अशी कोणती पापे तू केलीस की त्यामुळे तुला हे दुःख प्राप्त झाले?" भूताने मनुष्यजन्मात जी भयंकर पापे केली व कोठल्या नरकयातना भोगाव्या लागल्या व नंतर भूतयोनीत कसा खितपत पडला हे सर्व सांगितले. ऐकून धर्मशर्मा दयाद्र भावनेने म्हणाला - "मी माझ्या तीन दिवसांच्या स्नानाचे पुण्य तुला देतो." असे करून त्याने माझे (श्रीहरिनाम) स्मरण केले आणि त्रिदिन स्नानाचे पुण्य प्रेताला अर्पण केले. त्यामुळे तो प्रेतदेह विघटित झाला आणि तो दिव्य देह प्राप्त करून विमानाने स्वर्गात गेला."
विष्णूने सांगितलेले अधिकमासातील पुण्य व माहात्म्य ऐकून लक्ष्मी म्हणाली - "मला या मासातील स्नानाचे माहात्म्य आणखी ऐकावेसे वाटते. तरी कृपा करून ते सांगा."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२१ समाप्त ||
