गुरुचरित्र – अध्याय ३६(छत्तीसावा)
॥आह्निकनिरूपणं॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्री गुरुभ्यो नमः॥
| मूळ ओवी | ओवीचा अर्थ |
|---|---|
| शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचे चरणी । विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे करूनिया ॥ १ | उत्तम शिष्य नामधारक सिद्ध मुनींच्या चरणी लागला आणि हात जोडून भक्तीभावाने विनंती करू लागला. |
| जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक भवार्णी । तूचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥ २ | """हे सिद्ध मुनी, तुमचा जयजयकार असो! या संसारसागरातून तारून नेणारे तुम्हीच आहात. तुम्ही अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारे सूर्य आहात.""" |
| मायामोहरजनीत । होतो आपण निद्रिस्त । कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केले आम्हांसी ॥ ३ | """मी माया आणि मोहाच्या रात्रीत झोपलेलो होतो, पण कृपासागर श्रीगुरूंनी मला जागे केले.""" |
| तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी गुरु । कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥ ४ | """माझा अंधकार दूर करणारे गुरु मला भेटले आहेत. सिद्ध मुनींनी मला भवसागराच्या पलीकडे नेले आहे.""" |
| ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी भावभक्तीसी । गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे ॥ ५ | असे म्हणून त्याने सिद्धांना भक्तीने विनवले. सिद्ध मुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी नामधारकाला अभय दिले. |
| पुढे चरित्र केवी झाले । विस्तारावे स्वामी वहिले । आमुते स्वामी कृतार्थ केले । ज्ञानामृत प्राशवून ॥ ६ | """स्वामी, पुढे काय झाले ते मला विस्ताराने सांगा. तुमच्या ज्ञानामृताने मी कृतार्थ झालो आहे.""" |
| कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न होय अंतःकरणी । निरोपावे विस्तारोनि म्हणोनि चरणी लागला ॥ ७ | """ही कथा ऐकताना मनाची तृप्ती होत नाही, अजून ऐकावेसे वाटते. कृपया विस्तारपूर्वक सांगा,"" असे म्हणून तो चरणी लागला." |
| सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा झाली निका । एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥ ८ | "सिद्ध मुनी म्हणाले, ""नामधारका, पुढची कथा खूप चांगली आहे. ती एकाग्रतेने ऐक, सर्वांना ज्ञान प्राप्त होईल.""" |
| गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा वाढली अपरंपारु । बोलता असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसो ॥ ९ | """गाणगापुरात असताना श्रीगुरूंचा महिमा अफाट वाढला. तो सर्व सांगणे कठीण आहे, पण महत्त्वाचा भाग मी तुला सांगतो.""" |
| महिमा एकेक सांगता । विस्तार होईल बहु कथा । अवतार श्रीहरी साक्षाता । कवण शके वर्णावया ॥ १० | """श्रीगुरूंचे प्रत्येक चरित्र सांगायचे तर खूप मोठा विस्तार होईल. साक्षात श्रीहरीच्या अवताराचे वर्णन कोण करू शकेल?""" |
| तया गाणगापुरात । होता विप्र वेदरत । विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे वर्ततसे ॥ ११ | "गाणगापुरात एक ब्राह्मण राहत होता. तो वेदाभ्यासात मग्न, विरक्त आणि धर्मशास्त्राप्रमाणे वाघनारा होता." |
| न घेतला प्रतिग्रह त्याणे । परान्नासी न वचे नेणे । मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न करीच ॥ १२ | त्याने कधीही कोणाचे दान घेतले नाही किंवा कोणाकडे जेवायला (परान्न) गेला नाही. तो कधी खोटे बोलत नसे. |
| नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे आपुले उदर भरी । तयाची नारी असे घरी । क्रोधवंत परियेसा ॥ १३ | तो रोज कोरडी भिक्षा मागून स्वतःचे पोट भरत असे. पण त्याची पत्नी मात्र अतिशय रागीट स्वभावाची होती. |
| याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी संसार सामान्यपणे । अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न प्रत्यही ॥ १४ | तो ब्राह्मण गरिबीत दिवस काढत होता. अतिथी किंवा अभ्यागताला जेऊ घातल्याशिवाय तो स्वतः अन्न घेत नसे. |
| तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र येती समाराधनेसी । सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥ १५ | त्या गावात दररोज अन्नदान होत असे. हजारो ब्राह्मणांना गोडधोड जेवण दिले जाई. |
| समस्त जावोनि भोजन करिती । तया विप्रवनितेप्रती । येऊनि गृही स्तुति करिती । अनेक परीची पक्वान्ने ॥ १६ | इतर ब्राह्मण तिथे जेवून येत आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीसमोर पक्वान्नांची स्तुती करत. |
| ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी दुःख करी । परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनात ॥ १७ | "हे ऐकून त्या पत्नीला खूप दुःख होई. ती देवाला म्हणत असे, ""हे हरी, हे काय माझे नशीब?""" |
| कैसे दैव आपुले हीन । नेणे स्वप्नी ऐसे अन्न । दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट भोगितसे ॥ १८ | """माझे नशीब किती खराब आहे! स्वप्नातही मला चांगले अन्न मिळत नाही. या दरिद्री पतीमुळे मी नेहमी कष्टात आहे.""" |
| पूर्वजन्मीचे आराधन । तैसा आपणासी पति हीन । सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो देवराया ॥ १९ | """पूर्वजन्मीच्या पापामुळे मला असा पती मिळाला आहे. मला कायम गरिबीत राहावे लागत आहे.""" |
| समस्त विप्र स्त्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत । पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते समस्ती ॥ २० | """इतर सर्व ब्राह्मण आपल्या पत्नीसह दररोज मेजवानीला जातात. त्यांनी पूर्वजन्मी खूप पुण्य केले असावे.""" |
| आपुला पति दैवहीन । कदा नेणे परान्नभोजन । काय करावे नारायण । म्हणोनि चिंती मनात ॥ २१ | """माझा पती मात्र कोणाकडे जेवायला जात नाही. आता मी काय करू?"" असे म्हणून ती सतत चिंता करत असे." |
| वर्तता ऐसे तया स्थानी । आला विप्र महाधनी । अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला परियेसी ॥ २२ | एके दिवशी तिथे एक श्रीमंत ब्राह्मण आला. त्याला पितृपक्षात श्राद्ध (अपरपक्ष) करायचे होते. |
| तया स्थानी विप्रासी । क्षण दिले परियेसी । सवे त्यांच्या स्त्रियांसी । आवंतिले तिही परियेसा ॥ २३ | त्या श्रीमंत ब्राह्मणाने या विरक्त ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला भोजनाचे आमंत्रण दिले. |
| देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता । सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचे ॥ २४ | आमंत्रण मिळताच ती पत्नी आनंदाने पतीकडे आली आणि तिने आमंत्रणाबद्दल सांगितले. |
| अनेक परीची पक्वान्ने । देताती वस्त्रे परिधाने । अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती ऐके प्राणेश्वरा ॥ २५ | """स्वामी, तिथे अनेक प्रकारची पक्वान्ने आहेत. ते कपडे आणि खूप दक्षिणाही देणार आहेत.""" |
| याते स्वामी अंगीकारणे । अथवा आपण निरोप देणे । कांक्षा करिते माझे मन । अपूर्व अन्न जेवावे ॥ २६ | """तुम्ही हे आमंत्रण स्वीकारावे, अशी माझी इच्छा आहे. मला एकदा तरी चांगले अन्न जेवायचे आहे.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण । सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥ २७ | "ब्राह्मण म्हणाला, ""तुला जायचे असेल तर तू आनंदाने जा, पण मी परान्न घेणार नाही.""" |
| निरोप घेउनी तये वेळी । गेली तया गृहस्थाजवळी । आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे तयासी ॥ २८ | निरोप घेऊन ती त्या श्रीमंत ब्राह्मणाकडे गेली आणि म्हणाली की मी जेवायला येईन. |
| विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगू दंपतीसी । बोलावी आपुल्या पतीसी । तरीच आमुच्या गृहा यावे ॥ २९ | "श्रीमंत ब्राह्मण म्हणाला, ""आम्ही दाम्पत्याला बोलावले आहे. तुझा पती येईल तरच तू जेवायला ये.""" |
| ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी खेदे खिन्न । विचार करी आपुले मन । काय करावे म्हणोनिया ॥ ३० | "हे ऐकून ती स्त्री पुन्हा दुःखी झाली. पतीशिवाय आपल्याला जेवण मिळणार नाही, हे तिला समजले." |
| म्हणे आता काय करणे । कैसे दैव आपुले उणे । बरवे अन्न स्वप्नी नेणे । पतीकरिता आपणासी ॥ ३१ | "ती म्हणाली, ""माझे नशीबच खराब आहे. या पतीमुळे मला चांगले जेवणही मिळणार नाही.""" |
| विचारोनि मानसी । आली नृसिंहगुरूपासी । नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी विनवीतसे ॥ ३२ | तिने विचार केला आणि ती श्रीनृसिंह सरस्वतींकडे (श्रीगुरूंकडे) आली. तिने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. |
| म्हणे स्वामी काय करणे । बरवे अन्न कधी नेणे । आपुले पतीसी सांगणे । आवंतणे बरवे येतसे ॥ ३३ | """स्वामी, मला कधीच चांगले अन्न मिळत नाही. माझ्या पतीला कोठेतरी जेवायला जाण्यासाठी तुम्ही सांगा.""" |
| सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी । न वचे कधी परान्नासी । काय करू म्हणतसे ॥ ३४ | """ते लोक पती-पत्नीला एकत्र बोलावतात, पण माझा पती माझे ऐकत नाही. तो कधीच दुसऱ्याकडे जेवायला जात नाही.""" |
| स्वामी आता कृपा करणे । माझ्या पतीते सांगणे । बरवी येताती आमंत्रणे । अन्नवस्त्र देताती ॥ ३५ | """स्वामी, तुम्ही कृपा करा आणि माझ्या पतीला समजावून सांगा.""" |
| ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥ ३६ | तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसले आणि त्यांनी तात्काळ त्या ब्राह्मणाला बोलावले. |
| श्रीगुरु म्हणती तयासी । जावे तुम्ही आवंतणेसी । तुझे स्त्रियेचे मानसी । असे मिष्टान्न जेवावे ॥ ३७ | "श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले, ""तू जेवायला जा. तुझ्या पत्नीची खूप इच्छा आहे की तिने गोडधोड जेवण जेवावे.""" |
| तिचे मनींची वासना जाण । तुवा पुरवावी कारण । सदा दुश्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचे असो नये ॥ ३८ | """तिची इच्छा तू पूर्ण केली पाहिजेस. आपल्या पत्नीचे मन नेहमी दुःखी ठेवू नये.""" |
| ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा नेम असे ॥ ३९ | "ब्राह्मण म्हणाला, ""स्वामी, माझा असा नियम आहे की मी कधीही दुसऱ्याचे अन्न घेत नाही.""" |
| गुरुवचन जो न करी । तोचि पडे रौरवघोरी । निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन त्वरित म्हणतसे ॥ ४० | """पण जो गुरूचे वचन पाळत नाही, तो नरकात जातो. तुमची आज्ञा शिरसावंद्य आहे, मी नक्की जाईन.""" |
| पुसोनिया श्रीगुरूसी । आले दंपत्य आवंतणेसी । आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेते ॥ ४१ | श्रीगुरूंची अनुमती घेऊन दोघेही जेवायला गेले. ब्राह्मणाच्या पत्नीला खूप आनंद झाला. |
| पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण । अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती तया दंपतीसी ॥ ४२ | यजमान ब्राह्मणाने पितरांचे नाव घेऊन संकल्प केला आणि त्यांना अनेक प्रकारची पक्वान्ने वाढली. |
| भोजन करिता समयासी । दिसे विपरीत तियेसी । श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे जेविताती ॥ ४३ | भोजन चालू असताना त्या स्त्रीला दिसले की त्यांच्या ताटात कुत्रे आणि डुकरे येऊन जेवत आहेत! |
| कंटाळले तिचे मन । उठली आपण त्यजुनी अन्न । जे जेवीत होते ब्राह्मण । तया समस्तांसी सांगतसे ॥ ४४ | तिला खूप किळस वाटली. ती ताटावरून उठली आणि जेवणाऱ्या इतर ब्राह्मणांनाही ते सांगू लागली. |
| ऐसेपरी पतीसहित । आली नारी चिंताक्रांत । पतीस सांगे वृत्तान्त । श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥ ४५ | "ती पतीसह घरी परतली आणि म्हणाली, ""तुम्ही कुत्र्यांचे उष्टे जेवण जेवलात!""" |
| स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझे नि आपुले दैव हीन । घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट श्वानसूकरांचे ॥ ४६ | "ब्राह्मण म्हणाला, ""हे आपल्या नशिबाचे दोष आहेत. म्हणूनच परान्न हे कुत्र्या-डुकरांच्या उष्ट्यासारखे असते.""" |
| ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली दोघे श्रीगुरुपासी । नमन केले परियेसी । ऐका श्रोते एकचित्ते ॥ ४७ | असे म्हणून ते दोघेही पुन्हा श्रीगुरूंकडे आले आणि त्यांना वंदन केले. |
| श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे सुख परान्नासी । सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥ ४८ | "श्रीगुरु त्या स्त्रीला म्हणाले, ""परान्न खाण्यात कसले सुख? तू तुझ्या पतीला नेहमी त्रास द्यायचीस, आता पूर्ण झाली का तुझी इच्छा?""" |
| ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणी । विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे स्वामिया ॥ ४९ | हे ऐकून ती स्त्री श्रीगुरूंच्या पाया पडली आणि क्षमा मागू लागली. |
| मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी । नेले आपण परान्नासी । क्षमा करणे स्वामिया ॥ ५० | """स्वामी, मी मतिमंद आहे. मी माझ्या पतीला दोष लावला आणि त्यांना परान्न खायला लावले, मला क्षमा करा.""" |
| चिंता करी द्विजवरू । म्हणे स्वामी काय करू । दोष घडला अपारू । व्रतभंग झाला म्हणोनि ॥ ५१ | "ब्राह्मणही काळजी करू लागला. तो म्हणाला, ""स्वामी, माझे व्रत मोडले आहे, मला खूप मोठा दोष लागला आहे.""" |
| परान्न न घ्यावे म्हणोनि । संकल्प होता माझे मनी । मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविला ॥ ५२ | """परान्न न घेण्याचा माझा निश्चय होता, पण या पत्नीमुळे माझा तो नियम मोडला गेला.""" |
| ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु म्हणती हासोन । पुरविली स्त्रियेची वासना । आता तिचे मन धाले ॥ ५३ | "श्रीगुरु हसून म्हणाले, ""तिची इच्छा आता पूर्ण झाली आहे, आता तिला समजले असेल.""" |
| कधी न वचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसी । न करी चिंता मानसी । दोष तुज नाही जाण ॥ ५४ | """आता ती कधीच तुला परान्न घ्यायला सांगणार नाही. तू काळजी करू नकोस, तुला दोष लागलेला नाही.""" |
| आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म घडती सहज । अडला असेल एखादा द्विज । देवपितृकर्माविणे ॥ ५५ | "श्रीगुरूंनी एक नवीन नियम सांगितला, ""ज्यामुळे धर्म सहज घडेल—जर एखादा ब्राह्मण श्राद्ध किंवा देवकार्यासाठी अडला असेल...""" |
| कोणी न मिळती विप्र त्यासी । जावे तेथे भोजनासी । जरी तेथे तू न जासी । अनंत दोष असे जाण ॥ ५६ | """...आणि त्याला कोणीही ब्राह्मण मिळत नसेल, तर तिथे तू जेवायला जावेस. जर अशा वेळी तू गेला नाहीस, तर मात्र तुला दोष लागेल.""" |
| श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी करी नमन । विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥ ५७ | श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला आणि विचारले. |
| अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील दोष कवणेपरी । जाऊ नये कवणा घरी । निरोपावे स्वामिया ॥ ५८ | """स्वामी, कोणाच्या घरी जेवल्याने दोष लागतात आणि कोणाच्या घरी जाऊ नये, हे मला विस्ताराने सांगा.""" |
| विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती विस्तारोन । सावधान करून मन । ऐका श्रोते सकळिक ॥ ५९ | ब्राह्मणाची विनंती ऐकून श्रीगुरू परान्न भक्षणाचे नियम सांगू लागले. श्रोत्यांनी हे लक्षपूर्वक ऐकावे. |
| श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावया घरे पुससी । गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे शिष्यवर्गा घरी ॥ ६० | "श्रीगुरु म्हणाले, ""जर तुला जेवायला जायचेच असेल, तर तू तुझ्या गुरूंच्या घरी किंवा आपल्या शिष्यांच्या घरी आनंदाने जाऊ शकतोस.""" |
| वैदिकादि विद्वज्जन । मातुळ आपुला श्वशुर जाण । सहोदरादि साधुजन । तया घरि जेवावे ॥ ६१ | "वेदाभ्यास करणारे विद्वान, मामा, सासरा, सख्खे भाऊ आणि सज्जन पुरुष यांच्या घरी भोजनास जाण्यास हरकत नाही." |
| अडला विप्र ब्राह्मणाविण । त्याचे घरी घ्यावे अन्न । करावे गायत्रीजपन । दोष जाती अवधारा ॥ ६२ | "जर एखाद्या ब्राह्मणाचे कार्य ब्राह्मणावाचून अडले असेल, तर तिथे जेवावे. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप केल्यास दोष दूर होतात." |
| विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत माझी परियेसी । निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या घरी जेवू नये ॥ ६३ | "ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, ""स्वामी, कोणाचे अन्न निषिद्ध आहे आणि कोणाकडे जेवू नये, हे कृपया मला सांगा.""" |
