गुरुचरित्र – अध्याय ३९(ऐकोणचाळीसावा)
॥वृद्धवंध्यासंतानप्राप्ति॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्री गुरुभ्यो नमः॥
| मूळ ओवी | ओवीचा अर्थ |
|---|---|
| सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व वर्तलें ऐका । साठी वर्षे वांझेसी एका । पुत्र झाला परियेसा ॥१॥ | सिद्ध मुनी नामधारकाला म्हणतात, "पुढील अपूर्व कथा ऐक. साठ वर्षांच्या एका वांझ स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली." |
| आपस्तंब-शाखेसी । ब्राह्मण एक परियेसीं । शौनकगोत्र -प्रवरेसी । नाम तया ‘सोमनाथ’ ॥२॥ | गाणगापुरात आपस्तंब शाखेचा, शौनक गोत्राचा 'सोमनाथ' नावाचा एक ब्राह्मण राहत होता. |
| ‘गंगा’ नामें त्याची पत्नी । पतिव्रताशिरोमणि । वेदशास्त्रें आचरणी । आपण करी परियेसा ॥३॥ | त्याची पत्नी 'गंगा' ही अत्यंत पतिव्रता आणि सदाचारी होती. |
| वर्षें साठी झालीं तिसी । पुत्र नाहीं तिचे कुशीं । वांझ म्हणोनि ख्यातेसी । होती तया गाणगापुरीं ॥४॥ | तिचे वय ६० वर्षे झाले होते, तरी तिला मूल नव्हते. गाणगापुरात ती 'वांझ' म्हणून ओळखली जात होती. |
| पतिसेवा निरंतर । करी भक्तिपुरस्सर । नित्य नेम असे थोर । गुरुदर्शना येत असे ॥५॥ | ती पतीची सेवा आणि भक्ती करायची आणि रोज नित्यनेमाने श्रीगुरूंच्या दर्शनाला मठात येत असे. |
| नीरांजन प्रतिदिवसीं । आणोनि करी श्रीगुरुसी । येणेंपरी बहुत दिवसीं । वर्तत होती परियेसा ॥६॥ | ती दररोज श्रीगुरूंना निरांजन (आरती) ओवाळत असे. हा तिचा क्रम अनेक दिवस चालला होता. |
| ऐसें असतां वर्तमानीं । संतुष्ट झाले श्रीगुरुमुनि । पृच्छा करिती हांसोनि । तया द्विजस्त्रियेसी ॥७॥ | तिची ही निष्काम भक्ती पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी हसून तिला विचारले. |
| श्रीगुरु म्हणती तियेसी । काय अभीष्ट असे मानसीं । आणित्येसी प्रतिदिवसीं । नीरांजन परोपरी ॥८॥ | "तू रोज श्रद्धेने आरती करतेस, तुझ्या मनात नक्की काय इच्छा आहे?" |
| तुझ्या मनींची वासना । सांगे त्वरित विस्तारुन । सिद्धि पाववील नारायण । गौरीरमण गुरुप्रसादें ॥९॥ | "तुझ्या मनातली इच्छा मला सांग. नारायण आणि महादेव गुरुप्रसादाने तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील." |
| ऐकोनि श्रीगुरुचें वचन । करी साष्टांगीं नमन । विनवीतसे कर जोडून । ‘ अपुत्रस्य लोको नास्ति’ ॥१०॥ | श्रीगुरूंचे शब्द ऐकून तिने साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाली, "पुत्राशिवाय गती नाही, असे शास्त्रात म्हटले आहे." |
| पुत्राविणें स्त्रियांसी । पाहों नये मुखासी । पापरुपी महादोषी । म्हणती मातें स्वामिया ॥११॥ | "पुत्रहीन स्त्रीचे तोंड पाहू नये, असे लोक मानतात. मला सर्वजण पापी आणि दोषी म्हणतात." |
| जिचे पोटीं नाहीं बाळ । तिचा जन्म निर्फळ । वाट पाहती उभयकुळ । बेचाळीस पितृलोकीं ॥१२॥ | "जिच्या पोटी संतान नाही, तिचा जन्म व्यर्थ आहे. पुत्राच्या हाताने पिंडदान व्हावे म्हणून ४२ पिढ्यांचे पूर्वज वाट पाहत असतात." |
| पितृ चिंतिती मनांत । म्हणती एखादी सती वंशांत । पुत्र व्यालिया आम्हां हित । तो उद्धरील सकळांतें ॥१३॥ | "पूर्वज चिंता करतात की, वंशात एखादा पुत्र होईल तरच आमचा उद्धार होईल." |
| पुत्राविणें जें घर । तें सदा असे अघोर । अरण्य नाहीं त्यासी दूर । ‘यथारण्य तथा गृह’ ॥१४॥ | "पुत्राशिवाय घर हे अरण्यवत (वेड्यासारखे) वाटते. मूल नसलेले घर स्मशानासारखे भासते." |
| नित्य गंगास्नानासी । आपण जात्यें परियेसीं । घेऊनि येत बाळकांसी । समस्त स्त्रिया कवतुकें ॥१५॥ | "मी रोज गंगेवर स्नानाला जाते, तेव्हा इतर स्त्रिया आपापल्या बाळांना कौतुकाने सोबत घेऊन येतात." |
| कडे घेऊनियां बाळा । खेळविताति स्त्रिया सकळा । तैसें नाहीं माझे कपाळा । मंदभाग्य असें देखा ॥१६॥ | "त्या स्त्रिया आपल्या मुलांना खेळवताना पाहिल्या की मला माझे नशीब दुर्दैवी वाटते." |
| जळो माझें वक्षस्थळ । कडे घ्यावया नाहीं बाळ । जन्मोनियां संसारीं निष्फळ । नव्हें पुरुष अथवा सती ॥१७॥ | "बाळाला कडेवर घेता येत नाही, तर हे माझे शरीर काय कामाचे? माझा जन्म निष्फळ झाला आहे." |
| पुत्रपौत्र असती जयांसी । परलोक साधे तयांसी । अधोगति निपुत्रिकासी । लुप्तपिंड होय स्वामिया ॥१८॥ | "ज्याला पुत्र-पौत्र आहेत, त्याला परलोक मिळतो. निपुत्रिकाची अधोगती होते आणि त्याचे पिंड दानही थांबते." |
| आतां पुरे जन्म मज । साठी वर्षें जाहलीं सहज । आम्हां आतां वर दीजे । पुढें उत्तम जन्म होय ॥१९॥ | "आता माझे ६० वर्षे वय झाले आहे. आता मला असा वर द्या की, पुढच्या जन्मी तरी मला उत्तम संतान लाभेल." |
| पुत्रवंती व्हावें आपण । अंतःकरण होय पूर्ण । ऐसा वर देणें म्हणोन । विनवीतसे तये वेळीं ॥२०॥ | "पुढील जन्मात मी पुत्रवती व्हावे, हीच माझी इच्छा आहे." |
| ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । पुढील जन्म जाणेल कवण । तूतें स्मरण कैंचें सांग ॥२१॥ | श्रीगुरु हसून म्हणाले, "पुढचा जन्म कोणाला ठाऊक आहे? तेव्हा तुला आताच्या गोष्टी आताच्या गोष्टी आठवणार आहेत का?" |
| नित्य आरति आम्हांसी । भक्तिपूर्वक भावेंसीं । करितां जाहलों संतोषी । कन्या-पुत्र होतील तुज ॥२२॥ | "तू रोज माझी आरती करतेस, त्यामुळे मी प्रसन्न आहे. तुला याच जन्मात कन्या आणि पुत्र होतील." |
| इहजन्मीं तूतें जाण । कन्या पुत्र सुलक्षण । होतील निगुतीं म्हणोन । श्रीगुरु म्हणती तयेसी ॥२३॥ | "तुला याच जन्मात गुणवान मुले होतील, हे नक्की समज," असे श्रीगुरूंनी तिला सांगितले. |
| श्रीगुरुवचन ऐकोनि । पालवीं गांठी बांधी ज्ञानी । विनवीतसे कर जोडूनि । ऐका स्वामी कृपासिंधु ॥२४॥ | श्रीगुरूंचे बोल ऐकून तिने खात्री म्हणून आपल्या पदराला गाठ मारली आणि म्हणाली, "हे कृपासिंधु..." |
| साठी वर्षें जन्मासी । जाहलीं स्वामी परियेसीं । होत नाहीं विटाळसी । मातें कैंचे पुत्र होती ॥२५॥ | "स्वामी, माझे वय ६० झाले आहे. माझे विटाळ (मासिक धर्म) कधीच बंद झाले आहेत, आता मला मूल कसे होईल?" |
| नाना व्रत नाना तीर्थ । हिंडिन्नल्यें पुत्रार्थ । अनेक ठायीं अश्वत्थ- । पूजा केली स्वामिया ॥२६॥ | "मी मुलासाठी अनेक व्रते, तीर्थयात्रा केल्या. अनेक ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा केली." |
| मज म्हणती सकळै जन । करीं वो अश्वत्थप्रदक्षिणा । तेणें पुरतील मनकामना । होतील पुत्र म्हणोनि ॥२७॥ | "लोक म्हणायचे की पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने मुले होतात, म्हणून मी तेही करून पाहिले." |
| अश्वत्थसेवा बहुकाळ । करितां माझा जन्म गेला । विश्वास म्यां बहु केला । होतील पुत्र म्हणोनि ॥२८॥ | "अश्वत्थाची सेवा करण्यातच माझे अर्धे आयुष्य गेले, पण अजून मूल झाले नाही." |
| साठी वर्षें येणेंपरी । कष्ट केले अपरांपरी । सेवा करित्यें अद्यापिवरी । अश्वत्थाची प्रदक्षिणा ॥२९॥ | "मी आजवर खूप कष्ट केले आहेत आणि आजही मी पिंपळाला प्रदक्षिणा घालतच आहे." |
| पुत्र न होती इह जन्मीं । पुढें होतील ऐसे कामीं । सेवा करितसें स्वामी । अश्वत्थाची परियेसा ॥३०॥ | "या जन्मात मुले झाली नाहीत, तरी पुढच्या जन्मात व्हावीत म्हणून मी ही सेवा सुरू ठेवली आहे." |
| आतां स्वामी प्रसन्न होसी । इहजन्मीं पुत्र देसी । अन्यथा नोहे बोलासी । तुमच्या स्वामी नरहरी ॥३१॥ | "आता तुम्ही मला या जन्मात पुत्राचा वर दिला आहे. तुमचे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत." |
| स्वामींनीं दिधला मातें वर । माझे मनीं हा निर्धार । हास्य न करी स्वामी गुरु । शकुनगांठी बांधिली म्यां ॥३२॥ | "तुम्ही हा वर दिला आहे, पण माझी थट्टा करू नका. मी तुमच्या शब्दांची शकुनगाठ बांधली आहे." |
| पुढील जन्म-काम्यासी । करित्यें सेवा अश्वत्थासी । स्वामी आतांचि वर देसी । इहजन्मीं कन्या-पुत्र ॥३३॥ | "पुढच्या जन्मासाठी मी पिंपळाची सेवा करत होते, पण तुम्ही आताच मला संतानप्राप्तीचा वर दिला आहे." |
| अश्वत्थसेवा बहु दिवस । करितां झाले मज प्रयास । काय देईल आम्हांस । अश्वत्थ सेवित्यें मूर्खपणें ॥३४॥ | "इतके दिवस पिंपळाची सेवा केली, त्याने मला काय दिले? मी जणू मूर्खपणानेच इतकी वर्षे सेवा केली असे वाटते." |
| ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । अश्वत्थसेवा महापुण्य । वृथा नोहे परियेसा ॥३५॥ | श्रीगुरु हसून म्हणाले, "पिंपळाची सेवा कधीही वाया जात नाही, ते महापुण्य आहे." |
| निंदा न करीं अश्वत्थासी । अनंत पुण्य परियेसीं । सेवा करीं वो आम्हांसरसी । तूतें पुत्र होतील ॥३६॥ | "अश्वत्थाची निंदा करू नकोस. त्याची सेवा माझ्या मार्गदर्शनानुसार कर, तुला नक्कीच पुत्र होईल." |
| आतां आमचे वाक्येंकरी । नित्य जावें संगमातीरीं । अमरजा वाहे निरंतरीं । भीमरथीसमागमांत ॥३७॥ | "आता तू रोज अमरजा आणि भीमा नदीच्या संगमावर जात जा." |
| तेथें अश्वत्थ असे गहन । जातों आम्ही अनुष्ठाना । सेवा करीं वो एकमनें । आम्हांसहित अश्वत्थाची ॥३८॥ | "तिथे एक मोठा पिंपळाचा वृक्ष आहे, जिथे मी अनुष्ठानाला बसतो. तिथे तू एकाग्र मनाने त्या वृक्षाची सेवा कर." |
| अश्वत्थाचें महिमान । सांगतसें परिपूर्ण । अश्वत्थनाम-नारायण । आमुचा वास तेथें असे ॥३९॥ | "मी तुला आता अश्वत्थाचा महिमा सांगतो. तो साक्षात नारायण स्वरूप आहे आणि माझा तिथेच वास असतो." |
| ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे ते अंगना । अश्वत्थवृक्षाचें महिमान । स्वामी मातें निरोपावें ॥४०॥ | गंगा ब्राह्मणी म्हणाली, "स्वामी, मला या वृक्षाचा महिमा सविस्तर सांगावा." |
| कैसी महिमा असे त्यासी । स्वामी सांगावें मजसी । स्थिर होईल माझें मानसी । सेवा करीन भक्तीनें ॥४१॥ | "या वृक्षाचे महत्त्व काय आहे? ते समजले की मी अधिक भक्तीने त्याची सेवा करीन." |
