अधिकमास माहात्म्य
अध्याय २३: उपवासाचे माहात्म्य. विप्रसेवेचे माहात्म्य
लक्ष्मी म्हणाली - "मला आपण स्नानाचे महत्व सांगितले. अधिकमासात एक दिवसाआड एक दिवस उपवास करण्याचे फल काय ? असा उपवास कोणी केला? त्याचे फळ त्याला काय मिळाले ते सांगाल काय ? मला ऐकण्याची उत्सुकता आहे."
विष्णू म्हणाला - "होय. त्याला एकांतरोपवास म्हणतात. त्याचे फळ अलौकिक आहे. एक कथाच मी सांगतो. विंध्य पर्वतात अमरकंटक म्हणून एक स्थान आहे. तेथे अनेक सिद्ध लोक आत्मानंदात मग्न होऊन राहतात. तेथे एक नदी उगम पावून अनेक पर्वतांना ओलांडीत पश्चिम समुद्राला मिळते (नर्मदा नदी). ती शिवहस्तापासून उगम पावली आहे. सिद्ध चारण, देवता-मानव-सर्वांना ती पूज्य आहे."
त्या नदीच्या तिरी भृगुकच्छ नावाचे नगर आहे. तेथे गौरीशंकर आणि मी निवास करतो. अनेक देवही अंशात्मक रूपाने तेथे राहतात. तेथे एक विद्वान, वेदज्ञ, ज्योतिषी रहात असे. त्याचे नाव कुशलशर्मा. कुशावती नावाची त्याची पत्नी होती. ती सुंदर होती, पतिव्रता होती. त्या दांपत्याला एक स्वरूपसुंदर कन्या झाली. मेधावती असे तिचे नाव होते. पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण वराशी त्यांनी तिचा विवाह लावून दिला. ती कन्या विवाहानंतर काही दिवस सासरी राहिली. वधूवर आनंदाने राहत होते. त्यांच्या परस्परांवर अत्यंत प्रेम होते."
पण एक दिवस असे झाले की तो पती नर्मदेत पोहायला गेला असता सुसरीने त्याला ओढून नेले. मेधावतीने पुष्कळ दिवस आत्यंतिक शोक केला. पण एके दिवशी ती एकटी बसली असता तिच्या मनात विवेकाचा विचार आला. संसार दुःखमयच आहे. कायम दुःख करीत बसण्यापेक्षा अव्यय सुख मिळेल असे काहीतरी व्रत करावे. तिने पित्याला विचारले. पिता म्हणाला - "अधिकमासात एकांतर-उपवास व्रताचे तू आचरण कर. त्याने सर्व पापे, सर्व दुःखे यांचे निवारण होते. मनुष्य भवसागरातून तरून जातो."
त्याच्या सांगण्याप्रमाणे ती मुलगी अधिकमासात रोज नर्मदा नदीत स्नान करी व एक दिवसाआड एक दिवस असे उपोषण करू लागली. रोज पुरुषोत्तमाची पूजा करू लागली. भूमीवर शयन करावे, एक दिवस उपास करावा, दुसऱ्या दिवशी हवीष्यान्न भक्षण करावे असे करू लागली. तिने मासान्ती उद्यापन केले. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात असे व्रत ती करीत असे. ती कालांतरे वृद्ध झाली. कृश झाली. तिने विरक्त होऊन एक दिवस नर्मदा नदीत आपला देह विसर्जन केला. शिवदुतांनी तिला कैलासावर नेले. ती पार्वतीची सखी म्हणून तेथे पुष्कळ काळ राहिली. ती देवी विशालाक्षी म्हणून काशी येथे येऊन राहिली."
विष्णू पुढे म्हणाला - "अधिकमासात दिवसा उपवास करून नक्त म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहरात भोजन करण्याचे व्रतही उत्तम फलदायी आहे. त्या मेधावतीची एक मैत्रीण होती कोमल असे तिचे नाव होते. तिने असे व्रत केले व तिला कैलासात गौरीच्या सानिध्यात निवास करण्याचे फल मिळाले. नंतर ती काशीक्षेत्रात मंगलागौरी नावाने देवी रूपात येऊन राहिली. असा हा अधिकमास सर्व दुःख हरण करणारा आहे. त्याचा महिमा शंकर व कामदेव किंवा मीही पूर्णपणे वर्णन करू शकत नाही."
लक्ष्मी म्हणाली - "अधिक मासात ब्राम्हणाची सेवा करण्याचे काय फल आहे ? ते कोणाला कसे मिळाले ते कृपा करून सांगावे."
विष्णू म्हणाला - "सांगतो ऐका. भारतात विराट नावाचा एक देश आहे. तेथे धार्मिक लोक स्वधर्माचरण करून राहत होते. तेथे महापुर नावाचे नगर आहे. ते सह्याद्री पर्वतात आहे. ते परशुरामची माता रेणुका हिचे निवासस्थान आहे. भगवान शंकरही अंशात्मक रूपाने तेथे असतात. त्या नगरात धनदास नावाचा एक श्रीमंत पण अत्यंत सेवाभावी व नम्र असा शूद्र रहात होता. तो स्वतः विप्रसेवा करीत असे. घर, आंगण स्वच्छ ठेवणे, वस्त्रे धुणे, नाना प्रकारची कामे करणे हे सर्व तो करी. त्याची पत्नी त्या ब्राम्हण पत्नीची सेवा करी. ती पतीला सर्वथा अनुकूल होती. तो धनदास त्या विप्राची सेवा करताना आपले धनही खर्च करी. स्वतःवर कोणतेही दुःख वा संकट आले तरी ते दांपत्य बोलून दाखवीत नसे. अधिकमासात तर धनदास व त्याची पत्नी यांनी त्या विप्राची व त्याच्या पत्नीची पूर्णपणे व अत्यंत आदराने सेवा केली. पण पुढे काय झाले ? तो वृद्ध झाला. तो रोगी झाला. त्याचे शरीर विकलांग झाले. कुष्ठरोग्याला समाज बहिष्कृत करतो तसा त्याला लोकांनी दूर केला. त्याला जीवन नकोसे झाले. पूर्वकर्म भोगणे प्राप्त झाले. योगायोग असा की एके दिवशी एक सिद्ध योग्याने त्याला असे सांगितले की " तू व तुझी पत्नी उद्या हा देह सोडून स्वर्गात जाल. दिव्य विमान तुम्हाला न्यायला येईल." ते ऐकताच धनदासाला आनंद झाला. त्याने आपल्या संपत्तीचे तीन भाग केले. एक भाग आपल्या मुलाला दिला. दुसरा भाग आपल्या दोन्ही कन्यांना दिला आणि तिसरा भाग तीर्थक्षेत्रात जाऊन तेथील ब्राह्मणांना दिला. कोट्यवधींची संपत्ती त्याने वाटून टाकली व दुसऱ्या दिवशीच ते दांपत्य मरण पावले. सिद्धांनी सांगितल्याप्रमाणे विमान आले व ते दांपत्य दिव्य देहाने स्वर्गात गेले. हे इंदिरे ! त्या शूद्राचे अनेक जन्मांचे पाप नष्ट झालेच होते. जे भोगायचे राहिले होते ते कुष्ठरोगाच्या रुपाने फिटले. विप्रसेवेचे पुण्य म्हणून त्याला स्वर्ग प्राप्त झाला पुन्हा जन्म घ्यावा लागला नाही."
वाल्मिकी दृढधन्वा राजाला ह्या पूर्वकथा सांगत होते.