| श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरे ऐसी । अपार असे स्मृति चंद्रिकेसी । ऋषिसंमते सांगेन ॥ ६४ | श्रीगुरूंनी स्मृती आणि ऋषींच्या मतानुसार निषिद्ध अन्नाची सविस्तर माहिती दिली. |
| नित्य मातापितयांसी । सेवा घेती अतिदोषी । जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ द्विजांघरी ॥ ६५ | "जे स्वतःच्या माता-पित्यांकडून सेवा करून घेतात आणि जे अत्यंत धनलोभी आहेत, त्यांच्या घरी जाऊ नये." |
| कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी विप्रालागोनि । अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती जेविल्या ॥ ६६ | "स्वतःच्या पत्नी आणि मुलांना कष्ट देऊन जो धर्मादाय करतो, त्याच्या घरचे अन्न खाल्ल्यास दोष लागतो." |
| गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी । विप्र जाण मल्लयुद्ध करी । वीणा वाद्य ज्याचे घरी । न घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥ ६७ | "गर्विष्ठ, शस्त्रधारी ब्राह्मण, मल्ल किंवा ज्यांच्या घरी केवळ विलासासाठी वाद्ये वाजवली जातात, तिथे जेवू नये." |
| बहिष्कारी विप्राघरी । याचकवृत्तीने उदर भरी । अन्न वर्जावे तया घरी । आत्मस्तुति परनिंदक ॥ ६८ | "ज्याला समाजाने बहिष्कृत केले आहे, जो केवळ भीक मागून पोट भरतो किंवा जो स्वतःची स्तुती व दुसऱ्याची निंदा करतो, त्याचे अन्न वर्ज्य करावे." |
| बहुजन एक अन्न करिती । पृथक् वैश्वदेव न करिती । वर्जावी अन्ने विप्रजाती । महादोष बोलिजे ॥ ६९ | "जिथे अनेक लोक एकत्र राहतात पण वैश्वदेव वेगवेगळा करत नाहीत, तिथे अन्न घेणे दोषपूर्ण आहे." |
| गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण मंत्र उपदेशी । शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी । त्या गुरुघरी जेवू नये ॥ ७० | "जो स्वतःला गुरु म्हणवून मंत्र देतो, पण त्याचे शिष्य दुराचारी आहेत, अशा गुरूच्या घरी जेवू नये." |
| क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे । स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवू नये तया घरी ॥ ७१ | अतिशय रागीट ब्राह्मण किंवा पत्नीचा त्याग केलेल्या पुरुषाच्या घरी भोजन करू नये. |
| धनगर्वी तामसाघरी । कृपण निर्द्रव्य व्यभिचारी । दांभिक दुराचारी विप्राघरी । अन्न तुम्ही वर्जावे ॥ ७२ | "धनाचा गर्व असणारा, तामसी, कंजूस, व्यभिचारी किंवा ढोंगी ब्राह्मणाचे अन्न टाळावे." |
| पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी । वर्जावे अन्न साधुजनी । महादोष बोलिजे ॥ ७३ | "जी ब्राह्मण स्त्री पती आणि पुत्राला सोडून वेगळी राहते, तिने दिलेले अन्न खाणे महापाप आहे." |
| स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी । सदा बहु याचक जरी । तया घरी न जेवावे ॥ ७४ | "जो पत्नीच्या पूर्ण नियंत्रणात आहे, जो सोनाराचे काम करतो किंवा जो सतत याचना करतो, त्याच्या घरी जेवू नये." |
| खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन करी । वस्त्रधुत्या रजकाघरी । दान विप्रे घेऊ नये ॥ ७५ | "दुष्ट राजसेवक, लोखंड किंवा लाकूड तोडणारा आणि धोबी यांच्याकडून ब्राह्मणाने दान किंवा अन्न घेऊ नये." |
| मद्यपान नराघरी । याचने उदरपूर्ति करी । वेश्मी सहजार असे नारी । दान विप्रे न घ्यावे ॥ ७६ | "मद्यपी, भिकारी किंवा ज्याच्या घरात परपुरुषाशी संबंध असलेली स्त्री आहे, त्याच्याकडून दान घेऊ नये." |
| तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळकाघरी परियेसी । न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष बोलिजे ॥ ७७ | "चोरी करणारा, द्वारपाळ किंवा कपटी माणसाचे अन्न वर्ज्य करावे." |
| द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन सांगे द्विजवरी । अन्न वर्जावे तया घरी । घोडी विकी जो ब्राह्मण ॥ ७८ | "जो पैशासाठी शूद्रांना शिक्षण देतो किंवा जो घोडे विकण्याचा व्यापार करतो, अशा ब्राह्मणाचे अन्न खाऊ नये." |
| भागवतकीर्तन नाही घरी । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी । स्नानावीण भोजन करी । तया घरी जेवू नये ॥ ७९ | "ज्याच्या घरी देवभक्ती नाही, जो जुगारी आहे किंवा जो स्नानाशिवाय जेवतो, त्याच्या घरी जाऊ नये." |
| न करी संध्या सायंकाळी । दान न करी कदा काळी । पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी न जेवावे ॥ ८० | "जो संध्यावंदन करत नाही, जो कधी दान देत नाही आणि जो पितृकर्म करत नाही, त्याच्या घरी जेवू नये." |
| दंभार्थाने जो जप करी । अथवा कापट्यरूपे जरी । द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी जेवू नये ॥ ८१ | "जो केवळ प्रदर्शनासाठी किंवा पैशासाठी जप करतो, त्याच्या घरी भोजन करू नये." |
| ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसी । द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी जेवू नये ॥ ८२ | "कर्ज देऊन उपकार मिरवणारा आणि केवळ स्वतःच्या पत्नीसाठी संपत्ती साठवणारा, यांच्याकडे जेवू नये." |
| विश्वासघातकी नराघरी । अनीति पक्षपात करी । स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥ ८३ | "विश्वासघातकी, अनितीने वाघनारा आणि आपल्या पूर्वजांचा धर्म सोडलेल्या माणसाच्या घरी अन्न घेऊ नये." |
| विद्वज्जन ब्राह्मण साधूसी । एखादा करी अति द्वेषी । अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया घरी जेवू नये ॥ ८४ | "जो विद्वान ब्राह्मणांचा आणि साधूंचा द्वेष करतो, त्याच्या घरचे अन्न वर्ज्य करावे." |
| कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता । आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू नये तया घरी ॥ ८५ | "जो आई-वडील आणि कुलदैवताचा त्याग करतो किंवा गुरूंची निंदा करतो, त्याच्या घरी जेवू नये." |
| गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर असे जरी । अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती विप्रासी ॥ ८६ | "गाय, ब्राह्मण किंवा स्त्रीची हत्या करणाऱ्या माणसाच्या घरी अन्न घेतल्यास मोठे पाप लागते." |
| आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे एका द्वारु । दान देता वर्जी जरु । जेवू नये तया घरी ॥ ८७ | "जो केवळ लोभापोटी एकाच दारी पडून राहतो किंवा दान देण्यापासून इतरांना रोखतो, त्याचे अन्न घेऊ नये." |
| समस्त जातीस करी शरण । तोचि चांडाळ होय जाण । घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी विप्रासी ॥ ८८ | "जो धर्माची मर्यादा सोडून सर्वांना शरण जातो आणि ब्राह्मणांना मान देत नाही, त्याचे अन्न घेऊ नये." |
| आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे करून सदा दूषी । न घ्यावे अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरी देखा ॥ ८९ | "जो स्वतःच्या कन्या किंवा जावयाला छळतो किंवा ज्याला पुत्र नाही, त्यांच्या घरी जेवू नये." |
| पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरी अन्न । परपाक करी तया नाम जाण । तया घरी जेवू नये ॥ ९० | "जो स्वतः पंचमहायज्ञ करतो पण जेवतो नेहमी दुसऱ्याकडे, अशा माणसाच्या घरी जेवू नये." |
| विवाह झाला असता आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण । स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न जेवावे तया घरी ॥ ९१ | "लग्न होऊनही जो ब्राह्मण पंचमहायज्ञ आणि अग्नीहोत्र विधी करत नाही, त्याच्याकडे जेवू नये." |
| घरचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति करी । अन्न वर्जावे तया घरी । श्वपच नाम तयाचे ॥ ९२ | "जो घरच्या अन्नाला नावे ठेवतो आणि परान्नाची स्तुती करतो, त्याचे अन्न वर्ज्य करावे." |
| भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया घरी । डोळे जाती अवधारी । आंधळा होय अल्पायुषी ॥ ९३ | "जो केवळ आचारी बनून पोट भरतो, त्याचे अन्न घेतल्यास दृष्टी मंदावते आणि आयुष्य कमी होते." |
| बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा जाय जाण । धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी जेवू नये ॥ ९४ | "निषिद्ध लोकांच्या घरी जेवल्याने माणूस बहिरा होतो, त्याची स्मरणशक्ती आणि धैर्य नष्ट होते." |
| गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न करी जाण । अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया घरी जेवू नये ॥ ९५ | "जो गृहस्थ असून दानधर्म करत नाही, पण केवळ अद्वैताच्या मोठ्या गोष्टी करतो, त्याच्याकडे जेवू नये." |
| परगृही वास आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण । त्याचे जितुके असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥ ९६ | "जो ब्राह्मण दुसऱ्याच्या घरी राहून त्याचे अन्न खातो, त्याच्या आयुष्याचे सर्व पुण्य यजमानाला मिळते." |
| तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्श । त्याचिकारणे निषिद्ध असे । परान्न तुम्ही वर्जावे ॥ ९७ | "अन्नाला स्पर्श करताच यजमानाचे सर्व दोष ब्राह्मणाला लागतात, म्हणूनच परान्न वर्ज्य करण्यास सांगितले आहे." |
| भूदान गोदान सुवर्णदान । गजवाजीरत्नदान । घेता नाही महादूषण । अन्नदाना अतिदोष असे ॥ ९८ | "जमीन, गाय किंवा सोने यांचे दान घेण्यापेक्षा अन्नदान घेणे (परान्न खाणे) अधिक दोषपूर्ण मानले जाते." |
| समस्त दुष्कृत परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी । तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥ ९९ | परान्न खाणे आणि परस्त्रीशी संग करणे हे दोन्ही नरकाकडे नेणारे मार्ग आहेत. |
| परगृही वास करिता । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता । अमावास्येसी परान्न जेविता । मासपुण्य जाय देखा ॥ १०० | दुसऱ्याच्या घरी राहिल्याने संपत्ती जाते आणि अमावस्येला परान्न खाल्ल्यास पूर्ण महिन्याचे पुण्य नष्ट होते. |
| अगत्य जाणे परान्नासी । न बोलाविता जाय संतोषी । जाता होती महादोषी । शूद्रे बोलाविता जाऊ नये ॥ १०१ | न बोलावता जेवायला जाणे हे अत्यंत दोषपूर्ण आहे. तसेच शूद्राच्या आमंत्रणावरून भोजनास जाऊ नये. |
| आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ नये भोजनासी । पुत्र झालिया कन्येसी । सुखे जावे अवधारा ॥ १०२ | "स्वतःच्या मुलीच्या घरी जेवायला जाऊ नये. पण जर मुलीला मुलगा झाला असेल, तर मात्र तिथे जावे." |
| सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ नये परियेसी । जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये परियेसा ॥ १०३ | ग्रहणात किंवा सुतक असताना कोणाचेही दान किंवा अन्न घेऊ नये. |
| ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर । तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे दैन्य असे ॥ १०४ | "जो ब्राह्मण खऱ्या आचारधर्माने वागेल, त्याला कधीही गरिबी किंवा दुःख भोगावे लागणार नाही." |
| समस्त देव त्याचे होती । अष्ट महासिद्धि साधती । ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु तया घरी ॥ १०५ | "जो ब्राह्मणाचे कर्म पाळतो, त्याच्या घरी साक्षात कामधेनु असते आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात." |
| विप्र मदांधे व्यापिले । आचारकर्मे सांडिले । याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्म नष्ट होऊनिया ॥ १०६ | "आजचे ब्राह्मण मदांध झाले आहेत आणि आचार विसरले आहेत, म्हणूनच ते दरिद्री आणि दुःखी आहेत." |
| विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसी । सकळ आचारधर्मासी । निरोपावे दातारा ॥ १०७ | "ब्राह्मणाने विनंती केली, ""स्वामी, मला सर्व आचारधर्म सांगा.""" |
| श्रीगुरुमूर्ति कृपासागरु । त्रिमूर्तीच्या अवतारु । भक्तजनांच्या आधारु । निरोपावे आचार ब्राह्मणाचे ॥ १०८ | कृपासागर श्रीगुरूंनी मग ब्राह्मणाचे दैनंदिन कर्तव्य काय असावे, हे सांगण्यास सुरुवात केली. |
| श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी । सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी ऋषि आचरले जे ॥ १०९ | "श्रीगुरु म्हणाले, ""मी तुला ऋषीमुनींनी सांगितलेला आचारधर्म विस्ताराने सांगतो.""" |
| नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप करिती बहु दिवसी । आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥ ११० | नैमिषारण्यात ऋषी तप करत असताना तिथे पराशर ऋषी आले. सर्वांनी त्यांना वंदन केले. |
| समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर जोडून । ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे म्हणती ते ॥ १११ | सर्व ऋषींनी पराशरांना ब्राह्मणांच्या आचरणाबद्दल विचारले. |
| आता आम्ही आचार करितो । तेणे संशय मनी येतो । ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो । तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥ ११२ | """आम्ही आचार पाळतो पण मनात संशय येतो. तुम्ही ब्रह्मर्षी आहात, आम्हाला उपदेश करा.""" |
| गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य नव्हे हो पवित्र । तैसा श्रीगुरु तू सत्पात्र । आचार आम्हा सांगावे ॥ ११३ | """गुरूशिवाय ज्ञान पवित्र नसते, म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा.""" |
| पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार तुम्हासी । जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि पावती ॥ ११४ | "पराशर ऋषी म्हणाले, ""मी असा आचार सांगतो ज्यामुळे विनासायास सर्व सिद्धी मिळतील.""" |
| ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि । मग ध्याव्या मूर्ति तिन्ही । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥ ११५ | "ब्राह्ममुहूर्तावर ( पहाटे) उठून श्रीगुरूंचे आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचे ध्यान करावे." |
| मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह । सनत्कुमार-सनक-सनंदन-सह । स्मरावे तये वेळी ॥ ११६ | त्यानंतर सूर्य-चंद्रादी नवग्रह आणि सनकादी ऋषींचे स्मरण करावे. |
| सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी देखा । सप्त समुद्र असती जे का । स्मरावे सप्त पितृदेवता ॥ ११७ | "नारद, तुंबरु, सिद्ध योगी, सात समुद्र आणि सात पितृदेवतांचे स्मरण करावे." |
| सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त द्वीपे सप्त भुवनी । समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे प्रातःस्मरण ॥ ११८ | "सप्तर्षी, सात द्वीपे आणि सात भुवनांचे नाव घेऊन प्रातःस्मरण करावे." |
| मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि दोनी । लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे ॥ ११९ | मग अंथरुणावरून उठून दोनदा आचमन करावे आणि विधी उरकून शौच-शुद्धी करावी. |
| पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमनविधीसी । सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी करणे ऐका ॥ १२० | "पराशर ऋषींनी पुढे आचमनाचा विधी आणि तो केव्हा करावा, हे विस्ताराने सांगण्यास सुरुवात केली." |
| स्नानापूर्वी अपर दोनी । उदक प्राशिता येणेचि गुणी । निजता उठता समयी दोनी । आचमने करावी ॥ १२१ | "स्नानापूर्वी, पाणी पिल्यानंतर, झोपण्यापूर्वी आणि झोपून उठल्यानंतर दोन-दोन वेळा आचमन करावे." |
| अधोवायुशब्द झालिया । वोखटे दृष्टी देखिलिया । दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि व्हावे परियेसा ॥ १२२ | अधोवायू सुटल्यावर किंवा काही अशुभ पाहिल्यास दोनदा आचमन करून शुद्ध व्हावे. |
| भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया शिंकलिया दोनी । लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे ॥ १२३ | "जेवणापूर्वी, जांभई किंवा शिंक आल्यावर आणि लघवी किंवा शौचास जाऊन आल्यावर दोनदा आचमन करावे." |
| जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । स्पर्श करावा अक्ष श्रोत्री । येणे पवित्र परियेसा ॥ १२४ | "जवळ पाणी नसल्यास डोळे आणि कानांना स्पर्श करून 'श्रोत्राचमन' करावे, त्याने शुद्धता येते." |
| ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त देवता असती निर्गुणी । त्यासी स्पर्शिता तत्क्षणी । आचमनफळ असे देखा ॥ १२५ | "ब्राह्मणाच्या उजव्या कानात सात देवतांचा वास असतो, त्याला स्पर्श केल्यास आचमनाचेच फळ मिळते." |
| श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च वरुणार्कैद्रवायवः । विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं तिष्ठन्ति देवताः ॥ १२६ | "श्लोक: अग्नी, जल, चंद्र, वरुण, सूर्य, इंद्र आणि वायू या देवता ब्राह्मणाच्या उजव्या कानात नित्य निवास करतात." |
| टीका । त्या देवतांची नावे ऐका । सांगेन ऋषि सकळिका । अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र चंद्र असती ॥ १२७ | "वरील श्लोकाचा अर्थ ऋषींनी सांगितला की अग्नी, जल, वरुण, सूर्य, वायू, इंद्र आणि चंद्र या त्या सात देवता आहेत." |
| लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम स्नान करा सुमनी । बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय तव ॥ १२८ | प्रात:विधी आटोपून मंत्र न म्हणता (तूष्णीम) स्नान करावे आणि सूर्योदयापर्यंत पवित्र आसनावर बसावे. |
| गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त । वरकड जपावे पवित्र । प्रगट होता अरुणोदित । बहिर्भूमीसी जाईजे ॥ १२९ | सूर्योदयापूर्वी गायत्री व्यतिरिक्त इतर मंत्रांचा जप करावा आणि उजेड झाल्यावर शौचास (बहिर्भूमीस) जावे. |
| यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल पालव घालूनि । नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी बैसावे ॥ १३० | "जाणवे उजव्या कानावर ठेवून, डोक्याला वस्त्राचा वेढा घालून नैऋत्य दिशेला तोंड करून बसावे." |
| दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री बैसावे दक्षिणमुखी । मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू नये ॥ १३१ | दिवसा उत्तर दिशेला आणि रात्री दक्षिण दिशेला तोंड करून बसावे. शौचकाळी मौन पाळावे आणि इकडे तिकडे पाहू नये. |
| सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू नये नदी-आकाशी । स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये कवणाते ॥ १३२ | "शौचकाळी सूर्य, चंद्र, नक्षत्रे, नदी किंवा लोकांकडे पाहू नये." |
| शौचाविणे कांस घाली । कांस न काढी लघुशंकाकाळी । त्यासी होय यमपुरी अढळी । नरक भोगी अवधारा ॥ १३३ | शौचाला जाताना वस्त्राची कास न सोडणाऱ्याला नरकवास भोगावा लागतो. |
| अगत्य घडे उदकावीण । करूनिया गंगास्मरण । मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि वर्जावे ॥ १३४ | "पाणी उपलब्ध नसल्यास गंगेचे स्मरण करून मातीने शौचविधी उरकावा, पण त्यानंतर शुद्धीशिवाय काही खाऊ नये." |
| बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । ऐका समस्त तत्परेसी । म्हणे पराशर सर्वाते ॥ १३५ | "शौचास कोठे बसावे, याचे नियम पराशर ऋषींनी सांगितले आहेत." |
| न बैसावे भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी । हिरवी पर्णे करावी दुरी । वाळल्या पानी बैसावे ॥ १३६ | "थेट जमिनीवर बसू नये, गवतावर किंवा वाळलेल्या पानांवर बसावे. हिरवी पाने अंगाला लागू देऊ नयेत." |
| जे ब्राह्मण उभ्या मुतती । त्यांसी ऐका कवण गति । त्यांचे रोमे अंगी किती । तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥ १३७ | "जे ब्राह्मण उभे राहून लघवी करतात, त्यांना शरीरावरील केसांइतकी वर्षे नरकात राहावे लागते." |
| मळविसर्जन करूनि । उठावे हाती शिश्न धरूनि । जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे परियेसा ॥ १३८ | विधी आटोपल्यावर जलपात्राकडे जाऊन हाताने जननेंद्रियाचा स्पर्श टाळत शौच करावे. |
| मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी । वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील आणु नये ॥ १३९ | "शौचासाठी माती घेताना वारूळ, उंदराचे बीळ किंवा नदीच्या पात्रातील माती घेऊ नये." |
| ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती । देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥ १४० | "रस्ता, झाडाखालची जागा, मंदिर किंवा तीर्थक्षेत्रातील माती शौचासाठी वापरू नये." |
| वापी कूप तडागात । मृत्तिका आणिता पुण्य बहुत । उदक करी घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्यावी शौचासी ॥ १४१ | विहीर किंवा तलावातील माती आणणे श्रेयस्कर आहे. ती घेताना त्यावर पाणी शिंपडून मग घ्यावी. |
| आवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानी एक लावावे । अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका हस्तासी तीन सप्ते ॥ १४२ | "मातीचे गोळे करून जननेंद्रियावर १, गुदद्वारावर ५, डाव्या हातावर १० आणि दोन्ही हातांवर ७ वेळा लावून धुवावे." |
| एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका लावावी सकळ । आणिक सांगेन समय केवळ । ऋषि समस्त परियेसा ॥ १४३ | प्रत्येक पायावर ७ वेळा माती लावून धुवावे. शौचाचे हे विधी शुद्धतेसाठी महत्त्वाचे आहेत. |
| या मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण । बहुर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥ १४४ | "लघवीनंतर १ पट, शौचानंतर २ पट आणि शरीरसंबंधानंतर ३ पट माती वापरून शुद्धी करावी." |
| आणिक प्रकार असे देखा । करावे येणेप्रमाणे ऐका । जितुके करणे गृहस्थ लोका । द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥ १४५ | "गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे, तर ब्रह्मचाऱ्यांनी त्याच्या दुप्पट विधी करावा." |
| त्रिगुण करावे वानप्रस्थे । चतुर्गुण करावे यती समस्ते । न्यून पूर्ण करावे यापरते । धर्मसिद्धि होय देखा ॥ १४६ | "वानप्रस्थाने ३ पट आणि संन्याशाने ४ पट शुद्धी करावी, तेव्हाच धर्मसिद्धी मिळते." |
| येणे प्रकारे करा दिवसी । रात्री याच्या अर्धैसी । संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे अर्ध त्याहुनी ॥ १४७ | "दिवसा पूर्ण विधी करावा, रात्री त्यापेक्षा अर्धा आणि संकटकाळी किंवा प्रवासात त्याहूनही कमी विधी करावा." |
| व्रतबंध झालिया ब्राह्मणासी । हाच आचार परियेसी । हाचि उपदेश चहू वर्णासी । शौचविधि बोलिला ॥ १४८ | मुंज झालेल्या ब्राह्मणाने आणि इतर वर्णांनीही या शौचविधीचे पालन करावे. |
| शौच केलियानंतरी । चूळ भरावे परिकरी । ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये सहा परियेसा ॥ १४९ | "शौचानंतर चूळ भरण्याचे प्रमाण: ब्राह्मणाने ८, क्षत्रियाने ६ वेळा चूळ भरावी." |
| वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ । येणे विधि भरा चूळ । अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर ऋषि ॥ १५० | वैश्याने ४ आणि शूद्राने २ वेळा चूळ भरावी. यापेक्षा अधिक करू नये. |
| चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन वेळा । शुचिस्थानी बैसून निर्मळा । कुळदेवता स्मरावी ॥ १५१ | विधीनंतर ८ वेळा चूळ भरून ३ वेळा आचमन करावे आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. |
| तूष्णीम् आचमन करावे । नाम घेता चोवीस ठावे । आतळावे पुनः आचमावे । उसका विधी सांगेन ॥ १५२ | मंत्र न म्हणता आचमन करावे आणि विष्णूची २४ नावे घ्यावीत. |
| विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे विख्यात असती । जे बोलिले असे श्रुती । सांगेन तीर्थ अवधारा ॥ १५३ | "ब्राह्मणाच्या उजव्या तळहातात ५ तीर्थे असतात, असे श्रुतीमध्ये सांगितले आहे." |
| अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ परियेसी । तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी । पितृतीर्थ असे जाण ॥ १५४ | "अंगठ्याच्या मुळाशी 'ब्रह्मतीर्थ', अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये 'पितृतीर्थ' असते." |
| चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ अवधारी । कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ परियेसा ॥ १५५ | बोटांच्या टोकावर 'देवतीर्थ' आणि करंगळीच्या मुळाशी 'ऋषितीर्थ' असते. |
| तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी तीर्थै करावी हर्षी । आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा ब्राह्मण विद्वज्जन ॥ १५६ | "तर्पण करताना संबंधित तीर्थांचा वापर करावा, पण आचमन नेहमी 'ब्रह्मतीर्थाने' करावे." |
| ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही । केशव नारायण माधव म्हणोनि । देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद नाम उच्चारावे ॥ १५७ | "'केशव, नारायण, माधव' म्हणून ३ आचमने करावीत आणि 'गोविंद' म्हणून पाणी सोडावे." |
| विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि । बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि । श्रीधर नाम उच्चारावे ॥ १५८ | "विष्णू-मधुसूदन म्हणत हात धुवावेत, त्रिविक्रम-वामन म्हणत गालांना आणि श्रीधर म्हणत ओठांना स्पर्श करावा." |
| पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ पादद्वय स्पर्शी । सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर शिखास्थानी ॥ १५९ | "हृषीकेश म्हणून हात धुवावेत, पद्मनाभ म्हणून पायांना आणि दामोदर म्हणून शिखेला स्पर्श करावा." |
| चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण घ्राणेसी । तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा वासुदेव प्रद्युम्न ॥ १६० | संकर्षण म्हणत पाठीला आणि वासुदेव-प्रद्युम्न म्हणत नाकाला स्पर्श करावा. |
| अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श श्रोत्रेसी । कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत नाभी म्हणावे ॥ १६१ | डोळे आणि कानांना स्पर्श करताना अनिरुद्ध-अधोक्षज म्हणावे आणि अच्युत म्हणून बेंबीला स्पर्श करावा. |
| पंचांगुली उपेंद्र देखा । हरी श्रीकृष्ण भुजा एका । पाच अंगुली विधिपूर्वका । येणे विधी स्पर्शावे ॥ १६२ | "उपेंद्र, हरी आणि श्रीकृष्ण ही नावे घेत खांद्यांना आणि शरीराच्या अवयवांना स्पर्श करावा." |
| विधी संध्याकाळी । आणिक करावे वेळोवेळी । अशौच अथवा संकटकाळी । असती विधाने ती ऐका ॥ १६३ | हे आचमन विधी संध्याकाळी आणि इतर वेळीही शुद्धीसाठी करावेत. |
| देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त प्रक्षाळा गोविंद नावे । मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥ १६४ | संध्या व्यतिरिक्त वेळी 'गोविंद' म्हणून हात-तोंड धुवून साधे आचमन करावे. |
| विधान आणिक सांगेन । देवतीर्थे तिनी घेऊन । गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु श्रोत्र स्पर्शावे ॥ १६५ | आचमनानंतर डोळे आणि कानांना स्पर्श करणे शुद्धीसाठी आवश्यक आहे. |
| शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श होता परियेसी । आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती ब्राह्मणाते ॥ १६६ | विजातीय व्यक्तीला किंवा अपवित्र वस्तूला स्पर्श झाल्यास आचमन करावे. |
| भिजोनि आलिया पाउसात । द्विराचमने होय पुनीत । स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन करावे ॥ १६७ | "पावसात भिजल्यावर, स्नान करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी दोनदा आचमन करावे." |
| फलाहार भक्षण करिता । अथवा आपण उदक घेता । आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमने शुद्ध होय ॥ १६८ | "फळे खाल्ल्यावर, पाणी पिल्यावर किंवा स्मशानातून आल्यावर दोनदा आचमन करून शुद्ध व्हावे." |
| उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करा निर्धारी । आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन करावे ॥ १६९ | पाणी नसल्यास उजव्या कानाला स्पर्श करावा. |
| श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी । जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे तया घरी ॥ १७० | "श्रीगुरु म्हणाले की जो या आचमन विधीचे पालन करतो, त्याच्या घरी कधीच दारिद्र्य येत नाही." |
| आता सांगेन विधान । करावया दंतधावन । समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥ १७१ | "दात घासण्यासाठी काही दिवस वर्ज्य आहेत—पर्वकाळ, प्रतिपदा आणि षष्ठीला दात घासू नयेत." |
| न करावे नवमीद्वादशीसी । शनयर्कमंगळवारेसी । श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू नये दंतधावन ॥ १७२ | "नवमी, द्वादशी, शनिवार, रविवार, मंगळवार, श्राद्ध आणि लग्नाच्या दिवशी काष्ठाने दात घासू नयेत." |
| कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी । खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया जन्म चांडाळयोनी ॥ १७३ | "ताड, खजूर किंवा काट्यांच्या झाडाने दात घासल्यास चांडाळ योनीत जन्म मिळतो." |
| खदिरकरंजाआघाडेसी । औदुंबरार्कवटशाखेसी । अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य वृक्ष ऐका तुम्ही ॥ १७४ | "खैर, करंज, आघाडा, औदुंबर, वटवृक्ष किंवा करवंद यांची काठी दात घासण्यासाठी उत्तम आहे." |
| विप्रे द्वादशांगुलेसी । नवांगुले क्षत्रियासी । षडांगुले वैश्यशूद्रांसी । दंतधावन काष्ठ आणावे ॥ १७५ | "ब्राह्मणाने १२ बोटे, क्षत्रियाने ९ आणि वैश्य-शूद्राने ६ बोटे लांबीची काठी वापरावी." |
| दंतधावन काष्ठेसी । तोडिता म्हणावे मंत्रासी । आयुः प्रज्ञा नाम परियेसी । म्हणोनि काष्ठ तोडावे ॥ १७६ | काठी तोडताना आयुष्य आणि बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करावी. |
| दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे । चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे ॥ १७७ | "दात घासल्यावर ती काठी नैऋत्येला फेकावी, १२ वेळा चूळ भरावी आणि दोनदा आचमन करावे." |
| मग करावे प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन । तेजोबलाआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥ १७८ | "त्यानंतर पहाटेचे स्नान करावे. त्याने तेज, बळ आणि आयुष्य वाढते." |
| प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवते होती वश । सौभाग्य सुख होती हर्ष । प्रातःस्नान केलिया ॥ १७९ | "पहाटेच्या स्नानाने बुद्धी वाढते, वाईट स्वप्ने नष्ट होतात आणि सर्व देवता प्रसन्न होतात." |
| यती तापसी संन्यासी । त्रिकाळ करावे स्नानासी । ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ करावे ॥ १८० | "संन्याशाने ३ वेळा, तर ब्रह्मचाऱ्याने १ वेळा विधीपूर्वक स्नान करावे." |
| नित्य केलिया पापनाश असे । करावे याचि कारणे हर्षे । गृहस्थे वानप्रस्थे विशेषे । प्रातर्मध्याह्नी करावे ॥ १८१ | "नित्य स्नानाने पापांचा नाश होतो. गृहस्थ आणि वानप्रस्थांनी सकाळी आणि दुपारी स्नान करावे." |
| अशक्य संकट आले जरी । अथवा न मिळे निर्मल वारि । स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥ १८२ | "जर आजारपण किंवा पाणी नसल्यास स्नानाचे इतर पर्याय पराशर ऋषींनी सांगितले आहेत." |
| अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे वायुस्नान । करा विधीने मंत्रस्नान । आपोहिष्ठा मंत्राने ॥ १८३ | "अग्नीस्नान, भस्मस्नान, वायूस्नान किंवा मंत्रांनी मंत्रस्नान करावे." |
| आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल भावभक्ति । गुरुदेवता दर्शनमात्री । तीर्थस्नानफळ असे ॥ १८४ | "दृढ भक्ती असल्यास गुरु किंवा देवतेच्या दर्शनानेच तीर्थस्नानाचे फळ मिळते." |
| अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ भक्तीने घेता । अंगावरी प्रोक्षिता । तीर्थस्नानफळ असे ॥ १८५ | आई-वडिलांचे चरणतीर्थ अंगावर शिंपडल्यास सर्व तीर्थांच्या स्नानाचे पुण्य मिळते. |
| अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत । किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ असे देखा ॥ १८६ | पावसात भिजणे किंवा गायींच्या धुळीत बसणे हे सुद्धा स्नानासारखेच पवित्र आहे. |
| स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने होय शुचिता । शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान करावे ॥ १८७ | "चांडाळाचा स्पर्श झाल्यास पूर्ण स्नान करावे, तर शूद्राचा स्पर्श झाल्यास हात-पाय धुवून शुद्ध व्हावे." |
| दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य करावे जले । संधि-विग्रह-साकडे पडले । उषःस्नान करावे ॥ १८८ | शरीर सुदृढ असेपर्यंत पाण्यानेच स्नान करावे. संकटाच्या वेळी पहाटेचे संक्षिप्त स्नान करावे. |
| प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसी । अशक्तता असेल देहासी । उष्णोदके करावे ॥ १८९ | "सकाळी स्नानासाठी थंड पाणी सर्वोत्तम आहे, पण अशक्त असल्यास गरम पाण्याने स्नान करावे." |
| स्वभावे पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क । पवित्र झाले उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥ १९० | "पाणी नैसर्गिकरीत्या पवित्र असते, पण अग्नीच्या संपर्काने ते अधिक शुद्ध होते." |
| उष्णोदके स्नान करिता । शीतोदक करा मिश्रित । मध्ये करावे आचमन तत्त्वता । संकल्प तेथे म्हणावा ॥ १९१ | "गरम पाण्यात थोडे थंड पाणी मिसळावे, आचमन करावे आणि संकल्प करून स्नान करावे." |
| घरी स्नान करिता देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका । वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले हस्ते करूनिया ॥ १९२ | घरी स्नान करताना अघमर्षण किंवा तर्पण करू नये आणि स्वतःची वस्त्रे स्वतः पिळू नयेत. |
| पुत्रोत्साह संक्रांतीसी । श्राद्धकाळ मृतदिवसी । न करावे स्नान उष्णोदकेसी । अमावास्या पौर्णिमा ॥ १९३ | "मुलाचा जन्म, संक्रांत, श्राद्ध, सुतक, अमावस्या आणि पौर्णिमेला गरम पाण्याने स्नान करू नये." |
