अधिकमास माहात्म्य
अध्याय २०
अपूप दान, स्मितविलासिनी, दूर्वास व तपस्विनी यांची कथा
लक्ष्मीला अधिकमासाचे माहात्म्य आणखी ऐकण्याची उत्कंठा होती. म्हणून विष्णू तिला सांगू लागला - "मी सांगितलेल्या पर्वणीच्या दिवशी व विशेषतः द्वादशीस अधिकमासात अनारसे (अपूप) यांचे दान खास महत्त्वाचे आहे. तुपात तळलेले गोड असे तेहतीस अनारसे मोठ्या कांस्य पात्रात ठेवून त्याला झाकण लावावे. त्यावर वस्त्र घालावे. गंधादी उपचारानी त्या भांड्याची पूजा करावी. सदाचरणी ब्राह्मणाला निमंत्रण करून त्याचे पूजन करावे. दक्षिणा, विडा आदी अर्पण करावे. पुरुषोत्तमाची प्रार्थना करावी व ते अपूपपात्र त्या ब्राह्मणाला दान द्यावे. असे अनारशांचे वाण, विष्णुरूप समजून आपल्या जावयाला देण्याचे महापुण्य आहे. अधिकमासात रोज गायीची, ब्राह्मणाची, तुळशीची, श्रीकृष्णरूपात माझी पूजा करावी. त्या पुण्याची ख्याती अवर्णनीय आहे. अशा पुण्याने सर्व प्राण्यांचा, देव, यक्ष, गंधर्व, मानव यांचा उद्धार होतो."
या विषयात एक कथा मी तुला सांगतो ती ऐक. इंद्रलोकात स्मितविलासिनी नावाची अप्सरा होती. ती कुबेराची आवडती होती. तिच्या मैत्रिणींबरोबर ती भूलोकात फिरण्यासाठी उतरली. ती कुरुक्षेत्रात गेली. मैत्रिणींसह ती तेथे पुष्कळ काळ राहिली. तिने एकदा सुगंधी फुलांची एक माळ गुंफली. तिला त्या सुगंधाने मदनबाधा झाली. तिची कामवासना जागृत झाली. कोणीतरी योग्य माणसाच्या गळ्यात ती माळ घालावी व त्याच्यासह विलास करावा असे तिच्या मनात आले पण त्यावेळी कोणी तरुण मनुष्य तिला आढळला नाही. तिने आपली कामविव्हल अवस्था सख्यांना सांगितली. तेवढ्यात तिला दुर्वास ऋषी दिसले. सख्या तर त्यांना पाहून भिऊन पळाल्या. तिने धिटाईने पुढे जाऊन दुर्वासांच्या गळ्यात ती माळ घातली. दुर्वास चटकन संतापले व त्यांनी तिला शाप दिला - "तू एखाद्या पिशाचिनीप्रमाणे अचानक मला स्पर्श केलास! जा, तू पिशाचिनीच हो!" हा शाप ऐकताच त्या अप्सरेची फारच निराशा झाली. तिला फार भय वाटले. तिने नाना प्रकारे गयावया केली. दुर्वासांची क्षमा मागितली. त्यावेळी आपण एवढ्याशा अपराधाबद्दल हिला फार भयंकर शाप दिला असे वाटून दुर्वासांनी तिला उ:शाप दिला. कन्याकुमारी येथे दोन सागर मिळतात त्या भारताच्या दक्षिण तीरी एक तपस्विनी, जी हजारो वर्षे तप करीत आहे, ती येईल. तिने जर दया येऊन तुला तिचे अधिकमासव्रताचे पुण्य प्रदान केले तर तू पुन्हा पूर्ववत अप्सरा होशील."
असा उ:शाप देऊन दुर्वास पुढे निघून गेले. ती अप्सरा दुसऱ्याच क्षणी पिशाचिनी झाली. तिच्या सख्या स्वर्गात पळून गेल्या. ती शापित अप्सरा पिशाचिनी होऊन भटकू लागली. दुर्वास म्हणाले होते - "तू भुकेने व्याकुळ होऊन त्या स्त्रीला भक्षण करण्यास धावत जाशील. पण तू तिला न मारता शरण जा!" आणि झाले तसेच. पुष्कळ काळ गेला. जो प्राणी मिळेल तो ती खाई. पण एक वेळ अशी आली की ती भटकत भटकत भुकेने तडफडत दक्षिण दिशेस गेली. तिला समुद्रतीरावरच्या प्रदेशात एक तपस्वीनी दिसली. तक्षणी ती त्या स्त्रीला खावे म्हणून तिच्याकडे धावली. पण तिचे दर्शन घडतात तिचे मन पालटले. ती तपस्विनीजवळ जाऊन पाया पडली. आपली दुर्दैवाची कहाणी तिने निवेदन केले. त्या तपसीला तिची दया आली. तिने स्मितविलासिनीला आपण केलेल्या अधिकमासाच्या व्रतांपैकी एका व्रताचे पुण्य दिले. त्याचा प्रभाव असा पडला की पिशाचयोनीतून मुक्त होऊन ती पुनश्च अप्सरा झाली व स्वर्गात गेली!"
असे सांगून विष्णू म्हणाला - "अधिकमासाच्या व्रताचे पुण्य केवढे असते ते समजून आले ना? त्याचे वर्णन ब्रम्हा, शेष, शंकर, कोणतेही देव व मीही पूर्णपणे सांगू शकत नाही. पर्वतात मेरू, ताऱ्यांत सूर्य, पक्षात गरुड, ग्रहात चंद्र, मनुष्यात ब्राह्मण, पशूत गाय, वृक्षात पिंपळ, नद्यात गंगा जशी श्रेष्ठ तसा सर्व महिन्यात अधिकमास श्रेष्ठ आहे."
|| अधिकमास माहात्म्य अध्याय-२० समाप्त ||