| श्रीगुरु म्हणती तियेसी । अश्वत्थवृक्षासी निंदा करिसी । महिमा असे अपार त्यासी । समस्त देव तेथें वसती ॥४२॥ | श्रीगुरु म्हणाले, "ज्या वृक्षाची तू निंदा केलीस, तिथे सर्व देवांचा निवास असतो." |
| अश्वत्थाचें महिमान । असे ब्रह्मांडपुराणीं निरुपण । नारदमुनीस विस्तारोन । ब्रह्मदेवानें सांगितलें ॥४३॥ | "ब्रह्मदेवाने नारद मुनींना 'ब्रह्मांड पुराणात' अश्वत्थाचा महिमा सांगितला आहे." |
| ब्रह्मकुमर नारदमुनि । नित्य गमन त्रिभुवनीं । ब्रह्मयासी पुसोनि । आला ऋषि-आश्रमासी ॥४४॥ | नारद मुनी एकदा ब्रह्मदेवाला विचारून ऋषींच्या आश्रमात आले. |
| नारदातें देखोनि । अर्घ्यपाद्य देवोनि । पूजा केली उपचारोनि । पुसते झाले तयेवेळीं ॥४५॥ | ऋषींनी नारदांची पूजा केली आणि त्यांना प्रश्न विचारले. |
| ऋषि म्हणती नारदासी । विनंति एक परियेसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । विस्तारावें स्वामिया ॥४६॥ | ऋषींनी विचारले, "स्वामी, आम्हाला अश्वत्थ वृक्षाचा महिमा सांगा." |
| ऋषिवचन ऐकोनि । सांगता जाहला नारदमुनि । गेलों होतों आजिचे दिनीं । ब्रह्मलोकीं हिंडत ॥४७॥ | नारद मुनी म्हणाले, "मी आजच ब्रह्मलोकातून आलो आहे." |
| आपण पुसे स्वभावेंसीं । अश्वत्थमहिमा असे कैसी । समस्त मानिती तयासी । विष्णुस्वरुप म्हणोनियां ॥४८॥ | "मी ब्रह्मदेवाला विचारले की, सर्व लोक ज्याला विष्णूचे स्वरूप मानतात, त्या अश्वत्थाचा महिमा काय आहे?" |
| ऐसा वृक्ष असे जरी । सेवा करणें कवणेपरी । कैसा महिमा सविस्तारीं । निरोपावें स्वामिया ॥४९॥ | "त्याची सेवा कशी करावी आणि त्याचा महिमा काय आहे, हे मला सांगा." |
| ब्रह्मा सांगे आम्हांसी । अश्वत्थमुळीं आपण वासी । मध्यें वास ह्रुषीकेशी । अग्रीं रुद्र वसे जाणा ॥५०॥ | ब्रह्मदेव म्हणाले, "पिंपळाच्या मुळात मी (ब्रह्मा), मध्यभागात विष्णू आणि शेंड्यावर शिव (रुद्र) वास करतात." |
| शाखापल्लवीं अधिष्ठानीं । दक्षिण शाखे शूलपाणि । पश्चिम शाखे विष्णु निर्गुणी । आपण उत्तरे वसतसें ॥५१॥ | "त्याच्या फांद्या आणि पानांतही विविध देवांचा निवास असतो." |
| इंद्रादि देव परियेसीं । वसती पूर्वशाखेसी । इत्यादि देव अहर्निशीं । समस्त शाखेसी वसती जाणा ॥५२॥ | "इंद्रादी देव पूर्व दिशेच्या फांदीवर राहतात. अशा प्रकारे हा वृक्ष देवांचे निवासस्थान आहे." |
| गोब्राह्मण समस्त ऋषि । वेदादि यज्ञ परियेसीं । समस्त मूळांकुरेसी । असती देखा निरंतर ॥५३॥ | "गाय, ब्राह्मण, ऋषी, वेद आणि यज्ञ हे सर्व या वृक्षाच्या मुळात सामावलेले आहेत." |
| समस्त नदीतीर्थें देखा । सप्त-सागर लवणादिका । वसती जाणा पूर्व शाखा । ऐसा अश्वत्थ वृक्ष जाणा ॥५४॥ | "नद्या, तीर्थे आणि सात समुद्रही या वृक्षाच्या फांद्यांवर वास करतात." |
| अ-कारशब्द मूळस्थान । स्कंध शाखा उ-कार जाण । फळ पुष्प म-कारवर्ण । अश्वत्थमुख अग्निकोणीं असे ॥५५॥ | "हा वृक्ष 'ओम्' कार स्वरूप आहे. मुळात 'अ', फांद्यांत 'उ' आणि फळ-फुलांत 'म' सामावला आहे." |
| एकादश रुद्रादिक । अष्ट वसु आहेत जे का । जे स्थानीं त्रैमूर्तिका । समस्त देव तेथें वसती ॥५७॥ | "अकरा रुद्र आणि आठ वसूही जिथे त्रिमूर्तींचा वास आहे तिथेच राहतात." |
| ऐसा अश्वत्थनारायण । महिमा वर्णावया शक्त कवण । कल्पवृक्ष याचि कारण । ब्रह्मा म्हणे नारदासी ॥५७॥ | "हा अश्वत्थ नारायण साक्षात कल्पवृक्ष आहे, असे ब्रह्मदेवाने सांगितले." |
| नारद सांगे ऋषेश्वरांसी । त्रयमूर्ति वास ज्या वृक्षाशीं । काय महिमा सांगों त्यासी । भजतां काय सिद्धि नोहे ? ॥५८॥ | "नारद मुनी ऋषींना म्हणाले, जिथे त्रिमूर्ती वास करतात, त्या वृक्षाच्या भक्तीने कोणती गोष्ट साध्य होणार नाही?" |
| ऐसें ऐकोनि समस्त ऋषि । विनविताति नारदासी । आचारावया विधि कैसी । कवणें रीतीनें भजावें ॥५९॥ | ऋषींनी विचारले, "मग या वृक्षाची पूजा करण्याची विधी काय आहे?" |
| पूर्वीं आम्हीं एके दिवसीं । पुसिलें होतें आथर्वणासी । त्याणें सांगितलें आम्हांसी । अश्वत्थसेवा एक रीतीं ॥६०॥ | "आम्ही पूर्वी अथर्वण ऋषींना विचारले होते, त्यांनी एक विधी सांगितला होता." |
| तूं नारद ब्रह्मऋषि । समस्त धर्म ओळखसी । विस्तार करोनि आम्हांसी । विधिपूर्वक निरोपावें ॥६१॥ | ऋषींनी नारदांना विनंती केली की, "तुम्ही सर्व धर्म जाणता, तरी अश्वत्थ पूजेचा विधी आम्हाला विस्ताराने सांगावा." |
| नारद म्हणे मुनिवरा । त्या व्रताचिया विस्तारा । सांगेन ऐका तत्परा । विधान असे ब्रह्मवचनीं ॥६२॥ | नारद म्हणाले, "ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेले या व्रताचे विधान मी तुम्हाला सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका." |
| आषाढ-पौष-चैत्रमासीं । अस्तंगत गुरुशुक्रेसीं । चंद्रबळ नसते दिवसीं । करुं नये प्रारंभ ॥६३॥ | आषाढ, पौष आणि चैत्र महिना, तसेच गुरु-शुक्राचा अस्त असताना किंवा चंद्रबळ नसताना या व्रताचा प्रारंभ करू नये. |