| स्नान करिता बांधा शिखा । दर्भहस्ती सूर्याभिमुखा । मौन असावे विवेका । कवणासवे न बोलावे ॥ १९४ | "स्नान करताना शेंडी बांधलेली असावी, हातात दर्भ असावेत आणि मौन पाळावे." |
| आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री तीन म्हणा सुरसी । येणेपरी स्नानोदकासी । अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥ १९५ | 'आपोहिष्ठा' आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून स्नानाच्या पाण्याला अभिमंत्रित करावे. |
| प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक मिळवोनि । स्नान करावे प्रतिदिनी । गृहस्थांनी घरी देखा ॥ १९६ | सुरुवातीला थोडे थंड पाणी अंगावर घेऊन मग गरम पाण्याने स्नान करावे. |
| अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र उकलावे त्वरित । उद्यंत मंत्र जपत । वस्त्र सूर्यासी दाखवावे ॥ १९७ | वस्त्र सोडताना 'अवधूत' आणि सूर्याला दाखवताना 'उद्यंत' मंत्र म्हणावा. |
| आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र जपोन । धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र जपावे ॥ १९८ | "आचमन करून, मंत्रांचा जप करत शुद्ध धुतलेले वस्त्र परिधान करावे." |
| आवहंती वितन्वती मंत्रे । वस्त्रे नेसावी पवित्र । द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥ १९९ | मंत्रोच्चार करत पवित्र वस्त्र नेसावे आणि त्यानंतर दोनदा आचमन करावे. |
| आता मंत्रस्नान करणे । सांगेन त्याची विधाने । आपोहिष्ठादि मंत्राने । प्रोक्षावे शरीरावरी ॥ २०० | पाण्याशिवाय मंत्रांनी स्नान करायचे असल्यास 'आपोहिष्ठा' मंत्राने शरीरावर पाणी शिंपडावे. |
| पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी । मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि । करावे तुम्ही मार्जनी । आपोहिष्ठा मंत्रेसी ॥ २०१ | "पाय, डोके आणि हृदयावर क्रमाने पाणी शिंपडून मार्जन करावे." |
| ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन करोनि । मानसस्नान विधींनी । करावे ऐका भक्तीने ॥ २०२ | हे विधी झाल्यावर पुन्हा आचमन करून मनामध्ये मानसस्नान करावे. |
| नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान करावे भक्तीसी । चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान केलिया मानसन्मान ॥ २०३ | चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून मानस पूजा केल्यास मोठे फळ मिळते. |
| अपवित्रः पवित्रो वा । येणे मंत्रे हरि ध्यावा । उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ अवधारा ॥ २०४ | "मंत्र म्हणून स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडावे, त्याने शुद्धता प्राप्त होते." |
| मंगलस्नानविधा । सांगेन ऐका ब्राह्मण । रविवारी निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥ २०५ | मंगलस्नानाचे नियम: रविवारी तेल लावून स्नान केल्यास ताप येतो. |
| नदीतीरी असे नरु । अशक्त असे शरीरु । गंगास्मरणे निर्धारु । आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥ २०६ | "शरीर अशक्त असल्यास नदीवर न जाता गंगेचे स्मरण करून ओल्या वस्त्राने अंग पुसावे." |
| कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी मृत्यु परियेसी । लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि गुरुवारी ॥ २०७ | "सोमवारी तेल लावल्यास कांती कमी होते, मंगळवारी मृत्यूचे भय, बुधवारी लक्ष्मीप्राप्ती आणि गुरुवारी धनहानी होते." |
| शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी अखिल संपत । जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान करावे ॥ २०८ | शुक्रवारी मुलाला त्रास होतो आणि शनिवारी तेल लावून स्नान केल्यास संपत्ती मिळते. |
| नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःसूर्याभिमुखी । संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान करावे अवधारा ॥ २०९ | "नदीत प्रवाहाकडे, घरी सकाळी सूर्याकडे आणि संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून स्नान करावे." |
| स्नान करिता नदीसी । अघमर्षण करावे परियेसी । नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी । नदीस्नान करावे ॥ २१० | नदीत स्नान करताना 'अघमर्षण' विधी आणि 'नमोऽग्नयेऽप्सुमते' मंत्र म्हणावा. |
| यदपांक्रूर मत्रेंसी । उदक लोटावे द्विहस्तेसी । तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे गंगे जपावे ॥ २११ | पाणी पुढे लोटत 'इमं मे गंगे' या मंत्राचा जप करावा. |
| ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान करावे गंगेत । नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥ २१२ | "मंत्र म्हणत गंगेत स्नान करावे, हा नदीस्नानाचा मुख्य विधी आहे." |
| रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती । स्नानावेगळे शुद्ध न होती । स्नान करावे अवधारा ॥ २१३ | "रडल्यानंतर, उलटी झाल्यावर किंवा वाईट स्वप्न पडल्यास स्नानाशिवाय शुद्धी होत नाही." |
| आता वस्त्रावे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये गृहस्थाने ॥ २१४ | वस्त्राचे नियम: ओले वस्त्र कास घातल्याशिवाय नेसू नये. |
| रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र । नेसूनि जे जन जप करीत । ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥ २१५ | मळलेले वस्त्र नेसून किंवा फक्त एकच धोतर नेसून जप करू नये. |
| श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसी । उपवस्त्र वहिर्वासी । उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥ २१६ | ब्राह्मणाने पांढरे वस्त्र आणि उपवस्त्र धारण करणे आवश्यक आहे. |
| धोत्र नेसलिया नंतरी । विभूति लावावी परिकरी । मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावे ॥ २१७ | वस्त्र नेसल्यावर मंत्रांच्या उच्चारासह भस्म लावावे. |
| भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावावे परी । द्वारावती मुख्य धरी । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥ २१८ | "भस्म नसेल तर द्वारकेचे गोपीचंदन लावावे, साधी माती लावू नये." |
| न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका । ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तया ॥ २१९ | "गोपीचंदन नसेल तर गंगेची माती लावून टिळा लावावा, त्याने विष्णूची कृपा मिळते." |
| पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे तेणे अंगुष्ठेसी । ज्यासी काम असे आयुधी । मध्यांगुली लावावे ॥ २२० | "आरोग्यासाठी अंगठ्याने आणि विजयासाठी मधल्या बोटाने टिळा लावावा." |
| अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य मुक्तीसी । जे लाविती नखेसी । महापातक घडे तया ॥ २२१ | "अन्नासाठी अनामिकेने आणि मुक्तीसाठी तर्जनीने टिळा लावावा, पण नखांनी लावू नये." |
| उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव आष्ट अंगुली । सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार लावावे ॥ २२२ | "टिळ्याची रुंदी ५ ते १० बोटे असावी (विशिष्ट आकाराप्रमाणे)." |
| चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम पक्ष असे बोली । द्वादश नामे करा भली । विष्णुनाम उच्चारित ॥ २२३ | विष्णूची १२ नावे घेत शरीराच्या १२ भागांवर टिळे लावावेत. |
| केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी नारायण म्हणोनि । माधवनामे ह्रदयस्थानी । कमळपुष्पाकार देखा ॥ २२४ | "कपाळावर 'केशव', बेंबीवर 'नारायण' आणि हृदयावर 'माधव' नावाने टिळा लावावा." |
| गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे कटिप्रदेशी । दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी उत्तर त्रिविक्रम ॥ २२५ | "कंठावर 'गोविंद' आणि भुजांवर विष्णूची इतर नावे घ्यावीत." |
| वामन नामे बाहु देखा । श्रीधर दक्षिणकर्णिका । ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ दक्षिणकटी ॥ २२६ | "बाहूंवर आणि कानांवर विष्णूच्या विविध नावांनी टिळा लावावा." |
| दामोदर शिरस्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्रविधान । पापे जाती जळोन । गोपीचंदन लाविता ॥ २२७ | डोक्यावर 'दामोदर' म्हणून टिळा लावावा. याने सर्व पापे नष्ट होतात. |
| द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनी । हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति मुक्ति देखा ॥ २२८ | गोपीचंदन आणि भस्म लावल्याने शिव-विष्णू दोघेही प्रसन्न होतात. |
| विवाहादि शोभन दिवसी । देवताकृत्य श्राद्धदिवसी । अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावे ॥ २२९ | "लग्न, श्राद्ध, सुतक किंवा तेल लावून स्नान केल्यावर गोपीचंदन लावू नये." |
| ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेसी । आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन विख्यात ॥ २३० | "तर्पणासाठी लागणारे दर्भ १० प्रकारचे असतात, त्यांची नावे ऋषींनी सांगितली." |
| दूर्वा उशीर कुश काश । सकुद गोधूम व्रीहि मौजीष । नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥ २३१ | "दूर्वा, वाळा, कुश, काश, गहू, मुंज गवत इत्यादी १० प्रकारचे दर्भ महत्त्वाचे आहेत." |
| नित्य आणावे दूर्वैसी । जरी न साधे आपणासी । श्रावण भाद्रपदमासी । संग्रह संवत्सरी करावा ॥ २३२ | "रोज नवीन दूर्वा आणाव्यात, शक्य नसल्यास पावसाळ्यात त्यांचा संग्रह करावा." |
| चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि क्षत्रिय-वैश्यासी । एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी धरावे ॥ २३३ | "ब्राह्मणाने ४, क्षत्रिय-वैश्याने ३ आणि शूद्राने १ दूर्वा धारण करावी." |
| या दूर्वेची महिमा । सांगता असे अनुपमा । अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी रुद्र मध्ये हरि ॥ २३४ | "दूर्वेच्या शेंड्यावर ब्रह्मा, मुळाशी शिव आणि मध्ये विष्णूचा वास असतो." |
| अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी द्वयांगुल । धारण करावे ब्रह्मकुळे । याची महिमा थोर असे ॥ २३५ | "विशिष्ट लांबीची दूर्वा ब्राह्मणांनी धारण करावी, तिचा महिमा मोठा आहे." |
| चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका । ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक केवी होय ॥ २३६ | जसे विष्णू चक्राने आणि शिव त्रिशुळाने असुरांचा नाश करतात... |
| इंद्र वज्रायुध धरिता । दैत्यगिरी विभांडी तत्त्वता । तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता । पापदुरिते पराभवती ॥ २३७ | "...तसेच ब्राह्मण हातातील दूर्वेने (दर्भाने) पापांचा नाश करतो." |
| जैसे तृणाचे बणवीसी । अग्निस्पर्श होता नाशी । तेवी आलिया पापराशि । दर्भस्पर्शै जळती देखा ॥ २३८ | "जसा गवताचा ढिगारा अग्नीने जळतो, तशी पापांची रास दर्भाच्या स्पर्शाने जळून जाते." |
| ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि बांधावी कुशाग्री । वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी ब्राह्मणे भक्तीने ॥ २३९ | जप करताना दर्भाला गाठ बांधावी आणि जेवताना ती वर्तुळाकार करून धरावी. |
| कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि बांधावी परियेसी । अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप नाशी येणेपरी ॥ २४० | धार्मिक कर्मे करताना दर्भाला गाठ बांधून केल्यास सर्व पापे नष्ट होतात. |
| एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावे पवित्र । नित्य-कर्मासी हेच पवित्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥ २४१ | नित्य कर्मासाठी ११ बोटे लांबीचे आणि दोन दले (पाते) असलेले पवित्र दर्भ वापरावेत. |
| जपहोमादि दानासी । स्वाध्याय पितृकर्मासी । सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे न करावे ॥ २४२ | "जप, होम, दान, स्वाध्याय आणि पितृकर्म हे विधी दर्भाच्या अंगठीशिवाय (पवित्री) किंवा हातातील सोन्या-चांदीच्या अंगठीवाचून करू नयेत." |
| देवपितृकर्मासी देख । रजत करावे सुवर्णयुक्त । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥ २४३ | देवकार्यात चांदी आणि सोन्याचा वापर करावा. तर्जनीमध्ये चांदीची आणि अनामिकेमध्ये सोन्याची अंगठी धारण करावी. |
| मुद्रिका असावी खड्गपात्री । कनिष्ठिकांगुली पवित्री । ग्राह्य नव्हे जीवंतपित्री । तर्जनांगुली मुद्रिका ॥ २४४ | "करंगळीत पवित्र दर्भ असावेत. ज्याचे वडील जिवंत आहेत, त्याने तर्जनीमध्ये मुद्रिका घालू नये." |
| योगपट उत्तरी देखा । तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका । पायी न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावे ॥ २४५ | काही विशिष्ट विधी करताना तर्जनीमध्ये चांदीची मुद्रिका असावी. विधीवेळी पादुका घालू नयेत. |
| नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती । पापे त्यासी न लागती । एखादे रत्न असता हाती । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥ २४६ | "ज्याच्या हातात नवरत्नांची अंगठी असते, त्याला पापे लागत नाहीत. ब्राह्मणासाठी हातात किमान एक रत्न असणे पवित्र मानले जाते." |
| प्रातःसंध्येच विधान । सांगेन ऐका ऋषिजन । नक्षत्र असतांचि प्रारंभून । अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥ २४७ | प्रात:संध्येचा विधी आकाशात तारे असताना सुरू करावा आणि सूर्य उगवताना अर्घ्य द्यावे. |
| सूर्योदय होय तव । जप करीत उभे असावे । उदयसमयी अर्घ्य द्यावे । तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥ २४८ | "सूर्योदयापर्यंत गायत्री मंत्राचा जप करत उभे राहावे. सूर्य उगवतानाच अर्घ्य द्यावे, त्यापूर्वी दिलेले अर्घ्य व्यर्थ ठरते." |
| ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी । विस्तारोनि आम्हांसी । सांगावे जी स्वामिया ॥ २४९ | "ऋषींनी पराशरांना विचारले, स्वामी, संध्येचा संपूर्ण विधी आम्हाला विस्ताराने सांगा." |
| श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । सांगेन संध्याविधिसी । ऐका तुम्ही तत्परेसी । पराशरस्मृतीसी असे ॥ २५० | "श्रीगुरु ब्राह्मणाला म्हणाले, मी तुला पराशर स्मृतीमधील संध्येचा विधी सांगतो, लक्ष देऊन ऐक." |
| गायत्रीमंत्र जप करिता । शिखा बांधावी तत्त्वता । आसन घालावे निरुता । दर्भपाणि होउनी ॥ २५१ | "गायत्री जप करण्यापूर्वी शिखा बांधावी, व्यवस्थित आसन घालावे आणि हातात दर्भ धरावेत." |
| देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम स्मरोन । प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥ २५२ | "दोनदा आचमन करावे, विष्णूचे स्मरण करावे आणि त्यानंतर न्यास व प्राणायाम करावा." |
| प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री नाम छंदासी । परमात्मा देवता परियेसी । म्हणा प्राणायामे विनियोगः ॥ २५३ | "प्राणायामाचा संकल्प करताना ॐ चा ऋषी परब्रह्म, छंद गायत्री आणि देवता परमात्मा आहे असे म्हणावे." |
| ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया । व्याह्रति सप्त अतिशया । प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥ २५४ | "सात व्याहृतींचे उच्चार करत नाभी, हृदय आणि मस्तकाला स्पर्श करावा." |
| व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका असे प्रजापति ऋषि । प्रत्येक देवता परियेसी । सप्त नामे देवांची ॥ २५५ | सात व्याहृतींचे ऋषी 'प्रजापती' आहेत आणि त्यांच्या सात स्वतंत्र देवता आहेत. |
| अग्निर्वायु गुरुः सूर्य । वरुणेंद्र विश्वदेव । सप्त व्याह्रति सप्त देव । छंद सप्त सांगेन ॥ २५६ | "अग्नी, वायू, गुरु, सूर्य, वरुण, इंद्र आणि विश्वेदेव या सात देवतांचे स्मरण करावे." |
| गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप् बृहती पंक्ति पंचम ऐका । त्रिष्टुप् जगती छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥ २५७ | प्राणायामासाठी गायत्रीपासून जगतीपर्यंतच्या सात छंदांचा विनियोग करावा. |
| ॐ भूः पादन्यास । ॐ भुवः जानु स्वः गुह्य । ॐ महः नाभि स्थान स्पर्शा । जनो ह्रदय तपो कंठ ॥ २५८ | "शरीरावर न्यास करावा: भू: - पाय, भुव: - गुडघे, स्व: - गुह्येंद्रिय, मह: - नाभी, जन: - हृदय, तप: - कंठ." |
| ॐ भू र्ह्रदयाय नम इति । ॐ भुवः शिरसे स्वाहेति । ॐ स्वः शिखायै वषडिति । ॐ तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ॥ २५९ | हृदय, शिर आणि शिखेवर 'नम:', 'स्वाहा' आणि 'वषट्' मंत्रांनी न्यास करावा. |
| ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय वोषट् । धियोयोनः प्रचोदयात् अस्त्राय फट् । ॐ भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग करावे ॥ २६० | डोळ्यांना 'वोषट्' आणि अस्त्रासाठी 'फट्' म्हणून न्यास करावा. याला 'षडंग न्यास' म्हणतात. |
| प्राणायामे विनियोगः म्हणुनि । आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो जिव्हामृतललाटे ॥ २६१ | प्राणायाम करताना स्तन, नेत्र, जिव्हा आणि ललाटाला स्पर्श करून देवतांचे ध्यान करावे. |
| प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणती ऋषि । देवतानामे परियेसी । ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥ २६२ | प्राणायामाचे ऋषी प्रजापती असून ब्रह्मा, अग्नी, वायू आणि सूर्य या देवता आहेत. |
| ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जप कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥ २६३ | 'ॐ भूर्भुव: स्व:' म्हणत तीन प्राणायाम करावेत. गायत्री जपाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. |
| गायत्रीची अधिदेवता । ब्रह्माग्निवायु सविता । ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त लोकन्यास सांगेन ॥ २६४ | गायत्रीची अधिदेवता ब्रह्मा, अग्नी, वायू आणि सूर्य असून ऋषी ब्रह्मा आहेत. |
| पादन्यास भुर्लोक । भुवः जानु अतिविशेख । स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास महर्लोक ॥ २६५ | पायांना भूलोक, गुडघ्यांना भुव:लोक, गुह्येंद्रियाला स्व:लोक आणि नाभीला महर्लोक मानावे. |
| जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे सत्यलोक म्हणावे । ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक म्हणती तयासी ॥ २६६ | हृदयाला जनलोक, कंठाला तपलोक आणि कपाळाला सत्यलोक मानून न्यास करावा. |
| गायत्रीची प्रार्थना करूनि । प्राणायाम करा विधींनी । ब्रह्मचारी गृहस्थानी । पंचांगुली धरा परमेष्ठी ॥ २६७ | गायत्रीची प्रार्थना करून ब्रह्मचारी आणि गृहस्थांनी पाचही बोटांनी नाक धरून प्राणायाम करावा. |
| वानप्रस्थ संन्यासी यती । अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी । ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे चढवावे ॥ २६८ | संन्याशांनी अंगठा, अनामिका आणि करंगळीने उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. |
| वामनासापुटी विसर्जोनि । करा प्राणायाम तिन्ही । येणेचि विधी करा मुनि । त्रिकालसंध्या कर्मै ॥ २६९ | डाव्या नाकपुडीने श्वास सोडावा. अशा प्रकारे तीन प्राणायाम करून त्रिकाल संध्या करावी. |
| आता करावे मार्जनेसी । सांगेन ऐका समस्त ऋषि । जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी । तेणे विधी सांगतो ॥ २७० | "आता 'मार्जन' विधी (शरीरावर पाणी शिंपडणे) कसा करावा, ते सांगतो." |
| आपोहिष्ठेति सूक्तेसी । सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी । आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥ २७१ | 'आपोहिष्ठा' सूक्ताचा विनियोग करून सिंधूद्विप ऋषींचे स्मरण करावे. |
| येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे करा मार्जन । यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले पाद प्रोक्षावे ॥ २७२ | दर्भाने अंगावर पाणी शिंपडावे आणि 'यस्य क्षयाय' मंत्राने पायावर प्रोक्षण करावे. |
| आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे आपुल्या शिरसी । सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक प्राशन करावे ॥ २७३ | 'आपोजनयथा' मंत्राने डोक्यावर आणि 'सूर्यश्च' मंत्राने आचमन करावे. |
| हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन करावे परियेसी । द्रुपदादिवेति मंत्रेसी । घ्राणोनि उदक सोडावे ॥ २७४ | मार्जन करून पाण्याचा वास घेऊन ते डाव्या बाजूला सोडावे. |
| आचमने करोनि दोन । मार्जनविधान सांगेन । वामहस्ती पात्र धरून । मार्जन करा विशेषी ॥ २७५ | "दोन आचमने करून, डाव्या हातात पाण्याचे पात्र धरून मार्जन करावे." |
| औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही असे पवित्र । ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती उदक बरवे ॥ २७६ | "तांबे, सोने, चांदी किंवा लाकडाचे पात्र मार्जनासाठी पवित्र मानले जाते." |
| मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न पात्र ते जाण अपवित्र । ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ २७७ | मातीचे किंवा दोन तोंडे असलेले पात्र अपवित्र असून ते देवकार्यात वापरू नये. |
| मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी अष्ट पादे नवका । यस्य क्षयाय स्नान भुमिका । येणेपरी मार्जन ॥ २७८ | डोक्यावर ८ वेळा आणि पायावर ९ वेळा मार्जन करावे. |
| आपः पुनन्तु मंत्रेसी । प्राशनोदक माध्याह्नेसी । अग्निश्चेति मंत्रेसी । सायंसंध्या करावी ॥ २७९ | दुपारी 'आप: पुनन्तु' आणि संध्याकाळी 'अग्निश्च' मंत्राने आचमन करावे. |
| प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका । आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक आचमन करावे ॥ २८० | पाणी प्राशन केल्यावर दोनदा आचमन करावे आणि पाण्याचा वास घेऊन पुन्हा एक आचमन करावे. |
| अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन । गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य द्यावे मनोभावे ॥ २८१ | अर्घ्य देताना दोन्ही हात गाईच्या शिंगासारख्या आकारात जोडून पाणी सोडावे. |
| गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावी तिन्ही । हंसःशुचिषेति माध्याह्नी । अर्घ्य द्यावे अवधारा ॥ २८२ | सकाळी व संध्याकाळी गायत्री मंत्राने ३ अर्घ्ये आणि दुपारी 'हंस: शुचिषत्' मंत्राने अर्घ्य द्यावे. |
| प्रातर्माध्याह्नी उभे बरवे । सायं अर्घ्य बैसोनि द्यावे । आचमन त्रिवारी करावे । करी प्रदक्षिणा असावादित्य ॥ २८३ | सकाळी व दुपारी उभे राहून, संध्याकाळी बसून अर्घ्य द्यावे व स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. |
| अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन कथा विस्तारोन । राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेती देखा ॥ २८४ | अर्घ्य का द्यावे याची कथा: 'मंदेह' नावाचे ३० कोटी राक्षस सूर्याशी युद्ध करतात. |
| सूर्यासवे युद्धासी । नित्य येतीपरियेसी । संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥ २८५ | या राक्षसांमुळे सूर्याचा पराभव होईल अशी भीती देवांना वाटू लागली. |
| अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान न होय परियेसी । कर्मै न चालती ब्राह्मणांसी । स्वाहास्वधाकार न चाले ॥ २८६ | "जर सूर्य पराभूत झाला, तर सृष्टीचे नियम थांबतील आणि धार्मिक कर्मे होणार नाहीत." |
| स्वाहास्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास होती । सृष्टि राहिली न होय उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥ २८७ | "देवांना यज्ञभाग मिळणार नाही आणि सृष्टी नष्ट होईल, म्हणून अर्घ्य देण्याचा उपाय शोधला." |
| याचि कारणे अर्घ्य देती । तीचि वज्रायुधे होती । जावोनि दैत्यांसी लागती । पराभविती प्रतिदिवसी ॥ २८८ | ब्राह्मणांनी दिलेले अर्घ्य हे 'वज्र' बनून राक्षसांना लागते आणि त्यांचा नाश करते. |
| दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष । प्रदक्षिणा करिता होय नाश । असावादित्य म्हणोनिया ॥ २८९ | हे दैत्य ब्रह्मवंशी असल्याने त्यांना मारल्याचा दोष लागू नये, म्हणून प्रदक्षिणा घालून 'असावादित्य' म्हणावे. |
| ब्रह्महत्येचिया पातकासी । भूमिप्रदक्षिणा दोष नाशी । चार पावले फिरता कैसी । भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥ २९० | संध्येच्या वेळी घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेइतकी पुण्यकारक असते. |
| संध्या करावयाचे स्थान । सांगेन ऐका फलविधान । घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥ २९१ | घरी संध्या केल्यास १ पट पुण्य मिळते. |
| दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शताधिका । पुष्करतीरी सहस्त्र ऐका । गंगासुरनदी कोटिफल ॥ २९२ | "गावाबाहेर १० पट, नदीकाठी १०० पट आणि गंगाकाठी कोटी पट फळ मिळते." |
| सुरापान दिवा मैथुन । अनृतादि वाक्ये पापे जाण । संध्या बाहेर करिता क्षण । जळती दोष तात्काळी ॥ २९३ | घराबाहेर संध्या केल्यास महापापेही नष्ट होतात. |
| स्थाने असती जप करावयासी । विस्तारे सांगेन तुम्हासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्ते परियेसा ॥ २९४ | "जप करण्यासाठी कोणती स्थाने श्रेष्ठ आहेत, ते ऐका." |
| जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे देखा । बाहेर द्विगुणी फल अधिका । नदीतीरी त्रिगुण फल ॥ २९५ | "घरी जपाचे १ पट, बाहेर २ पट आणि नदीकाठी ३ पट फळ मिळते." |
| गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल अधिका । अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल अधिक असे ॥ २९६ | गोठ्यात १० पट आणि अग्निहोत्राच्या ठिकाणी १०० पट फळ मिळते. |
| तीर्थदेवता सन्निधानी । सहस्त्रफल असे निर्गुणी । शतकोटि फल हरिसन्निधानी । ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥ २९७ | "मंदिरात १००० पट, विष्णूपाशी १०० कोटी आणि शिवापाशी अनंत फळ मिळते." |
| जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे परियेसी । सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप बोलिले असे ॥ २९८ | "जप करण्यासाठी कोणत्या आसनाचा वापर करावा, याचे नियम आहेत." |
| काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता मनोहरी । दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष तो होय ॥ २९९ | नुसत्या लाकडी पाटावर बसून जप केल्यास दुःख प्राप्त होते. |
| पल्लवशाखांसी बसता । सदा होय दुश्चिता । वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी व्याधि होय ॥ ३०० | पानांवर बसल्यास चित्त विचलित होते, कापडावर दरिद्रता येते आणि दगडावर व्याधी जडतात. |
| भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी सुखसंतोष । कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥ ३०१ | "भस्मावर रोगनाश, घोंगडीवर सुख, मृगाजिनावर ज्ञान आणि व्याघ्रचर्मावर मोक्ष मिळतो." |
| कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे उपहरण । पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा अधिक होय ॥ ३०२ | "कुशासनावर वशीकरण शक्ती मिळते, रोग-पापे नष्ट होतात आणि आयुष्य वाढते." |
| ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा तुम्ही पवित्री । ध्यान करावे गायत्री । समस्त पापे हरती देखा ॥ ३०३ | 'ॐ' जपून गायत्रीचे ध्यान करावे, त्याने सर्व पापे नष्ट होतात. |
| गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन असे वर्णिता । रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन असे देखा ॥ ३०४ | "गायत्रीचे स्वरूप: शरीर आणि वस्त्रे लाल असून, हंस हे वाहन आहे." |
| अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा । कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करी ॥ ३०५ | "ब्रह्मा ही अधिदेवता असून चार हात व तोंडे आहेत. हातात कमंडलू, जपमाळ आणि पळी आहे." |
| ऋग्वेद असे समागमी । अग्निहोत्रफल आवाहयामि । मग आयातु वरदा देवी । म्हणावे ऐका ब्राह्मणाने ॥ ३०६ | ती ऋग्वेदासह येते. 'आयातु वरदा देवी' म्हणून तिचे स्वागत करावे. |
| त्या मंत्रासी ऋषि देवता । गायत्रीसदृश असे ख्याता । प्रातःसंध्या तुम्ही करिता । विधि तुम्हा सांगेन ॥ ३०७ | प्रातःसंध्येच्या वेळी पाळावयाचा विधी आता सांगतो. |
| गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदः । ॐ आदित्य देवता देवा । हे प्रातःसंध्या म्हणता भेद । गायत्री देवता गायत्री छंदः ॥ ३०८ | प्रातःसंध्येसाठी गायत्री देवता आणि गायत्री किंवा अनुष्टुप छंद असतो. |
| गायत्री आवाहने विनियोगः । ही माध्याह्नसंध्या म्हणावी । सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती आवाहने विनियोगः ॥ ३०९ | माध्याह्न संध्येसाठी 'सविता' देवता आणि 'सरस्वती' रूपाचे आवाहन करावे. |
| प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन । रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ असे ॥ ३१० | "प्रातःसंध्येचे ध्यान: लाल शरीर, लाल वस्त्र आणि हंसावर आरूढ झालेली माता." |
| चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु धरिला विशेखी । अक्षसूत्र चाटु हस्तकी । ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥ ३११ | चार हात, चार तोंडे आणि ऋग्वेदाचे प्रतीक असलेली ही माता तेजस्वी दिसते. |
| ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे अक्षरज्ञानी । एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ३१२ | असे ध्यान करून एकाग्र चित्ताने मंत्राचा जप करावा. |
| ओंकार शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामी । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३१३ | 'ॐ' काराने शिखा, छंद, ऋषी, लक्ष्मी आणि बलाचे आवाहन करावे. |
| ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या करावी सुवेळी । आता सांगेन माध्याह्नकाळी । ध्यान आवाहनपूर्वक ॥ ३१४ | सकाळी अशी संध्या करून आता माध्याह्न संध्येचे ध्यान सांगतो. |
| अभिभुरो सावित्रीध्यान । यौवनस्था माध्याह्न । सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते परियेसा ॥ ३१५ | दुपारी माता 'सावित्री' रूपातील असून ती तरुण रूपात असते. |
| श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन असे वृषभ पवित्र । उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥ ३१६ | "पांढरा वर्ण, नंदी वाहन आणि पाच तोंडे असलेला रुद्र ही तिची देवता आहे." |
| वरद अभयहस्त देखा । रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका । यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥ ३१७ | तिच्या हातात रुद्राक्षमाळा व त्रिशूळ असून हे यजुर्वेदाचे रूप 'अग्निष्टोम' यज्ञाचे फळ देते. |
| ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि ॥ ३१८ | ओंकाराने शिखा, ऋषी, लक्ष्मी आणि लज्जेचे आवाहन करावे. |
| आता सायंसंध्या ध्यान । सांगेन ऐका विधान । एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥ ३१९ | "आता सायंसंध्येचे ध्यान सांगतो, ते लक्ष देऊन ऐका." |
| अभिभूत सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सायंसंध्या । कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना । गरुडवाहन असे देखा ॥ ३२० | संध्याकाळी माता 'सरस्वती' रूपातील वृद्ध असून काळा वर्ण व गरुड वाहन असते. |
| मकार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता । गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥ ३२१ | "हे 'म' कार रूप असून विष्णू देवता आहे. ती हातात शंख, चक्र धारण केलेली आहे." |
| वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे ध्यान । करावे ऐका तुम्ही ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥ ३२२ | सायंसंध्येचा जप केल्याने 'वाजपेय' यज्ञाचे फळ मिळते. |
| ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि । श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३२३ | सायंसंध्येवेळी ओंकाराने श्री आणि बलाचे आवाहन करावे. |
| पंचशीर्षोपनयने विनियोगः । प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । गायत्री छंदः ॥ ३२४ | गायत्री मंत्राच्या पाच शिरांच्या विनियोगासाठी ऋषी परब्रह्म व देवता परमात्मा आहे. |
| उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप् जगती छंदः । ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः । ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥ ३२५ | यात अग्नी-वायू-सूर्य आणि ब्रह्मा-विष्णू-महेश या देवता सामावलेल्या आहेत. |
| आहवनीयाग्निगार्हपत्य । दक्षिणाग्निउपस्थानानि । पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥ ३२६ | तिन्ही अग्नी आणि तीन लोक (पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग) यात समाविष्ट आहेत. |
| पीतविद्युतश्वेतवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि । विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी । जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥ ३२७ | ती जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांची स्वामिनी आहे. |
| ऐसे त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी । आता विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्ते ॥ ३२८ | अशा प्रकारे गायत्रीचे तीन काळांतील ध्यान सांगितले. आता जपाचा विधी ऐका. |
| ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः । ॐ अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे ॥ ३२९ | ईश्वराच्या प्रीतीसाठी जपाचा संकल्प करून नाभी, हृदय व कंठावर न्यास करावा. |
| भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी । अग्निर्देवता परिएय्सी । विश्वामित्र ऋषि देखा ॥ ३३० | 'भू:' या व्याहृतीचे ऋषी विश्वामित्र, छंद गायत्री आणि देवता अग्नी आहे. |
| षड्ज स्वर श्वेत वर्ण । पादस्पर्श उच्चारोन । प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याह्रति म्हणावी ॥ ३३१ | पांढरा वर्ण असून पायाला स्पर्श करून दुसरी व्याहृती म्हणावी. |
| भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक् नाम छंदासी । वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि असे जाण ॥ ३३२ | 'भुव:' या व्याहृतीचे ऋषी भृगु, छंद उष्णिक आणि देवता वायू आहे. |
| असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श रूप उच्चारोन । करा तुम्ही ऐसे ध्यान । जानूमध्ये न्यासावे ॥ ३३३ | याचा वर्ण सावळा असून गुडघ्यांवर न्यास करावा. |
| प्राणायाम विनियोग म्हणोनि । न्यास करावे भक्तिभावनी । स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान करा भक्तीने ॥ ३३४ | आता 'स्व:' या व्याहृतीचे ध्यान भक्तीने करावे. |
| स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप् छंदासी । सविता देवता परियेसी । भारद्वाज ऋषि जाण ॥ ३३५ | 'स्व:' चे ऋषी भारद्वाज, छंद अनुष्टुप आणि देवता सूर्य आहे. |
| स्वर गांधार पीतवर्णा । कंठी स्पर्शोन मंत्र म्हणा । प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याह्रतिमंत्रासी ॥ ३३६ | याचा वर्ण पिवळा असून कंठाला स्पर्श करून हा मंत्र म्हणावा. |
| ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी । बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ ऋषि निर्धारे ॥ ३३७ | 'मह:' चे ऋषी वसिष्ठ, छंद बृहती आणि देवता बृहस्पती आहे. |
| मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा तुम्ही ध्यान । वेगे म्हणा नाभी स्पर्शोन । प्राणायामे विनियोगः ॥ ३३८ | याचा वर्ण तांबूस असून नाभीला स्पर्श करून हा न्यास करावा. |
| जन मंत्र उच्चारासी । म्हणा पंक्ति छंदासी । वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर असे जाण ॥ ३३९ | 'जन:' चे ऋषी गौतम, छंद पंक्ती आणि देवता वरुण आहे. |
| रूप असे नीलवर्ण । करा न्यास ह्रदयस्थान । प्राणायामे विनियोगून । जनः पंच न्यास ऐसे ॥ ३४० | याचा वर्ण निळा असून हृदयावर न्यास करावा. |
| तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप् छंद परियेसी । ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत स्वर परियेसा ॥ ३४१ | 'तप:' चे ऋषी कश्यप, छंद त्रिष्टुप आणि देवता ईश्वर आहे. |
| असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे कंठस्थान । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मणहो ॥ ३४२ | याचा वर्ण लोखंडासारखा धूसर असून कंठाला स्पर्श करून न्यास करावा. |
| सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे जगती छंदासी । विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद स्वर जाणावा ॥ ३४३ | 'सत्यम्' चे ऋषी अंगिरस, छंद जगती आणि देवता विश्वेदेव आहे. |
| रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा स्पर्शून । प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तीने ॥ ३४४ | याचा वर्ण सोन्यासारखा असून कपाळावर न्यास करावा. |
| इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा शिरस्थानी । ध्यान करा विधींनी । सांगेन ऐका ब्राह्मणहो ॥ ३४५ | हे सर्व न्यास झाल्यावर डोक्यावर हात ठेवून पुढील ध्यान करावे. |
| शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप् छंदासी । उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाण ॥ ३४६ | मस्तकाला स्पर्श करताना ऋषी प्रजापती व देवता परमात्मा मानावे. |
| प्राणायामे विनियोगून । मग करावे गायत्रीध्यान । ॐ आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा भक्तीने ॥ ३४७ | त्यानंतर 'ॐ आपोज्योति...' या मंत्राने भक्तीने ध्यान करावे. |
| ॐ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःस्वरो । शिरसी येणे विधी । अंगन्यास करावे ॥ ३४८ | या मंत्राने मस्तकावर अंगन्यास करावा. |
| चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास सांगेन एकाएकासी । एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर ऋषि तो ॥ ३४९ | गायत्री मंत्रातील २४ अक्षरांचे स्वतंत्र न्यास आता पराशर ऋषी सांगत आहेत. |
| या त्रिपदा गायत्रीसी । असे विश्वामित्र ऋषि । देवी गायत्री छंदेसी । वर्ण देवता सांगेन ॥ ३५० | गायत्री मंत्राचे ऋषी विश्वामित्र आणि छंद गायत्री आहे. |
| ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चोवीस अक्षरे परियेसी । पृथक् न्यास परियेसी । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥ ३५१ | २४ अक्षरांचे वेगवेगळे विधी लक्षपूर्वक ऐका. |
| तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अग्नि देवता परियेसी गायत्री छंद म्हणावा ॥ ३५२ | 'त' अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता अग्नी आणि छंद गायत्री आहे. |
| अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप वर्ण असे परियेसी । वायव्य कोण स्थान त्यासी । गुल्फन्यास करावा ॥ ३५३ | याचा वर्ण अंबाडीच्या फुलासारखा असून घोट्यावर न्यास करावा. |
| त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वायुदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥ ३५४ | 'त्स' अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता वायू आणि छंद गायत्री आहे. |
| जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप पिवळे सुरस । सर्व पापे दहती परियेस । त्सवर्णाचे लक्षण ॥ ३५५ | पायांच्या नडगीवर न्यास करावा. हे अक्षर सर्व पापे जाळून टाकते. |
| विवर्णनाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥ ३५६ | 'वि' अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता सोम आणि छंद गायत्री आहे. |
| न्यास करावया जानुस्थान । इंद्रनील विद्युद्वर्ण । ऐसे अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥ ३५७ | गुडघ्यावर न्यास करावा. हे अक्षर मोठे रोग दूर करते. |
| तुवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । विद्युद्देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥ ३५८ | 'तु' अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता वीज आणि छंद गायत्री आहे. |
| न्यास करा जानुस्थानी । दीप्ति असे जैसा वह्नि । रूप असे सौम्यपणी । भ्रूणहत्यापाप नाशी ॥ ३५९ | गुडघ्यावर न्यास करावा. हे अक्षर भ्रूणहत्येसारखे पाप नष्ट करते. |
| र्वर्णनाम अक्षरासी । विश्वामित्र ऋषि परियेसी । अश्विनीदेवता परियेसी । देवी गायत्री छंद म्हणावा ॥ ३६० | 'व' (वरेण्यं मधील) अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता अश्विनीकुमार आणि छंद गायत्री आहे. |
| र्ववर्ण अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । सोम देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥३६१॥ | 'र्व' (वरेण्यं मधील) अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता सोम (चंद्र) आणि छंद गायत्री आहे. |
| सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी न्यास बोलती । समस्त अघौघ नाशती । रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥३६२॥ | स्फटिकासारखी कांती असलेल्या या अक्षराचा न्यास गुह्यस्थानी करावा, त्याने सर्व पापांचा समूह नष्ट होतो. |
| रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वरुण देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥३६३॥ | 'रे' अक्षराचे ऋषी विश्वामित्र, देवता वरुण और छंद गायत्री आहे. |
| णिकार वृषणस्थान जाणा । विद्युत्प्रकाशरूपधारणा । बार्हस्पत्यनाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥३६४॥ | 'णि' अक्षराचा न्यास जननेंद्रियावर करावा. विजेसारखा प्रकाश असलेल्या या अक्षरामुळे अभक्ष्य भक्षणाचे पाप धुऊन जाते. |
| णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । बृहस्पति देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥३६५॥ | या 'णि' अक्षराची देवता बृहस्पती (गुरु) आहे. |
| यं कटिस्थान शांताकारवर्ण । देहहत्यापापज्वलन । न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥३६६॥ | 'यं' अक्षराचा न्यास कमरेवर (कटिस्थान) करावा. हे शांत स्वरूपाचे अक्षर देहहत्येचे पाप जाळून टाकते. |
| यं अक्षर म्हणावयासी । असे विश्वामित्र ऋषि । तारका दैवत परियेसी । देवी गायत्री छंद असे ॥३६७॥ | 'यं' अक्षराची देवता 'तारका' आहे. |
| भकारा नाभी करा न्यास । कृष्णमेघवर्ण सुरस । पर्जन्य देवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥३६८॥ | 'भ' (भर्गो मधील) अक्षराचा न्यास नाभीवर करावा. काळ्या ढगांसारखा वर्ण असलेली याची देवता पर्जन्य असून, ते गुरुहत्येचे पाप नष्ट करते. |
| भवर्ण नाम अक्षरासी । असे विश्वामित्र ऋषि । पर्जन्य देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३६९॥ | या अक्षराचा विधी विश्वामित्र ऋषींनी सांगितला आहे. |
| र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस । इंद्र देवता परियेस । गोहत्येचे पाप जाय ॥३७०॥ | 'र्गो' अक्षराचा न्यास पोटावर करावा. लाल रंगाचे हे अक्षर असून याची देवता इंद्र आहे; याने गोहत्येचे पाप जाते. |
| गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । इंद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३७१॥ | या अक्षराचा छंद गायत्री आहे. |
| देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम देव परियेसी । स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते परियेसा ॥३७२॥ | 'दे' (देवस्य मधील) अक्षराचा न्यास स्तनांवर करावा. गंधर्व ही याची देवता असून स्त्रीहत्येचे पाप याने नष्ट होते. |
| देवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । गंधर्व देवता परियेसी । देवी गायत्री छंद देखा ॥३७३॥ | हे अक्षर शुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. |
| वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल रूप वर्ण परियेस । पूषा देवता असे त्यास । वाणीजातपाप नाशी ॥३७४॥ | 'व' अक्षराचा न्यास हृदयावर करावा. पांढऱ्या रंगाचे हे अक्षर असून पूषा (सूर्य) ही देवता आहे; याने वाणीने घडलेली पापे नष्ट होतात. |
| ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३७५॥ | या अक्षराची देवता रुद्र मानली जाते. |
| स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण रूप सुरस । मित्र देवता परियेस । मार्जारकुक्कुटपाप जाय ॥३७६॥ | 'स्य' अक्षराचा न्यास कंठावर करावा. सोन्यासारख्या वर्णाची याची देवता 'मित्र' असून क्षुद्र प्राण्यांच्या हत्येचे पाप याने जाते. |
| स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । मित्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३७७॥ | या अक्षराचा विधी शास्त्रोक्त करावा. |
| धीकाराक्षरमंत्र दंती न्यास । शुक्लकुमुदसंकाश । त्वष्टा देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥३७८॥ | 'धी' (धीमहि मधील) अक्षराचा न्यास दातांवर करावा. याची देवता 'त्वष्टा' असून पितृहत्येचे पाप याने नष्ट होते. |
| धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाण ॥३७९॥ | या अक्षराची मुख्य देवता विष्णू आहे. |
| मकारन्यास तालुस्थान । पद्म तेजोमय जाण । वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥३८०॥ | 'म' अक्षराचा न्यास टाळूवर करावा. कमलासारखे तेजस्वी असलेल्या या अक्षराची देवता वासुदेव असून, सर्व जन्मांची पापे याने जातात. |
| मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । वासुदेव देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३८१॥ | हे अक्षर मोक्षदायी आहे. |
| हिकार नासिकी करा न्यास । शंखवर्ण असे त्यास । वासुदेव देवता परियेस । सर्व पाप हरण होय ॥३८२॥ | 'हि' अक्षराचा न्यास नाकावर करावा. शंखासारख्या शुभ्र वर्णाचे हे अक्षर सर्व पाप हरण करते. |
| हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । मेरु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३८३॥ | याची देवता मेरू पर्वत मानली जाते. |
| धिकारा नेत्रस्थानी न्यास । पांडुरभास संकाश । सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥३८४॥ | 'धि' (धियो मधील) अक्षराचा न्यास डोळ्यांवर करावा. याची देवता सोम असून विवाहातील दोष किंवा पापे याने नष्ट होतात. |
| धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । सोमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३८५॥ | हे अक्षर दृष्टी सुखद करते. |
| योकाराक्षर मंत्रासी । भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी । रक्तगौरवर्ण रूपेसी । प्राणिवधपाप जाय ॥३८६॥ | 'यो' अक्षराचा न्यास दोन भुवयांच्या मध्ये करावा. याची देवता यम असून प्राण्यांच्या वधाचे पाप याने जाते. |
| योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा विश्वामित्र ऋषि । यमदेवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३८७॥ | हे यमदेवेतेचे अक्षर आहे. |
| योकार ललाटस्थानी न्यास । रूप रुक्मांभसंकाश । सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावे ॥३८८॥ | दुसऱ्या 'यो' अक्षराचा न्यास कपाळावर (ललाट) करावा; सुवर्णासारख्या तेजामुळे सर्व पापे नष्ट होतात. |
| योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि विश्वामित्र ऋषि । विश्वे देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३८९॥ | याची देवता 'विश्वेदेव' आहे. |
| नकारा उदित प्राङ्मुखा । सूर्यासमान तेज देखा । आश्विनौ देवता असे निका । विराजमान परियेसा ॥३९०॥ | 'न' अक्षराचा न्यास मुखावर करावा. सूर्यासारखे तेज असलेल्या या अक्षराची देवता अश्विनीकुमार आहे. |
| नकाराक्षर वर्णासी । जाणा विश्वामित्र ऋषि । अश्विनौ देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३९१॥ | हे अक्षर कांती वाढवते. |
| प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे । रूप असे नीलवर्ण । प्रजापति देवता जाण । विष्णुसायुज्य पाविजे ॥३९२॥ | 'प्र' (प्रचोदयात् मधील) अक्षराचा न्यास उजव्या बाजूला करावा. निळ्या रंगाचे हे अक्षर विष्णूचे सायुज्य देते. |
| प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । प्रजापति देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३९३॥ | याची देवता प्रजापती आहे. |
| चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया पश्चिम भागासी । कुंकुमरूपवर्ण त्यासी । सर्वदेवपदवी पाविजे ॥३९४॥ | 'चो' अक्षराचा न्यास पश्चिम बाजूला करावा. कुंकवासारख्या वर्णामुळे सर्व देवांच्या पदवीची प्राप्ती होते. |
| चोकार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्वामित्र ऋषि । सर्व देवता परियेसी । गायत्री देवी छंद जाणा ॥३९५॥ | याची देवता 'सर्वदेव' आहे. |
| दकाराक्षराचा उत्तरे न्यास । शुक्लवर्ण रूप सुरस । करावे तुम्ही ऐसे न्यास । कैलासपद पाविजे ॥३९६॥ | 'द' अक्षराचा न्यास उत्तर दिशेला (किंवा उत्तर भागावर) करावा, याने कैलास प्राप्त होते. |
| दकाराक्षर मंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । रुद्र देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३९७॥ | याची देवता रुद्र आहे. |
| याकार मूर्धास्थानी न्यास । सुवर्णरूप सुरस । ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥३९८॥ | 'या' अक्षराचा न्यास मस्तकाच्या मध्यभागी करावा, याने ब्रह्मलोकात निवास मिळतो. |
| यावर्णाक्षर मंत्रासी । असे विश्वामित्र ऋषि । ब्रह्म देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥३९९॥ | याची देवता ब्रह्मा आहे. |
| तकार न्यास शिखास्थानी । निरुपम वैष्णवभुवनी । विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥४००॥ | 'त्' या शेवटच्या अक्षराचा न्यास शिखेवर करावा, याने प्रत्यक्ष विष्णूचे रूप मिळून वैकुंठात वास होतो. |
| तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा विश्वामित्र ऋषि । विष्णु देवता परियेसी । देवी गायत्री छंद जाणा ॥४०१॥ | शेवटच्या अक्षराची देवता विष्णू आहे. |
| ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास करावे विधींसी । हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक न्यास करावे ॥४०२॥ | अशा प्रकारे २४ अक्षरांचे न्यास करून डोक्यावर हात ठेवून पुढील विधी करावा. |
| शिरस्थानी न्यासासी । म्हणावे अनुष्टुप् छंदासी । ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥४०३॥ | मस्तकावर हात ठेवून प्रजापती ऋषी आणि परमात्मा देवतेचे स्मरण करावे. |
| प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं आपोस्तन स्पर्शोनि । ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि । रसोजिह्वा न्यासावे ॥४०४॥ | प्राणायाम करून स्तन, नेत्र आणि जिभेला स्पर्श करून मंत्रांचे न्यास करावेत. |
| अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि स्पर्शोनि ऐसी । ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास करा येणे विधी ॥४०५॥ | 'अमृत' म्हणून कपाळाला आणि 'ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्' म्हणून मस्तकाला स्पर्श करावा. |
| इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि । व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळा ॥४०६॥ | हे सर्व झाल्यावर तीनदा गायत्री मंत्र म्हणून व्यापक न्यास आणि करशुद्धी करावी. |
| भुः० स्वः० विन्यसोनि । गायत्रीच्या दश पदांनी । दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण करावे ॥४०७॥ | गायत्रीच्या १० पदांनी १० बोटांवर न्यास करावेत. |
| अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका स्पर्शोनि । उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली न्यासावे ॥४०८॥ | अंगठ्यापासून करंगळीपर्यंत दोन्ही हातांच्या बोटांवर न्यास करावेत. |
| चोवीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी । तर्जनीमूलादारभ्येसी । कनिष्ठिकापर्यंत ॥४०९॥ | चोवीस अक्षरांचा न्यास तर्जनीपासून करंगळीपर्यंत क्रमाने करावा. |
| द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे न्यास सुनिश्चित । षडंगन्यास समस्त । प्रणवासहित करावे ॥४१०॥ | प्रत्येक हातावर १२-१२ अक्षरे आणि प्रणवासह (ॐ) षडंगन्यास करावा. |
| ॐ भूः हिरण्यात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥४११॥ | 'ॐ भू:' म्हणून अंगठ्याला आणि 'ॐ भुव:' म्हणून तर्जनीला नमस्काराचा न्यास करावा. |
| ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ॐ महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः । ॐ जनः, ॐ तपः ॐ सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः । प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥४१२॥ | मध्यमा, अनामिका आणि करंगळीवर अनुक्रमे सूर्य, ब्रह्मा आणि सत्य लोकांचे न्यास करून तळहातांना स्पर्श करावा. |
| ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां ह्रदयाय नमः । वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे स्वाहा । भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै वषट् । धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं ॥४१३॥ | हृदयाला 'नम:', डोक्याला 'स्वाहा', शिखेला 'वषट्' आणि कवचाला 'हुम्' असा न्यास करावा. |
| धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां अस्त्राय फट् । उभयहस्तांगुलिन्यासां कुर्यात् । अथ षडंगन्यासः ॥४१४॥ | नेत्रांना 'वौषट्' आणि अस्त्राला 'फट्' म्हणून न्यास पूर्ण करावा. |
| ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः । ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा । ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट् । ॐ महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥४१५॥ | प्राणांच्या विविध देवतांचा शरीराच्या अवयवांवर षडंगन्यास करावा. |
| ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट् । ॐ तत्स० ह्रदयाय नमः ॥४१६॥ | 'प्रचोदयात्' पर्यंत सर्व मंत्रांनी शरीराच्या विविध भागांना मंत्राग्नी द्यावा. |
| ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा ।भर्गोदेवस्य शिखायै वौषट् । धीमहि कवचाय हुं । धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट् । प्रचोदयात अस्त्राय फट् ॥४१७॥ | षडंगन्यासाचा हा विधी शुद्धीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे. |
| षडंगन्यास करोनि । अंगन्यास दशस्थानी । त्यांची नावे सांगेन कानी । एकचित्ते अवधारा ॥४१८॥ | षडंगन्यास झाल्यावर शरीराच्या १० मुख्य स्थानांवर अंगन्यास करावा. |
| पादजानुकटिस्थानी । नाभिह्रदयकंठभुवनी । तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी दशस्थान ॥४१९॥ | पाय, गुडघे, कंबर, नाभी, हृदय, कंठ, टाळू, नेत्र, कपाळ आणि मस्तक ही ती १० स्थाने आहेत. |
| गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी । दशस्थान अंगन्यासासी । तत्सवितुर्वरेण्येसी । भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥ | गायत्रीच्या १० पदांनुसार या १० स्थानांवर विधीपूर्वक न्यास करावा. |
| धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो सप्तम स्थान जाण । योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४२१॥ | 'धीमहि' हे सहावे, 'धियो' हे सातवे आणि 'यो' (यो न:) हे आठवे स्थान अंगन्यासासाठी वापरावे. |
| नकार नवम मंत्रस्थान । प्रचोदयात् दहावे जाण । अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥४२२॥ | 'न:' हे नववे आणि 'प्रचोदयात्' हे दहावे स्थान असून, याप्रमाणे दहा पदांचे अंगन्यास ब्राह्मणांनी करावेत. |
| चतुर्विशति अक्षरांसी । करावे अंगन्यासासी । पादांगुष्ठस्पर्श हर्षी । शिखादारभ्य न्यासावे ॥४२३॥ | गायत्रीच्या २४ अक्षरांचे न्यास पायाच्या अंगठ्यापासून शिखेपर्यंत (शेंडीपर्यंत) क्रमाने करावेत. |
| अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं गुल्फयोर्नमः । विं जंघर्योर्नमः । तुं जानुभ्यां नमः ॥४२४॥ | अंगठ्याला 'नम:', घोट्याला (गुल्फ) 'त्स' आणि गुडघ्याला 'तु' अक्षराने न्यास करावा. |
| व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय नमः । णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां नमः ॥४२५॥ | मांड्या (ऊरु), गुह्यस्थान आणि कमरेवर (कटि) संबंधित अक्षरांचे न्यास करावेत. |
| भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः । दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय नमः ॥४२६॥ | नाभी, पोट (उदर), स्तन आणि हृदयावर मंत्राक्षरांनी स्पर्श करून न्यास पूर्ण करावा. |
| स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो नमः । मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः ॥४२७॥ | कंठ, दात, टाळू (तालु) आणि नाकावर क्रमाने न्यास करावा. |
| धिं नेत्राभ्यां नमः । यों भ्रुवोर्मध्याय नमः । यों ललाटाय नमः । नः प्राङ्मुखाय नमः ॥४२८॥ | डोळे, दोन भुवयांच्या मध्ये, कपाळ आणि मुखाच्या दर्शनी भागावर न्यास करावा. |
| प्रं दक्षिणमुखाय नमः । चों पश्चिममुखाय नमः । दं उत्तरमुखाय नमः । यां मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट् ॥४२९॥ | दक्षिण, पश्चिम, उत्तर मुखाचे भाग, मस्तक आणि शिखेवर 'वषट्' म्हणून न्यास संपवावा. |
| ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ठ धरोनि । कटिपपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥ | हे न्यास झाल्यावर पुन्हा पायाच्या अंगठ्यापासून कमरेपर्यंत ऊर्ध्वन्यास (वरच्या दिशेने) करावेत. |
| तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार गुल्फ असे स्थान । विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु ॥४३१॥ | 'त' अंगठ्यावर, 'त्स' घोट्यावर आणि 'वि' जंघेवर न्यासावे असे श्रीगुरु सांगतात. |
| तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार गुह्यपूर्वक स्पर्श । णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार कटिस्थान न्यास ॥४३२॥ | गुडघे, मांड्या, गुह्येंद्रिय आणि कमरेवर अक्षरांचे स्थान निश्चित करून स्पर्श करावा. |
| शिखा धरोनि पादपर्यंत । करावे न्यास उतरत । त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते परियेसा ॥४३३॥ | आता शिखेपासून पायापर्यंत उतरत्या क्रमाने न्यास कसे करावेत, ते ऐका. |
| तं नमः शिकायै विन्यस्य । यां नमः मुर्ध्नि विन्यस्य । दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो नमः पश्चिमशिखायां ॥४३४॥ | शिखा, मस्तक आणि दिशांच्या क्रमाने अक्षरांचे विन्यास करावेत. |
| प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः प्राङ्मुखे । यो नमः ललाटे । यो नमः भ्रुवोर्मध्यी ॥४३५॥ | मुखाच्या बाजू, कपाळ आणि भ्रूमध्यावर मंत्राक्षरे न्यासावीत. |
| धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः नासिकयोः । मं नमः तालौ । धी नमः दंतेषु ॥४३६॥ | डोळे, नाक, टाळू आणि दात यांवर श्रद्धापूर्वक न्यास करावा. |
| स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये । दें नमः स्तनयोः । र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ ॥४३७॥ | कंठ, हृदय, स्तन, पोट आणि नाभी या स्थानांवर अक्षरांचा विन्यास करावा. |
| प्रणवादि नमोत न्यास करावे । आकार नाभी उकार ह्रदये । मकार मुखे नकार ललाटे । मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥४३८॥ | 'ॐ' (अ-उ-म) च्या अक्षरांचे नाभी, हृदय, मुख आणि मस्तकावर न्यास करून नमस्कार करावा. |
| अथ मुद्रासंपुटप्रकारी । चतुर्विशति अवधारी । सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥४३९॥ | आता गायत्री जपासाठी आवश्यक असलेल्या २४ मुद्रांचा विस्तार सांगतो. |
| सुमुखं संपुटं चैव विततं विस्तृतं तथा । द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥ | सुमुख, संपुट, वितत, विस्तृत, द्विमुख, त्रिमुख, चतुर्मुख आणि पंचमुख या मुद्रा आहेत. |
| षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं तथा । शकटं यमपाशं च ग्रंथितं चोल्मुकोल्मुकम ॥४४१॥ | षण्मुख, अधोमुख, व्यापकांजली, शकट, यमपाश, ग्रंथित आणि उन्मुख या मुद्रा आहेत. |
| प्रलंबं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहकम् । सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं पल्लवं तथा ॥४४२॥ | प्रलंब, मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह, सिंहाक्रांत, महाक्रांत, मुद्गर आणि पल्लव या उर्वरित मुद्रा आहेत. |
| एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत् । एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता ॥४४३॥ | ज्याला या मुद्रा माहित नाहीत, त्याचा गायत्री जप निष्फळ होतो. या मुद्रा केल्यास गायत्री प्रसन्न होते. |
| मुद्राविण गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ । या कारणे करावे पात्र । मुद्रापूर्वक जप करावा ॥४४४॥ | मुद्रांशिवाय जप करणे व्यर्थ आहे, म्हणून विधीपूर्वक मुद्रा करूनच जप करावा. |
| गौप्प्य करावा मुद्रायुक्त । प्राणायाम करा निश्चित । समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४४५॥ | जप गुप्तपणे (माळ झाकून) करावा. पापांच्या नाशासाठी किमान १०८ वेळा जपाचा संकल्प करावा. |
| या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ऋग्वेद असे ऋषि । भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा देवता त्रिष्टुप् छंद ॥४४६॥ | गायत्रीच्या पहिल्या पादाचे तत्त्व पृथ्वी, देवता ब्रह्मा आणि ऋषी ऋग्वेद आहे. |
| द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद असे ऋषि । रुद्रदेवता प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४४७॥ | दुसऱ्या पादाची देवता रुद्र असून ऋषी यजुर्वेद आहे. |
| गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः सामतत्त्व परियेसी । विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी । समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४४८॥ | तिसऱ्या पादाची देवता विष्णू असून, तिन्ही वेदांच्या तत्त्वाचा हा विनियोग पापांचा नाश करतो. |
| भूमिस्तंभ परियेसी । गायत्री छंदासी । म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा दैवत जाणावे ॥४४९॥ | गायत्री मंत्राला 'ब्रह्मपद' मानून ब्रह्मा देवतेची प्रार्थना करावी. |
| गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा विधान । एकचित्ते करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥ | आता गायत्री मातेचे मुख्य ध्यान कसे करावे, ते ऐका. |
| मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् । गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥४५१॥ | पाच मुखे, तीन डोळे, डोक्यावर चंद्रकोर आणि हातात शंख-चक्र-गदा धारण केलेल्या गायत्री मातेचे मी भजन करतो. |
| ऐसे ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्रनयनी । अंती षडंग न्यासोनि । जप करा येणेपरी ॥४५२॥ | असे ध्यान करून, नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवून आणि शेवटी षडंगन्यास करून जप करावा. |
| गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्ते परियेसा । मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे दोनी पाप हरे ॥४५३॥ | 'मंत्र' या शब्दातील दोन अक्षरेच पापांचे हरण करण्यासाठी पुरेशी आहेत. |
| मकार म्हणजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण । मन प्राण एकवटोन । जप करावा एकचित्ते ॥४५४॥ | 'म' म्हणजे मन आणि 'त्र' म्हणजे प्राण; मन आणि प्राण एकवटून जप करावा. |
| जप म्हणजे अक्षरे दोनी । प्रख्यात असती त्रिभुवनी । जकार जन्म विच्छेदोनि । पकारे जन्मपाप दुरी ॥४५५॥ | 'ज' मुळे जन्म-मृत्यूचे चक्र थांबते और 'प' मुळे जन्मांतरीची पापे दूर होतात. |
| चारी वेदांस मूळ एका । गायत्रीनाम नाशी पातका । याचि कारणे करावा निका । वेदपठणफळ असे ॥४५६॥ | गायत्री ही चारी वेदांची जननी आहे, तिचा जप केल्यास वेद पठणाचे फळ मिळते. |
| ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर । जप करा हो निर्धार । चिंतिले फल पाविजे ॥४५७॥ | जो मनुष्य गायत्री जप करत नाही, त्याचा जन्म डुकराप्रमाणे व्यर्थ आहे. जप केल्यास सर्व फळे मिळतात. |
| न करावा उदकी बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन । याचि कारणे सांगेन विस्तारोन । अग्नि तीनि विप्रमुखी ॥४५८॥ | पाण्यात बसून जप करू नये, त्याने बुद्धी कमी होते. ब्राह्मणाच्या मुखात तीन अग्नींचा वास असतो. |
| आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि तिसरा विख्यात । अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व जाय अग्नीचे ॥४५९॥ | अग्नी आणि पाण्याचा संपर्क झाल्यास अग्नीचे तेज कमी होते, तसेच पाण्यात जप केल्यास जपाचे तेज कमी होते. |
| या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे उत्तम आसनी । हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा माळ धरोनिया ॥४६०॥ | म्हणून कोरड्या जागी आसनावर बसून, हात नाभीपाशी ठेवून माळेने जप करावा. |
| उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि कीजे माध्याह्नीकाळी । अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी करावा ॥४६१॥ | सकाळी उभे राहून आणि दुपारी बसून जप करावा, असा नियम आहे. |
| माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा माळ धरोनि । हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी जपावा ॥४६२॥ | दुपारी माळ हृदयापाशी धरून आणि संध्याकाळी मुखाला स्पर्श करून जप करावा. |
| बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा वृक्ष निर्मळी । जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी जपावा ॥४६३॥ | संध्याकाळी बसून जप करावा. जवळ निर्मळ वृक्ष असल्यास तिकडे पहावे, अन्यथा नाकाच्या शेंड्याकडे पहावे. |
| ब्रह्मचारी गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी । वानप्रस्थ संन्यासी यासी । सहस्त्र मुख्य करावा ॥४६४॥ | गृहस्थांनी किमान १०८ आणि संन्याशांनी १००० वेळा जप करावा. |
| संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति तरी करी । अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा ॥४६५॥ | संकटात असल्यास २८ वेळा आणि अत्यंत अशक्त असल्यास किमान १० वेळा जप करावा. |
| उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य सुमुखेसी । अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ पुकार परियेसा ॥४६६॥ | मनातल्या मनात जप करणे सर्वोत्तम, ओठ हलवून करणे मध्यम आणि मोठ्याने ओरडून करणे कनिष्ठ होय. |
| त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसी । म्हणता होय महादोषी । महानरक अवधारा ॥४६७॥ | गायत्रीचे तिन्ही चरण एकत्र जोडून म्हणू नयेत, त्यात थोडा थांबा घ्यावा, अन्यथा दोष लागतो. |
| पृथक करोनि त्रिपदासी । जपा मंत्र अतिहर्षी । ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत पुण्य लाधिजे ॥४६८॥ | तीन पादांचा उच्चार स्वतंत्रपणे केल्यास ब्रह्महत्येसारखी पापेही नष्ट होतात. |
| अंगुष्ठजपे एक पुण्य । पर्वांगुलीने दशगुण । शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥४६९॥ | अंगठ्याने जप केल्यास १ पट, बोटांच्या पेरांनी १० पट आणि पोवळ्याच्या माळेने १००० पट फळ मिळते. |
| स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके पुण्य लक्षाधिक । पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष पुण्य असे ॥४७०॥ | स्फटिक माळेने १०,००० पट, मोत्यांच्या माळेने १ लाख पट आणि कमळगट्ट्याच्या माळेने १० लाख पट फळ मिळते. |
| कोटुगुणे सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला । जप करा नित्य काळा । गौप्यमाला धरोनिया ॥४७१॥ | सोन्याच्या माळेने कोटी गुण आणि दर्भ किंवा रुद्राक्षाच्या माळेने अनंत फळ मिळते. |
| गौप्यमाला करकमळी । जप करा निश्चली । सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाते ॥४७२॥ | माळ व गोमुखी हातात धरून स्थिर चित्ताने जप करावा. |
| जप करिता नुल्लंघिजे मेरु । उल्लंघिता पाप बोलिले अपारु । प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरुलंघनपाप जाय ॥४७३॥ | माळेचा मेरुमणी ओलांडू नये, तो ओलांडल्यास दोष लागतो. तसे झाल्यास ३ प्राणायाम करावेत. |
| गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही करावा एकादश । सर्व पातके होती नाश । त्रिरात्रीचे पाप जाय ॥४७४॥ | तीन दिवस रोज ठराविक संख्येने जप केल्यास सर्व पापे नष्ट होतात. |
| अष्टोत्तरशत जप करिता । अघोर पातक जाय त्वरिता । करोनि सहस्त्र जप एकाग्रता । उपपातके नासती ॥४७५॥ | १०८ जपाने घोर पापे आणि १००० जपाने उपपातके नष्ट होतात. |
| महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसी । जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥४७६॥ | महापापांच्या नाशासाठी १ कोटी जप करावा; याने इच्छापूर्तीही होते. |
| जप करावा मन दृढे । न पहावे मागे पुढे । शूद्रादिक यातीकडे । संभाषण न करावे ॥४७७॥ | जप करताना इकडे तिकडे पाहू नये आणि कोणाशीही बोलू नये. |
| द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता होय अनंतदोषी । चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे परियेसा ॥४७८॥ | पैसे घेऊन दुसऱ्यासाठी जप केल्यास दोष लागतो आणि पुढचा जन्म नीच योनीत मिळतो. |
| कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी इतुके घडले । श्रोत्राचमन करा वहिले । दोष नाही अवधारा ॥४७९॥ | जप करताना शरीर खाजवू नये, चुकून तसे झाल्यास उजव्या कानाला स्पर्श करून आचमन करावे. |
| ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त देवता ऐका निर्गुणी । स्पर्श करिता तत्क्षणी । पापे जाती परियेसा ॥४८०॥ | ब्राह्मणाच्या उजव्या कानात सात देवतांचा वास असतो, त्याला स्पर्श केल्यास शुद्धी प्राप्त होते. |
| दृष्टी पडता चांडाळासी । द्विराचमने शुद्ध होसी । संभाषण झालिया पतितासी । आचमनस्नान करावे ॥४८१॥ | जप करताना चांडाळावर दृष्टी पडल्यास दोनदा आचमन करावे आणि पापी माणसाशी संभाषण झाल्यास स्नान करून आचमन करावे. |
| जपता निद्रा येई जरी । अधोवायु जांभई आलियावरी । क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे अवधारा ॥४८२॥ | जप करताना झोप, जांभई, अपानवायू किंवा क्रोध आल्यास तो जप निष्फळ ठरतो. |
| मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये बोलिजे संधिविषयी । तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं । पापे जाती सकळिक ॥४८३॥ | जप करताना मौन पाळणे उत्तम, पण अत्यंत आवश्यक असल्यास बोलल्यानंतर 'तद्विष्णो:' हा मंत्र म्हणावा, त्याने दोष दूर होतो. |
| नेणता घडे इतुके जरी । आचमन करावे श्रोत्री । अग्नि सूर्यधेनुदर्शन करी । विष्णुमंत्र जपावा ॥४८४॥ | काही चूक घडल्यास उजव्या कानाला स्पर्श करून आचमन करावे किंवा अग्नी, सूर्य, गाय यांचे दर्शन घेऊन विष्णूचे स्मरण करावे. |
| ऐसा जप करावा विधीने । मनकामना होय पूर्ण । ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥४८५॥ | अशा विधीने जप केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, असे पराशर ऋषींनी सांगितले. |
| गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषि । उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी । इमं मे वरुण सायंकाळी ॥४८६॥ | सकाळी 'मित्रस्य', दुपारी 'उदुत्यं' आणि संध्याकाळी 'इमं मे वरुण' या मंत्रांनी सूर्याची प्रार्थना करावी. |
| शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे विधि जैसे असती । गोत्र प्रवर म्हणा भक्ती । वृद्धाचाराप्रमाणे ॥४८७॥ | आपापल्या वेदांच्या शाखेप्रमाणे, गोत्र आणि प्रवराचा उच्चार करून विधी करावा. |
| चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी । गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥४८८॥ | चारही दिशांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी आणि आपले गोत्र-प्रवर उच्चारून अभिवादन करावे. |
| ऐसी संध्या करून । मग करावे औपासन । सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥४८९॥ | संध्या आटोपल्यावर 'औपासन' (अग्निहोत्र विधी) करावा, त्याचा विधी श्रीगुरु सांगत आहेत. |
| साय्म्रातवेला दोन्ही । औपासन करावे सगुणी । मिळोनि न करावे द्विजजनी । सर्वांनी पृथक पृथक हेचि जाणा ॥४९०॥ | सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकाने स्वतंत्रपणे औपासन करावे, सर्वांनी मिळून एकच करू नये. |
| न करावे वेळणी आळंद्यात । भूमीवरी न करा नित्य । स्थंडिली करावे विहित । अथवा उदके सारवावे ॥४९१॥ | उघड्या जमिनीवर अग्नी प्रज्वलित न करता, सारवलेल्या स्वच्छ जागेवर किंवा स्थंडिलावर विधी करावा. |
| कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे नित्य उपासनेसी । वारा घालो नये त्यासी । हाते पर्णी आणि सुपे ॥४९२॥ | अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हाताने, पानाने किंवा सुपाने वारा घालू नये. |
| व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे दरित्र धनक्षय । मुखे फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूली होय मृत्यु ॥४९३॥ | पाल्याने वारा घातल्यास रोग, सुपाने दरिद्रता आणि तोंडाने फुंकल्यास आयुष्य कमी होते. |
| फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु घालावा अग्नीसी । काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित असावा अग्नि देखा ॥४९४॥ | अग्नी फुंकण्यासाठी फुंकणी किंवा पंख्याचा वापर करावा. समिधांमुळे समृद्धी येते. |
| ज्वाला निघती जये स्थानी । आहुति घालावी तया वदनी । समिधा आणाव्या ब्राह्मणी । शूद्रहस्ते घेऊ नये ॥४९५॥ | जिथे अग्नीच्या ज्वाळा आहेत तिथेच आहुती द्यावी. समिधा स्वतः ब्राह्मणाने आणाव्यात. |
| समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो नये शूद्रे ऐका । होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन नावे परियेसा ॥४९६॥ | होम-हवनासाठी लागणारे साहित्य शूद्रांकडून आणू नये. |
| साळी सावे नीवार । तंदुल असती मनोहर । गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य असे ॥४९७॥ | तांदूळ, गहू, जव, ज्वारी इत्यादी धान्ये होमासाठी वापरावीत. |
| साठी दाणे मिति प्रमाण । आहुति मुख्य कारण । अधिक न कीजे अथवा न्यून । घृतसंपर्क करावे ॥४९८॥ | साधारण ६० दाण्यांची एक आहुती तुपासह द्यावी. |
| घृत नसेल समयासी । तिल पवित्र होमासी । तिळांचे तैल परियेसी । तेही पवित्र असे देखा ॥४९९॥ | तूप नसल्यास तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. |
| औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ तर्पण करी । सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥ | औपासन झाल्यावर 'ब्रह्मयज्ञ' आणि 'तर्पण' कसे करावे ते ऐका. |
| मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि । ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी । उपासनादि कर्मै करोनि । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥५०१॥ | सकाळी नित्यकर्मे आटोपल्यावर दुपारी ब्रह्मयज्ञ करावा. |
| उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे तर्पण ब्राह्मणी । प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि मंत्र जपावा ॥५०२॥ | पाण्याजवळ बसून तीन प्राणायाम करून ब्रह्मयज्ञ सुरू करावा. |
| दूर्वा घेऊनि दक्षिण करी । पूर्वमुख अथवा उत्तरी । बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥५०३॥ | उजव्या हातात दूर्वा घेऊन, डाव्या पायावर उजवा पाय ठेवून पूर्व किंवा उत्तर मुखी बसावे. |
| उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे दक्षिण जानुवासी । म्हणावे तीन प्रणवांसी । मग म्हणावे ऋचाक्षर ॥५०४॥ | दोन्ही हात जोडून उजव्या गुडघ्यावर ठेवावेत आणि 'ॐ' चा उच्चार करावा. |
| ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा गायत्री उच्चारोनि । तत्स० म्हणोनि । मग जपावी दश वेळा ॥५०५॥ | गायत्री मंत्राचा दहा वेळा जप करावा. |
| स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी । अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा म्हणा पन्नासा ॥५०६॥ | शक्य असल्यास वेदांचे पठण करावे, अन्यथा एका ऋचेचा ५० वेळा उच्चार करावा. |
| तोही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषी । नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन वेळा जपावा ॥५०७॥ | काहीच शक्य नसल्यास 'नमो ब्रह्मणे' हा मंत्र तीनदा म्हणावा. |
| वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि स्पर्शावे उदकासी । तर्पण करावे परियेसी । ऐक ब्राह्मणा एकचित्ते ॥५०८॥ | पाण्याला स्पर्श करून तर्पण विधीला सुरुवात करावी. |
| ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य दर्भ परियेसी । वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त समस्त देव पितर ॥५०९॥ | दर्भाच्या साहाय्याने वसू, रुद्र आणि आदित्यांसह पितरांना तृप्त करावे. |
| एखादे दिवसी न घडे जरी । अथवा होय समय रात्री । जप करावा गायत्री । वेदपठण फल असे ॥५१०॥ | जर कधी तर्पण जमले नाही, तर रात्री गायत्री जप करावा, त्याने वेद पठणाचे फळ मिळते. |
| देवतर्पण कुशाग्रेसी । मध्यस्थाने तृप्त ऋषि । मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे परियेसा ॥५११॥ | दर्भाच्या शेंड्याने देवांना, मधल्या भागाने ऋषींना आणि मुळाने पितरांना तर्पण द्यावे. |
| न करावे तर्पण पात्रात । करावे आपण उदकात । भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे करू नये ॥५१२॥ | तर्पण नेहमी वाहत्या पाण्यात किंवा नदीत करावे, घरात जमिनीवर करू नये. |
| दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करावे अवधारी । विधियुक्त भक्तिपुरःसरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥५१३॥ | दर्भावर पाणी सोडून भक्तिभावाने पितरांचे स्मरण करावे. |
| तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण करावे अवधारी । ठेवावे शिळेवरी । भूमी काष्ठपात्री देखा ॥५१४॥ | हातात तीळ घेऊन तर्पण करावे. तीळ शिळेवर किंवा लाकडाच्या पात्रात ठेवू नयेत. |
| रोमकूपादि स्थानी देखा । तीळ ठेविता पावती दुःखा । तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोलली स्थाने पाच ॥५१५॥ | शरीरावर किंवा निषिद्ध जागी तीळ पडल्यास ते दोषकारक ठरतात. |
| घरी तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसी । करावे आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥५१६॥ | घरी तर्पण करताना तीळ वापरू नयेत (केवळ पाण्याने करावे), तीळतर्पण नदीवरच करावे. |
| श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी । कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण करावे ॥५१७॥ | देवांना पांढरे, ऋषींना धुरकट आणि पितरांना काळे तीळ अर्पण करावेत. |
| यज्ञोपवीती सव्ये देवांसी । निवीती करावी ऋषींसी । अपसव्य पितरांसी । तर्पण करावे येणे रीती ॥५१८॥ | देवांना जनेयू सव्य (उजवे), ऋषींना गळ्यात (निवीत) आणि पितरांना अपसव्य (डावे) ठेवून तर्पण करावे. |
| देवासी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक । पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसे करावे ॥५१९॥ | देवांना १, ऋषींना २ आणि पितरांना ३ ओंजळी पाणी द्यावे. |
| स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त बंधूसी एक । सपत्नी आचार्य नामिका । द्वयांजुलि करावे ॥५२०॥ | कुटुंबातील स्त्रियांना आणि गुरूंना योग्य संख्येने अर्घ्य द्यावे. |
| देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी । कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत पुण्ये परियेसा ॥५२१॥ | देवांना अक्षता आणि पितरांना काळे तीळ दिल्यास अनंत पुण्य मिळते. |
| आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा मघा नक्षत्रासी । षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण करू नये ॥५२२॥ | रविवार, शुक्रवार आणि काही विशिष्ट तिथींना (एकादशी, नवमी इ.) तीळतर्पण निषिद्ध आहे. |
| अथवा विवाह उपनयनासी । जन्मनक्षत्र जन्मदिवसी । आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण करू नये ॥५२३॥ | घरामध्ये मंगल कार्य असताना किंवा वाढदिवसाच्या दिवशी तीळतर्पण करू नये. |
| जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य करा जाण । मुद्रिका हस्ती सुवर्ण । दर्भपवित्रे करावे ॥५२४॥ | ज्या दिवशी तीळ निषिद्ध आहेत, त्या दिवशी केवळ दर्भ आणि सुवर्ण मुद्रिका धारण करून पाण्याने तर्पण करावे. |
| पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण करिता तर्पण । श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल असे अवधारी ॥५२५॥ | योग्य विधी आणि दक्षिणेविना केलेले श्राद्ध किंवा तर्पण निष्फळ ठरते. |
| निषिद्ध बोलिले ज्या दिवसी । तर्पण करावे उदकेसी । दिपवाळी चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसा ॥५२६॥ | नरक चतुर्दशीला (दिवाळी) यमाचे तर्पण आवर्जून करावे. |
| अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे तर्पण परियेसी । यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत सव्याने ॥५२७॥ | मंगळवारी येणाऱ्या चतुर्दशीला यमाच्या नावाने तर्पण करावे. |
| एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि । यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण करावे भक्तीने ॥५२८॥ | यमाच्या प्रत्येक नावाचा उच्चार करून तीन तीन ओंजळी पाणी द्यावे. |
| यमाची नावे त्रयोदशी । सांगेन ऐका विस्तारेसी । यम धर्मराजा परियेसी । मृत्यु अंतक चौथा जाणा ॥५२९॥ | यमाची १३ नावे: यम, धर्मराज, मृत्यू, अंतक... |
| वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय ऐका । आठवा औदुंबरनामिका । नीलाय परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥ | ...वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, नील, परमेष्ठी... |
| वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त त्रयोदशिका । प्रत्येक नामे म्हणोनि एकेका । नदीत द्यावे परियेसा ॥५३१॥ | ...वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त. ही नावे घेऊन नदीत तर्पण करावे. |
| समस्त पातके नासती । रोगराई न पीडिती । अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा न बाधे ॥५३२॥ | यामुळे सर्व पापे नष्ट होतात, रोग जात नाहीत आणि अकाली मृत्यूची भीती उरत नाही. |
| शुक्लपक्षी माघमासी । तर्पण करावे अष्टमीसी । भीष्मनामे परियेसी । वर्षपातके परिहरती ॥५३३॥ | माघ शुद्ध अष्टमीला (भीष्माष्टमी) भीष्म पितामहांच्या नावाने तर्पण करावे. |
| ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे अर्घ्यै तिन्ही । द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे नृसिंहसरस्वती ॥५३४॥ | हे सर्व झाल्यावर सूर्याला तीन अर्घ्ये द्यावीत, असे श्री नृसिंह सरस्वती महाराज सांगतात. |
| सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी । सांगता झाला ब्राह्मणासी । येणेपरी विहिताचार ॥५३५॥ | सिद्ध मुनी नामधारकाला म्हणतात की, अशा प्रकारे स्वामींनी ब्राह्मणाला आचाराचे नियम सांगितले. |
| म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा ब्राह्मणांचा आचार । वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे साधतील ॥५३६॥ | जो ब्राह्मण या विधींचे पालन करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. |
| इति श्रीगुरुचरित्रामृत । नामधारक शिष्य संवादत । वेदोपनिषदमतितार्थ । आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥ | अशा प्रकारे श्रीगुरूचरित्रातील आचार निरूपण नावाचा हा ३६ वा अध्याय समाप्त झाला. |
| इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥३६॥ ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओवीसंख्या ॥५३७॥ ॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥ | |