गुरुचरित्र अध्याय त्रेपन्नावा ।५३ वा। मराठी अर्थासह

गुरुचरित्र – अध्याय ५३(त्रेपन्नावा)

॥द्विपंचाशदध्यायसारे अवतरणिका॥

GuruCharitra Chapter Image
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः॥
मूळ ओवी ओवीचा अर्थ
श्रोते व्हावें सावधान । गुरुचरित्राध्याय बावन्न । ऐकोनि नामधारकाचे मन । ब्रह्मानंदीं निमग्न पैं ॥ १ श्रोत्यांनो सावध व्हा. ५२ अध्यायांचे गुरुचरित्र ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात मग्न झाले.
सेवूनि गुरुचरित्रामृत । नामधारक तटस्थ होत । अंगीं घर्मपुलकांकित । रोमांचही ऊठती ॥ २ "गुरुचरित्ररूपी अमृताचे प्राशन केल्यावर नामधारक स्तब्ध झाला, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले."
कंठ झाला सद्गदित । गात्रें झालीं सकंपित । विवर्ण भासे लोकांत । नेत्रीं वहाती प्रेमधारा ॥ ३ "त्याचा कंठ दाटून आला, शरीर थरथरू लागले आणि डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले."
समाधिसुखें न बोले । देह अणुमात्र न हाले । सात्त्विक अष्टभाव उदेले । नामधारक शिष्याचे ॥ ४ "नामधारकाला समाधी लागली, तो हालचाल करेनासा झाला. त्याच्यात सात्त्विक अष्टभाव जागृत झाले."
देखोनि सिद्ध सुखावती । समाधि लागली यासी म्हणती । सावध करावा मागुती लोकोपकाराकारणें ॥ ५ "हे पाहून सिद्धमुनींना आनंद झाला, पण लोकांच्या कल्याणासाठी त्याला पुन्हा देहभानावर आणणे आवश्यक होते."
म्हणोनि हस्तें कुरवाळिती । प्रेमभावें आलिंगिती । देहावरी ये ये म्हणती । ऐक बाळा शिष्योत्तमा ॥ ६ "सिद्धांनी त्याला कुरवाळले, प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले, ""बाळा, आता देहभानावर ये."""
तूं तरलासी भवसागरीं । रहासी ऐसा समाधिस्थ जरी । ज्ञान राईल तुझ्या उदरीं । लोक तरती कैसे मग ॥ ७ "तू तर भवसागर तरला आहेस, पण तू असाच समाधीत राहिलास तर हे ज्ञान जगाला कोण सांगणार?"
याकारणें अंतःकरणीं । दृढता असावी श्रीगुरुचरणीं । बाह्य देहाची रहाटणी । शास्त्राधारें करावी ॥ ८ "अंतःकरणात गुरुचरण धरावेत, पण जगाच्या कल्याणासाठी देहाने कर्म करत राहावे."
तुवां विचारिलें म्हणोनि । आम्हां आठवली अमृताची वाणी । तापत्रयातें करी हानि । ऐशी अनुपम्या प्रगटली ॥ ९ "तुझ्या प्रश्नांमुळे मला ही अमृतासारखी कथा आठवली, जी मानवाचे त्रिविध ताप नष्ट करते."
तुजमुळें आम्हां आठवलें । तुवां आम्हां बरवें केलें । त्वाही एकाग्रत्वें ऐकिलें । आतां हेंच विस्तारीं ॥ १० "तुझ्यामुळे मला हे सर्व आठवले आणि तूही ते एकाग्रतेने ऐकले. आता याचा विस्तार कर."
नामधारका ऐशिया परी । सिद्ध सांगती परोपरी । मग तो नेत्रोन्मीलन करी । कर जोडोन उभा ठाके ॥ ११ सिद्धांच्या बोलण्याने नामधारकाने डोळे उघडले आणि हात जोडून उभा राहिला.
म्हणे कृपेचें तारुं । तूंचि या विश्वास आधारु । भवसागर पैल पारु । तूंचि करिसी श्रीगुरुराया ॥ १२ तो म्हणाला, "स्वामी, तुम्हीच या विश्वाचा आधार आणि भवसागरातून तारून नेणारी नौका आहात."
ऐसें नामधारक विनवीत । सिद्धाचे चरणीं लागत । म्हणे श्रीगुरुचरित्रामृत । अवतरणिका मज सांगा ॥ १३ नामधारकाने सिद्धांच्या चरणी डोके ठेवले आणि विनंती केली की मला आता संपूर्ण ग्रंथाचा सारांश (अवतरणिका) सांगा.
या श्रीगुरुचरितामृतीं । अमृताहूनि परमामृतीं । भक्तजनाची मनोवृत्ति । बुडी देवोनि स्थिरावली ॥ १४ "या गुरुचरित्ररूपी अमृतामध्ये भक्तांचे मन स्थिरावले आहे."
अतृप्त आहे अजूनि । हेचि कथा पुनः सुचवोनि । अक्षयामृत पाजूनि । आनंदसागरीं मज ठेवा ॥ १५ "माझी तहान अजून भागलेली नाही, मला पुन्हा एकदा तो आनंद द्या."
बहु औषधींचें सार काढोन । त्रैलोक्यचिंतामणी रसायण । संग्रह करिती विचक्षण । तैसें सार मज सांगा ॥ १६ "जसे अनेक औषधींचे सार काढून रसायन बनवतात, तसे मला या ग्रंथाचे सार सांगा."
ऐकोनि शिष्याची प्रार्थना । आनंद सिद्धाचिया मना । म्हणती बाळका तुझी वासना । अखंड राहो श्रीगुरुचरित्रीं ॥ १७ सिद्धांना आनंद झाला आणि ते म्हणाले, "तुझी ही गुरुभक्ती अशीच अखंड राहो."
श्रीगुरुचरित्राची ऐका । सांगेन आतां अवतरणिका । प्रथमपासूनि सारांश निका । बावन्नाध्यापर्यंत ॥ १८ "आता मी १ ते ५२ अध्यायांचा सारांश तुला सांगतो, तो ऐक."
प्रथमाध्यायीं मंगळाचरण । मुख्य देवतांचें असे स्मरण । श्रीगुरुमूर्तींचें दर्शन । भक्तांप्रती जाहलें ॥ १९ १ ला अध्याय: मंगळाचरण, देवतांचे स्मरण आणि भक्तांना झालेल्या श्रीगुरुमूर्तींचे दर्शन.
द्वितीयाध्यायीं ब्रह्मोत्पत्ति । चारी युगांचे भाव कथिती । श्रीगुरुसेवा दीपकाप्रती । घडली ऐसें कथियेलें ॥ २० २ रा अध्याय: विश्वाची उत्पत्ती, चार युगांचे धर्म आणि 'दीपक' शिष्याची गुरुसेवा.
नामधारका अमरजासंगमा । श्रीगुरु नेती आपुले धामा । अंबरीष दुर्वास यांचा महिमा । तृतीयाध्यायीं कथियेला ॥ २१ ३ रा अध्याय: अंबरीष आणि दुर्वास यांची कथा आणि विष्णूचे अवतार.
चतुर्थाध्यायीं अनसूयेप्रती । छळावया त्रैमूर्ति येती । परी तियेचे पुत्र होती । स्तनपान करिती आनंदें ॥ २२ ४ था अध्याय: अनसूयेचे सत्व पाहण्यास आलेल्या त्रिमूर्तींना तिने बाळ बनवले आणि दत्तात्रेय अवतार झाला.
पंचमीं श्रीदत्तात्रेय धरी । स्वयें अवतार पीठापुरीं । श्रीपादश्रियावल्लभधारीं । तीर्थयात्रेसी निघाले ॥ २३ ५ वा अध्याय: श्रीपाद श्रीवल्लभांचा पीठापुरात जन्म आणि त्यांची तीर्थयात्रा.
सहाव्यांत लिंग घेउनी । रावण जात गोकर्णीं । विघ्नेश्वरें विघ्न करुनी । स्थापना केली तयाची ॥ २४ ६ वा अध्याय: रावणाने नेलेले आत्मलिंग गणपतीने गोकर्ण येथे स्थापित केले.
गोकर्णमहिमा असंख्यात । रायाप्रती गौतम सांगत । चांडाळी उद्धरली अकस्मात । सातव्या अध्यायीं वर्णिती ॥ २५ ७ वा अध्याय: गोकर्ण महिमा आणि एका चांडाळीचा झालेला उद्धार.
माता पुत्र जीव देत होतीं । तयाप्रती गुरु कथा सांगती । शनिप्रदोष व्रत देती । ज्ञानी करिती अष्टमीं ॥ २६ ८ वा अध्याय: आत्महत्या करणाऱ्या माता-पुत्राला श्रीगुरूंनी शनिप्रदोष व्रताचा महिमा सांगितला.
नवमाध्यायीं रजकाप्रती । कृपाळू गुरु राज्य देती । दर्शन देऊं म्हणती पुढती । गुप्त झाले मग तेथें ॥ २७ ९ वा अध्याय: श्रीगुरूंनी एका रजकाला (धोब्याला) पुढच्या जन्मी राज्य देण्याचे वचन दिले.
तस्करीं मारिला भक्त ब्राह्मण । तस्करां वधिती श्रीगुरु येऊन । ब्राह्मणाला प्राणदान । देती दशमाध्यायांत ॥ २८ १० वा अध्याय: चोरांनी मारलेल्या ब्राह्मणाला श्रीगुरूंनी जिवंत केले.
माधव ब्राह्मण करंजपुरीं । अंबा नामें त्याची नारी । नरसिंहसरस्वती तिचे उदरीं । एकादशीं अवतरले ॥ २९ ११ वा अध्याय: श्रीनृसिंह सरस्वतींचा कारंजा येथे अंबा आणि माधव यांच्या घरी जन्म झाला.
द्वादशाध्यायीं मातेप्रती । ज्ञान कथुनी पुत्र देती । काशी क्षेत्रीं संन्यास घेती । यात्रा करिती उत्तरेची ॥ ३० १२ वा अध्याय: मातेला आत्मज्ञान दिले, संन्यास घेतला आणि उत्तर यात्रा केली.
मातापित्यांतें करंजपुरीं । भेटोनि येती गोदातीरी । कुक्षिव्यथेच्या विप्रावरी । कृपा करिती त्रयोदशीं ॥ ३१ १३ वा अध्याय: पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणावर कृपा केली.
क्रूर यवनाचें करुनि शासन । सायंदेवास वरदान । देती श्रीगुरु कृपा करुन । चौदाविया अध्यायीं ॥ ३२ १४ वा अध्याय: सायंदेवाचे क्रूर यवनापासून रक्षण केले आणि त्याला वर दिला.
पंचदशीं श्रीगुरुमूर्ति । तीर्थें सांगती शिष्यांप्रती । यात्रे दवडूनि गुप्त होती । वैजनाथीं श्रीगुरु ॥ ३३ १५ वा अध्याय: शिष्यांना तीर्थयात्रेला पाठवून श्रीगुरु वैजनाथ येथे गुप्त राहिले.
षोडशीं ब्राह्मण गुरुभक्ति । कथूनि दिधली ज्ञानशक्ति । श्रीगुरु आले भिल्लवडीप्रती । भुवनेश्वरीसन्निध ॥ ३४ १६ वा अध्याय: गुरुभक्तीचा महिमा सांगून श्रीगुरु भिल्लवडीला आले.
भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण । जिव्हा छेदोनि करी अर्पण । त्यास श्रीगुरुंनी विद्या देऊन । धन्य केला सप्तदशीं ॥ ३५ १७ वा अध्याय: आपली जीभ वाहणाऱ्या अडाणी ब्राह्मणाला विद्वान बनवले.
घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा । वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥ ३६ १८ वा अध्याय: एका गरीब ब्राह्मणाच्या घरची घेवड्याची वेल उपटून तिथे त्याला मोहरांचा हंडा दिला.
औदुंबराचें करुनि वर्णन । योगिनींस देऊनि वरदान । गाणगापुरास आपण । एकोनविंशीं श्रीगुरु गेले ॥ ३७ १९ वा अध्याय: औदुंबर वृक्षाचा महिमा सांगून श्रीगुरु गाणगापुरात आले.
स्त्रियेचा समंध दवडून । पुत्र दिधले तिजला दोन । एक मरतां कथिती ज्ञान । सिद्धरुपें विसाव्यांत ॥ ३८ २० वा अध्याय: स्त्रीचा समंध घालवून तिला दोन पुत्र दिले आणि एकाच्या मृत्यूनंतर तिला ज्ञान दिले.
तेचि कथा एकविंशीं । प्रेत आणिलें औदुंबरापाशीं । श्रीगुरु येऊनि तेथे निशीं । पुत्र उठविती कृपाळू ॥ ३९ २१ वा अध्याय: मृत मुलाला औदुंबर वृक्षाखाली जिवंत केले.
भिक्षा दरिद्रयाघरीं घेती । त्याची वंध्या महिषी होती । तीस करुन दुग्धवंती । बाविसाव्यांत वर दिधला ॥ ४० २२ वा अध्याय: एका गरीब ब्राह्मणाच्या भाकड म्हशीला दूध देणारी बनवले.
तेविसाव्यांत श्रीगुरुस । राजा नेई गाणगापुरास । तेथें उद्धरती राक्षस । त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा ॥ ४१ २३ वा अध्याय: गाणगापूरच्या राजाची आणि एका राक्षसाची कथा; त्रिविक्रम भारतींनी केलेली निंदा.
भेटों जाती त्रिविक्रमा । दाविती विश्वरुपमहिमा । विप्र लागे गुरुपादपद्मा । चोविसाव्यांत वर देती ॥ ४२ २४ वा अध्याय: त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा केली.
म्लेंच्छांपुढें वेद म्हणती । विप्र ते त्रिविक्रमा छळती । त्याला घेऊनि सांगातीं । गुरुपाशीं आला पंचविंशीं ॥ ४३ २५ वा अध्याय: उद्धट ब्राह्मणांनी त्रिविक्रमांना छळले आणि वेदांवर वाद घातला.
सव्विसाव्यांत तया ब्राह्मणां । श्रीगुरु सांगती वेदरचना । त्यागा म्हणती वादकल्पना । परी ते उन्मत्त नायकती ॥ ४४ २६ वा अध्याय: श्रीगुरूंनी ब्राह्मणांना वेदरचना समजावली पण त्यांनी ऐकले नाही.
सत्ताविशीं आणोनि पतिता । विप्रांसी वेदवाद करितां । कुंठित करोनि शापग्रस्ता । ब्रह्मराक्षस त्यां केलें ॥ ४५ २७ वा अध्याय: एका दलिताकडून वेद वदवले, ब्राह्मणांचा गर्व हरण केला आणि त्यांना ब्रह्मराक्षस होण्याचा शाप मिळाला.
अष्टाविंशीं तया पतिता । धर्माधर्म सांगोनि कथा । पुनरपि देऊनि पतितावस्था । गृहाप्रती दवडिला ॥ ४६ २८ वा अध्याय: त्या दलिताला धर्माधर्माची कथा सांगून पुन्हा त्याच्या पूर्व स्थितीत पाठवले.
एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव । त्रिविक्रमा कथितां गुरुराव । राक्षसा उद्धरी वामदेव । हा इतिहास तयांतची ॥ ४७ २९ वा अध्याय: भस्माचा महिमा आणि वामदेव ऋषींनी राक्षसाचा केलेला उद्धार.
त्रिंशाध्यायीं पति मरतां । तयाची स्त्री करी बहु आकांता । तीस श्रीगुरु नाना कथा । कथून शांतवूं पाहती ॥ ४८ ३० वा अध्याय: पतीच्या मृत्यूनंतर रडणाऱ्या स्त्रीला कर्माची गती समजावून शांत केले.
एकतिसाव्यांत तेचि कथा । पतिव्रतेचे धर्म सांगतां । सहगमनप्रकार बोधितां । ते स्त्रियेतें जगद्गुरु ॥ ४९ ३१ वा अध्याय: पतिव्रता धर्म आणि सती जाण्याचे शास्त्र समजावले.
सहगमनीं निघतां सती । श्रीगुरुस झाली नमस्कारिती । आशीर्वाद देवोनि तिचा पति । बत्तिसाव्यांत उठविला ॥ ५० ३२ वा अध्याय: सती जाणाऱ्या स्त्रीला 'अष्टपुत्रा सौभाग्यवती' आशीर्वाद देऊन तिच्या पतीला जिवंत केले.
तेतिसाव्यांत रुद्राक्षधारण । कथा कुक्कुटमर्कट दोघेजण । वैश्य- वेश्येचें कथन । करिती रायातें परस्पर ॥ ५१ ३३ वा अध्याय: रुद्राक्ष धारणाचा महिमा. वैश्य आणि वेश्येची कथा.
रुद्राध्यायमहिमा वर्णन । चौतिसाव्यांत निरुपण । राजपुत्र केला संजीवन । नारद भेटले रायातें ॥ ५२ ३४ वा अध्याय: रुद्राभिषेकाचा महिमा आणि मेलेल्या राजपुत्राला जिवंत केले.
पंचत्रिंशत्प्रसंगांत । कचदेवयानी कथा वर्तत । आणिक सोमवारव्रत । सीमंतिनीच्या प्रसंगें ॥ ५३ ३५ वा अध्याय: कच-देवयानी कथा आणि सीमंतिनीचे सोमवार व्रत.
छत्तिशीं ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा । स्त्रियेनें नेलें परान्नभोजना । कंटाळुनी धरिती श्रीगुरुचरणा । त्याला कर्ममार्ग सांगती ॥ ५४ ३६ वा अध्याय: एका ब्राह्मणाला त्याच्या पत्नीने परान्न भोजनास नेले, श्रीगुरूंनी त्याला कर्ममार्ग सांगितला.
सप्तत्रिंशीं नाना धर्म । विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म । प्रसन्न होवोनि वर उत्तम । देती श्रीगुरु तयांतें ॥ ५५ ३७ वा अध्याय: ब्राह्मणांना ब्रह्मकर्माचा आणि आचाराचा बोध केला.
अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण । तिघांपुरतें आणिलें अन्न । जेविले बहुत ब्राह्मण । आणिक गांवचे शूद्रादि ॥ ५६ ३८ वा अध्याय: भास्कर ब्राह्मणाच्या अल्प अन्नातून हजारो लोकांना जेवण दिले.
सोमनाथाची गंगा युवती । साठ वर्षांची वंध्या होती । तीस दिधली पुत्रसंतती । एकुणचाळिसावे अध्यायीं ॥ ५७ ३९ वा अध्याय: साठ वर्षांच्या वंध्या स्त्रीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.
नरहरीकरवीं शुष्क काष्ठा । अर्चवूनि दवडिलें त्याच्या कुष्ठा । शबरकथा शिष्यवरिष्ठां । चाळिसाव्यांत सांगती ॥ ५८ ४० वा अध्याय: वाळलेल्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा कुष्ठरोग बरा झाला.
एकेचाळिसीं सायंदेवा । हस्तें घेती श्रीगुरुसेवा । ईश्वरपार्वतीसंवाद बरवा । काशीयात्रानिरुपण ॥ ५९ ४१ वा अध्याय: सायंदेवाकडून सेवा करून घेतली आणि काशीयात्रेचे फळ सांगितले.
पुत्रकलत्रेंसी सायंदेव । येऊनि करिती श्रीगुरुस्तव । त्याला कथिती यात्राभाव । वरही देती बेचाळिसी ॥ ६० ४२ वा अध्याय: सायंदेवाच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि काशीचे महत्त्व सांगितले.
त्रेचाळिसीं अनंतव्रत । धर्मराया कृष्ण सांगत । तेचि कथा सायंदेवाप्रत । सांगोनि व्रत करविती ॥ ६१ ४३ वा अध्याय: सायंदेवाकडून 'अनंत चतुर्दशी' व्रत करवून घेतले.
चवेचाळिसीं तंतुकार भक्तासी । श्रीपर्वत दावूनि क्षणेसी । शिवरात्रीपुण्यकथा त्यासी । विमर्षण राजाची कथियेली ॥ ६२ ४४ वा अध्याय: तंतुकार भक्ताला एका क्षणात श्रीशैल्य दर्शन घडवले आणि शिवरात्री कथा सांगितली.
पंचेचाळिसीं कुष्ठी ब्राह्मण । आला तुळजापुराहून । त्याला करवूनि संगमीं स्नान । कुष्ठ नासूनि ज्ञान देती ॥ ६३ ४५ वा अध्याय: तुळजापूरच्या नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग बरा केला.
कल्लेश्वर हिपरगे ग्रामास । श्रीगुरु भेटती नरहरी कवीस । आपुला शिष्य करिती त्यास । शेचाळिसीं अध्यायीं ॥ ६४ ४६ वा अध्याय: नरहरी कवींना दर्शन देऊन आपला शिष्य बनवले.
सत्तेचाळिसीं दिवाळी सण । गुरुसी आमंत्रिती सातजण । तितुकीं रुपें धरुनि आपण । गेले मठींही राहिले ॥ ६५ ४७ वा अध्याय: एकाच वेळी सात ठिकाणी सात रूपे घेऊन दिवाळी साजरी केली.
अठ्ठेचाळिसीं शूद्रशेतीं । उसका जोंधळा कापूनि टाकिता । शतगुणें पिकवूनि पुढती । आनंदविलें तयातें ॥ ६६ ४८ वा अध्याय: एका गरीब शेतकऱ्याचे पीक कापून त्याला शंभरपट धान्य दिले.
एकोनपंचाशतीं श्रीगुरुमूर्ति । अमरजासंगममाहात्म्य कथिती । आणिकही तेथें सांगती । कुष्ठ दैवार्जितीं रत्नाबाईचें ॥ ६७ ४९ वा अध्याय: अमरजा संगमाचे महत्त्व आणि रत्नाबाईचा कुष्ठरोग बरा केला.
म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती । भक्तीस्तव त्याचे नगरा जाती । पुढें श्रीपार्वतीं भेटों म्हणती । पन्नासावे अध्यायीं ॥ ६८ ५० वा अध्याय: यवन राजाची व्याधी बरी केली आणि त्याच्या नगरीला भेट दिली.
एकावन्नबावन्नांत गुरुमूर्ति । देखूनिया क्षितीं पापप्रवृत्ति । उपद्रवितील नाना याती । म्हणोनि गुप्तरुपें रहावे ॥ ६९ ५१-५२ अध्याय: जगातील वाढते पाप पाहून श्रीगुरु गुप्त रूपाने राहण्याचा निर्णय घेतात.
ऐसा करुनि निर्धार । शिष्यांसी सांगती गुरुवर । आजि आम्ही जाऊं पर्वतावर । मल्लिकार्जुनयात्रेसी ॥ ७० श्रीगुरूंनी ठरवले की आता आपण श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाच्या यात्रेला जावे.
ऐसें ऐकूनि भक्तजन । मनीं होती अतिउद्विग्न । शोक करिती आक्रंदोन । श्रीगुरुचरणीं लोळती ॥ ७१ हे ऐकून भक्त अत्यंत दुःखी झाले आणि रडू लागले.
इतुकें पाहुनी गुरुमूर्ति । वरद हस्तें तयां कुरवाळिती । मद्भजनीं धरा आसक्ति । मठधामीं राहोनिया ॥ ७२ श्रीगुरूंनी भक्तांचे सांत्वन केले आणि सांगितले की तुम्ही मठात राहून माझी भक्ती करा.
ऐसें बोधूनि शिष्यांसी । गुरु गेले कर्दळीवनासी । नाविकमुखें सांगूनि गोष्‍टीसी । निजानंदीं निमग्न होती ॥ ७३ अशा प्रकारे शिष्यांना बोध करून श्रीगुरु कर्दळीवनात गेले आणि नावाड्याच्या मुखाने निरोप पाठवून निजानंदात निमग्न झाले.
ऐसें अपार श्रीगुरुचरित्र । अनंत कथा परम पवित्र । त्यांतील बावन्न अध्यायमात्र । प्रस्तुत कथिलें तुजलागीं ॥ ७४ "श्रीगुरूंचे चरित्र अपार आहे, त्यातील अनंत पवित्र कथांपैकी ५२ अध्याय मी तुला सांगितले आहेत."
सिद्ध म्हणे नामधारका । तुज कथिली अवतरणिका । श्रीगुरु गेले वाटती लोकां । गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥ ७५ "सिद्धमुनी म्हणतात, ""हे नामधारका, ही संपूर्ण सारांशरूपी अवतरणिका आहे. लोकांना वाटते की श्रीगुरु गेले, पण ते आजही गाणगापुरात गुप्त रूपाने आहेत."""
कलियुगीं अधर्म वृद्धि पावले । म्हणोनि श्रीगुरु गुप्त झाले । भक्तजनाला जैसे पहिले । तैसेच भेटती अद्यापि ॥ ७६ "कलियुगात अधर्म वाढल्यामुळे ते गुप्त झाले असले, तरी आजही ते भक्तांना पूर्वीप्रमाणेच दर्शन देतात."
हे अवतरणिका सिद्धमाला । श्रीगुरु भेटती जपे त्याला । जैसा भावार्थ असे आपुला । तैशीं कार्यें संपादिती ॥ ७७ "ही अवतरणिका म्हणजे सिद्धांची माळ आहे. जो कोणी हिचा जप करेल, त्याला त्याच्या श्रद्धेनुसार फळ लाभेल."
नामधारका शिष्य भला । अवतरणिकेचा प्रश्न केला । म्हणोनि इतिहाससारांशाला । पुनः वदलों सत्‌शिष्या ॥ ७८ " तू चांगला शिष्य आहेस, तुझ्या प्रश्नामुळेच मला हा सारांश पुन्हा सांगता आला."
पूर्वीं ऐकिलें असेल कानीं । त्यातें तात्काळ येईल ध्यानीं । इतरां इच्छा होईल मनीं । श्रीगुरुचरित्रश्रवणाची ॥ ७९ "ज्यांनी आधी चरित्र ऐकले आहे, त्यांना हा सारांश ऐकून सर्व आठवेल आणि इतरांना संपूर्ण ग्रंथ ऐकण्याची इच्छा होईल."
ऐसी ही अवतरणिका जाण । तुज कथिली कथांची खूण । इचें सतत करितां स्मरण । कथा अनुक्रमें स्मरतसे ॥ ८० ही अवतरणिका कथांची ओळख आहे. याचे स्मरण केल्याने संपूर्ण गुरुचरित्र डोळ्यासमोर उभे राहते.
ऐसें वदे सिद्धमुनि । नामधारक लागे चरणीं । विनवीतसे कर जोडोनि । तुझे वचनें सर्व सिद्धि ॥ ८१ सिद्धमुनींचे बोलणे ऐकून नामधारक त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, "तुमच्या शब्दांनीच मला सर्व सिद्धी प्राप्त झाली."
आतां असे विनवणी । श्रीगुरुसप्ताहपारायणीं । किती वाचावें प्रतिदिनीं । हें मज सांगा श्रीगुरुराया ॥ ८२ "आता मला श्रीगुरुचरित्राच्या सात दिवसांच्या पारायणाची (सप्ताह) पद्धत आणि दररोज किती वाचावे, हे सांगा."
सिद्ध म्हणती नामधारका । तुवां प्रश्न केला निका । परोपकार होईल लोकां । तुझ्या प्रश्नेंकरुनिया ॥ ८३ सिद्ध म्हणाले, "तू चांगला प्रश्न केलास, यामुळे लोकांचे कल्याण होईल."
अंतःकरण असतां पवित्र । सदाकाळ वाचावें गुरुचरित्र । सौख्य होय इहपरत्र । दुसरा प्रकार सांगेन ॥ ८४ "मन पवित्र असेल तर गुरुचरित्र कधीही वाचावे, त्याने सुख मिळते. आता सप्ताहाची विशेष पद्धत सांगतो."
सप्ताह वाचावयाची पद्धति । तुज सांगों यथास्थिति । शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं । सप्ताह करितां बहु पुण्य ॥ ८५ शास्त्राप्रमाणे शुचिर्भूत होऊन पारायण केल्यास मोठे पुण्य मिळते.
दिनशुद्धि बरवी पाहून । आवश्यक स्नानसंध्या करुन । पुस्तक वाचावयाचें स्थान । रंगवल्लयादि शोभा करावी ॥ ८६ "चांगला दिवस पाहून, स्नान-संध्या आटोपून, वाचनाची जागा रांगोळीने आणि फुलांनी सुशोभित करावी."
देशकालादि संकल्प करुन । पुस्तकरुपीं श्रीगुरुचें पूजन । यथोपचारें करुन । ब्राह्मणांसही पूजावे ॥ ८७ संकल्प करून ग्रंथाची श्रीगुरु रूपात पूजा करावी आणि ब्राह्मणांचा सन्मान करावा.
प्रथम दिवसापासोन । बसावया असावें एक स्थान । अतत्त्वार्थभाषणीं धरावें मौन । कामादि नियम राखावे ॥ ८८ "पारायणाचे सातही दिवस एकाच जागी बसावे, मौन पाळावे आणि संयम राखावा."
दीप असावे शोभायमान । देवब्राह्मणवडिलां वंदून । पूर्वोत्तरमुख करुन । वाचनीं आरंभ करावा ॥ ८९ "दिवा लावून, देव आणि मोठ्यांना नमस्कार करून, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचन सुरू करावे."
नवसंख्या अध्याय प्रथम दिनीं । एकविंशतीपर्यंत द्वितीय दिनीं । एकोनत्रिंशा तृतीय दिनीं । चतुर्थदिवशीं पस्तीस ॥ ९० १ ला दिवस: १ ते ९ अध्याय; २ रा दिवस: १० ते २१ अध्याय; ३ रा दिवस: २२ ते २९ अध्याय; ४ था दिवस: ३० ते ३५ अध्याय.
अडतीसपर्यंत पांचवे दिनीं । त्रेचाळिसवरी सहावे दिनीं । सप्तमीं बावन्न वाचोनि । अवतरणिका वाचावी ॥ ९१ ५ वा दिवस: ३६ ते ३८ अध्याय; ६ वा दिवस: ३९ ते ४३ अध्याय; ७ वा दिवस: ४४ ते ५२ आणि नंतर अवतरणिका.
नित्य पाठ होता पूर्ण । करावें उत्तरांगपूजन । श्रीगुरुतें नमस्कारुन । उपहार कांहीं करावा ॥ ९२ रोज वाचन पूर्ण झाल्यावर पूजा करून देवाला नैवेद्य दाखवावा.
या प्रकारें करावें सप्तदिन । रात्रीं करावें भूमिशयन । सारांश शास्त्राधारें करुन । शुचिर्भूत असावें ॥ ९३ सातही दिवस जमिनीवर झोपावे आणि पूर्णपणे पवित्र राहावे.
एवं होतां सप्तदिन । ब्राह्मणसुवासिनीभोजन । यथाशक्ति दक्षिणा देऊन । सर्व संतुष्ट करावे ॥ ९४ सात दिवसांनंतर ब्राह्मण आणि सुवासिनींना जेवण देऊन यथाशक्ती दान द्यावे.
ऐसें सप्ताह अनुष्ठान । करितां होय श्रीगुरुदर्शन । भूतप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ॥ ९५ "अशा प्रकारे सप्ताह केल्यास श्रीगुरूंचे दर्शन होते आणि सर्व संकटे, बाधा दूर होऊन सौख्य लाभते."
ऐसें सिद्धांचें वचन ऐकोनि । नामधारक लागे चरणीं । म्हणे बाळाची आळी पुरवोनि । कृतकृत्य केलें गुरुराया ॥ ९६ सिद्धांचे वचन ऐकून नामधारकाने कृतज्ञता व्यक्त केली.
श्रोते म्हणती वंदूनि पायीं । श्रीगुरु केली बहु नवलाई । बाळका अमृत पाजी आई । तैसें आम्हां पाजिलें ॥ ९७ "श्रोते म्हणतात की, जशी आई बाळाला दूध पाजते, तसे तुम्ही आम्हाला हे ज्ञानरूपी अमृत पाजले."
प्रति अध्याय एक ओंवी । ओंविली रत्नमाळा बरवी । मनाचे कंठीं घालितां पदवी । सर्वार्थाची पावती ॥ ९८ "प्रत्येक अध्यायाचे सार असलेली ही ओवींची रत्नमाळा जो धारण करेल, त्याला सर्व काही प्राप्त होईल."
सिद्धांचें वचन रत्नखाणी । त्यांतूनि नामधारक रत्नें आणी । बावन्न भरोनि रांजणीं । भक्तयाचका तोषविलें ॥ ९९ सिद्धांच्या शब्दांच्या खाणीतून नामधारकाने ही ५२ रत्ने आणून भक्तांना तृप्त केले आहे.
किंवा सिद्ध हा कल्पतरु । नामधारकें पसरिला करु । यांचा करोनि परोपकारु । भक्तांकरितां बहु केला ॥ १०० सिद्धमुनी कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि नामधारकाने त्यांच्याकडून हे ज्ञान मिळवून लोकांचे भले केले आहे.
किंवा सिद्धमुनि बलाहक । नामधारक शिष्य चातक । मुख पसरोनि बिंदु एक । मागतां अपार वर्षला ॥ १०१ सिद्धमुनी ढगासारखे आहेत आणि नामधारकाय चातकासारखा आहे. एका थेंबाच्या आशेने त्याने मुख पसरले आणि सिद्धांनी ज्ञानाचा वर्षाव केला.
तेणें भक्तां अभक्तां फुकाचा । सकळां लाभ झाला अमृताचा । ह्रदयकोशीं खळजनांचा । पाषाण समयीं पाझरे ॥ १०२ "या अमृताचा लाभ सर्वांना झाला आहे, यामुळे दुष्टांचे हृदयही पाघळेल."
श्रीगुरुरायाचे धरुं चरण । सिद्धमुनीतें करुं वंदन । नामधारका करुं नमन । ऐसें करीं नारायण ॥ १०३ "आम्ही श्रीगुरूंच्या चरणी, सिद्धमुनींना आणि नामधारकाला वंदन करतो."
श्रीगुरुरुपी नारायण । विश्वंभरा दीनोद्धारणा । आपणा आपुली दावूनि खुणा । गुरुशिष्यरुपें क्रीडसी ॥ १०४ "श्रीगुरु हेच नारायण आहेत, जे दीनदुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी गुरु-शिष्याच्या रूपात लीला करतात."
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु । शुभं भवतु । ओवीसंख्या ॥१०४॥ श्रीगुरुचरित्रं समाप्तं । एकंदर ओवीसंख्या ॥७३८५॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

गुरुचरित्र अध्याय पहिला 👈

👆श्री गुरुचरित्रातील पहिला अध्याय वाचण्यासाठी क्लिक करा.

52 श्लोकी गुरुचरित्र 👈

👆वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form