| याव्यतिरिक्त आणिक मासीं । बरवे पाहोनियां दिवसीं । प्रारंभ करावा उपवासीं । शुचिर्भूत होऊनि ॥६४॥ | इतर शुभ महिन्यात, शुभ दिवस पाहून, उपवास करून आणि शुचिर्भूत होऊन व्रताला सुरुवात करावी. |
| भानुभौमवारेसी । आतळूं नये अश्वत्थासी । भृगुवारीं संक्रांतिदिवसीं । स्पर्शूं नये परियेसा ॥६५॥ | रविवार आणि मंगळवारी अश्वत्थाला स्पर्श करू नये. तसेच शुक्रवारी आणि संक्रांतीच्या दिवशीही स्पर्श वर्ज्य आहे. |
| संधिरात्रीं रिक्तातिथीं । पर्वणीसी व्यतीपातीं । दुर्दिनादि वैधृतीं । अपराण्हसमयीं स्पर्शूं नये ॥६६॥ | "संधीकाळ, रात्र, रिक्ता तिथी (४, ९, १४), पर्वकाळ, व्यतीपात योग आणि दुपारच्या वेळी वृक्षाला स्पर्श करू नये." |
| अनृत-द्यूतकर्मभेषीं । निंदा-पाखांड-वर्जेसीं । प्रातर्मौनी होवोनि हर्षीं । आरंभावें परियेसा ॥६७॥ | "असत्य बोलणे, जुगार, निंदा आणि पाखंडी विचार सोडून, सकाळी मौन धारण करून आनंदाने पूजा सुरू करावी." |
| सचैल स्नान करुनि । निर्मळ वस्त्र नेसोनि । वृक्षाखालीं जाऊनि । गोमयलिप्त करावें ॥६८॥ | "वस्त्रासह स्नान करून, स्वच्छ कपडे नेसून वृक्षाखाली जावे आणि तिथली जागा शेणाने सारवून घ्यावी." |
| स्वस्तिकादि शंखपद्मेसीं । घालावी रंगमाळा परियेसीं । पंचवर्ण चूर्णेसीं । भरावें तेथें पद्मांत ॥६९॥ | तिथे स्वस्तिक, शंख, पद्म अशा रांगोळ्या काढाव्यात आणि पाच रंगांच्या चूर्णाने त्या भराव्यात. |
| मागुती स्नान करुनि । श्वेत वस्त्र नेसोनि । गंगा यमुना कलश दोनी । आणोनि ठेवणें पद्मांवरी ॥७०॥ | पुन्हा स्नान करून पांढरे वस्त्र नेसावे आणि गंगा-यमुना मानून दोन कलश त्या रांगोळीवर ठेवावेत. |
| पूजा करावी कलशांसी । पुण्याहवाचनकर्मेंसीं । संकल्पावें विधींसीं । काम्यार्थ आपुलें उच्चारावें ॥७१॥ | कलशांची पूजा करून पुण्याहवाचन करावे आणि आपल्या मनातील इच्छेचा उच्चार करून संकल्प सोडावा. |
| मग कलश घेवोनि । सात वेळां उदक आणोनि । स्नपन करावें जाणोनि । अश्वत्थ वृक्षासी अवधारा ॥७२॥ | मग त्या कलशातील पाण्याने सात वेळा अश्वत्थ वृक्षाला अभिषेक (स्नान) घालावा. |
| पुनरपि करुनियां स्नान । मग करावें वृक्षपूजन । पुरुषसूक्त म्हणोन । पूजा करावी षोडशोपचारें ॥७३॥ | पुन्हा स्नान करून 'पुरुषसूक्त' म्हणत वृक्षाची षोडशोपचार पूजा करावी. |
| मनीं ध्यावी विष्णुमूर्ति । अष्टभुजा आहेति ख्याती । शंख-चक्र-वरद-हस्तीं । अभय-हस्त असे जाणा ॥७४॥ | "मनात भगवान विष्णूच्या अष्टभुजा मूर्तीचे ध्यान करावे, ज्यांच्या हातात शंख, चक्र, वरद आणि अभय मुद्रा आहे." |
| खड्ग-खेटक एके करीं । धनुष्य-बाण सविस्तारीं । अष्टभुजी येणेंपरी । ध्यावा विष्णु नारायण ॥७५॥ | "दुसऱ्या हातांत तलवार, ढाल, धनुष्य आणि बाण असलेल्या या नारायण रूपाचे ध्यान करावे." |
| पीतांबर पांघरुण । सदा लक्ष्मी-सन्निधान । ऐसी मूर्ति ध्याऊन । पूजा करणें वृक्षासी ॥७६॥ | "पीतांबर नेसलेल्या आणि ज्यांच्या सोबत सदैव लक्ष्मी असते, अशा मूर्तीची पूजा वृक्षात करावी." |
| त्रैमूर्तीचें असें स्थान । शिवशक्तीविणें नाहीं जाण । समस्तांतें आवाहनोन । षोडशोपचारें पूजावें ॥७७॥ | अश्वत्थ हे त्रिमूर्तींचे स्थान आहे. तिथे शिव-शक्तीसह सर्वांचे आवाहन करून पूजा करावी. |
| वस्त्रें अथवा सुतेसीं । वेष्टावें तया वृक्षासी । पुनरपि संकल्पेसीं । प्रदक्षिणा कराव्या ॥७८॥ | "वृक्षाला वस्त्र किंवा कापूस अर्पण करून, पुन्हा संकल्प करून प्रदक्षिणा घालाव्यात." |
| मनसा-वाचा-कर्मणेसीं । भक्तिपूर्वक भावेंसीं । प्रदक्षिणा कराव्या हर्षीं । पुरुषसूक्त म्हणत देखा ॥७९॥ | "मन, वाणी आणि कर्माने शुद्ध होऊन पुरुषसूक्त म्हणत आनंदाने प्रदक्षिणा घालाव्यात." |
| अथवा सहस्त्रनामेंसीं । कराव्या प्रदक्षिणा हर्षीं । अथवा कराव्या मौन्येंसीं । त्याचें फळ अमित असे ॥८०॥ | "विष्णू सहस्त्रनाम म्हणत किंवा मौन राहून प्रदक्षिणा घालाव्यात, त्याचे फळ अफाट आहे." |
| चाले जैसी स्त्री गर्भिणी । उदककुंभ घेउनी । तैसे मंद गतींनीं । प्रदक्षिणा कराव्या शुद्धभावें ॥८१॥ | "डोक्यावर पाण्याचा कुंभ घेतलेली गर्भिणी स्त्री जशी हळू चालते, तशाच मंद गतीने आणि शुद्ध भावाने प्रदक्षिणा घालाव्यात." |
| पदोपदीं अश्वमेध । पुण्य जोडे फळप्रद । प्रदक्षिणासमाप्तमध्य । नमस्कार करावा ॥८२॥ | प्रत्येक पावलावर अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर वृक्षाला नमस्कार करावा. |
| ब्रह्महत्यादि पापांसी । प्रायश्चित्त नाहीं परियेसीं । प्रदक्षिणा द्विलक्षांसीं । ब्रह्महत्या पाप जाय ॥८३॥ | "ब्रह्महत्येसारख्या पापाला प्रायश्चित्त नाही, पण दोन लाख प्रदक्षिणा घातल्यास ते पापही नष्ट होते." |
| त्रिमूर्ति वसती जया स्थानीं । फल काय सांगूं प्रदक्षिणीं । समस्त पापा होय धुणी । गुरुतल्पादि पाप जाय ॥८४॥ | "जिथे त्रिमूर्ती वसतात, त्या प्रदक्षिणेचे फळ काय वर्णावे? सर्व महापापे धुवून निघतात." |
| नाना व्याधि हरती दोष । प्रदक्षिणा करितां होय सुरस । कोटि ऋण असे ज्यास । परिहरत परियेसा ॥८५॥ | "सर्व रोग आणि दोष दूर होतात. ज्याच्यावर कोटींचे कर्ज आहे, त्याचे कर्जही या प्रदक्षिणांनी फिटते." |
| जन्म मृत्यु जरा जाती । संसारभय नाश होती । ग्रहदोष बाधों न शकती । सहस्त्र प्रदक्षिणा केलिया ॥८६॥ | जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते आणि हजार प्रदक्षिणा केल्यास ग्रहांची पीडा बाधत नाही. |
| पुत्रकाम्य असे ज्यासी । त्यातें फल होय भरंवसीं । मनोवाक्कायकर्मेंसी । एकोभावें करावें ॥८७॥ | "ज्याला पुत्राची इच्छा आहे, त्याने श्रद्धेने हे केल्यास त्याला नक्कीच फळ मिळते." |
| चतुर्विध पुरुषार्थ । देता होय तो अश्वत्थ । पुत्रकाम्य होय त्वरित । न करा अनुमान ऋषी हो ॥८८॥ | "हा अश्वत्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ देणारा आहे. यात शंका घेऊ नका." |
| शनिवारीं वृक्ष धरोनि । जपावें मृत्युंजय-मंत्रानीं । काळमृत्यु जिंकोनि । राहती नर अवधारा ॥८९॥ | शनिवारी वृक्षाला स्पर्श करून मृत्युंजय मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूवर विजय मिळवता येतो. |
| त्यासी अपमृत्यु न बाधती । पूर्णायुषी होती निश्चितीं । शनिग्रह न पीडिती । प्रार्थावें अश्वत्थासी ॥९०॥ | तो मनुष्य पूर्णायुषी होतो आणि त्याला शनीची पीडा होत नाही. |
| शनिनाम घेवोनि । उच्चारावें आपुले जिव्हेनीं । बभ्रु-पिंगळ म्हणोनि । कोणस्थ-कृष्ण म्हणावें ॥९१॥ | "शनीच्या नावांशी (बभ्रु, पिंगळ, कृष्ण, कोणस्थ) प्रार्थना करावी." |
| अंतक-यम-महारौद्री । मंद-शनैश्वर-सौरि । जप करावा येणेंपरी । शनिपीडा न होय ॥९२॥ | "अंतक, यम, मंद, शनैश्वर अशा नावांचा जप केल्यास शनीचे दोष टळतात." |
| ऐसें दृढ करोनि मना । अश्वत्थ सेवितां होय कामना । पुत्रकाम्य तत्क्षणा । होय निरुतें अवधारा ॥९३॥ | मन खंबीर करून अश्वत्थाची सेवा केली, तर पुत्राची इच्छा लवकर पूर्ण होईल. |
| अमावस्या-गुरुवारेंसी । अश्वत्थछाया-जळेंसीं । स्नान करितां नरासी । ब्रह्महत्या पाप जाय ॥९४॥ | गुरुवारी अमावस्या असताना अश्वत्थाच्या छायेत पाण्यात स्नान केले तर ब्रह्महत्येचे पाप फिटते. |
| अश्वत्थतळीं ब्राह्मणासी । अन्न देतां एकासी । कोटि ब्राह्मणां परियेसीं । भोजन दिल्हें फळ असे ॥९५॥ | या झाडाखाली एका ब्राह्मणाला जेऊ घातले तर कोटी ब्राह्मणांना जेऊ घातल्याचे पुण्य मिळते. |
| अश्वत्थतळीं बैसोन । एकदां मंत्र जपतां क्षण । फळें होतील अनेकगुण । वेदपठण केलियाचें ॥९६॥ | तिथे बसून एकदा जरी मंत्र जपला तरी पूर्ण वेद वाचल्याचे पुण्य मिळते. |
| नर एखादा अश्वत्थासीं । स्थापना करी भक्तींसीं । आपुले पितृ-बेचाळिसी । स्वर्गीं स्थापी परियेसा ॥९७॥ | "जो कोणी अश्वत्थाची स्थापना (लागवड) करतो, तो आपल्या ४२ पिढ्यांच्या पितरांना स्वर्गात स्थान मिळवून देतो." |
| छेदितां अश्वत्थवृक्षासी । महापाप परियेसीं । पितृसहित नरकासी । जाय देखा तो नर ॥९८॥ | "अश्वत्थ तोडणे हे महापाप आहे, तो मनुष्य पितरांसह नरकात जातो." |
| अश्वत्थतळीं बैसोन । होम करितां महायज्ञ । अक्षय सुकृत असे जाण । पुत्रकाम्य त्वरित होय ॥९९॥ | या झाडाखाली होम-हवन केल्यास त्याचे अक्षय पुण्य मिळते आणि पुत्रप्राप्ती होते. |
| ऐसा अश्वत्थमहिमा । नारदाप्रति सांगे ब्रह्मा । म्हणोनि ऐकती ऋषिस्तोम । तया नारदापासोनि ॥१००॥ | असा महिमा ब्रह्मदेवाने नारदांना सांगितला आणि ऋषींनी तो नारदांकडून ऐकला. |
| नारद म्हणे ऋषेश्वरासी । प्रदक्षिणेच्या दहावे अंशीं । हवन करावें विशेषीं । आगमोक्त विधानपूर्वक ॥१०१॥ | "नारद म्हणतात, जेवढ्या प्रदक्षिणा घालू त्याच्या दहाव्या हिश्शाचे हवन करावे." |
| हवनाचे दहावे अंशीं । ब्राह्मणभोजन करावें हर्षी । ब्रह्मचर्य हविष्यान्नेंसीं । व्रत आपण करावें ॥१०२॥ | हवनाच्या दहाव्या अंशी ब्राह्मण भोजन घालावे. स्वतः ब्रह्मचर्य आणि सात्त्विक आहार पाळावा. |
| येणेंपरी आचरोन । मग करावें उद्यापन । शक्त्यनुसार सौवर्ण । अश्वत्थवृक्ष करावा ॥१०३॥ | अशा प्रकारे व्रत करून त्याचे उद्यापन करावे आणि सोन्याचा छोटा अश्वत्थ वृक्ष तयार करावा. |
| तो द्यावा ब्राह्मणासी । विधिपूर्वक परियेसीं । श्वेतधेनु सवत्सेंसीं । ब्राह्मणातें दान द्यावी ॥१०४॥ | तो सोन्याचा वृक्ष आणि सवत्स गाय ब्राह्मणाला दान द्यावी. |
| वृक्षातळीं तिळराशी । करावी यथानुशक्तीसीं । श्वेतवस्त्र झांकोनि हर्षीं । सुक्षीण ब्राह्मणासी दान द्यावें ॥१०५॥ | तिळाची रास करून ती पांढऱ्या वस्त्राने झाकून गरीब ब्राह्मणाला दान द्यावी. |
| ऐसें अश्वत्थविधान । सांगे नारद ऋषिजना । येणेंपरी आचरोन । सकळाभीष्ट लाधले ॥१०६॥ | "अशा विधीने अनेकांना इच्छित फळ मिळाले आहे, असे नारद मुनी ऋषींना म्हणाले." |
| श्रीगुरु म्हणती वांझ सतीसी । अश्वत्थमहिमा आहे अशी । भावभक्ति असे ज्यासी । त्यातें होय फलश्रुति ॥१०७॥ | "श्रीगुरु त्या गंगा ब्राह्मणीला म्हणाले, ""असा हा अश्वत्थ महिमा आहे, ज्याची श्रद्धा आहे त्याला फळ नक्की मिळते.""" |
| आचार करीं वो येणेंपरी । संशय अंतःकरणीं न धरीं । वृक्ष असे भीमातीरीं । जेथें अमरजासंगम ॥१०८॥ | "शंका धरू नकोस आणि संगमावरील अश्वत्थाची सेवा कर." |
| तेंचि आमुचें असे स्थान । सेवा करीं वो एकोमनें । होईल तुझी मनकामना । कन्या पुत्र तुज होतील ॥१०९॥ | "तिथेच माझे स्थान आहे. तू एकाग्रतेने सेवा कर, तुला कन्या आणि पुत्र होतील." |
| ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी ते अंगना । विनवीतसे कर जोडूनि । भावभक्तीकरोनियां ॥११०॥ | श्रीगुरूंचे बोल ऐकून तिने भक्तीने त्यांना नमन केले. |
| आपण वांझ वर्षें साठी । कैंचे पुत्र आपुले पोटीं । वाक्य असे तुमचें शेवटीं । म्हणोनि आपण अंगीकारीन ॥१११॥ | "माझे वय ६० आहे, तरीही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी हे व्रत स्वीकारते." |
| गुरुवाक्य म्हणजे कामधेनु । ऐसें बोलती वेदपुराण । आतां नाहीं अनुमान । करीन सेवा स्वामिया ॥११२॥ | "गुरूंचे वाक्य हे कामधेनूसारखे असते, आता मी ही सेवा नक्कीच करीन." |
| चाड नाहीं अश्वत्थासी । निर्धार तुमचे बोलासी । सेवा करीं तुमची ऐसी । म्हणोनि चरणीं लागली ॥११३॥ | "मला झाडापेक्षा तुमच्या शब्दांवर जास्त विश्वास आहे," असे म्हणून ती त्यांच्या चरणी लागली. |
| ऐसा निरोप घेवोनि । जावोनि वनिता संगमस्थानीं । षट्कूलांत न्हाऊनि । सेवा करी अश्वत्थाची ॥११४॥ | श्रीगुरूंची आज्ञा घेऊन तिने संगमावर स्नान केले आणि अश्वत्थाची सेवा सुरू केली. |
| श्रीगुरुनिरोप जेणेंपरी । तैसी सेवा करी ते नारी । येणेंपरी तीन रात्रीं । आराधिलें परियेसा ॥११५॥ | तिने तीन रात्री अत्यंत निष्ठेने सेवा केली. |
| श्रीगुरुसहित अश्वत्थासी । पूजा करितां तिसरे दिवसीं । स्वप्न जाहलें तियेसी । सांगेन ऐका एकचित्तें ॥११६॥ | तिसऱ्या दिवशी तिला एक स्वप्न पडले. |
| स्वप्नामध्यें विप्र एक । येवोनि देतो तिसी भाक । काम्य झालें तुझें ऐक । सांगेन एक करीं म्हणे ॥११७॥ | "स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि म्हणाला, ""तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता मी सांगतो ते कर.""" |
| जाऊनि गाणगापुरांत । तेथें असे श्रीगुरुनाथ । प्रदक्षिणा करीं हो सात । नमन करीं तूं भक्तींसीं ॥११८॥ | "गाणगापुरात श्रीगुरूंना सात प्रदक्षिणा घाल आणि त्यांना वंदन कर." |
| जें काय देतील तुजसी । भक्षण करीं वो वेगेंसी । निर्धार धरुनि मानसीं । त्वरित जावें म्हणे विप्र ॥११९॥ | "ते तुला जे काही देतील, ते लगेच खा. वेळ लावू नकोस." |
| ऐसें देखोनि सुषुप्तींत । सवेंचि झाली ते जागृत । कल्पवृक्ष असे अश्वत्थ । कल्पिलें फळ त्वरित होय ॥१२०॥ | "स्वप्न संपल्यावर ती जागी झाली. अश्वत्थ हा खरोखर कल्पवृक्ष आहे, याची तिला प्रचिती आली." |
| सेवा करुनि चवथे दिवशीं । आली आपण मठासी । प्रदक्षिणा करुनि हर्षीं । नमन केलें तये वेळीं ॥१२१॥ | चौथ्या दिवशी सेवा पूर्ण करून ती मठात आली आणि श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. |
| हांसोनियां श्रीगुरुमुनि । फळें देती तिसी दोनी । भक्षण करीं वो संतोषोनि । काम्य झालें आतां तुझें ॥१२२॥ | "श्रीगुरूंनी हसून तिला दोन फळे दिली आणि सांगितले, ""ही आनंदाने खा, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे.""" |
| भोजन करीं वो तूं आतां त्वरित । काम्य होईल तुझें सत्य । कन्या-पुत्र दोघे तूतें । दिल्हे आजि परियेसा ॥१२३॥ | "तू आता जेवण कर. तुला कन्या आणि पुत्र असे दोन्ही संतती लाभतील असा मी आशीर्वाद देतो." |
| पारणें करोनि विधींसीं । मग भक्षावें या फलांसी । दान द्यावें ब्राह्मणांसी । जें काय पूर्वीं निरोपिलें ॥१२४॥ | श्रीगुरूंनी विधीनुसार पारणे करून फळे खाण्यास सांगितले आणि गरिबांना दान देण्यास सुचवले. |
| व्रत संपूर्ण करोनि । केलें दान ते भामिनीं । तेचि दिवशीं अस्तमानी । झाली आपण विटाळशी ॥१२५॥ | तिने व्रत पूर्ण करून दान केले आणि त्याच दिवशी सायंकाळी ६० व्या वर्षी तिला मासिक पाळी आली (विटाळशी झाली). |
| मौन दिवस तीनवरी । भोजन करी हिरवे खापरीं । श्वेत वस्त्र नेसोनि नारी । कवणाकडे न पाहेचि ॥१२६॥ | "तिने तीन दिवस कडक नियम पाळले, मौन धरले आणि कोणाकडेही न पाहता एकांतवास स्वीकारला." |
| येणेंपरी तिन्ही निशी । क्रमिल्या नारीनें परियेसीं । सुस्नात होवोनि चवथे दिवशीं । आली श्रीगुरुचे दर्शना ॥१२७॥ | तीन दिवस पूर्ण झाल्यावर चौथ्या दिवशी स्नान करून ती पुन्हा श्रीगुरूंच्या दर्शनाला आली. |
| पतीसमवेत येऊनि । पूजा करी ती एकाग्रमनीं । श्रीगुरु म्हणती संतोषोनि । पुत्रवंती व्हावें तुम्हीं ॥१२८॥ | पती सोमनाथसह तिने पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. |
| ऐसें नमूनि श्रीगुरुसी । आली आपुल्या मंदिरासी । ऋतु दिधला पांचवे दिवसीं । म्हणोनि कन्या परियेसा ॥१२९॥ | श्रीगुरूंना नमन करून ती घरी आली. गर्भधारणा होऊन तिला पहिली कन्या झाली. |
| येणेंपरी ते नारी । जाहली ऐका गरोदरी । ग्राम सकळ विस्मय करी । काय नवल म्हणतसे ॥१३०॥ | ६० व्या वर्षी ती गर्भवती राहिलेली पाहून संपूर्ण गावाला मोठे नवल वाटले. |
| म्हणती पहा नवल वर्तलें । वांझेसी गर्भधारण केवीं झालें । सोमनाथ विप्र भले । करीतसे आनंद ॥१३१॥ | "पहा काय चमत्कार झाला! वांझ स्त्रीला गर्भ कसा राहिला?" असे लोक म्हणू लागले, तर सोमनाथ आनंदित झाला. |
| सातवे मासीं ओटी भरिती । अक्षय वाणें ओंवाळिती । श्रीगुरुसी विनोदावरी प्रीति । वाणें देवविती कौतुकें ॥१३२॥ | सातव्या महिन्यात तिची ओटी भरली गेली. श्रीगुरूंनीही कौतुकाने तिला वाण देण्यास सांगितले. |
| आठवे मासीं तो ब्राह्मण । करी सीमंतविधान । गुरुनिरोपें संतोषोन । देती वाणें ग्रामांत ॥१३३॥ | आठव्या महिन्यात सीमंतोन्नयन संस्कार झाले आणि श्रीगुरूंच्या आज्ञेने संपूर्ण गावात वाण वाटले. |
| अभिनव करिती सकळही जन । म्हणती वांझेसी गर्भधारण । पांढरे केश म्हातारपण वाणें देती कौतुकें ॥१३४॥ | "पांढरे केश आणि म्हातारपणात ही स्त्री वाण वाटत आहे, हे पाहून लोक आश्चर्याने बोलू लागले." |
| एक म्हणती श्रीगुरुप्रसाद । श्रीनृसिंहमूर्ति भक्तवरद । त्याची सेवा करितां आनंद । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३५॥ | "हा सर्व श्रीगुरूंचाच प्रसाद आहे. त्यांच्या सेवेने चारी पुरुषार्थ प्राप्त होतात." |
| त्रैमूर्तींचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर । भक्तजनां मनोहर प्रगटला भूमंडळीं ॥१३६॥ | "साक्षात दत्तप्रभू नृसिंह सरस्वतींच्या रूपात भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर प्रकट झाले आहेत." |
| ऐसें नानापरी देखा । स्तोत्र करिती गुरुनायका । वाणें देत ते बालिका । अत्योल्हास तिच्या मनीं ॥१३७॥ | लोक श्रीगुरूंची स्तुती करत होते आणि गंगा ब्राह्मणी अत्यंत आनंदाने सर्वांना वाण वाटत होती. |
| वाणें देऊनि समस्तांसी । येऊनि नमी ती श्रीगुरुसी । भक्तवत्सल परियेसीं । अशीर्वचन देतसे ॥१३८॥ | तिने सर्वांना वाण देऊन श्रीगुरूंना नमस्कार केला. भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिला पुन्हा आशीर्वाद दिला. |
| संतोषोनि विप्रवनिता । करी साष्टांग दंडवता । नानापरी स्तोत्र करितां । विनवीतसे परियेसा ॥१३९॥ | आनंदित झालेल्या त्या स्त्रीने साष्टांग नमस्कार करून श्रीगुरूंची स्तुती केली. |
| जय जया परमपुरुषा । तूंचि ब्रह्मा विष्णुमहेशा । तुझें वाक्य जाहलें परीस । सुवर्ण केला माझा देह ॥१४०॥ | "हे परमपुरुषा, तुम्हीच ब्रह्मा, विष्णू, महेश आहात. तुमच्या शब्दांनी माझ्या लोखंडासारख्या देहाचे सोने केले." |
| तूं तारावया विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । त्रैमूर्ति तूंचि होसी । अन्यथा नव्हे स्वामिया ॥१४१॥ | "विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर अवतार घेतला आहे, यात शंका नाही." |
| तुझी स्तुति करावयासी । अशक्य आपुले जिव्हेसी । अपार तुझ्या महिमेसी । नाहीं साम्य कृपासिंधु ॥१४२॥ | "तुमचा महिमा अपार आहे, माझी जीभ तुमची स्तुती करण्यास असमर्थ आहे." |
| येणेंपरी स्तोत्र करुनि । श्रीगुरुचरण वंदूनि । गेली निरोप घेऊनि । आपुले गृहा परियेसा ॥१४३॥ | अशा प्रकारे स्तुती करून आणि दर्शन घेऊन ती आनंदाने घरी परतली. |
| ऐसे नवमास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । समस्त ज्योतिषी येवोनि । वर्तविती जातकातें ॥१४४॥ | नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. ज्योतिषांनी येऊन तिची कुंडली पाहिली. |
| ज्योतिषी म्हणती तये वेळीं । होईल कन्या मन निर्मळी । अष्टपुत्रा वाढेल कुळी । पुत्रपौत्रीं नांदेल ॥१४५॥ | ज्योतिषांनी कुंडलीचे विश्लेषण करून मुलीचे भविष्य सांगितले . "ही मुलगी अत्यंत भाग्यवान असेल, तिला आठ पुत्र होतील आणि ती नातवंडांनी खेळेल." |
| येणेंपरी ज्योतिषीं । जातक वर्तविलें परियेसीं । सोमनाथ आनंदेंसीं । दानधर्म करिता जाहला ॥१४६॥ | हे ऐकून सोमनाथने आनंदाने खूप दानधर्म केला. |
| दहा दिवस क्रमोनि । सुस्नात झाली ते भामिनी । कडिये बाळक घेवोनि । आली श्रीगुरुदर्शनासी ॥१४७॥ | अकराव्या दिवशी स्नान करून ती आपल्या बाळाला कडेवर घेऊन श्रीगुरूंकडे आली. |
| बाळक आणोनि भक्तींसीं । ठेविलें श्रीगुरुचरणापाशीं । नमन करी साष्टांगेंसीं । एकभावेंकरोनियां ॥१४८॥ | तिने बाळाला श्रीगुरूंच्या चरणांवर ठेवले आणि मनोभावे नमस्कार केला. |
| आश्वासोनि श्रीगुरुमूर्ति । उठीं बाळे पुत्रवंती । बहुतपरी संतोषविती । प्रेमभावेंकरोनियां ॥१४९॥ | श्रीगुरूंनी तिला 'पुत्रवती हो' असा पुन्हा आशीर्वाद देऊन धीर दिला. |
| उठोनि विनवी ती श्रीगुरुसी । पुत्र नाहीं आमुचे कुशीं । सरस्वती आली घरासी । बोल आपुला सांभाळावा ॥१५०॥ | ती म्हणाली, "स्वामी, मुलगी (सरस्वती) तर आली, पण पुत्राचा आपला शब्द अजून बाकी आहे." |
| ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन । न करीं मनीं अनमान । तूतें पुत्र होईल ॥१५१॥ | श्रीगुरु हसून म्हणाले, "शंका धरू नकोस, तुला मुलगाही नक्की होईल." |
| म्हणोनि तिये कुमारीसी । कडिये घेती प्रीतींसीं । सांगताति समस्तांसी । तये कन्येचें लक्षण ॥१५२॥ | श्रीगुरूंनी त्या लहान मुलीला प्रेमाने जवळ घेतले आणि सर्वांना तिची लक्षणे सांगू लागले. |
| पुत्र होतील बहु इसी । होईल आपण शतायुषी । पुत्राचे पौत्र नयनेंसीं । पाईल आपण अहेवपणें ॥१५३॥ | "हिला अनेक मुले होतील, ही शंभर वर्षे जगेल आणि नातवंडांचा संसार डोळ्यांनी पाहेल." |
| होईल इसी ज्ञानी पति । त्यातें चारी वेद येती । अष्टैश्चर्यें नांदती । प्रख्यात होवोनि भूमंडळीं ॥१५४॥ | "हिला विद्वान पती मिळेल आणि हिचा संसार ऐश्वर्याने भरलेला असेल." |
| आपण होईल पतिव्रता । पुण्यशील धर्मरता । इची ख्याति होईल बहुता । समस्ता इसी वंदिती ॥१५५॥ | "ही मुलगी अत्यंत पुण्यवान आणि पतिव्रता निघेल, संपूर्ण जगात हिची कीर्ती होईल." |
| दक्षिणदेशीं महाराजा । येईल इचे दर्शनकाजा । आणिक पुत्र होईल तुज । म्हणोनि श्रीगुरु बोलती ॥१५६॥ | "दक्षिण देशाचा राजा हिच्या दर्शनाला येईल. आणि तुला यानंतर मुलगाही होईल." |
| येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । कन्यालक्षण सांगती । विप्रवनिता विनयवृत्तीं । म्हणे पुत्र व्हावा मज ॥१५७॥ | श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीने पुन्हा विनंती केली की मला पुत्र हवा आहे. |
| श्रीगुरु म्हणती तियेसी । पुत्र व्हावा तुज कैसी । योग्य पाहिजे वर्षें तीसी । अथवा शतायुषी मूर्ख पैं ॥१५८॥ | श्रीगुरूंनी विचारले, "तुला कसा मुलगा हवा? जो तीस वर्षे जगणारा विद्वान असेल की शंभर वर्षे जगणारा मूर्ख?" |
| ऐकोनि श्रीगुरुच्या वचना । विनवीतसे ते अंगना । योग्य पाहिजे पुत्र आपणा । तयासी पांच पुत्र व्हावे ॥१५९॥ | ती म्हणाली, "मला विद्वान पुत्र हवा, ज्याला पुढे स्वतःची पाच मुले असतील." |
| भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । वर देती तेणें रीतीं । संतोषोनि घरा जाती । महानंद दंपतीसी ॥१६०॥ | श्रीगुरूंनी तसाच वर दिला. सोमनाथ आणि गंगा आनंदाने घरी गेले. |
| पुढें तिसी पुत्र झाला । वेदशास्त्रीं विख्यात भला । पांच पुत्र तो लाधला । नामकरणी श्रीगुरुचा ॥१६१॥ | आगे तिला पुत्र झाला जो शास्त्रात पारंगत निघाला आणि त्याला पाच मुले झाली. |
| कन्यालक्षण श्रीगुरुमूर्ती । निरोपिलें होतें जेणें रीतीं । प्रख्यात झाली सरस्वती । महानंद प्रवर्तला ॥१६२॥ | श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ती कन्या (सरस्वती) खूप प्रसिद्ध झाली. |
| यज्ञ करी तिचा पति । प्रख्यात नाम ‘दीक्षिती’ । चहूं राष्ट्रीं त्याची ख्याती । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥१६३॥ | तिचा पती 'दीक्षित' नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याने मोठे यज्ञ केले. |
| साठी वर्षें वांझेसी । पुत्र जाहला परियेसीं । सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कृपा श्रीगुरुची ॥१६४॥ | सिद्ध मुनी म्हणतात, "पहा, ६० वर्षांच्या वांझ स्त्रीलाही श्रीगुरूंनी पुत्र दिला. अशी त्यांची कृपा अगाध आहे." |
| निर्धार असे ज्याचे मनीं । त्यासी वर देती तत्क्षण । एकोभावें याकारणीं । भक्ति करावी श्रीगुरुची ॥१६५॥ | ज्याची श्रद्धा पक्की आहे, त्याला श्रीगुरु त्वरित फळ देतात. |
| म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भजा भजा हो श्रीगुरु । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥१६६॥ | ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात की श्रीगुरूंची भक्ती करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. |
| जो भजेल श्रीगुरुसी । एकोभावें भक्तींसीं । त्यासी दैन्य कायसी । जें जें मागेल तें देईल सत्य ॥१६७॥ | जो अनन्य भावाने श्रीगुरूंना शरण जातो, त्याचे दारिद्र्य संपते आणि त्याला हवे ते मिळते. |
| गुरुभक्ति म्हणजे कामधेनु । अंतःकरणीं नको अनुमानु । जें जें इच्छीत भक्तजनु । समस्त देईल परियेसा ॥१६८॥ | "गुरुभक्ती ही साक्षात कामधेनू आहे. मनात कोणतीही शंका न धरता भक्ती करा, सर्व इच्छा पूर्ण होतील." |
| इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्यासंतानप्राप्ति नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥३९॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १६८ ॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ | |